Login

बाबा दत्तक घेणे आहे..! (भाग:-३)

मुलगा असतानाही दिपकरावांनी स्वतःला दत्तक घेण्यासाठी पेपरमध्ये जाहिरात का दिली? दत्तक घेतल्यानंतर काय घडले त्यांच्या आयुष्यात? जाणून घ्या या कथेत..

जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६

विषय:- दुसरी बाजू

शीर्षक:- बाबा दत्तक घेणे आहे..!

भाग:- ३

जाताना सुबोध दिपकरावांना काळजीने म्हणाला,"बाबा, औषधे वेळच्या वेळी घेत जा."

"जास्त तेलकट खाऊ नका, काळजी घ्या, बाबा." कौशिकीही म्हणाली.

"काळजी करू नका, आता माझा हा मुलगा आणि सुन आहेत ना, ते घेतली माझी काळजी. तेही तुमच्यापेक्षा जास्त!" जातानाही त्यांनी टोमणा मारला.

मानव आणि ओवी दिपकरावांना आपल्या घरी घेऊन आले. त्यांच्या तुलनेने ते घर छोटे होते; नीटनेटके, स्वच्छ आणि टापटीप होते.

इथे त्यांना कोणतीच रोखठोक, बंधने नव्हती. ते हवे तसे वागत. ते दोघेही त्यांची  छान काळजी घेत असत. रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांनी आरती झाली की ते दोघे त्यांचा आशीर्वाद घेत असतो.
ऑफिसमध्ये जाताना ते दोघे काय आणू तुम्हाला? असे विचारायचे. आल्यावरही दिवस कसा गेला, काय केले, काही त्रास तर नाही ना झाला, असे प्रेमाने विचारपूस करायचे. औषध वेळच्या वेळी द्यायचे. विक एंडला फिरायला घेऊन जायचे.

ओवी त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून द्यायची. आग्रहाने त्यांना वाढायची. आनंदाने त्यांची सेवा करायची. त्यामुळे दिपकराव अगदी आनंदी होते.

इकडे सुबोध आणि कौशिकी यांना घर रिकामे रिकामे वाटू लागले. पदोपदी त्यांना त्यांची आठवण येऊ लागली. ते उदास वाटू लागले. दिपकरावांचे बोलणे जरी कडू असले तरी त्यात प्रेम होते. याची जाणीव त्यांना होऊ लागली. त्यांची उवीण त्यांना खायला उठत होती.

असेच महिना उलटून गेला. एके दिवशी मानव दिपकरावांना म्हणाला,"बाबा, मला दहा हजार रुपये पाहिजे होते. एक खूप महत्त्वाचे काम होते. काय ते संध्याकाळी आल्यावर सांगतो. आता घाई आहे."

"बरं, देतो." असे म्हणत त्यांनी त्यांच्याकडील दहा हजार रुपये त्याला दिले. नेमके ते पैसे देताना सुबोध तिथे आला.

त्याला पाहून दिपकरावांनी तोंड फिरवून घेतले. तर मानव आणि ओवीने हसून त्याचे स्वागत केले.

मानवला उशीर झाला म्हणून त्याने ओवीला त्याला चहापाणी बघायचे सांगून निघून गेला.

ओवी सुबोधला पाणी देऊन चहा करायला निघून गेली.

घराचे निरीक्षण करत सुबोध दिपकरावांना म्हणाला,"कसे आहात, बाबा?"

"तिथल्या पेक्षा खूप आनंदी आहे. हे घर जरी छोटं असलं तरी मायेची ऊब आहे इथे. माणसे एकमेकांना वेळ देतात, प्रेमाने बोलतात." ते त्याला न पाहता म्हणाले.

"बाबा, मी तुमचा राग समजू शकतो; पण असेच लगेच विश्वास ठेवून एवढे पैसे देणे योग्य आहे का?" त्याने विचारले.

ते काहीच बोलले नाहीत. तेव्हा तो "काळजी घ्या," असे बोलून निघून गेला.

ते विचार करत होते, 'कशासाठी मानवने पैसे घेतले असतील?'

त्यांनी शुभदाला मेसेज करून सांगितले.

"तू ना कोणावरही पटकन विश्वास ठेवतोस आणि तुझ्यात पेशेंन्स पण नाही. जरा धीर धर. संध्याकाळपर्यंत वाट पाहा. नंतर बघू." तिने रिप्लाय दिला.

संध्याकाळी मानवने त्यांच्या हातात बॅंक अकाऊंट काढण्याचे कागदपत्रे दिले. ते दहा हजार त्याने त्यात टाकण्यासाठी घेतले होते असे सांगितले. इथून पुढेही त्यात रक्कम जमा करा असे सांगितले.

ते निःशब्द झाले. आपण उगीच त्याच्यावर शंका घेतली असे त्यांना वाटू लागले. त्यांनी लगेच मेसेज करून शुभदा सगळे सांगितले.

हळूहळू मानव आणि ओवीने दिपकरावांचा पूर्ण विश्वास संपादन करून घेतला.

काही दिवसांनी दिपकारावांचा वाढदिवस त्या दोघांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यात त्यांनी खूप जणांना बोलावले होते. सुबोध आणि कौशिकी शिवमला घेऊन आले.

शिवमने त्यांना शुभेच्छा दिल्या. केक कापून वाढदिवस साजरा केला. दिपकरावांनी सुबोध आणि कौशिकी सोडून सर्वांना केक खाऊ घातले.

नंतर वाढदिवसाची भेट म्हणून मानव आणि ओवीने त्यांना मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीची कागदे भेट म्हणून दिली आणि सही करण्यास सांगितले.

ते आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा ओवी म्हणाला,"गैरसमज नसावा, बाबा. आज आम्ही आहोत पण उद्याच कोणी पाहिले आहे. जर आम्हाला काही झालं तर तुम्हाला कोण बघणार? त्याचीच तरतूद आम्ही केली. आमचं काही चुकलं का?"

दिपकराव भारावून तिच्याकडे पाहत म्हणाले,"तुझं काही नाही चुकलं. आत्तापर्यंत माझ्या वाढदिवसाचे सर्वात बेस्ट गिफ्ट आहे. तुम्ही दोघेही माझा किती विचार करता. देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो."

ते सही करत होते तर कौशिकी त्यांना म्हणाली,"बाबा, न वाचता सह्या करून नका. एकदा वाचून तर पहा."

"त्याची काही गरज नाही. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे." असे म्हणत त्यांनी त्यावर सही केली.

कौशिकी आणि सुबोध यांना मानव आणि ओवी यांचे वागणे खटकले होते. काही तरी गौडबंगाल आहे असे तिला वाटू लागले.

घरी आल्यावर तिने मनातील शंका सुबोधला बोलून दाखवली. त्यालाही तसेच वाटत होते.

दोघांना त्याचा छडा लावायचा ठरवले. तिची एक मैत्रीण त्याच बॅंकेत काम करत होती ज्या बँकेतून मानव ओवीने पाॅलिसी काढली होती. तिने माहिती काढल्यावर जे सत्य समोर आले त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच सुबोधच्या कानावर ती गोष्ट घातली. तोही घाबरून गेला. त्या दिपकरावांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. चारवेळा फोन केला तरी त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा ते दोघेही मानवच्या घरी आले. तर तिथे घराला कुलूप होते.

क्रमशः

सुबोध आणि कौशिकी यांना मनात मानव- ओवी विषयी काय कळले?

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all