बाळंतपण भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" सूनबाई, ही प्लेट आत घेऊन जा. " रमाबाई हॉलमधून टी. व्ही. पाहतच ओरडून मनीषाला सांगत होत्या.
मनीषा सहा महिन्यांची गर्भवती किचन मधून बाहेर आली आणि टीपॉय वरची प्लेट उचलून आत नेऊ लागली. तोच रमाबाई परत म्हणाल्या, " दुपारी जेवणात ज्वारीची भाकरी, पिठलं आणि मसालेभात कर. "
" आई, रखमाबाई येतील इतक्यात त्यांना सांगते मी बनवायला सर्व. " मनीषा कपाळावरचा घाम पुसत म्हणाली.
" कालच मी रखमाबाईंना ' उद्यापासून येऊ नका.' म्हणून सांगितलं आहे. तेव्हा तू बनवायला घे. " रमाबाई टी. व्ही वरची नजर न हलवता म्हणाल्या.
" का ? का सांगितलत त्यांना येऊ नका म्हणून ? " मनीषाने आश्चर्याने विचारलं.
" का म्हणजे ? तू काय करणार मग ? सर्व कामांना बाई लावून ठेवली आहेस. या अवस्थेत अंगाची हालचाल हवी. तू सदाकदा आराम करत असतेस. " रमाबाई रागाने म्हणाल्या.
" आई अहो डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली आहे. म्हणून तर एवढ्या सर्व कामाला बाई लावली आहे. " मनीषा त्यांना समजावत म्हणाली.
" डॉक्टर काही पण सांगतात. त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायची नसते. आम्हांला पण मुलं झाली आहेत. अनुभव आहे मला. म्हणून सांगतेय. चल पटापट काम करायला सुरुवात कर. " रमाबाई म्हणाल्या.
" आई मला ज्वारीची भाकरी आणि पिठलं नाही पचत. ज्वारीच्या भाकरीने बाथरूमला त्रास होतो आणि पिठल्याने मला गॅस होतो. " मनीषा हळू आवाजात म्हणाली.
" ठीक आहे. माझ्यासाठी हेच बनव आणि तुला हवं ते तुझ्यासाठी बनवून घे. " असं म्हणत त्यांनी परत टी. व्ही वर लक्ष केंद्रित केलं.
म्हणजे आता मनीषाला जास्तीचा स्वयंपाक बनवायचा होता.
मनीषाला खूप थकल्यासारखं वाटत होत. चक्कर येत होती. पण सासूबाईंना त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. रमाबाई आणि भास्करराव ( सासरे ) गावी राहत होते. तर मनीषा आणि केतन शहरात. सर्व व्यवस्थित सुरु होत.
मनीषाला खूप थकल्यासारखं वाटत होत. चक्कर येत होती. पण सासूबाईंना त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. रमाबाई आणि भास्करराव ( सासरे ) गावी राहत होते. तर मनीषा आणि केतन शहरात. सर्व व्यवस्थित सुरु होत.
मनीषाला दिवस गेले. सुरुवातीला चार महिने छान गेले पण नंतर मनीषाला त्रास होऊ लागला. म्हणून डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी चेकअप करून तिला मेडिसिन दिल्याच पण सक्तीची बेडरेस्ट सुद्धा सांगितली. मनीषा - केतन दोघे कमावते होते. त्यामुळे त्यांनी सर्व कामांना बाई लावली तर मनीषाने ऑफिसमध्ये आवेदन करून वर्क फ्रॉम होम करून घेतलं. एवढं असूनही केतनला मनीषाजवळ सारखं कोणीतरी असावं असं वाटायचं म्हणून त्याने गावावरून रमाबाईंना बोलावलं होत. सर्व कामांना, स्वयंपाकाला बाई होतीच. फक्त मनीषावर देखरेख होईल. आणि काही तातडीची गरज लागली तर कोणीतरी सोबत असावं म्हणून.
पण इथे रमाबाई घरी आल्यापासून घराचं चित्रच पालटलं होत. त्यांनी एक एक करत सर्व काम मनीषाकडून करून घ्यायला सुरुवात केली. आता तर बाई पण काढून टाकली. मनीषाला कळत नव्हतं की सासूबाई आपल्यावर देखरेख ठेवायला, आपलं गर्भारपण सांभाळायला आल्या आहेत की त्रास दयायला ?
संध्याकाळी मनीषाने केतनला सर्व सांगितलं तर त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याने यावर आईशी बोलायचं ठरवलं. केतन रात्री जेवणानंतर रमाबाई जवळ हा विषय काढायला गेला. मनीषा सुद्धा जवळपासच होती. केतन काही बोलणार तोच रमाबाई म्हणाल्या, " केतन मी मनीषाला घेईन गावी जातेय. रेल्वेच तिकिट काढून दे. " रमाबाईंचे शब्द बॉम्बसारखे फुटले.
क्रमश :
पुढे आपण पाहुयात रमाबाई मनीषाला गावी घेऊन जातात का ? मनीषा पुढे काय निर्णय घेईल ?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
