Login

बालिका वधू- विवाहाचा कच्चा धागा..(भाग-३)

बाल विवाह झालेल्या सावीची कथा..

बालिका वधू- विवाहाचा कच्चा धागा..

भाग:-३

धुमधडाक्याने लग्न सोहळा पार पडला. सावी आता माने घराण्याची कुलवधू बनून आली. थाटामाटात तिचा गृहप्रवेश झाला. छोट्या घरात राहलेली सावी आता महालासारख्या घरात आली. ते घर बघून ती हरखूनच गेली. असं घर ती पहिल्यांदा पाहत होती. तिची सासू खूपच प्रेमळ होती. पण आजेसासू म्हणजे प्रशांतची आजी थोड्या जुन्या विचारांची, रूढी, परंपरांना जपणारी, शकुन अपशकुन मानणारी होती.

देवावर तर भलतीच श्रद्धा, स्वभाव एकदम कडक, बोलणं जहाल. हम करे सो कायदा असच त्यांचा रूबाब होता. बिचारी सावी त्यांना खूपच दबकून असायची. प्रशांत आजीचा खूप लाडका नातू होता.

आजींचे खूप सारे नियम होते. ते सर्वांना मान्यच कराव लागायचं.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी प्रशांत शिकण्यासाठी शहरात गेला. खरं तर त्याला ही यातलं जास्त काही कळलच नव्हतं, बस्स, लग्न झालं. त्याचे आजोबा सतत आजारी असायचे त्यांच्या इच्छेखातर हे लग्न लवकर झालेल होतं.

सगळे काही ठीक चाललेलं होतं. सावी ही बऱ्यापैंकी त्या घरात रूळली होती. सगळे नियम, रितीभाती समजून घेऊन वागत होती. शिकायची इच्छा असूनही ती शिकू शकली नाही त्याचं कारण म्हणजे तिची आजीसासू.

त्यांच म्हणणं होत की लग्न झालं की चूल अन् मूल एवढंच मुलींच्या आयुष्यात असतं. बाईची जात आहे कशाला शिकवायची? सदाशिवचेही त्यांच्या समोर काही चालत नसे.

काही बोलायला गेलं की सगळं घर डोक्यावर घेऊन त्यांचा आकांडतांडव सुरू व्हायचा. आई आहे म्हणून आणि त्यांचा वयाचा मान ठेवून कोणी काही बोलत नसायचे.

काही वाईट घडलं की त्या नेहमी सावीला दोष द्यायच्या. त्यातच प्रशांतच्या आजोबांना देवाज्ञा झाली. मग तर काय आजीने कहरच केला. या अपशकुनी पोरीमुळे प्रशांतचे आजोबा गेले. हिला या घरात थारा नाही. त्यांनी लगेच सुनावले.

राजाराम आणि त्याच्या पत्नीने नाना तऱ्हेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्या काही ऐकतच नव्हत्या. एक तर या घरात ती राहिल नाही तर मी अशी जणू त्यांनी धमकीच दिली.

"काही दिवस तिला तिच्या माहेरी पाठवू. आईचा राग शांत झाला की नंतर तिची समजूत काढून परत आणू." असा विचार सदाशिवने मनात केला.

त्यामुळे सावीला तिच्या आईवडिलांकडे पाठवण्यात आले. तिला काही दिवस राहू दे इथे. प्रशांतचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीला लागला की आम्ही मानाने सावीला परत घेऊन जाऊ. तो पर्यंत आईचा राग जाईल असे बोलून सदाशिव सावीला तिच्या माहेरी सोडून आले.

वर्षामागून वर्ष सरून गेली. सावी आता २० वर्षांची झाली. आधीपेक्षा ही ती छान दिसू लागली. इकडे प्रशांतच ही शिक्षण पूर्ण झालं आणि चांगल्या पदावर तो नोकरीला लागला. एवढ्या वर्षात दोघांची ना भेट झाली ना बोलणं झालं.

प्रशांत तर त्याचं लग्न झालंय हे विसरला होता. त्याने शहरातच एका मुलीच्या प्रेमात पडून लग्न ही केलेलं होतं; पण दोन्हीही परिवाराला त्याची कानोकान खबर लागू दिली नाही.

कधी मधी तो गावी यायचा पण सावीबद्दल तो कधीच जाणून घ्यायचा नाही. कधी विषय निघाला तरी तो काही तरी कारण देऊन टाळायचा. नंतर तर तो अभ्यास, नोकरी याचे कारण सांगून घरी येतच नव्हता.

पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला अचानकच तातडीने बोलावून घेतलं. तो घरी आला तर त्याला बोलवण्याचं कारण कळलं. खूपच चिडला तो कारण सदाशिवने सावीला घरी आणण्यासाठी त्याला बोलावले होते.

"सावी तुझी बायको आहे, प्रशांत. अजून किती दिवस ती माहेरी राहिलं? तू तिला तुझ्या सोबत शहरात घेऊन जा." सदाशिवने फरमान सोडले‌.

त्याला मात्र तिच्यात अजिबात रस नव्हता. मुळात लहानपणी लग्न झाले हे त्याला पटले नव्हते. सदाशिव तसे न सांगता तो म्हणाला," माझे तिथे भागत नाही. मग तिला कसं पोसू? दुसऱ्या ठिकाणी जास्त पगाराची नोकरी शोधतोय. ती नोकरी मिळाली की बघू"

खरं तर तिला न्यायला टाळाटाळ करत होता आणि दुसरे कारण म्हणजे त्याला दुसऱ्या लग्नाबद्दल कळू द्यायचं नव्हतं आणि सावीला तर मुळीच न्यायच नव्हतं.

"ठीक आहे. मग तिला भेटून तर ये. हवं तर नंतर घेऊन जा पण आता आलाच आहेस तर भेट घेऊन जा." ते म्हणाले.

तो कसा बसा तयार झाला; पण त्याच्या मनात मात्र वेगळंच खूप काही शिजत होतं.

क्रमशः

काय शिजत होतं त्याच्या डोक्यात?

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →