बालिका वधू - विवाहाचा कच्चा धागा..
भाग:-४
इकडे सावीच्या घरी प्रशांत येणार असल्याचा निरोप आला. म्हणून त्याच्या स्वागताची जंगी तयारी चालू केली. सावी तर खूपच खूश होती. मस्त तयार होऊन आपल्या भावी सुखी स्वप्नांच्या दुनियेत ती बागडत होती. काय बोलायचं, कसं बोलायचं यासाठी मनात शब्दांची जुळवाजुळव करत स्वप्नांचे मनोरे रचत होती.
'हे कसे दिसत असतील? किती वर्षाने भेटतोय आम्ही? खूप मोठे साहेब झालेत असं ऐकलयं, कसला भारी रूबाब असेल ना त्यांचा, असे एक ना अनेक प्रश्नांची भट्टी तिच्या मनात जमली होती; पण तिला बिचारीला हे कुठे ठाऊक होतं की तिच्या सर्व स्वप्नांना सुरंग लागणार होता. स्वप्नांचे मनोरे कोसळणार होते. ज्याची ती इतकी आतुरतेने वाट पाहत होती. तोच तिच्या सर्व स्वप्नांना पायदळी तुडवणार होता. तिच्या आयुष्यात ती पुढे काय घडणार, काय वादळ येणार यापासून ती अनभिज्ञ होती.
दारात गाडीचा आवाज येताच जावयाच्या स्वागताची लगबग सुरू झाली ; पण प्रशांत मात्र घमंडीत होता.
"माझ्याकडे जास्त वेळ नाही, मामा. मी सरळ मुद्द्याच बोलतो. मला तुमच्या मुलीला नांदवायच नाही." प्रशांत न बसताच उभ्यानेच स्पष्ट शब्दांत तुच्छतेने पाहत म्हणाला.
हे ऐकून तर राजारामला धक्काच बसला आणि ते धक्क्यातून सावरत म्हणाले," हे काय बोलताय तुम्ही, जावईबापू?"
"योग्य तेच बोलतोय मी; पण मला तुमच्या मुलीबद्दल बरंच काही कळलंय, तिची काय काय थेर चालू आहेत बाहेर ते. " प्रशांत ओठ तिरपे करत म्हणाला.
"नाही जावईबापू, तुमचा काही तरी गैरसमज झालाय." राजारामाला खरं तर खूप राग आला होता. तरी ते रागावर संयम राखत शांतपणे म्हणाले.
"हं..गैरसमज नाही, मामा. खरं तर मी आधीचं यायला हवं होत, हे सांगण्यासाठी.. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जाऊ दे. मला जे बोलायचं होत ते मी बोललो. येतो मी." प्रशांत गुर्मीने म्हणाला आणि जाऊ लागला.
"नाही, नाही अस काहीबाही बोलू नका, हो. तुमच्या वाटेकडे खूप आस लावून बसलीय हो, पोर. असं काही नका हो करू." ते लेकीसाठी गयावया करू लागले ; पण प्रशांत जणू निर्णय घेऊनच आलेला. त्याला त्यांच्या गयावया केल्याने आसुरी आनंद मिळत होता.
"गपा हो, उगीचच साळसूदपणाचा आव आणू नका, तुम्हीच कारणीभूत आहात तिच्या अशा वागण्याला, वेळीच लगाम घालता आलं नाही तुम्हाला आणि अशी चारित्र्यहिन मुलगी माझ्या गळ्यात बांधताय. लाज नाही वाटतं तुम्हाला." प्रशांत उद्गिन होऊन म्हणाला.
राजारामांचा संयमाचा बांध फुटला. ते गरजले," बास जावयबापू, खूप बोलतात तुम्ही. काय बोललात? हा..चारित्र्यहिन, माझ्या सावीबद्दल अशी बोलायची हिम्मत कशी झाली तुमची? तुमच्या जागी दुसरं कोणी असलं असतं ना तर जीभ हासडून हातात दिली असती. गंगेसारख्या माझ्या पवित्र लेकीवर असे घाणेरडे आरोप लावताना काहीच वाटत नाही का तुम्हाला?"
"हे पाहा.."असं अजून काही बोलणार तोच काही तरी पडल्याचा आवाज आला.
"सावी..ऽऽ" असे मोठ्याने ओरड्याचा आवाज आला. सगळे त्या दिशेला धावले. सावी खाली पडली होती. कदाचित तिने सगळं बोलणं ऐकलं होतं आणि तिला ते सहन झाल नव्हतं.
तिच्या घरी आज प्रशांत येणार म्हणून तिचा मावस भाऊ सुमित आलेला होता. त्याने तिला उचलून बेडवर ठेवलं.
तिचे आई जी इतका वेळ प्रशांतचं बोलणं ऐकून किती तरी संयम बाळगला होता तो सुटला आणि तरातरा जाऊन तिने प्रशांतच्या दंडाला धरून खेचलं,"झालं का आता तुमचं समाधान, माझी मुलगी अशी तशी वाटली काय तुम्हाला, खूप ऐकून घेतलं, बास आता. तुम्हाला नको आहे ती. मग स्पष्ट सांगायचे ना. का उगीच बिनबुडाचे आरोप लावताय? जा निघा इथून; पण कान खोलून ऐका. माझ्या सावीला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला ! "जोरात ओरडून त्या बोलू लागल्या. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते.
तेवढ्यात सुमित तिला समजावत म्हणाला, "मावशी, जाऊ दे ना. आता वेळ नाही हे बोलण्याची, ह्या माणसाला सोड, आपल्या सावीकडे पाहा. नंतर बघू आपण काय करायचं ते?"
तस त्या रागात प्रशांतला पाहत सावीकडे गेली.
"हे बघा, भाऊजी, खरं तर आता भाऊजी म्हणण्याचा मानही तुम्ही गमवलाय. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. निघा आता. गावाच्या पंचासमोर निर्णय होईल आता." सुमित बाहेरचा रस्ता दाखवत रागाने म्हणाला.
"एकदा सांगितले तुला ही समजलं नाही वाटतं, ठीक आहे, तुम्हाला तुमची अब्रू वेशीवर टांगायची खूपच हौस आहे ना, पंचासमोर बेआब्रू व्हायचंही आहे वाटत. मग तयार राहा."तो ही चुटकी वाजवत गुर्मीत म्हणाला आणि रागात निघून गेला. घरी न जाताच तो शहरातल्या त्याच्या घरी निघून गेला.
क्रमशः
काय होईल पुढे? प्रशांतचे भांडे उघडे पडेल की तो सावीवरील आरोप सिद्ध करण्या यशस्वी होईल?
©️ जयश्री शिंदे
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
