जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६
विषय:- दुसरी बाजू
शीर्षक:- बाबा दत्तक घेणे आहे..!
भाग:- १
"हे काय आहे, बाबा?" सुबोध वर्तमानपत्र त्याचे बाबा दिपकराव यांच्या समोरील टेबलावर आपटत रागाने म्हणाला.
"काय हो, बाबा असे वागणे शोभतं का तुम्हाला? लोक काय म्हणतील, काय विचारतील याचा तरी विचार करायचा?" त्यांची सून कौशिकीही नाकपुड्या फुगवत म्हणाली.
"मी काय करतोय ते बरोबरच करतोय. लोक काय म्हणतील, काय विचारतील हा तुमचा प्रश्न आहे. मला विचारल्यावर मी त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे. असंही मी लोकांचा विचारच करत नाही, हे तुम्हाला चांगलच माहिती आहे. राहिला प्रश्न हा की हे काय आहे तर तुम्ही दोघेही शिकलेले आहात म्हणजे तुम्हाला वाचता येतच असेल ना." दिपकराव उपहासात्मक हसत रोखून पाहत म्हणाले.
"अहो पण, अशी जाहिरात करण्याची काय गरज होती, बाबा? आम्ही काय बघत नाही तुम्हाला?" सुबोध संतापने म्हणाला.
"किती चांगलं मला बघता हे तर तू विचारू नकोस? बायकोच्या ताटाखालच्या बोका तू मला विचारतोस?" दिपकराव तिरक्या नजरेने कौशिकीकडे पाहत म्हणाले.
"बघा सुबोध, इतकं बघूनही बाबा कसे बोलत आहेत? तुम्हाला कधी मी ताटाखालचं बोका बनवलं? घर आणि ऑफिस दोन्हीही सांभाळत मी तारेची कसरत करते. हे दिसत नाही यांना." कौशिकी चिडून म्हणाली.
"ए बाई, मी तुला बोलतच नाहीये. मी माझ्या मुलाशी बोलतोय, समजलं!" दिपकराव चिडून तिला म्हणाले.
"हो का, तुमचा मुलगा माझा नवराही आहे हे लक्षात ठेवा." कौशिकीही आवाज चढवत म्हणाली.
"बस करा आता तुम्ही दोघेही! एकतर ऑफिसमध्ये त्या बाॅसची किटकिट; घरी थोडी शांतता मिळेल असं वाटलं, तर इथेही तेच किरकिर. वैताग आलाय नुसता!" सुबोध चिडून कपाळावर बोट चोळत म्हणाला.
"बस, अजून दोन-तीन दिवस सहन कर. कोणी ना कोणीतरी येईलच मला दत्तक घ्यायला. तेव्हा तुम्हाला या घरात शांतता मिळेल." दिपकराव टेबलावर हात आपटत म्हणाले आणि ते जाऊ लागले.
"हा..हा..वाट बघा! तुम्हाला दत्तक घेणारा कोणी वेडाच येईल." कौशिकी उपरोधक हसत म्हणाली.
"असू दे, वेडा तर वेडा. तेवढीच मलाही तो वेडेपणा अनुभवायला मिळेल आणि सोबत शांतताही," असे म्हणत ते तडक रूममध्ये गेले.
जाणाऱ्या दिपकरावांना ते दोघे जोराने श्वास घेत पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते.
"बाबांचं वागणं मला तर समजण्याबाहेरच आहे." तो वैतागत डोक्याला हात लावत म्हणाला.
"तुम्ही टेन्शन नका घेऊ, सुबोध. एवढ्या वयस्कर माणसाला कोणी दत्तक घ्यायला येईल असे मला तरी वाटत नाही. त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला? ते शांत झाले की होतील बोलू आपण त्यांच्याशी." ती त्याला दिलासा देत म्हणाली.
त्याने फक्त हुंकार भरत सुस्कारा सोडला.
दिपकराव त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि छोटा नातू शिवम यांच्यासोबत राहत होते.
दिपकराव थोडे सनकी होते. त्यांच्या जीभेवर नेहमी कारल्याची कडू चव असायची.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून तर त्यांचा स्वभाव आणखीनच चिडका बनला होता.
त्यांच्या तब्येतीसाठी कौशिकी त्यांच्या खाण्या-पिण्यावर लगाम घातला होता. त्यांचे कोलेस्टेरॉल कमी जास्त होत होते. म्हणून ती काळजीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असायची; पण त्यांना मात्र ती मनमानी करते असे वाटायचे.
सुबोध तिच्या बाजूने बोलला की ते चिडायचे, त्याला बायकोचा बैल म्हणायचे.
दिपकराव बाहेर गेले की उघड्यावरचे चाट खायचे. ज्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा. गोळ्या औषधेही वेळेवर घेत नसतं. मग ते आजारी पडले की सगळं घर डोक्यावर घ्यायचे. ज्यामुळे कौशिकीची चिडचिड व्हायची.
एकदा नाष्ट्याला पराठे केले होते. त्यांच्यासाठी कमी तेलाचे पराठे केले होते. पण त्यांना तुपाचे पराठे खायचे होते. ते खाण्यासाठी घेऊन बसले. तर कौशिकीने ते काढून कमी तेल व मिठाचे पराठे दिले. त्यावरून ते चिडत सुबोधला कडवटपणे म्हणाले,"बघितलेस का रे? तुझ्या बायकोने ताटातले पराठे काढले आणि हे असे बेचव पराठे दिलेत."
क्रमशः
दिपकरावांनी का तशी जाहिरात दिली असेल? येईल का कोणी त्यांना दत्तक घ्यायला?
©️ जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा