Login

अवनी एक प्रवास भाग ११५

उद्याचा कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचवून सगळ्यांना कशीतरी उशिराने झोप लागली. इकडे रात्री सगळे मस्त निद्राधीन असताना तिकडे शशांकची मात्र झोप उडालेली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज नुसताच फिरत होता. रात्री जेव्हा तो त्याची ड्युटी संपवून त्याच्या घरी चालला होता. तेव्हा त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. त्यावरच बोलण ऐकून त्याला जरा धक्काच बसला होता.
मागील भागात.

हॉलमध्ये तिच्यासाठी चहा नाश्ता तिची वाटच बघत होता. त्यासोबत सायली देखील होती.

“मग कशी चालू आहे उद्याची तयारी?” सायली

“खूपच मस्त.” परी चहाचा घोट घेत बोलली.

“चला आम्हाला आमच्या परीचा डान्स बघायला मिळणार.” सायली “ते ही पहिल्यांदाच.” आता ती टोमण्याच्या सुरात बोलली.

“नको ना आई परत परत.” परी भावनेच्या भरात बोलून गेली.

“परत आई वर आलीस?” सायली बारीक डोळे करून विचारू लागली.

“हो,” परी “कारण आई या शब्दाची माया त्या मॉम शब्दाला मला तरी येत नाही.”

“मग तुझ्या बाकी वानरसेनेला त्याबद्दल काही बोलत नाहीस.” सायली

“त्यांना सांगून सांगून थकली मी,” परी तिचे डोळे फिरवत बोलली. “मग मी पण तो विषय सोडून दिला.”

“बरं,” सायली “अजून एक विचारायचं होत.” सायली जरा चाचरतच बोलली.

आता पूढे.

परी सायलीकडे बघू लागली. “अशी फॉरमलीटी का करत आहेस?” परी जरा नाराज झाली.

“कारण विषय तुझ्या लग्नाचा आहे,” सायली हलकेच हसत विचारू लागली. “कधी जायचं बोलणी करयाला?”

“तो दगड अजून रुसून बसला आहे ना माझ्यावर.” परी परत तिच्याच तंद्रीत बोलून गेली.

“दगड?” सायलीचे डोळे विस्फारले गेले. “सिरीअसली?”

तशी परीने तिची जीभ चावली. “अम्म सॉरी. ते त्यांच्या घरी बोलून घ्या.”

परीचा चहा संपला होता. त्यामुळे ती एवढं बोलली आणि लाजून तिथून पळून गेली. तिला अस लाजून पळताना बघून सायलीला जरा हसूच आल.

परी थेट तिच्या खोलीत जाऊन पोहोचली. तिला आता तिचे उद्या डान्ससाठीचे सगळे कपडे नीट ठेवायचे होते. ते तिने नीट अरेंज करून ठेवले. तिचे डान्ससाठीचे गाणे तर तिने आधीच स्टेजवर म्युजिक अरेंज करणाऱ्या माणसांजवळ दिले होते. ते नीट वाजत आहेत का ते देखील तिने जातीने हजर राहून पाहिलं होत. सोबतच जे बिट्स गाण्यात आले नव्हते ते तिने त्या माणसांना वाजवायला लावले होते. ते बिट्स कुठल्या कडव्यानंतर कुठल्या जागी वाजवायचे हे देखील सांगितले होते. तिला हवं तस झालेलं दिसल्यावरचं ती तिथून निघून आली होती. परीचे ते म्युझिकच ज्ञान बघून ती माणस परीवर इम्प्रेस झाली होती.

उद्याचा दिवस परीसाठी खास असणार होता. तिच्या तुषारचा तिच्यावरचा असणारा तो खोटा खोटा राग गळून पडणार होता. एवढचं काय? ती तिच्या मनातलं देखील त्याला सांगणार होती. ते ही जरा हटक्या पद्धतीने.

सगळा काही नीट असल्याचं पाहून झाल्यावर परीने तिच्या मोबाईलमधला तुषारचा फोटो बाहेर काढला आणि त्या फोटोसोबत ती बोलू लागली.

‘तर साहेबांना खूप राग आला आहे ना माझा’ परी हलकेच हसत बोलली. ‘आता उद्या तुमचा राग किती वेळ टिकतो? ते पण बघते मी. तुम्ही हट्टी असाल तर मी तुमच्यापेक्षा दहा पटीने हट्टी आहे. तुम्ही अजून तरी मला ओळखल नाहीये मिस्टर दगड.’

एवढं बोलली आणि तिचा मोबाईल परत ठेवून ती खाली हॉलमध्ये आली. सायली तर किचनमध्ये कामवाल्या मावशींसोबत जेवणाच बघत होती. ते बघून परीने तेजश्रीला फोन लावला.

तेजश्री देखील तिची उद्याच्या डान्सची तयारी नीट झाली का ते बघत होती. त्या नादात तिने सगळ घर डोक्यावर घेतलं होत. तिचे आई वडील तर तिला वैतागून गेले होते. तर तुषार मात्र त्याच्या खोलीत विचार करत बसला होता.

‘अरे यार कोणता डान्स करणार आहे ती?’ तुषार ‘जर तो दिल्लीचा करत असेल तर मग ती परत तसच करेल का?’

हा विचार परत येताच तो अस्वस्थ झाला. एकतर तेजश्री पण त्याला काहीच सांगत नव्हती. तो परीला थेट विचारू शकत नव्हता आणि त्याच्याशिवाय कोण्या परक्या मुलाने परीला हात लावलेला त्याला सहन ही होणार नव्हत.

तुषार त्याच्याच विचारात असताना तेजश्री तिथे धावत आली. “दाद्या.”

ती एवढ्या जोरात ओरडली की तुषार तर पहिले जरा घाबरलाच होता. तो काळजीने तेजश्रीकडे बघू लागला.

“उद्या तू येणार आहेस ना माझा डान्स बघायला?” तेजश्री धापा टाकत बोलली.

“तू यासाठी जोरात ओरडली?” तुषार जरा चिडून बोलला.

“तस नाही,’ तेजश्री “तू येत असशील तर माझ एक काम आहे ते तुला करायला सांगते.”

“कोणत काम?” तुषार बारीक डोळे करून बोलला. कारण आजकाल ती त्याच सोडून त्याच्या होणाऱ्या बायकोच काम जास्त ऐकत होती ना.

“ते डान्स साठीच आहे...” तेजश्री

“डान्स साठी म्हणजे?” तुषार तिचं बोलण तोडत बोलला. “आता काय मी पण नाचू काय तुमच्यासोबत?”

“ऐकून तर घे ना बाबा.” तेजश्री कपाळवर आठ्या आणत बोलली. “आमच्या डान्सच काही सामान तुला घेऊन उभ राहायचं आहे. ते ही स्टेजच्या एका बाजूला.”

“का?” तुषार गोंधळून विचारू लागला. “तुमच्या कॉलेजचा स्टाफ कमी पडतो का जे मला कामाला लावत आहेस.”

“दादू," तेजश्री लाडात येत बोलली. “ते आम्हा मुलींचं समान आहे ना. प्लीज समजून घेना."

तरीही तुषार तिला बारीक डोळे करून बघत राहीला.

“म्हणजे तुझ्या बहिणीच अस खाजगी समान कोण्या दुसऱ्या मुलाच्या हाती देऊ ना. ठीक आहे.” तेजश्री नाटकी आवाजात बोलत तिथून चिडून जाऊ लागली.

“ओह गॉड.” तुषारने केसात हात फिरवला. “ठीक आहे, तुझा डान्स संपेपर्यंतच ना?”

“हो.” तेजश्री खुश होत बोलली. “म्हणजे वेळ आली तर थोड अजून थांबव पण लागेल.”

“अजून किती आणि का?” तुषार

“दादा यार,” तेजश्री कपाळवर आठ्या आणत बोलली. “किती प्रश्न विचारशील. तुला माझी काळजी आहे की नाही?” तेजश्री धमकीच्या सुरात बोलली.

“ठीक आहे माते.” तुषारने तिच्यासमोर त्याचे हात जोडले.

तशी तेजश्री खुदकन हसली आणि तिथून चालली गेली.

‘अरे यार,’ तुषार मनातच बोलू लागला. ‘आता हीच समान धरून बसलो तर माझ्या सामानावर कस लक्ष ठेवू? ही तेजू पण ना ऐन वेळेस काहीही करायला लावते.’

'माझ सामान?' तुषार या शब्दाने चमकून गेला. 'हिच्य नादी लागून मी काहीही विचार करायला लागलो.' तुषार मनातच सुस्कारा सोडत बोलला.

तुषार मनातच विचार करत होता की त्याला काहीतरी आठवलं. ‘तेजू बोलली की स्टेजच्या समोर उभ राहायचं आहे.’ तसा त्याच्या चेहरा उजळला. ‘चला म्हणजे स्टेजच्या जवळ तर उभ राहता येईल. बघू तर दे माझ्या परीला कोण हात लावतो ते.’ तुषार मनातच खूप खुश झाला.

तर परी पहिल्यांदाच त्यांच्या कॉलेजच्या स्टेजवर नाचणार आहे हे सगळ्या मंडळीना माहिती झाल्याने बंधू मंडळी तर त्यांच्या दीचा डान्स बघायला उत्सुक होतीच. पण सगळी वरिष्ठ मंडळी देखील ह्या वेळेस कॉलेजला परीचा डान्स बघायला येणार होती.

तिकडे तेजश्रीने देखील तिच्या घरी तिच्या आई वडिलांना कॉलेजच्या कार्यक्रमाला यायला सांगितल होत. तेजश्रीने परीच्या डान्सच तिच्या आई वडिलांसमोर इतक कौतुक केल होत की त्यांना देखील परीचा डान्स बघायची उत्सुकता लागली होती.

परी आणि तिचे हे सगळे कुटुंब सोडलं तर बाकी कोणालाही तिच्या डान्स करत असल्याबद्दल माहिती नव्हती.

रावीचा आजचा मुक्काम तिच्या मामांच्या घरी होता. त्यामुळे जशी संध्याकाळ झाली तस तिने तिचे कपडे आवरायला सुरवात केली. ती तिच्या दीच्या मदतीसाठी चालली होती. रुद्रला जमल तरच तो येणार होता. बाकी सोनाली तर तिच्या कामावरून संध्याकाळी निघणार होती. घरी येऊन तिच्या सासूला सोबत घेऊन मग ती कॉलेजला येणार होती.

रावी तिची बॅग घेऊन पार्किंगला आली आणि तिच्या स्कुटीवर तिची ती बॅग ठेवू लागली. आता उद्या परत सगळ्या जोड्या एकत्र येतील पण शशांक मात्र निघून गेलेला असल्याने ती जरा नाराज झाली होती. आता त्याची ड्युटी असल्याने ती त्याला यायला भाग पडू शकत नव्हती. पण एखाद्या टिपिकल गर्लफ्रेंडप्रमाणे ती त्याच्या नावाने जरा बडबड करत होती. त्याच काम महत्वाच आहे हे तिची बुद्धी जरी तिला सांगत होती तरी तिचं प्रेमात पडलेलं मन ऐकत नव्हत ना.

तिची ही बडबड एकाच्या कानावर येत होती. तो जो लपून तिच्यावर नजर ठेवून होता. ‘उद्या तुझ प्रेम तुला मिळेल ना, नक्की मिळेल. पण अस मिळेल की तू ज्याची कल्पना पण करू शकणार नाही.’ एवढं बोलून ती व्यक्ती परत तिथे लपून बसली.

रावी तिच्याच तंद्रीत समान ठेवून झाल्यावर स्कुटीवर बसली आणि तिथून निघाली. ती गेल्यावर लपलेली व्यक्ती परत बाहेर आली आणि त्याच्या मोबाईलवर फोन लावू लागली.

नयनच्या घरी मात्र तिचे वडील तिच्यावर खूप रागावले होते. त्यांचा सुजयवरचा राग अजूनही गेला नव्हता. तिच्या आईने देखील त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला. तरीही त्यांनी त्यांचा राग काही सोडला नव्हता. त्यांना तिच्या मुलीची झालेली ती हालत आठवून अजूनही त्यांच्या अंगावर काटा येत होता. त्यामुळे त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जायला परवानगी नाकारली होती. नयनला तर याच इतक टेन्शन आल होत की तिने रात्रीच्या जेवणाला देखील नकार दिला आणि सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली होती.

“जरा ऐकून तर घ्या ना,’ नयनची आई विनंती करत बोलली. “अस दोघे जण हट्टाला आले तर मी कोणाकडे बघू? त्याने तर त्याची चूक स्वीकारली आहे ना. जे झाल तो एक गैरसमज होता जो आत दूर झाला आहे. मग तुम्ही का ताणून धरत आहात?”

“कारण जी चूक एकदा झाली ती पुन्हा झाली तर ती काय करेल?” नयनचे वडील “त्याने तिचं साध ऐकून पण घेतलं नव्हत.”

“कारण नयन पण रागात त्याला बरंच काही बोलून गेली होती.” नयनची आई “म्हणून बोलते त्यांनी सोडलं आता आपण सोडून देऊ आणि त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागू.”

“लग्न?” नयनचे वडील “मला तर बघू दे ना. माझी परवानगी हवी की नको?”

“आधी तर तयार होते ना?” नयनची आई “मग आता अजून काय बघायचं बाकी आहे?”

“आहे बाकी बघायचं,” नयनचे वडील तो-यात बोलले. “आधी तिला बघून येतो.”

एवढ बोलून नयनचे वडील नयनच्या खोलीकडे निघून गेले. त्यांना अस जाताना बघून नयनची आई गालात हसली.

‘बघायचं आहे म्हणे,’ नयनची आई हलकेच हसत बोलली. ‘सरळ होकार द्यायला इगो आडवा आला ना.’

तिकडे नयनच्या वडिलांनी त्यांच्या लेकीची बरोबर समजून काढली आणि तिला परत जेवायला घेऊन आले. त्यांची मुलगी होती ती, तितकीच हट्टी. कार्यक्रमाला जायला परवानगी दिली तर जेवायला येणार अस तिने तिच्या वडिलांकडून कबूल करून घेतलं होत.

“मला वाटलं की लग्नाला तयार असाल तर ती जेवायला यायची धमकी देईल.” नयनचे वडील नयनकडे बघून बोलले. “पण तू तर फक्त कार्यक्रमाची परवानगी मागितलीस.”

“तुम्हाला ब्लॅकमेल करून मला माझ्या नव्या आयुष्याची सुरवात नाही करायची,” नयन जरा भावूक झाली. “तुम्ही नकार दिला असता तर सुजय आणि माझ तर ठरलं होत की लग्नच नाही करणार.”

“आणि त्याचे ते बंधू मंडळी सहज ऐकले असते ना?” नयनची आई लटक्या रागात बोलली.

तस इकडे नयनला हसू आल.

“ते ही बरोबर आहे बरोबर आहे म्हणा.” नयनचे वडील पण हलकेच हसत बोलले.

मग त्यांनी त्यांची जेवण आटोपली आणि ते निद्रेच्या अधीन झाले.

उद्याचा कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचवून सगळ्यांना कशीतरी बऱ्याच उशिराने झोप लागली.

इकडे रात्री सगळे मस्त निद्राधीन असताना तिकडे शशांकची मात्र झोप उडालेली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज नुसताच फिरत होता. रात्री जेव्हा तो त्याची ड्युटी संपवून त्याच्या घरी चालला होता. तेव्हा त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यावरच बोलण ऐकून त्याला जरा धक्काच बसला. त्यात भर म्हणजे त्याच्या मोबाईलवर त्याच नंबरवरून काही फोटो पाठवले गेले होते जे मेसेजवर बोलले गेलेलेचे स्क्रीनशॉट होते.

ते सगळ बघून शशांक विचारात पडला. त्याला त्या नंबरची माहिती काढायला वेळ लागला नसता. शेवटी तो पण एक निष्णात पोलीस ऑफिसर होता. फक्त समोर आलेल्या माहितीवर तो कोणतीही प्रतिक्रिया देणारा नव्हता. म्हणून त्याने आधी स्वतः बोलून घायचे ठरवले होते. जस त्याच रात्रीच जेवण झाल तसा तो लागलीच घरातून बाहेर पडला आणि त्याची गाडी त्याला आलेल्या त्या ठिकाणच्या दिशेने धावू लागली.

अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. परी रात्री उशीरा झोपून देखील आज पहाटेच उठली. सायली देखील तिच्यासोबत उठली. परीने तिला झोपायला देखील लावल होत. पण तिच्या लेकीचा आज पहिलाच डान्स होता. तिच्यावर कार्यक्रमाची इतर जबाबदारी देखील होती. त्यामुळे ती परीला अजून थोडी झोप काढायला लावत होती.

“एक काम करा दोघी एकमेकींना झोपवा.” दोघींची जुगलबंदी बघून विजय किचनमध्ये येत बोलला. “ही काम मी आटपून घेतो.”

सायली उठल्यापासून तिचा ही बराच गोंधळ चालू होता. त्यामुळे विजयची झोप चाळवली गेली होती. ती आरश्यात बघून तिच आवरत होती. तिच ते रूप बघून विजय तिला बघतच राहीला होता. त्याची ईच्छा तर खूप झाली होती की सायलीला जवळ घ्याव. पण तिचा तो वैतागलेला चेहरा बघून त्याने त्याच्या इच्छेला आवर घातला होता. ती खोलीतून गेल्यावरही त्याला काही झोप लागत नव्हती. शेवटी तो उठला आणि किचनमध्ये आला होता.

“तुम्हाला कोणी उठायला लावल?” सायली

“आता तू इथे असल्यावर त्यांना थोडीच रूममध्ये झोप लागेल.” परी तिचे डोळे मिचकावत बोलली.

तशी सायलीने तिच्या पाठीवर चापट मारली. “जास्त आगाऊपणा करू नकोस. जा आणि आवर पटकन.”

“अच्छा,” परी परत खट्याळ झाली. “म्हणजे तूम्ही मोकळे ना..” परी पुढे बोलणार तोच तिच्या पाठीवर परत एक चापट मारली.

“तूम्ही परत झोपायला मोकळे अस बोलायचं होत मला.” परी लहान मुलीसारखं ओरडत बोलली.

“राहू दे.” सायली “तूला पण रावीची हवा लागली आहे. तूझ्या मदतीसाठी इथे आली होती आणि ती उठली तरी का?”

“ती झोपून राहील हीच माझ्यासाठी तिची मदत आहे.” परी तिचे डोळे फिरवत बोलली.

तसे विजय आणि सायली हलकेच हसले.

नंतर सायलीने परी आणि विजयला किचनच्या बाहेर काढल. त्यांना बाहेर गेल्यावर सायली तिचे हात पटापट चालवू लागली. विजय तर त्यांच्या खोलीत गेला होता. तरी परी तिच कॉलेजसाठीची तयारी करायला तिच्या खोलीत गेली.

ती जशी खोलीत गेली तसा तिने डोक्यालाच हात लावला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →