जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६
विषय:- दुसरी बाजू
शीर्षक:- बाबा दत्तक घेणे आहे..!
भाग :-४
आजूबाजूला चौकशी केल्यानंतर त्यांना कळले की ते कोठेतरी फिरायला गेले आहेत. हे ऐकून तर सुबोधच्या मनात भीतीची लाट उसळली.
मानव आणि ओवी यांनी दिपकरावांना घेऊन शहराबाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी दिपकरावांना सोबत येण्याचा आग्रह करून तयार केले. सकाळी लवकर उठून ते तयार होऊन जाण्यासाठी बाहेर आले. भाड्याची टॅक्सी घेतली होती. मानव स्वतःच ड्राइव्ह करणार होता.
ते टॅक्सीत बसणार तोच त्यांच्या पोटात गुडगुड होऊ लागले. तेव्हा ते म्हणाले,"मानव, जरा थांब. माझ्या पोटात गुडगुड होत आहे. मी जरा टाॅयलेटला जाणून येतो."
"बरं, लवकर या." मानव मनातून अस्वस्थ होता; पण चेहऱ्यावर तसे त्याने दाखवले नाही.
"अहो बाबा, फोन कुठे नेता तिथे? इकडे द्या, माझ्याकडे ठेवतो." मानवने त्यांचा फोन काढून घेतला.
याच दरम्यान सुबोधचा फोन आला जे त्याने उचलला नाही.
"ओवी, आज काहीही करून प्लॅन सक्सेस व्हायला हवा. नाही तर पुन्हा असा मोका मिळणार नाही." मानव तिला म्हणाला.
"सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका." ती त्याला दिलासा देत म्हणाली.
थोड्याच वेळात दिपकराव आले. त्यांना घेऊन ते दोघे शहराबाहेर आले. एका सुनसान जागेवर त्यांनी टॅक्सी थांबवली.
"बाबा, हे लोकेशन किती सुंदर आहे! इथे फोटो छान येतील. चला आपण फोटो क्लिक करू या." ओवी त्यांना म्हणाली.
"हो..हो.. का नाही? चला काढूया." दिपकराव टॅक्सी मधून खाली उतरून आजूबाजूला पाहत म्हणाले.
तेथे थोड्या अंतरावर एक उंच कठडा होता. आजूबाजूला मोठमोठी झाडे होती.
त्या कठड्याकडे बोट दाखवत ओवी म्हणाली,"मानव, तुम्ही दोघे तेथे उभे राहा. मस्त फोटो येतील."
"बरं," म्हणत आधी मानव त्या कठड्यावर चढला. नंतर त्याने त्यांना हात देऊन दिपकरावांना वर घेतले. दोघेही हसत उभे राहिले.
ओवीने नजरेने मानवला हळूच इशारा केला. त्याने नजरेनेच हलकासा होकार दिला.
ती त्याला म्हणाली,"अहो, बाबांच्या खांद्यावर हात ठेवून जरा मागे जा, म्हणजे छान फोटो येईल."
तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवत 'असे ठीक आहे का?'विचारले.
ती कॅमेऱ्यात पाहत "अजून जरा मागे जा.. आणखी थोडे.."असे म्हणत कठड्याच्या एकदम कडेला जायला सांगितले.
एका पाईंटला दिपकरावांचा पाय घसरला. ते घाबरून मानवचा मदतीसाठी हात पकडायला गेले; पण त्याने हात न देता मागे सरकला आणि हसत "गुड बाय, बाबा" असे म्हणत त्यांना जोरात ढकलून दिले.
ते किंचाळत खाली पडले; पण दैव बलवत्तर म्हणून ते एका झाडाच्या फांदीला धरून हवेत लटकू लागले.
ते पाहून मानवला राग आला. तो रागाने त्यांच्याकडे पाहत ओरडून ओवीला म्हणाला,"ओवी, हा म्हातारा खूपच खमका दिसतोय. काठी आण पटकन. हातावर फकटे देतो म्हणजे खाली पडेल."
ती काठी आणण्यासाठी गेली.
दिपकराव मदतीसाठी आर्त स्वरात ओरडत होते,"मला वाचवा. अरे, मानव काय करतोस तू? मला वर काढ."
ओवीने झाडाची काठी आणून दिली.
"साॅरी बाबा, मी तुमची कोणतीही मदत नाही करू शकत. तुम्ही मेलात तरच आम्हाला तुमच्या इन्शुरन्सचे पन्नास लाख मिळतील." असे म्हणत तो त्या काठीने त्यांच्या हातावर फटका मारणार तोच सुबोध आणि कौशिकी पोलीसांसह तिथे पोहोचले.
"सर, पकडा यांना आणि माझ्या बाबांना वाचवायला मला मदत करा." तो मानव आणि ओवी यांच्याकडे बोट करून रागात म्हणाला.
त्याने लगेच दिपकरावांकडे धाव घेतली.
काही पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानव आणि ओवी यांना पकडले तर काही पोलिसांनी दिपकरावांना वाचवण्यात सुबोधची मदत केली.
स्वामींच्या कृपेने ते सुखरूप होते. फक्त हातापायाला थोडेफार खरचटले होते. त्यांना सुखरूप पाहून कौशिकीचा जीव भांड्यात पडला.
दिपकरावांनी आधी सुबोध आणि कौशिकी यांना गळ्यांशी लावून घेतले. नंतर त्यांनी खाली मान घालून उभ्या असलेल्या मानव आणि ओवी यांच्याकडे मोर्चा वळवला.
रागाने त्यांच्याकडे पाहत एक सनसनीत कानाखाली वाजवून देत म्हणाले,"पैसे पाहिजे होते तर मला मागायचे होतेस. मी हसत हसत दिले असते. ते प्रेमाचे नाटक कशासाठी केलेत?"
क्रमशः
सुबोध आणि कौशिकी यांना खरे कसे कळले?
©️ जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा