Login

अवनी एक प्रवास भाग ११६

ज्या विद्यार्थ्याकडे कॉलेजच आयडी होत त्यांनाच त्या कॉलेजच्या कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता. बंधू मंडळी तर त्या कॉलेजचे जुने विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांना तर प्रवेश मिळाला होता. पण प्रोब्लेम नयनचा आला होता. कारण ती तर ह्या कॉलेजची विद्यार्थी नव्हती. सुजयला तर ती एका ट्रेकिंगला भेटली होती. तेव्हा देखील त्याच्या पायाला लचक भरून तो मुरगळला देखील होता. तेव्हा तिनेच त्याच्या पायाला फर्स्ट एड केल होत.

मागील भागात.

“अच्छा,” परी परत खट्याळ झाली. “म्हणजे तूम्ही मोकळे ना..” परी पुढे बोलणार तोच तिच्या पाठीवर परत एक चापट मारली.

“तूम्ही परत झोपायला मोकळे अस बोलायचं होत मला.” परी लहान मुलीसारखं ओरडत बोलली.

“राहू दे.” सायली “तूला पण रावीची हवा लागली आहे. तूझ्या मदतीसाठी इथे आली होती आणि ती उठली तरी का?”

“ती झोपून राहील हीच माझ्यासाठी तिची मदत आहे.” परी तिचे डोळे फिरवत बोलली.

तसे विजय आणि सायली हलकेच हसले.

नंतर सायलीने परी आणि विजयला किचनच्या बाहेर काढल. त्यांना बाहेर गेल्यावर सायली तिचे हात पटापट चालवू लागली. विजय तर त्यांच्या खोलीत गेला होता. तरी परी तिच कॉलेजसाठीची तयारी करायला तिच्या खोलीत गेली.

ती जशी खोलीत गेली तसा तिने डोक्यालाच हात लावला.

आता पूढे.

परीने खोलीत आल्या आल्या पाहील की त्या खोलीत सूजय आणि रावी कोणतीतरी वस्तू घेऊन एकमेकांना पकडून भांडत बसले होते.

“अरे काय झाल तूम्हाला?” परी पटकन दोघींजवळ जात बोलली.
तिने दोघांना एकमेकांपासून दूर केल.

“हिला सांग ना.” सूजय “माझा हेअर ड्रायर आणला.”

“मग काय झाल?” रावी तोऱ्यात बोलली. “देणार तर त्या डिस्पेनसरीलाच ना. मग त्या आधी तिच्या नंदनने वापरला तर काय हरकत आहे?”

“ऐक ना,” परी “तू नको मराठी शब्दाची इज्जत काढूस. ते दे त्याला. मी तूला माझा हेअर ड्रायर देते.”

“मला हाच पाहीजे.” रावी हट्टाला येत बोलली आणि तिने तिचा मोबाईल काढला. त्यावर तिने फोन लावला. थोडी रिंग वाजेपर्यंत तेवढा वेळ शांतता राहीली. “हॅलो, डिस्पेनसरी.”

“तिला का फोन लावला?” सूजय अजूनच चिडून बोलला.

“तूझा हेअर ड्रायर मला वापरायचे आहे,” रावी “दि चे केस सेट करायचे आहेत.”

“वापर ना मग.” तिकडून नयन बोलली.

“तूझा होणारा नवरा मला भांडत आहे मी घेतली म्हणून.” रावी सूजयकडे तोऱ्यातच बघत बोलली.

“वापर तू.” नयन “आणि कॉलेजला कधी येणार?”

“हे काय तूझ्या नव-याने त्रास दिला नाही तर लगेच आवरून येतो.” रावी

“दे त्याला फोन.” नयन

तसा रावीने तिचा मोबाईल सूजयकडे दिला. सूजयने तो मोबाईल घेतला आणि खोलीच्या बाहेर गेला.

परीने नकारार्थी मान हलवली आणि तिची तयारी करू लागली. तर रावी परीला मदत करायला पुढे आली.

“मी आत्तापासून डान्सची तयारी करत नाहीये.” परी “आता मी फक्त कॉलेजला जायची तयारी करते. डानससाठी नंतर करणार आहे. तेव्हा बोलेवेल.”

“मग मी आता काय करू?” रावी तिचे ओठ बाहेर काढून विचारू लागली.

“तूझ्या आवडीच काम.” परी हसून दाखवत बोलली.

“म्हणजे?” रावी

तस परीने बेडकडे इशारा केला. “घे पसरून.”

तशी रावी खरोखरचं बेडवर पसरून झोपली. ते बघून परीने नकारार्थी मान हलवली आणि तिच आवरू लागली.

तिकडे तेजश्री पण पहाटेच उठली आणि तिच आवरू लागली. तस तर त्यांना जरा आरामातच बोलावलं होत. पण कार्यक्रमाचा उत्साह थोडीच जास्त वेळ झोपू देत असतो. त्यामुळेच तेजश्रीला देखील लवकर जाग आली होती.

तुषारचा मोबाईल देखील पहाटेच वाजला. परीने त्याला सुप्रभातचा मेसेज जो पाठवला होता. आता तुषारला त्या मेसेज्ची सवय झाली होती. त्याने त्याच्या मोबाईलवर अलार्म देखील लावण बंद केल होत. पहाटेच तिचा आलेला मेसेज तुषारची सकाळ सुंदर करायला लागला होता. आजचा तो मेसेज वाचून तुषारने त्याचा राग सोडून द्यायचं ठरवलं होत. असही तो तिच्यापासून जास्त दिवस लांब राहू देखील शकणार नव्हता.

मनाशी काहीतरी ठरवत तो देखील उठला आणि फ्रेश होऊन त्याच नेहमीच वर्क आउट करू लागला.

इकडे परी तिचं आवरून परत हॉलमध्ये आली. तिच्यासाठी चहा नाश्ता तिची वाट बघत होता. परी तो घेतच होती की रावी परीच्या खोलीतून धावत बाहेर येत होती. तर तिच्यामागे सुजय धावत होता. तो रावीला पकडायला बघत होता. तर रावी त्याला बरोबर चुकवत होती.

“रावडे,” सुजय चिडून बोलला. “कशाला काहीही सांगत बसते तिला?"

“अरे आता परत काय झाल?” परी ओरडून विचारू लागली.

“ती बघ ना,” सुजय रावीकडे रागात बघत बोलला. “नयनला बोलली की मला तिच्या...” बोलता बोलता सुजय थांबला.

“बोल ना बोल,” रावी परत सुजयची खोड काढत बोलली. “तुला तिच्या काय?”

“तुझ्यातर आता.” सुजय परत रावीच्या मागे धावला.

“खबरदार जर पुन्हा माकडासारख्या उड्या माराल तर.” परी दोघांना तंबी देत बोलली.

तसे ते दोघे जागीच थांबले.

“तुला आग लावायला इथे बोलावलं होत का?” परी रावीकडे चिडून बघत बोलली.

“मी कुठे काय बोलली?” रावी निरागस होत बोलली. “मी तर फक्त सुजय दादाच वाक्य पूर्ण करून बघत होती.”

“नको ना,” परी “आधीच शब्दांच्या अर्थाचे तू अनर्थ करतेस. तू वाक्य कस पूर्ण करणार गं?”

तशी रावी तिला कपाळाला आठ्या पाडून बघू लागली.

“आणि तू रे,” परी सुजयकडे वळली. “तू लहान आहेस का तिच्यापाठी अस पळत सुटतोस? आता हिला काही समजत नाही तर तिला तरी समजाव ना.”

“ती पण आता हिच्यासारखी वागायला लागली आहे,” सुजय “मलाच भांडत आहे ती.”

“हे भगवान,” परी डोक्याला हात लावत बोलली. “मला वाटल की ती तरी ह्याला सुधरवेल, पण ती तर..” परी बोलता बोलता थांबली. “तुम्हाला हवं ते करा, मी चालली.” परी चहा पाण्यासारखा पीत बोलली.

ती नाश्ता न करता उठणारच होती की सुजय आणि रावी दोघे तिच्यासमोर आले.

“आता काय?” परी कपाळाला आठ्या आणत बोलली.

“हे जे मामीने बनवून ठेवलं आहे ते कोण खाईल?” रावी पण तिच्या कपाळावर आठ्या चढवत बोलली.

“तुम्हीच खा ते.” परी वैतागून बोलली आणि परत उठायला लागली.

तस एकदा बाजूने रावी आणि दुसऱ्या बाजूने सुजय दोघांनी तिच्या हाताला पकडून खाली बसवलं. तशी परी दोघांना चिडून बघू लागली.

“एकतर तुमच्यामुळे मला उशीर झाला.” परी “आणि आता अजून उशीर करायचा विचार आहे का?”

“तिकडे काहीही होऊदे,” सुजय नाश्त्याच्या प्लेटमधला घास चमच्याने उचलला आणि परी समोर धरला. “तू खाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही.”

“नाहीतर मामींना बोलावून आणते.” रावीने परीची नकारार्थी हलणारी मान सरळ पकडून ठेवली. “त्यांनी एवढ्या प्रेमाने बनवलं सकाळी उठून आणि तू ते तसच टाकून जाणार?”

“अगं तोंड तर सोड ना.” परी रावीच्या हाताला चावत बोलली. “मी खाऊ कशी मग?”

परीच्या चावण्याने रावीला काहीच फरक पडला नव्हता. मग त्या दोघांनी मिळून परीला तो नाश्ता पूर्ण भरवला आणि मगच तिला जायची परवानगी दिली.

परीने जाता जाता दोघांना कडक लुक दिला. यावर रावीने तिला एक फ्लाइंग कीस दिली. तशी परी बडबड करतच निघून गेली. तिला बिल्डींगमधून स्कुटी बाहेर काढताना बघून रावीने तिच्या मोबाईलवर एक फोन लावला.

“पाठवलं हो तुमच्या बायकोला,” रावी नाटकी आवाजात बोलली. “अगदी तुम्ही सांगितलं तस तिचं पोट भरून नाश्ता भरवूनच पाठवलं.”

सुजयला तर खूप हसू येत होत. तर तिकडे तुषार पण खूप हसला होता. तिने रावीला इकडे बडबड केली होती तर तिकडे तुषार परीने कशी बडबड केली असेल त्याची कल्पना करत हसत होता. नंतर रावी आणि सुजय दोघेही परत त्यांच्या खोलीत झोपायला गेले.

जसा दिवस उजाडला सुजाता तेजश्रीच्या घरी येऊन पोहोचली. तिला आलेल बघून तेजश्रीच्या आईने सुजातासाठी चहा दिला. तेजश्रीच आवरून झाल तस ती तिची बॅग घेऊन हॉलमध्ये आली. मग दोघींमध्ये त्यांच्या सामानाबद्द्ल चर्चा झाली. त्यांनी ठरवलेलं सामान सगळ नीट घेतलं आहे ना? याची दोघींनी खातरजमा केली. सुजाताचा चहा पिऊन झाल्यावर दोघी त्यांच्या कॉलेजकडे निघून गेल्या.

कॉलेजला पोहोचल्यापासून परी तिच्या इतर सहकाऱ्यासोबत कामात व्यस्त झाली. तिचा मोबाईल कुठे होता? ते देखील तिला माहिती नव्हत. ते तर तिचे सहकारी वेळेवर तिला तिचा मोबाईल आणून देत होते म्हणून तो काही वेळातच तिच्या जवळ पोहोचत होता. तो सायलेंट असल्याने त्यावर किती फोन आले? किती मेसेज आले? हे तिला समजलच नव्हत. तिच्या मोबाईलवर बरेच मिस कॉल आलेले होते. ते परीने घाईघाईत पाहीलं आणि त्यावर नंतर फोन करू असा विचार करून ती तिला दिलेल्या कामात परत व्यस्त झाली.

स्टेजच राहिलेलं शेवटच काम बघून परी परत कॉलेजच्या आतल्या आवारात आली. सहभागी झालेले सगळे मुल आले की नाही? आलेल्या मुलांना कॉलेजच्या त्या प्रशस्त हॉलमध्ये एका लाईनीत बसवलं गेल. त्यांना त्यांचे नंबर परत एकदा सांगण्यात आले.

जशी सगळी मुल आल्याची खात्री झाली तस त्या हॉलमध्ये परत एकदा पूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम घ्यायला सुरवात केली. ह्यावेळेस निवेदक मॅडम देखील त्यांचा सराव करून घेत होत्या. अजून कुठे काही वाढीव काम करता येईल का? की जे आहे ते चांगल दिसत नसेल तर ते बदलत होत्या. मध्ये मध्ये तर परी देखील तिला नव नवीन कल्पना सुचवत होती.

या गडबडीत कधी दुपारचे बारा वाजून गेले ते कोणालाही समजलं नव्हत. कॉलेजचा स्टाफ आणि सहभागी विद्यार्थी यांच्यासाठी जेवणाची खास सोय केली होती. जसे दुपारचे साडेबारा वाजले तसे कॅटरिंगवाले तिथे जेवण घेऊन पोहोचले.

सकाळपासुन परत तालीम करून ती सगळेच भुकेले झाले होते. जस जेवण येऊन पोहोचल तस सगळेच जेवायला जाऊन बसले. जेवण झाल्यावर चांगला तास भर आराम झाला. नंतर परत जो तो आपल्या कामाला लागला.

आता हे कॉलेज चांगलचं प्रतिष्ठित अस होत. या कॉलेजच्या कार्यक्रमावर बऱ्याच मोठमोठ्या लोकांच या कार्यक्रमावर लक्ष होत. त्यामुळे या कार्यक्रमात हलकीशी देखील चूक होणार नाही याची दक्षता सगळेच घेत होते.

संध्याकाळ झाली आणि स्टेजवर लावलेल्या लाईट्स चमकू लागल्या. स्टेजवर टेबल मांडले जाऊ लागले. कार्यक्रमाची सुरवात करण्यासाठी पाहुण्यांचं स्वागत, मनोगत आधीच उरकून घेणार होते. नंतर कार्यक्रमात कोणताही अडथळा येणार नव्हता.

हळू हळूबाकी विद्यार्थी यायला लागले. सोबत त्यांचे पालक ही यायला लागले. म्युझिक, लाईट्स याची तपासणी करण्यात येऊ लागली, माईकची टेस्ट झाली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्टेजच्या एका बाजूला करण्यात आलेल्या जागेवर त्यांचा क्रमांकाप्रमाणे बसवण्यात आले.

आलेल्या प्रेक्षकांना देखील समोर व्यवस्थित बसवण्यात येऊ लागले. बघता बघता स्टेजसमोर असलेल्या त्या खुर्च्या पूर्ण भरायला लागल्या.

परीने तिच्या कुटुंबासाठी व्हीआयपी पास आधीच काढून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बसण्याची व्यवस्था अगदीच स्टेजच्या समोर प्रमुख पाहुण्याच्या अगदीच मागच्या खुर्च्यांवर झाली होती.

तेजश्रीने तुषारला ती जागा दाखवली जिथे त्याला तिच्या डान्सच्या वेळेपासून उभ राहायचं होत. ती जागा देखील स्टेजच्या डाव्या बाजूला अगदीच समोर होती. जेणेकरून तुषारला डान्ससाठी लागणार सामान लागलीच देता येणार होत.

ती जागा बघून तुषारला जरा आनंदच झाला. कारण त्याला परीच्या डान्सचा शेवट बघायचा होता.

परी स्टेजवर तिच्या कामात असताना तिची नजर तुषारवर गेली. तिच्या मनाप्रमाणे त्याला उभ राहिलेलं बघून तिच्या चेहऱ्यावर देखील एक चमक आली.

परी स्टेजवर असलेली तुषारला तर कधीच दिसली होती. तिचं ते काम पूर्ण करण्यासाठी तिच्या पायाला लागलेली ती भिंगरी बघून त्याला हलकेच हसू आल. ते काम करत असताना तिचे केसांसोबत चालू असलेले हातवारे, तिचं ते मधेच हसण, रागवण, चिडून बघण हे सगळ तुषार मनापासून बघत राहीला होता. पण मधेच तिची त्याच्यावर आलेली नजर बघून त्याने त्याची नजर फिरवून घेतली होती. त्याच अस वागण बघून परी देखील हलकेच हसली होती.

‘बघुयात शेवटी कसे नजर फिरवतील?’ परी मनातच बोलली आणि कार्यक्रमाची सुरवात करायला वळली.

ज्या विद्यार्थ्याकडे कॉलेजच आयडी होत त्यांनाच त्या कॉलेजच्या कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता. बंधू मंडळी तर त्या कॉलेजचे जुने विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांना तर प्रवेश मिळाला होता. पण प्रोब्लेम नयनचा आला होता. कारण ती तर ह्या कॉलेजची विद्यार्थी नव्हती. सुजयला तर ती एका ट्रेकिंगला भेटली होती. तेव्हा देखील त्याच्या पायाला लचक भरून तो मुरगळला देखील होता. तेव्हा तिनेच त्याच्या पायाला फर्स्ट एड केल होत.

आता नयनला कसा प्रवेश द्यायचा? हा विचार सुजयला पडला. परी तर कामात असल्याने ती काही फोन उचलत नव्हती. त्यामुळे ही बंधू मंडळी कॉलेजच्या गेटवर विचार करत बसली होती. ह्या कार्यक्रमाला एक्स्ट्रा सिक्युरिटी बोलावली असल्याने तिथे नेहमीचे शिपाई नव्हते. ते जरी असते तरी ह्या बंधू मंडळींनी त्यांच्या ओळखीवर नयनला आत घेतलं असत.

त्यांना अस गेटवरच उभ राहिलेलं बघून तिथे पोहोचलेले आराध्या आणि राहुल त्यांच्याजवळ गेले. जसा आराध्याला प्रोब्लेम समजला तिने नयनला तिच्यासोबत घेतलं. आता आराध्या हिची मोहिते साहेबांची मुलगी म्हणून ओळख होतीच आणि मोहिते साहेबांना देखील ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. त्यामुळे आराध्याला कोणीच अडवणारे नव्हते. मग आली की नयन आराध्यासोबत आतमध्ये.

ह्यांच्या मागे बाकी वरिष्ठ मंडळी एका मागे एक येऊन पोहोचले आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या जागेवर ते बसले गेले. राज आणि प्रसाद त्याच्या कूटूंबासोबत जरा उशीराच आले होते. राधीकाकडे देखील परीने व्हीआयपी पास दिले होते. ते दाखवून ते सगळेच जिथे बाकी वरिष्ठ मंडळी बसली होती तिथे जाऊन बसले.

आत आल्या आल्या प्रसाद मालाला शोधू लागला. त्याला जास्त शोधाशोध करावी लागली नाही. कारण ती तिच्या बंधूमंडळींसोबत उभी होती. प्रसाद आणि मालाची एकत्रच नजरानजर झाली आणि दोघांच्या चेहऱ्यावर एक चमक झळकली.

प्रसादची तर इच्छा होती की मालासोबत उभ रहाव. पण तिथे सगळेच होते. म्हणेन दोघे ही डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत राहीले.

आरुष ही आल्या आल्या लागलीच मनालीला शोधू लागला. पण रावी आणि मनाली तर परीला तयार करत होत्या. पूर्ण दिवस कामात असल्याने परीला तयारी करायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून ती आत दोघींच्या मदतीने तयारी करत होती. त्यात तिला तिच्या शेवटच्या डान्ससाठी वेगळी तयारी करायची होती. त्याची माहिती देखील परीने दोघींना आताच देऊन ठेवली. जेणेकरून परीला पटकन तयार होता येईल.

अखेर कार्यक्रमाला सुरवात झाली ती गणेश वंदनाने. नंतर सरस्वती पूजन झाल. नटेश्वरच्या मूर्तिची पूजा झाली. यानंतर लगेच पाहुण्याचे स्वागत आणि भाषण आटपून घेण्यात आले.

अखेर ज्या कार्यक्रमाची उत्सुकता होती तो वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. ती पूर्ण जागा विद्युत रोशानाईने झगमगून निघाली होती. एक नवीन चैतन्य तिथे पसरलं गेल.

आणि तिथे एक जयघोष तिथे गुंजला...

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →