Login

बाबा दत्तक घेणे आहे..! (भाग:-५ अंतिम)

मुलगा असतानाही दिपकरावांनी स्वतःला दत्तक घेण्यासाठी पेपरमध्ये जाहिरात का दिली? त्यानंतर काय घडले त्यांच्या आयुष्यात? जाणून घ्या या कथेत..

जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६

विषय:- दुसरी बाजू

शीर्षक:- बाबा दत्तक घेणे आहे..!

भाग:- ५ (अंतिम)

"आम्हाला माफ करा, बाबा. आम्हाला पैशाची खूप गरज होती. तुमची जाहिरात वाचून आमच्या डोक्यात तुम्हाला दत्तक घेऊन इन्शुरन्सने पैसे मिळवण्याची आयडिया आली. पैशांसाठी आम्ही हे सगळं केले." मानव खाली मान घालून हात जोडत थरथरत्या आवाजात म्हणाला.

"हो बाबा, आमच्याकडून चुकले. आम्हाला माफ करा. आम्ही काही पेशाने गुन्हेगार नाहीत." ओवीही गयावया करत होती.

दिपकरावांनी त्याच्यांकडे पाठ फिरवली.

पोलीस त्यांना ताब्यात घेऊन गेले.

सुबोध आणि कौशिकी यांनी दिपकरावांना घरी आणले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते.

ते त्या दोघांची माफी मागत म्हणाले,"माफ करा बाळांनो, मी पडताळून न पाहता स्वतःच्या हट्टासाठी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला चाललो होतो. पण स्वामींची कृपा तुम्ही दोघेही वेळेत तिथे पोहोचलाय. नाही तर आज मी जिवंत राहिलो नसतो.." ते सुबोधचा हात हातात घेऊन कपाळावर लावत रडू लागले.

"बाबा, शांत व्हा. जे होणार होते ते टळले आणि माफी मागू नका. तसं तर आमचंही चुकलंच की. आई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडलात. आम्ही तुमची दुसरी बाजू समजून घेतलीच नाही. माफ करा आम्हाला." सुबोध त्यांची माफी मागत भरल्या डोळ्यांनी पाहत भावूक होत म्हणाला.

"हो बाबा, माफ करा आम्हाला." कौशिकीही माफी मागत म्हणाली.

"नको रे माफी मागूत. उलट मी दुसरी बाजू न बघता त्या फसव्या लोकांवर विश्वास ठेवला ; पण तुम्हाला कसे कळले?" दिपकराव त्या दोघांना जवळ घेत विचारले.

"मानव आणि ओवी यांचे वागणे तुम्हाला न्यायला आले तेव्हापासूनच मला जरा खटकले होते. तेव्हा मी काही बोललो नाही. कारण तुम्ही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतात. तुम्हाला ते पटलेही नसते." सुबोध शांतपणे सांगत होता.

"त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही त्याला पैसे दिले ते मला पटले नव्हते. तुम्ही खूप लवकर त्यांच्यावर विश्वास ठेवलात. नंतर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तर ते खूपच प्रेमाने वागत होते तेही खटकले होते. इतक्या लोकांना बोलावले, त्यांच्यासमोर ते इन्शुरन्सचे पेपर दिले. किती काळजी करतात, जे चार लोकांना त्यांना दाखवायचे होते का हा प्रश्न मला पडला.

कौशिकीचे सिक्सथ सेन्स तिला काही तरी चुकीचे घडणार असे सांगत होते. तिने मला तसे बोलून दाखवले म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी माहिती काढली तेव्हा ते कळले. तुम्हाला फोन केला पण तुम्ही उचलला नाहीत. त्यांच्या घरी आलो तर तिथे कुलूप होते. मग आमचा संशय दाट झाला आणि सोबत तुम्हाला गमावण्याची भीतीही वाटू लागली. म्हणून आम्ही पोलिसांची मदत घेतली. तुमचा नंबरचे लोकेशन ट्रेस करत तिथे पोहोचलो." सुबोधने कौशिकीकडे पाहत सांगितले.

"पण खरं सांगू का, बाबा? तिथे पोहोचेपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. जेव्हा तुम्हाला झाडाला लटकलेल पाहिले तेव्हा तर माझा जीव कंठाशी आला होता; पण खरेच स्वामींची कृपा, आम्ही वेळेत आलो आणि तुम्हाला वाचवू शकलो." कौशिकी त्यांना गहिवरून पाहत म्हणाली.

ते कौतुकाने तिच्याकडे पाहत म्हणाले,"थॅंक्यू, बेटा. आजपासूनच तू म्हणशील तसं मी वागेन."

"नाही बाबा, तुम्ही आधी होतात तसेच राहा; पण गोड बोला. आम्हीही तुम्हाला वेळ देऊ." कौशिकी त्यांना बिलगत म्हणाली.

"हो बाळांनो, तसंच होईल." ते प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले.

"आजोबा, तुम्ही आता इथेच राहा. कुठेच जाऊ नका." शिवम नुकताच शाळेतून आला होता. त्यांना पाहून तो आनंदाने म्हणाला आणि त्यांच्याकडे झेप घेतली.

त्यांनी होकारार्थी मान डोलावली आणि त्याला उचलून घेत त्याच्या गालावर पप्पी घेतली.

आता त्या घरात आनंदाचे वारे वाहू लागले.

समाप्त -

दुसरी बाजू जाणून घेतल्यानंतरच मत व्यक्त करा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका नाही तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. वृद्ध लोकांना समजून घ्या, त्यांना वेळ द्या; कारण त्यांना फक्त प्रेमाची गरज असते.

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all