Login

बदललेला चष्मा

आपली ती बाबी...दुसरी कार्टी
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय - भूतकाळातील व्रण

बदललेला चष्मा

"काकू, तुम्ही दिलेले कपडे, साड्या एवढं सगळं बसत नाही आहे सुटकेसमध्ये त्यातलं काही काढून ठेवू का?"
प्रिया तृप्तीची सासरी न्यायची सुटकेस भरता भरता योजनाला म्हणजे तृप्तीच्या आईला विचारत होती.

तृप्तीचे लग्न चार दिवसावर येऊन ठेपले होते.लाडाची लेक सासरी जाणार म्हणून योजनाची जय्यत तयारी सुरू होती.
तिच्यासोबत काय काय द्यायचे याची लिस्टच तयार होती.

तृप्तीची जिवलग मैत्रीण प्रिया तृप्तीचे सगळे कपडे सुटकेसमध्ये भरत होती. बाजूलाच तृप्तीची आजी , दोनही आत्या, मामी,मावशी सगळे लोक बसलेलेच होते.
आत्या ,आजी बघतच होते सुटकेसमध्ये काय काय भरत आहे ते.

"नाही गं प्रिया कमी नाही करता येणार काही.एखादी छोटी बॅग करावी लागेल मग दुसरी .कारण सासरी गेल्या गेल्या नवीन नवीन ती काय जाऊला किंवा सासूबाईंना कपडे मागणार आहे घालायला ? तेवढे कपडे तर आपल्याला सोबत द्यावेच लागतील ना." योजनानी राहिलेले कपडे बघून एक बॅग प्रियाला आणून दिली भरायला.

योजनाची योजनाबद्ध कामं बघून तृप्तीची मावशी बहिणीची तारीफ करत भावजयीच्या जवळ बोलली,

" खरंच बाई ताईचं काम मानावेच लागेल. किती विचारपुर्वक तयारी सुरू आहे तिची."

बाजूला तृप्तीच्या आत्या आणि आजी ऐकतच होत्या.

मोठी आत्या वर्षा लगेच लहान आत्या आरतीला म्हणाली,

" सांग ना तिला योजना वहिनीचं योजनाबद्ध काम."
आरतीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
" ताई जाऊ दे प्रत्येकच गोष्ट बोलून नसते दाखवायची.

वहिनीलाही कळत असेल हे सगळं करताना. त्यावेळी काय वागलो आपण तिलाही आठवत तर असेलच."
आरती समजुतदार .अशा मंगल प्रसंगी उगाच रंगाचा बेरंग नाही करायचा म्हणत शांत राहिली.

पण त्या दोघी बहिणीचं बोलणं योजनाच्या भावजयीने ऐकलं होतं.

तिच्याकडून राहवल्या गेलं नाही तिने हळूच आरतीला विचारलं,

"काय झालं हो ताई?"

तिने नुसतं विचारलंच नव्हतं तर, जणू काही आरतीच्या भूतकाळातील जखमेवरची खपलीच काढली होती तिने.
व्रण उघडा पडला होता.

आरती बोलूच शकली नाही. आरतीला खूप रडायला येत होतं आतून आतून. पण वरतून ती दाखवत नव्हती कारण भरमंडपात लोकांनी तिलाच नाव ठेवले असते. आणि तिला ते आवडलेही नसते.

'भूतकाळ विसरून जायचा असतो तो जर धरून ठेवला तर आपण सुखात जगूच शकणार नाही. '

ही तिची जगण्याची व्याख्या होती.

जखमेवरची खपली तर निघालीच होती आरतीच्या आणि ती जे उघड्या डोळ्यांनी स्वतः बघत होती ते बघून तिचं मन भूतकाळात सहा वर्ष मागे गेलं.

आरतीच्या माहेरी आरती शेंडेफळ तिच्यावरती तीन भाऊ दोन बहिणी. आरतीच्या लग्नाच्या वेळी मोठ्या भावाची म्हणजेच योजना वहिनी ची मुलगी बारावीत शिकत होती.
सहा वर्ष म्हणजे फार काही काळ लोटला नव्हता विसरून जाण्याइतका.

आरती तर तो प्रसंगच काय... लग्नापूर्वी घरात भाऊभावजयीकडून मिळालेली वागणूक विसरूच शकत नव्हती.

बाकी बहिणींची लग्न त्या मोठ्या असल्यामुळे आधीच झालेली आरतीला मात्र फार सोसावे लागले.
आरती चे लग्न झाले त्यावेळी आई-वडील थकले होते सगळा कारभार मोठ्या भावाच्या हाती होता.

त्यावेळी योजना वहिनीने आरतीसाठी अगदी हात राखून राखून काम केले.
संसाराला लागणारे भांडीकुंडी तर सोडा पण रोजची घालायची अंगावरचे कपडे सुद्धा सोबत दिले नाही योजनावहिनीने.

आरती लग्न होऊन सासरी गेली. सासरी खटल्याचं घर.पहिल्याचदिवशी कपडे कुणाला मागणार?

तिने अंगावरचेच कपडे धुतले,रगडून पिळले आणि तेच ओले कपडे परत घातले.

तिने स्वतःला बजावले खरी परीक्षा सुरू झालीय आतापर्यंत आपण जी दिले ती सराव परीक्षा होती.

ती शांत रहाण्याचा प्रयत्न करत होती पण ... राहून राहून मन बंड करत होतं.

दुसऱ्या दिवशी वरात परतणीची ती माहेरी आली. त्यावेळी जेवणानंतर सगळे बसलेले होते.ती सहज आईला म्हणाली,

"आई, मी रोज ज्या घरात घालायची त्या दोन साड्या आणि माझे अंडरगारमेंट्स दे ना मला. घरात गेल्या गेल्या एकदम सगळे नवीन. नवऱ्याला ही कसं म्हणू नवीन आणून द्यायला.
"
आरतीचे शब्द ऐकले, आई बोलायचीच राहिली तर योजना वहिनी ताडकन उत्तरली,

"आता या घरावरचा हक्क संपला आता तिकडेच मागायचं सगळं."

नंतर आई आरतीला तिच्या दोन साड्या आणि कपडे द्यायला बसली .पण आरती खूप स्वाभिमानी होती आणि समजदारही तितकीच.

ती ते नाकारत आईला म्हणाली,

"आई,खूप मोठी शिकवण दिली वहिनीने मला‌. आता येथे मी परकी. इथल्या गवताच्या काडीवरही माझा हक्क राहिला नाही. चुकले मी, क्षमा करा.यानंतर ही चुक घडणार नाही."

तिने करारीबाण्याने मान फिरवली.डोळ्यात आलेले अश्रू परतवले आणि सासरी परत आली.

पण तो प्रसंग तिच्या मनावर खोल घाव करून गेला.

जो जीवनभराची शिकवण देवून गेला तो ती कसा विसरू शकणार होती.
----------

पण तिच्या वर्षा ताईला राहवलं नाही तिने तृप्तीच्या मावशी,मामीला घटना विशद करत सांगितलेच योजना वहिनीचे योजनाबद्ध काम.
सर्वत्र शांतता पसरली.

तेवढ्यात तिथे योजना वहिनी येवून टपकली.
एकेकाचा चेहरा बघत तिला वेळ लागला नाही समजायला.
तिच्यासाठी ती शांतता खूप बोलकी होती. तिला मनोमन समजून चुकला होता शांततेचा अर्थ.
'समजदार को इशारा काफी'

तिने लगेच काढता पाय घेतला तिथून.

समाप्त
©®शरयू महाजन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →