बालिका वधू- विवाहाचा कच्चा धागा..(लघुकथा)
भाग:- १
ती खाली मान घालून बसली होती.
तिचे वडील हात जोडून त्याला आर्जव करत होते,“ माझी लेक पवित्र आहे. तिचं पाऊल कधीच वाकडं पडलं नाही. तुमचा काही तरी गैरसमज झालाय. घेऊन जा तिला. नांदवा माझ्या लेकीला. तुम्ही जसे समजतात तशी ती बिलकूल नाही. तशी असती तर का तिने इतकी वर्षे तुमची वाट पाहण्यात घालवली असती?”
ते अगदी अगतिक होऊन बोलत होते; पण समोरच्या व्यक्तीला जरा ही पाझर फुटला नाही. त्याचा नकाराचा पाढा चालूच होता. तो पुढे काही ऐकून न घेता तिच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकून झापझाप पावले टाकत निघून गेला. तो हतबल पिता मात्र त्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीला पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता.
ती मात्र अगदी शून्यात नजर लावून तशीच बसून राहिली. गावाच्या पंचालाही काही करता आले नाही. सगळे निघून गेले. उरले ते बापलेक. बापाचं ते मन हळवं होऊन बरसत होतं.
का आपण लेकीचं आयुष्य पणाला लावलं? म्हणून स्वतःलाच ते कोसत होते. गुडघ्यावर बसलेले ते स्वतःला सावरत उठले, ती बसलेली त्या ठिकाणी येऊन तिला दोन्ही खांद्यांना धरून उठवलं.
“उठ पोरी, चल घरी जाऊ. माफ करं गं, तुझ्या या अभागी बापाला. तुझं घर वसवू शकलो नाही मी.” असे म्हणत रडत त्यांनी तिला गळ्याशी लावून घेतलं.
ती मात्र एकदम चुपचाप झाली होती. जणू तिचं सगळं अस्तित्व, तिचा जीव कोणीतरी हिरावून घेतल्यासारखे ती पुतळा बनली होती. ते तसेच तिला घरी घेऊन आले.
तिची अवस्था पाहून सगळ्यांना कळून चुकले की गावाच्या पंचासमोर काय झाले असेल? तिची आईही आता तोंडाला पदर लावून रडू लागली. आपणच आपल्या लेकीच्या या अवस्थेला जबाबदार आहेत असच त्या माऊलीला वाटलं.
ती म्हणजे सावी राजाराम पवार. दिसायला बऱ्यापैंकी, नाकीडोळी छानच, गव्हाळ रंगाची, लांब रेशमी केस, सुसंस्कृत, सालस पण थोडी कमी शिकलेली. नेहमी हसतमुख, बडबडी असणारी सावी आजच्या घटनेने पूर्ण कोडमोडून गेली.
आपल्याच नवऱ्याने आपल्याबद्दल असे आरोप लावावं, लांछन लावावं, तेही पंचासमोर हे तिच्या मनाला घाव करून गेलं. सगळे जरी तरी तिला ओळखत होते, तिच्याबद्दल समजून सांगत होते, तरीही कोणाचही न ऐकून घेता तो निघून गेला होता. आता तिला गहिवरून आलं आणि ती धाय मोकलून रडू लागली. तिचं ते आर्त रडणं आईबापाचं काळीज चिरून टाकत होतं .
रडून रडून जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिला पंचासमोर झालेली घटना आठवली. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ज्याची इतकी वर्षे आतुरतेने वाट पाहली. त्याच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार तिच्या मनाने केला नव्हता किंबहुना येऊ दिलाच नव्हता. त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली तोच असे नकारून गेला. नुसतं नाकारले असते तर एवढं त्रास झाला नसता; पण तो तर तिच्या चारित्र्यावर ही बोट ठेवून, नाही नाही ते आरोप लावून गेला होता. हा तोच होता तिचा पती प्रशांत. आता तिला भूतकाळातले ते दिवस आठवले.
क्रमशः
काय झालं होतं सावीच्या भूतकाळात?
©️ जयश्री शिंदे
