जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६
विषय:- दुसरी बाजू
शीर्षक:- बाबा दत्तक घेणे आहे..!
भाग:-२
"अहो बाबा, तुप आणि मीठ जास्त खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल वाढते म्हणून तिने खास तुमच्यासाठी केलेले पराठे केलेत." सुबोध नाष्टा करता करता समजावत म्हणाला.
"हो ना, कालच तपासणी करून आले ना, किती वाढले आहे ते!" कौशिकी डिफिन भरत म्हणाली.
"त्याची तू काळजी करू नकोस. हे बघ मला एक रामबाण औषध सापडलाय. हे बघ ही गोळी घेतली की माझे कोलेस्टेरॉल छूमंतर होईल."
पेपरमध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कुठलीशी आयुर्वेदिक गोळ्यांची जाहिरात तिला दाखवत, ऑफिसमधून तिला त्या गोळ्या आणण्याचा हुकूम सोडला.
"अहो बाबा, ते सगळं फसव असतं. उगीच अशा जाहिरातींना बळी पडू नका." ती रागात म्हणाली.
"तुला सांगितले तेवढे कर. बाकी जास्त काही बोलू नकोस. तुझ्या पदरच्या पैशाने आणायला सांगत नाहीये. तुला पैसे पाठवलेत त्यातून आण." ते पेपर तिच्यासमोर करत म्हणाले.
"अहो बाबा, पैशाचा विषय नाही ओ. जाऊ दे, तुम्हाला सांगून काही फायदा नाही. मला ऑफिसला उशीर होतोय. आणते येताना गोळ्या." ती डिफिनसोबत तो पेपरही पर्समध्ये ठेवत चिडून म्हणाली आणि जाऊ लागली.
"रोज सांगाव लागतं, स्वामींच्या पाया पडून जा म्हणून." ते तिच्याकडे रोखून पाहत पुटपुटले.
जाणारी ती लगेच माघारी वळली. पटकन स्वामी समर्थांच्या फोटोंच्या पाया पडून ऑफिसला गेली.
सुबोधने सुस्कारा टाकत नकारार्थी मान डोलावली.
रोज कशानाकशाने त्यांच्यात वाद व्हायचे.
दिपकरावांची एक मैत्रीण होती श्यामल. तिच्यासोबत ते दिलखुलास बोलायचे. तिलाही त्यांचा कडवट स्वभाव माहिती होता. तिही त्याला समजावयाची. तेवढ्यापुरते ते शांत राहायचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
एकदा बागेत ते आणि शुभदा बोलत बसले होते. एक मुलगा एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला दत्तक घेण्याची जाहिरात असलेले पाॅमप्लेट वाटत होता. ते कागद त्यांच्या हातात पडले.
क्षणभर ते विचारात पडले. त्यांच्या डोक्यात त्यांना दत्तकची आयडिया आली.
रोजच्या कुरबुरीतून सुटका होईल हा त्या मागचा हेतू होता.
सुबोध आणि कौशिकाला याची कल्पना न देता त्यांनी 'बाबा दत्तक घेणे आहे..!' अशी जाहिरात देऊन टाकली.
दोन दिवस ते सारखे फोन घेऊन बसायचे. फोन वाजला की पटकन फोन उचलायचे; पदरी निराशाच यायची. हे पाहून ते दोघे हसले.
सुबोध थट्टा करत म्हणाला,"बाबा, हा वेडेपणा सोडा. कोणी येणार नाही. उगीच का आस लावून बसता?"
"तू हस, बेटा; पण मला खात्री आहे कोणीतरी येईलच ज्याला खरंच बापाची कदर आणि गरज असेल. ज्याला बापाची किंमतही असेल." दिपकरावही तिरसक हसून म्हणाले.
तेवढ्यात त्यांचा फोन खणखणला. त्यांना सगळी माहिती दिली.
पलिकडून "कधी येऊ न्यायला" अशी विचारणा झाली तेव्हा "कधीही येऊ शकता" असे दिपकराव सुबोध आणि कौशिकाकडे पाहत हसून म्हणाले.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दिपकराव बॅग भरून तयार होऊन त्या माणसाची वाट पाहत होते. त्या पूर्वी त्यांनी सुबोधला त्यांची दोन लाखांची सेव्हिंग बॅंकेतून काढून आणायला लावली. त्याने ती काढून आणली.
"बाबा, जाणे गरजेचे आहे का? तिथे अनोळखी लोकांजवळ कसे राहणार? पुन्हा एकदा विचार करा." सुबोध तोंड बारीक करून म्हणाला.
"ते अनोळखी नाहीत. आता माझा मुलगा आणि सून आहेत. मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला आहे. माझ्या पैशांवर तुझा डोळा आहे ना. दोन लाख रूपये बघून डोळे फिरले असतील ना तुझे." कुत्सित हसत ते म्हणाले.
त्यांचे कडवट बोलणे त्याच्या मनाला खूप लागले. तो पटकन खिशातले त्यांचे पैसे काढून देत म्हणाला,"पैशाची हाव मला नाही, बाबा. तुमची काळजी वाटते म्हणून म्हणालो."
"कळलं.. कळलं, तुमची नाटकं!" असे म्हणत त्यांनी ते पैसे खिशात ठेवून घेतले. ते पुढे काही बोलणार तोच दाराची बेल वाजली.
त्यांनीच दार उघडल्यावर एक तरूण जोडपे हसतमुखाने आत आले.
"दिपकराव, तुम्हीच का?" त्यातला तरूण पुढे येत आबदीने विचारले.
"हो, मीच आहे." दिपकराव त्याला न्याहळत म्हणाले.
"हो का? बाबा, नमस्कार करतो." प्रेमाने त्यांच्या पायांशी झुकला आणि त्याच्या बायकोलाही नमस्कार करायला सांगितले.
त्यांच्या अशा कृतीने दिपकराव भारावून गेले.
"बाबा, मी मानव आणि ही माझी बायको ओवी. तुम्ही तयार आहात ना. चला, निघायचं ना, टॅक्सी उभा केली म्हणून म्हणालो." बॅग पाहून तो म्हणाला.
"हो, चला जाऊया." दिपकराव बॅग घेऊन निघाले.
मानव पुढे येत ती बॅग घेत म्हणाला,"तुम्ही राहू द्या, बाबा. मी घेतो."
त्यांनी हसून मान डोलावली.
"एक मिनिट, मला एक विचारायचे होते?" सुबोध मानवला थांबवत म्हणाला.
तो हुंकार भरत होकार दिला.
"बाबांना दत्तक घेण्याचे कारण सांगाल." सुबोधने विचारले.
"बाबांचे प्रेम, माया मिळण्यासाठी. लहानपणीच माझे आईवडील देवा घरी गेले. परवा पेपरमध्ये जाहिरात वाचली आणि आलो." मानव म्हणाला.
"मिळाले ना तुला उत्तर, आता निघू का आम्ही?" दिपकराव रोखून पाहत म्हणाले.
इतका शांतपणे बघत असलेला छोटा शिवम त्यांना म्हणाला,"आजोबा तुम्ही कोठे चाललात?"
काय चालले हे त्या छोट्या जीवाला माहित नव्हते.
"मी आता या काका-काकूसोबत राहाणार आहे. तुला आठवण आली तर तू ये भेटायला. बाय शिवू." ते त्याच्या गालावर पप्पी घेत जाऊ लागले.
जाताना ओठ तिरपे करून सुबोध आणि कौशिकीकडे पाहिले.
सुबोध आणि कौशिकी यांना वाईट वाटत होते. ते त्यांना निरोप देण्यासाठी टॅक्सी पर्यंत आले.
दिपकरावांनी शुभदाची भेट घेतली आणि ते नव्या घरी.. मानवचे बाबा म्हणून नव्या प्रवासाला निघाले.
क्रमशः
कसा असेल त्यांचा नवा प्रवास? खरंच त्यांना तिथे प्रेम मिळेल का?
©️ जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा