बचत   भाग १

सासूबाई सुनेला काटकसर आणि बचतच्या नावाखाली जेवणही नीट करु देत नाही. मग सून काय करते ? ते या कथेत वाचा.


बचत   भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर


" तूझ्या वडिलांना या वयात कशाला घड्याळ द्यायचं ? काय उपयोग त्याचा ? रिटायर झालेत ते, वारंवार वेळ बघायला, त्यांना आता काय काम आहे ? " सुमतीबाई आपल्या सुनेला बोलत होत्या.

" असं काय बोलताय आई ? बाबांची ' साठी ' चा कार्यक्रम आहे. सर्वजण त्यांच्यासाठी काही ना काही आणणार. ताई आणि जीजुंनी त्यांच्यासाठी चार दिवसांची वृंदावन ट्रिप बुक केली आहे. दादा आणि वहिनी ' साठीच्या ' सोहळ्याचा खर्च करणार आहेत. मग माझ्याकडून घड्याळ सुद्धा नको का ? " आद्या सासूबाईंना समजावत होती.

" आद्या, आता तू घरची सून म्हणजेच लक्ष्मी आहेस. त्यामुळे घरात काटकसरीने वागणं, बचत करणं ही तुझी जबाबदारी आहे. तू स्वतः काही कमवत नाहीस. महागाई वाढली आहे. त्यात मला नाही पटत हे असे फालतू खर्च. एखादा फुलांचा बुके घेऊन जा. त्यापेक्षा जास्त काही नाही. " असं बोलून आद्याला बोलायची संधी न देता त्या रूममध्ये निघून गेल्या.

आद्या - अभयच्या लग्नाला सहाच महिने झाले होते. लग्नाच्या आधी ती जिथे जॉब करायची, ते ऑफिस लांब असल्यामुळे तिने जॉब सोडला. शिवाय जॉब सोडायच्या आधी बँकेतील रक्कम तिने काही लग्न खर्चासाठी, काही एफ. डी., तर काही इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकली होती.

सासरी रूळल्यावर नवीन जॉब करु म्हणून ती घरी थांबली होती. लग्नानंतर सुमतीबाई तिला काटकसर, बचत या बाबतीत लेक्चर देत असायच्या  सुरुवातीला तिला वाटलं ' आपल्या चांगल्यासाठीच सांगत आहेत. ' पण हळूहळू खरेदी करताना, स्वयंपाक करताना सर्वात त्या तिला टोकू लागल्या.

तिला चांगलाच आठवत होत की, सर्व पुरुष मंडळी कामावर गेल्यावर नणंदबाई बऱ्याचदा घरी येतात. सासूबाई नेमकं पनीर किंवा मशरूम आणून भाजी बनवायला सांगायच्या. आणि नणंदे सोबत सासूबाई सुद्धा जेवायला बसायच्या. पनीर भाजी संपून जायची. एकदा आद्या म्हणाली, " आई पनीर थोडं जास्त आणत जा. मला भाजी उरत नाही. " त्यावर सुमतीबाई म्हणाल्या, " अगं आपल्या घरी आपणच बचत करायला हवी, ताई तर पाहुणी आहे. तिच्यासाठी बनवावं लागत. आता ती एकटी कशी जेवणार म्हणून मी सोबत बसते तिच्या एवढंच. आता घरच्या काटकसरी आणि बचतीची जबाबदारी तुझी आहे. तुला एवढं करावं लागेलच ना ? माझ्यावेळी मी सुद्धा केलं म्हणून आज त्याच बचतीवर एवढं घर उभं आहे बघ. " त्यावर आद्या गप्प बसली.

एकदा आद्याला बरं नव्हतं म्हणून ती अभय सोबत डॉक्टरकडे गेली होती. डॉक्टरांनी व्हिटॅमिन, आयन ची कमतरता सांगितली. टॉनिक सोबत तिला रोज ताजी फळं सुद्धा खायला सांगितली. अभयने घरी जाता जाताच थोडी फळं घेतली. घरी आल्यावर जेव्हा सुमतीबाईंनी ती फळं पाहिली तेव्हा त्यावेळी त्या काही बोलल्या नाही. पण दुसऱ्या दिवशी सुमतीबाई म्हणाल्या, " आद्या, डॉक्टर काहीही सांगतात. सर्वच आपण ऐकायचं का ? रोज फळं आणायची म्हणजे केवढा खर्च ? अभयच काय ? त्याला काय कळतंय ? घराचं, वाढता खर्च, बचत हे घरच्या सुनेचं काम असतं. आता आहेत ती फळं खा पण यापुढे अभय फळं नको आणूस म्हणून सांग. " नवीन लग्न असल्यामुळे आद्याला जास्त काही बोलता येत नव्हतं.

लग्नानंतर तिचा पहिला सण गुढीपाडवा होता. अभय तिच्यासाठी साडी घेणार होता. लग्नानंतरचा पहिलाच सण म्हणून. पण इथे पण सुमतीबाईंनी खोडा घातलाच,' आताच लग्न झालं आहे. कितीतरी साड्या आहेत तिच्याकडे. त्यात अजून कशाला ? पडून राहत. ' अभय दुसरं काही घ्यायचं म्हणाला तर ' आताच लग्नाचा एवढा खर्च झाला आहे. नंतर घे काहीतरी.' म्हणून त्यांनी ते ही करु दिलं नव्हतं. त्यावर नणंद घरी आल्यावर घरच्या मुलीला रिकाम्या हाती कसं पाठवायचं म्हणत आद्याला तिच्या भरजरी साड्यांमधून एक साडी दयायला लावली. कारण, एवढ्या नव्या कोऱ्या साड्या आहेत तर नवीन साडीसाठी उगाच खर्च कशाला करायचा ?

एवढया गोष्टी तिने दुर्लक्ष केल्या पण आता मात्र तिला जॉब नंतर सुरु करु या निर्णयाचा पश्चाताप होत होता.


क्रमश :
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →