Login

अवनी एक प्रवास भाग १२०

तेजश्री आणि तुषारने परीला येताना पाहिलं. परीच्या एक दोन पुरुष सहकाऱ्यांनी परीचे परत अभिनंदन करायला तिच्याशी हातमिळवणी केली. तिसऱ्या सहकाऱ्याची हात मिळवणी पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबली. तस इकडे तुषारच्या कपाळावरच्या नसा ताठ व्हायला सुरवात झाली. गप्पा मारता मारता परीची नजर तुषारवर गेली आणि तिने लागलीच त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला. त्या सहकाऱ्याला पण जरा ते वेगळच वाटल.

मागील भागात.

अचानक कोणीतरी समोर आल म्हणून परी दचकलीच. समोर रावीला बघून पहिले तर ती गोंधळलीच. परीने रावीचा चेहरा पाहिला तर त्यावर खट्याळपणा नाचत होता. मग परीला त्याची जाणीव झाली आणि तिने हलकेच मागे नजर टाकली. तर तुषार पण जागीच थांबला होता. तस परीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले.

“दी,” रावीचा खट्याळपणा चालू झाला. “तिकडे आम्ही बाहेर तुझी वाट बघत आहोत आणि तू आतमध्ये सरांसोबत..” रावी पुढे बोलणार तोच परीने तिच्या दंडावर चापट मारली.

“शट अप.” परीने तिचे डोळे मोठे केले.

“गप्पा मारत होते अस विचारायचं होत मला.” रावी तिचे शब्द फिरवत बोलली.

“राहू दे,” परी तिचं तोंड वाकड करत बोलली. “तुझे तोंडावरचे आणि मनातले प्रश्न मला काही समजत नाही का? इथल जर बाहेर कोणाला सांगितलस ना तर बघ. तुझ्या...”

“तुझ्या काय?” रावी तोऱ्यात बोलली. “द्यायची ती सगळी माहिती तू मॉमला दिली आहेस. आता ती धमकी त्यायची गरज नाही.”

परीने स्वतःच्या कपाळाला हात लावला.

आता पूढे.

“हे बघ दी,” रावी आता हळवी झाली. “तू तुझ्या आयुष्यात पुढे गेलीस हेच माझ्यासाठी खूप आहे.” रावीने परीचे हात आपल्या हातात घेतले. ते बघून परी पण जरा धक्यातच गेली.

रावीने तुषारवर नजर टाकली. तसा तुषार त्या दोघींच्या जवळ आला.

“प्लीज सर,’ रावी “आजवर दीने आम्हाला संभाळल आहे. पण तिने तिच्या मनाचा कधीच विचार केला नाही. आता तुमच्या हाती आमची दी देत आहे.” रावीने तुषारचा हात हातात घेतला आणि परीच्या हातात ठेवला. “आता तरी तुमचा राग सोडा.” रावी तुषारकडे बघत बोलली.

“तो तर कधीच सोडला होता,” तुषार नकळत बोलून गेला.

ते ऐकून परीचे डोळेच मोठे झाले आणि तो पुढे काही बोलणार तोच परीने त्याच्या पायावर तिचा पाय मारला. तुषार जरा कळवला आणि परीकडे बघू लागला. तर परी तिचं नाक उडवत तिथून चालली गेली.

“असे कसे ओ सर तुम्ही.” रावीने पण हात वर आणत खाली झटकले.

“अं सॉरी.” तुषार

“मला नाही दी ला बोला.” रावी परीकडे जायला निघत बोलली.

तिच्या मागे तुषार पण निघाला. परी जशी इथून निघाली तशी थेट विजय आणि सायलीजवळ जाऊन थांबली.

“चला झाल माझ.” ती आता घाई करत बोलली.

तसे तिला सगळेच विचित्र नजरेने बघू लागले. तर परी पण त्यांना गोंधळून बघू लागली. तस तिच्या लक्षात आल की ते सगळेच मागे बघत होते. मग परीने मागे वळून पाहिलं तस तिने डोक्यालाच हात लावला.

कारण तुषार एका गुढघ्यावर बसून त्याचे हात पसरून बसला होता. त्याच्या मागे रावीच्या हातात घाईघाईत लिहिलेला एका कागद होता. सगळ्यांनी बारीक डोळे करून ते वाचायचा प्रयत्न केला. कारण ते रावीच अक्षर गरजेपेक्षा जास्तच वळणदार होत.

“आय एम सॉरी.” अस त्यावर लिहील होत.

ते वाचून झाल्याचे रावीला जाणवतच तिने तो कागद मागे करून दुसरा कागद पुढे केला आणि तो वाचून बाकीच्यांनी डोक्याला हात लावला. कारण तिने तिच स्वतःच डोक लावून अस काही लिहील होत जे तुषारला पण माहिती नव्हत. रावी तर त्याच्या मागे उभी होती.

ते वाचून परीने लाजून चेहरा झाकून घेतला.

“माझी होणारी बायको जरा रुसली आहे, तिला जरा समजावा आणि लग्नाला होकार द्यायला लावा.”

तुषारने परीला लाजताना पाहिलं आणि तो विचार करू लागला. ‘फक्त सॉरी म्हटल्यावर ही का लाजली? आणि बाकीचे का डोक्याला हात लावत आहेत.’

त्याने बंधू मंडळीला इशारातच काय झाल म्हणून विचारलं. तस आरुषने मागे बघा असा डोळ्यांनी प्रतिक्रिया दिली. तेव्हा कुठे तुषारने मागे पाहिलं आणि त्याचे ही डोळे विस्फारले गेले. त्याने रावीकडे पाहिलं तर तिने तिचे खांदे उडविले. त्याने परत समोर पाहिलं तर सगळेच हसायला लागले होते.

परीने रावीकडे लटक्या रागात पाहिलं आणि थेट तिच्यामागे धावत सुटली. “रावडे. काहीही करत बसतेस. थांब बघतेच तुला.”

पण रावी कुठे तिच्या हाती लागत होती. “सॉरी दी.” ती दात काढत पुढे पळत होती. शेवटी परी दमून थांबली आणि सरळ विजयकडे धावत जात तिच्या वडिलांच्या कुशीत जाऊन लपली.

“अमम, मला घरी जायचं.” परी तिचं तोंड विजयच्या कुशीत लपवतच बोलली.

विजय परत हलकाच हसला आणि त्याने तुषारकडे पाहिलं. तसा तो पण इकडे तिकडे बघू लागला.

“दोन दिवसांनी घरी यायचं.” विजय तुषारकडे बघत बोलला. “नाही आले तर दुसरीकडे..”

“उद्या येऊ का?” तुषार लागलीच बोलला. विजय दुसरीकडे बोललेलं ऐकून तो घाबरून पटकन बोलून गेला.

तसे बाकी सगळेच हसू लागले. तुषार ओशाळून गेला. ते घरी निघालेच होते की कॉलेजचा प्यून परीला शोधत आला. कार्यक्रम तर संपला होता पण प्रिन्सिपल सरांना काहीतरी बोलायचं होत. मग परीने त्या सगळ्यांना घरी जायला सांगितलं. परी तर तिच्या स्कुटीवर आली होती त्यामुळे ती नंतर एकटी सुद्धा जाऊ शकत होती. पण रावीच्या डोक्यात मात्र वेगळच काहीतरी शिजायला लागल.

“दी तुझ्या स्कुटीची चावी दे ना.” रावी मधेच बोलली.

“मग ती कशी घरी येईल?” सुजय मधेच बोलला.

“लगेच येणार आहे मी.” रावी परीकडे बघून बोलली.

तर परी रावीचा चेहरा वाचू लागली. कारण तिचा हा गालात हसणारा चेहरा परीला काहीतरी वेगळच सांगत होता.

“दे ना दी प्लीज.” रावी लहान मुलीसारखी हट्ट करत बोलली.

तशी तिने तिला तिच्या स्कुटीची चावी दिली आणि ते सगळेच घरी जायला निघाले. सगळे पुढे चालत होते तर रावी जाणून मागे राहिली. तिने तुषार आणि त्याच्या बहिणीला तिच्या जवळ येऊ दिल जे मागून येत होते. रावी तुषारला बघत राहिली. तुषार पण जवळ आलेल्या रावीला गोंधळून बघत राहीला. तेजश्री आणि सुजाता पण रावीला गोंधळून बघत राहिल्या.

रावीने तुषारवर नजर टाकली आणि तेजश्रीला एका बाजूला घेतलं.

“तुला तुझ्या दादाची काही काळजी आहे की नाही?” रावी

तशी तेजश्री रावीला कपाळाला आठ्या पडून बघू लागली. “का?”

“आज दी ने इतक काही केल तुझ्या दादासाठी,’ रावी “मग तुझ्या दादाने काही करायला नको दी साठी?”

आता तेजश्री विचारात पडली आणि तिला आठवलं की तिने सांगून सुद्धा तुषार सांगितलेल्या जागेवर उभा राहीला नव्हता. ते तर वेळेवर तो त्या जागी पोहोचला होता. तेजश्रीला विचारात पडलेलं बघून रावीने पुढे बोलायला सुरवात केली.

“मी दी ची गाडी घेऊन जात आहे,” रावी तुषारवर नजर टाकत बोलली. “मग दी नंतर घरी कशी एकटी जाईल नाही का?”

रावीच्या ह्या प्रश्नाने तेजश्रीला हलकेच हसू आल. “ठीक आहे समजल मला.”

तुषार ह्या दोघींना बारीक डोळे करून बघत राहीला. तोपर्यंत रावी तेजश्रीसोबत बोलून निघून गेली आणि तेजश्री परत तुषारकडे आली.

“जरा वेळ थांबतो का?” तेजश्री

“का?” तुषार गोंधळून बोलला. “झाल ना सगळ आता?”

“ते मॅम अजून घरी गेल्या नाहीत,” तेजश्री “आता त्यांनी एवढा छान डान्स बसवून दिला तर त्यांचे आभार मानायला नको? असही आता खूपच उशीर झाला आहे.”

तुषारला तेजश्रीच बोलण पटल आणि ते सगळेच परीची वाट बघत थांबले. तिकडे प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये प्रिन्सिपल सरांनी त्यांच्या सर्व स्टाफचे कौतुक केले. खास करून परीच जरा जास्तच कौतुक झाल. तिने त्या कार्यक्रमात तिची जबाबदारी तर नीट पार पाडलीच होती. ते सांभाळून तिने तिचा डान्स दाखवत सर्वाना वेड लावल होत. काहींनी तर परीचे जरा कान पण ओढले होते. तिने तिची ही कला लपवून जी ठेवली होती. दिल्लीमध्ये ज्या मास्कधारी मुलीने ट्रॉफी जिंकून आणली होती ती देखील परीच होती हे भांड देखील प्रिन्सिपल सरांनी आताच फोडलं आणि त्यांनी त्यांची ही छोटीशी मिटिंग संपवली.

परी तिच्या सहकरी स्टाफबरोबर कॉलेजच्या आवारात आली. तिच्या डान्सचे तर सगळेच फॅन झाले होते. मग तिला ते सगळेच चिडवत गप्पा मारत येत होते.

तेजश्री आणि तुषारने परीला येताना पाहिलं. परीच्या एक दोन पुरुष सहकाऱ्यांनी परीचे परत अभिनंदन करायला तिच्याशी हातमिळवणी केली. तिसऱ्या सहकाऱ्याची हात मिळवणी पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबली. तस इकडे तुषारच्या कपाळावरच्या नसा ताठ व्हायला सुरवात झाली. गप्पा मारता मारता परीची नजर तुषारवर गेली आणि तिने लागलीच त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला. त्या सहकाऱ्याला पण जरा ते वेगळच वाटल.

त्यांचा निरोप घेऊन परी तेजश्रीजवळ आली. “तुम्ही गेले नाहीत अजून? उशीर झाला आहे.”

“हे मी तुला पण विचारू शकतो.” तुषारच्या डोळ्यासमोर अजूनही हात मिळवणीचा प्रसंग फिरत होता.

“ते सरांनी मिटिंग घेतली.” परी “रावी पण गाडी घेऊन गेली आहे. ती पण अजून आली नाही.”

“असही ती कुठे वेळेवर काम करते.” तुषार सुस्कारा सोडत बोलला.

आता त्याला तेजश्री आणि रावीमध्ये नक्की काय बोलण झाल असेल याची कल्पना आली. रावीला त्यानेच तर गाडी घेऊन जायला तर नाही लावलं ना? असा विचार परीच्या डोक्यात नक्की आला असता. त्यामुळे त्याने आताच सगळ काही रावीवर लोटलं.

“अम्म,” तेजश्री विचार करण्याच नाटक करत बोलली. “मी सुजाता सोबत जाते. दादा तू मॅमला सोडून ये.”

आता परीच्या डोक्यात जरा प्रकाश पडला. ‘रावी, का नको तिथे डोक लावते?’ तुषारसोबत जायचं ह्या विचारानेच तिच्या अंगावर शहारा आला होता.

तेजश्रीने तुषारच्या होकाराची वाट पण पहिली नाही आणि ती सरळ सुजाता सोबत निघून गेली. मग परीने तुषारला कपाळावर आठ्या आणून पाहिलं.

“मी काही केल नाही आधीच सांगतो,” तुषार परीचा रोख समजून बोलला. “हे सगळ रावी आणि तेजश्रीचा कारनामा आहे.”

“बघते ना दोघींकडे.” परी जरा चिडून बोलली. “चालायचं आता? नाहीतर उशीर झाला तर आमचे बंधू मंडळी येऊन पोहोचायचे आणि दोघींच्या प्लानवर..’” परी बोलता बोलता जीभ चावत थांबली.

तस तुषारला पण हलकेच हसू आल आणि ते दोघे ही बाईककडे निघाले. आता दोघांमध्ये खूपच शांतता होती. कुठून बोलावं ? तेच दोघांना समजत नव्हत. दोघे बाईकजवळ पोहोचले.

“थांक्यू.” तुषारने शांततेचा भंग केला.

“कश्याबद्दल?” परी

“तेच माझी इच्छा पूर्ण केलीस ना.” तुषार मंद स्मित करत बोलला.

“तरीही तोंड फिरवून निघून गेले.” परी तिच्या मानेला झटका देत बोलली.

यावर तुषार हलकेच हसला. “बस. नाहीतर उशीर झाला तर तुझी बंधू मंडळी मला काही सोडणार नाहीत.”

मग परी पण खुदकन हसली आणि तुषारच्या मागे त्याच्या बाईकवर बसली. ते दोघे निघणारच होते की परीचा फोन वाजला. परीने पाहिलं तर रावी तिला फोन करत होती.

“कुठे आहेस गं?” परी जरा चिडून बोलली. “म्हणे गाडी लगेच घेऊन येते आणि तुझा काही तपासच नाही.”

“दी.” रावीचा खट्याळ आवाज. “तुला जर खरचं राग आला असता ना तर तू तेव्हाच फोन केला असता जेव्हा तू मिटिंगमधून बाहेर पडली. आता सरांच्या गाडीवर बसलेली नसती.”

रावीच्या बोलण्याने परीच तोंडच उघड पडल आणि ती इकडे तिकडे बघू लागली.

“तू जर इथेच असशील तर लगेच समोर ये नाहीतर...” परी

“नाही येणार,’ रावी तोऱ्यात बोलली. “जवळ असती तरी आली नसती. असाही तुमची आज पहिली डेट आहे. जरा एन्जॉय करा.”

“रावी खूप मार खाशील.” परी आता खरोखर चिडून बोलली.

ती तिच्या कुटुंबासोबत घरी जायला निघाली होती. ते जरी पुढे गेले असले तरी त्यांना न सांगता अस मुलासोबत जाण आवडल नव्हत.

“मामांनी परमिशन दिली आहे बालिके.” रावी काही तिचा तो सूर सोडायला मागत नव्हती. “तू त्यांच टेन्शन नको घेउस. सध्या आमच्या होणाऱ्या जीजुंवर कॉन्संट्रेट कर.”

“रावी.” परी रागात बोलली.

“ठीक आहे,” रावीने पण विषय सोडून दिला आणि सरळ फोन ठेवून दिला.

तुषारने पण परीच्या मनाचा अंदाज घेतला आणि बाईक सरळ तिच्या घराकडे घेतली. पुढचे पाच ते दहा मिनिट कोणीच कोणाशी बोलल नाही. काही वेळाने परीच बोलायला लागली.

“मी बोलली का मला लगेच घरी जायचं आहे ते?” परी

तसा तुषार गोंधळून गेला. त्याने लागलीच त्याची बाईक बाजूला उभी केली. “काय झाल?”

“तुम्ही घराकडे गाडी घेऊन चालले आहात,” परी “मी बोलली का की मला लगेच घरी जायचं आहे.”

“आता फोनवर तर रावीला भांडत होतीस.” तुषार अजूनही गोंधळलेला होता.

“ते तिला तस बोलाव लागत नाहीतर तिचं डोक कुठेही धावायला लागत.” परी तोऱ्यात बोलली. “मला पाणीपुरी खायची आहे.”

आता तुषारने एक उसासा टाकला. ‘किती कॉमप्लीकेटेड आहे यार.’ एवढ बोलून त्याने त्याची बाईक एका गार्डनच्या जवळ थांबवली.

दोघे उतरले आणि त्या पाणीपुरीच्या दुकानाकडे गेले. तुषारने पाणीपुरीची ऑर्डर दिली.

“तुम्ही नाही खाणार?” एकच प्लेटची ऑर्डर बघून परीने त्याला विचारलं.

“मी अस बाहेरच नाही खात." तुषार

तोपर्यंत त्या दुकानदाराने एक प्लेट परीसमोर धरली. परीने ती घेतली आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊ लागली. तुषार तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे बघत राहीला. अगदी लहान मुलीसारखी ती खात होती. मधेच अज्जून तिखट बनवायला लावत होती.

दोन ते तीन पुऱ्या खाल्यावर तिने पुढची पाणीपुरी तुषारच्या समोर धरली. पहिले तर त्याने मानेनेच नकार दिला. पण परीचा पडलेला चेहरा बघून त्याने ती एक पाणीपुरी खाल्ली. तसा तिचा तो खुललेला चेहरा बघून तुषार पण मनातच हसला.

परी पण ह्या क्षणाचा मनमुराद आंनद घेत होती. नाहीतर ती आजवर फक्त समजूतदारीने आणि मोठी असल्यासारखी वागत होती. कोणीतरी आपले लाड करावेत आणि आपण ही लहान होऊन त्याच्यासोबत वागाव हे तिलाही वाटत होत आणि ते आता ती पूर्ण जगत होती.

एक प्लेट खाऊन झाल्यावर तिने त्या दुकानदाराला अजून एक प्लेटची ऑर्डर दिली.

“अगं बस,” तुषार काळजीने बोलला. “घरी जाऊन जेवायचं नाहीये का? एवढ तिखट खाशील तर पोटात गडबड होईल ना.”

“काही नाही होत,” परी दुसऱ्या प्लेटचा आस्वाद घेत बोलली. “उलट पुदिनाच्या पाण्याने पोट साफ होत.” परी मिटक्या मारत खात बोलली.

तस तुषारने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या परीला तो फक्त बघत राहीला. परीने अजून एक पाणीपुरी त्याच्या समोर धरली. पण तुषारने ती स्वतःच्या हातात घेत तिलाच स्वतःच्या हाताने चारली.

अश्या प्रकारे त्यांची पहिली ऑफिशियल डेट पार पडली. घरी जाताना मात्र त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. ते दोघे जरी नव्याने प्रेमात पडले असले तरी त्याच्यांत एक समजूतदारपणा होता. काही वेळातच ते परीच्या घरी जाऊन पोहोचले.

परीला आताचा प्रवास हा खूप लवकर संपल्यासारखा वाटला. तिने तुषारवर नजर टाकली. तुषारने देखील परीला पाहिलं.

“तुम्ही माझ्या प्रश्नाच उत्तर नाही दिल.” परी

‘कोणत्या?” तुषार

“कोणत्या?” परी लगेच गाल फुगवून विचारू लागली.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →