मागील भागात.
“मंद बदक कडून अजून दुसरी तरी काय अपेक्षा करणार.” नयन पण तितक्याच तोऱ्यात बोलली.
“तू परत हिला मंद बदक बोलली?” माला पण आता चिडून बोलली.
“ते रिकाम डोक यापेक्षा छान नाव आहे.” नयन तिरकस हसत बोलली. “चला ओ सर.” नयनने विजयकडे पाहिलं.
माला तर दोन क्षण नयन काय बोलली? ते समजून घेऊ लागली. मग तिला आठवलं की नयन तिला रिकाम्या डोक्याची हा शब्द बोलायची. माला रागात काही बोलणार तोच विजयने गाडी पुढे नेली देखील होती. कारण ह्यांची मस्ती भांडण काही थांबणार नव्हती.
विजयच्या गाडीच्या मागे बाकीच्या गाड्या निघाल्या. सायलीचे आई वडील आधीच घरी निघून गेले होते. त्यांच्या नातवाच्या स्वागताच्या तयारीसाठी हो. हे सगळे निघून गेल्यावर मात्र ते हॉस्पिटल अगदीच शांत होऊन गेल होत.
आता पूढे.
विजयच्या घरी राधिका तिच्या बाकी कुटुंबासोबत आधीच जाऊन पोहोचली होती. हे दोन दिवस प्रसादने मालाला जास्त काही त्रास दिला नव्हता. पण एकदा का ती फ्री झाली की सगळच वसूल करायच्या तयारीत होता.
आरुष आता सारखा मनालीला फोन लावत होता. पण ती आता त्याचा फोन उचलत नव्हती. खरं तर ती पण सुजयला भेटायला त्याच्या घराकडे यायला निघाली होती. आरुषला सरप्राईज द्यावं म्हणून ती त्याचा फोन उचलत नव्हती.
मनालीचे मामांचा देखील विजयला सारखा फोन चालू होता. विजय गाडी चालवत असल्याने तो काही त्यांचा फोन उचलत नव्हता. सायलीने त्याच कारण देखील विजयला विचारलं. पण विजयने सध्या त्याच उत्तर द्यायला टाळल.
काही वेळातच ते घरी जाऊन पोहोचले. घरी आधीच सुजयच्या स्वगताची जय्यत तयारी झाली होती. बिल्डींगच्या खाली असताना त्याला काही वाटल नव्हत. पण जसा तो लिफ्टने त्यांच्या घरच्या मजल्यावर जाऊन पोहोचला तसा त्याने डोक्यालाच हात लावला.
त्याची आजी आरतीच ताट घेऊन उभी होती. तर घरात बाकी मंडळी आज्जीच्या मागे उत्साहात उभे होते. ते सगळ बघून सुजयने मनातच सुस्कारा सोडला. ही सगळी तयारी बघून परीच्या डोक्यात काहीतरी कल्पना शिजू लागली.
जसा सुजय घराच्या दारात जाऊन उभा राहीला. तस परीने जाणून सुजयच्या बाजूला गर्दी करू नका असे बोलता बोलता नयनला सगळ्यांच्या नकळत त्याच्या बाजूला उभ केल.
आज्जीने देखील परीची कल्पना समजून घेतली आणि सुजयच्या चेहऱ्यासामोरून ताट ओवाळायला घेतलं. ओवाळता ओवाळता मधेच ते ताट नयनच्या चेहऱ्यासमोरून देखील जात होत. ताटातल्या दिव्याची ज्योत अधिकच उजळली गेली आणि त्याच्या प्रकाशात दोघांचे चेहरे देखील चांगलेच उजळले गेले.
सुजय आणि बाकी बंधू मंडळीना ते काही समजल नाही. पण बाकी वरिष्ठ मंडळी यांना मात्र लागलीच त्या गोष्टीची कल्पना आली.
“अरे वा.” राज शेवटी बोललाच. “लग्नाच्या आधीच सोबत गृहप्रवेश?” आणि तो हलकेच हसला.
आता नयन आणि बाकी बंधू मंडळीच्या डोक्यात प्रकाश पडला. नयन तर हलकेच लाजली. तर सुजय परीला आठ्या पाडून बघू लागला. कारण 'सुजयपासून बाजूला व्हा.' हे परीच वाक्य त्याला आता चांगलच आठवल होत.
“आता झालच आहे औक्षण तर या आत,” सायलीची आई “जोडीने.” जोडीने या शब्दावर त्या जोर देत बोलल्या.
सुजयला आता कुठेतरी डोक आपटून घ्यावस होत.
सगळेच घरात स्थिरावले. सुजयला त्याच्या खोलीत पाठवलं गेल. जरी कोणी जायला सांगितल नसत तरी तो स्वतःहून गेला असता. त्याच्यापाठी त्याची बाकी बंधू मंडळी देखील गेली.
नयन सध्यातरी हॉलमधेच बसली होती. परी आणि रावीने सर्वांसाठी पाणी आणलं. तस तर रावीला देखील सुजयच्या खोलीत जायचं होत. पण इथे नयन बसलेली बसल्याने ती नयनवर लक्ष ठेवायला तिथेच बसून राहिली होती.
वरिष्ठ महिला मंडळी यांनी आता देखील नयनला घेराव घातला आणि तिचं घरची चौकशी करायला सुरवात केली. नयन देखील त्यांच्यात मिसळून जात त्यांच्याशी मनमोकळी गप्पा मारू लागली.
परी आणि राजच्या कसल्याश्या गप्पा चालू होत्या. त्या दोघांसोबत प्रसाद देखील होता. सायलीचे आज्जी आजोबा ते देखील त्यांच्या खोलीत जाऊन आराम करत होते. म्हणजे सायलीने त्यांना जबरदस्ती पाठवलं होत.
विजय मात्र त्याच्या बाकी मित्रांना सोबत घेत त्याच्या खोलीत गेला होता.
तर रावी आता बाजूला एकटीच पडली होती. आतापासून नयनला दिला जाणारा भाव बघून ती त्या महिला मंडळीना आठ्या पाडून बघत होती.
“एवढ्या लांबून स्वतःच्या कानाला त्रास देण्यापेक्षा इथेच येऊन बस ना.” आपल्याकडे आठ्या पाडून बोलणाऱ्या लेकीला बघून सोनाली बोलली.
“ही लहानपणापासून अशीच आहे का?” नयन पण तिच्याकडे बघत बोलली. “मं....” ती बोलता बोलता थांबली. कारण आता सोनाली नयनकडे आठ्या पाडून बघू लागली होती.
“बरोबर ओळखलस तू.” आराध्या आता तिचे डोळे मिचावत बोलली.
मग सोनाली आराध्याला पण आठ्या पाडून बघायला लागली. आपली आई आपली बाजू घेत आहे बघून रावीची नसलेली कॉलर ताठ झाली. ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच सोनालीने बोलायला सुरवात केली.
“काहीही काय बोलता ओ माझ्या लेकीला?” सोनाली पूर्ण नाटकी आवाजात बोलू लागली. “आता नाही समजत लवकर कोणाकोणाला? सांगाव लागत सगळ लहान मुलासारखं. म्हणून काय तिला अस मंद बदक बोलाल?” मग ती नयनकडे बघू लागली. “आणि ती तुला कुठल्या अँगलने बदक दिसते?”
एवढचं ऐकून रावी ताठ होऊन बसली. याआधीच सोनालीच वाक्य तिच्या डोक्यावरून गेल होत.
“एवढा लांब बांबू तुला बदक दिसतो?” सोनाली तिचं हसू दाबत बोलली.
रावी तिची भुवई उंचावत नयनला चिडवणार तोच तिच्या डोक्यात प्रकाश पडू लागला की तिची आई तिची बाजू घेत नसून तिची मस्करी करत होती.
आणि दुसऱ्याच क्षणाला तिथे हास्याचे फवारे उडाले.
“नॉट फेअर मॉम.” रावी चिडून उठली आणि सरळ तिच्या बंधूमंडळीकडे जाऊ लागली.
“अय्या,” नयन जाणाऱ्या रावीला बघून लागलीच उठली आणि तिच्याकडे गेली. “आमच्या नणंद बाईना राग आला? सॉरी.” नयन अगदीच निरागस होऊन बोलली.
आता रावी तिला बघतच राहिली.
“सुजय तुमच खूप कौतुक करत असतो,” आता नयन रावीसोबत प्रेमाने बोलू लागली. “मी इतक्या वेळा तुम्हाला काहीही बोलले. तरी तुम्ही देखील तितकच बोलून सोडून दिल. ते मनावर नाही घेतलं. तुमच्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित इतक कधीच ऐकून घेतलं नसत. तुम्ही नारळासारख्या आहात. वरून कडक दिसत असल्या आतून कोमल मनाच्या.”
“आता मी तुला नारळ दिसते?” रावी कपाळावर आठ्या पाडून बोलली. तिने घेतलेला शब्दशः अर्थ ऐकून बाकीच्यांनी नकारार्थी मान हलवली. “आधी मला मंद बदक बोलली. तुझ्यामुळे माझी मॉम मला बांबू बोलली आणि आता तू नारळ बोलत आहेस. ईथे माझ बारस करायला आली आहेस का?”
आता मात्र नयनने पण एक उसासा टाकला आणि परत वरिष्ठ महिला मंडळात येऊन बसली आणि तिने परीकडे पाहिलं.
“चुकी झाली माझी.” नयन तोंड पाडून बोलली.
“खूप लवकर सुचल.” रावी विजयी सुरात बोलली.
ते ऐकून मात्र बाकी महिला मंडळीना त्यांच हसू आवरता आल नाही आणि त्या सगळ्याच खळखळून हसू लागल्या. ते बघून रावी अजूनच चिडली आणि सुजयच्या खोलीकडे निघून गेली.
“तुझ्या आईचा नंबर दे.” आराध्या नयनकडे बघत बोलली.
सायलीच्या ऐवजी आराध्याने नंबर मागितला म्हणून नयन जरा गोंधळली.
“वेंधळी आहे ती,” सायलीची आई त्यांच्या खोलीतून बाहेर येत बोलली. “लहानपणापासून आरुनेच तिला संभाळल आहे. नाहीतर ती पण या रावी सारखीच...” ती बोलता बोलता थांबली. कारण सायली तिच्या आईकडे रोखून बघू लागली. तर आराध्या गालात हसू लागली.
तिचं काय तिच्या बाकी मैत्रिणी पण हसू लागल्या.
“आठवत का?” सोनाली हसत बोलली. “आरुचा हात समजून दुसऱ्याचाच हात पकडून घेतला होता कॉलेजमध्ये असताना.”
“तेही तिच्या अहोंच्या कवितेमध्ये हरवून जात.” आरती अगदीच रोमांटिक आवाजात बोलली.
“आणि ते,” सोनाली “लहान असताना आरु शेतात पडली होती तेव्हा जळलेल्या शेतातून ही धावत सुटली होती.”
“आणि घरात पहिल्यांदा पाव भाजी करायला घेतली होती तेव्हा.” आता सायलीची आई पण सुरु झाली.
ह्या सगळ्यांना सुरु झालेलं बघून सायली हातची घडी घालून तिच्या ह्या नाटकी मैत्रिणींना बघू लागली. तर तिला अश्या अवस्थेत बघून बाकी जणी अजूनच हसू लागल्या.
“काहीही काय बोलता ओ माझ्या वहिनीला.” जिया पण सुरु झाली.
तशी सायलीने तिच्या पाठीवर चापट मारली. “तू पण तशीच आहेस, तुझ्या भावासारखी.” सायली तिचं तोंड वाकड करत बोलली.
तसे ते अजूनच हसू लागले. ह्या सगळ्यांना अस मनमोकळ हसताना बघून नयनला खूपच भारी वाटलं. सगळेच असे रक्ताचे नव्हते तरी रक्ताच्या नात्यापलीकडचे घट्ट असे नाते जगत होते. तर नयनच्या घरी इनमीन चार माणस होती. तिचे आई वडील, भाऊ आणि ती.
नातेवाईक होते ते सगळेच गावी होते. इथे आजूबाजूच्या शहरात काही जण होते. तेही फक्त कधी सणवार अथवा काही काम असल की तेव्हाच येत होते. अस भरलेलं कुटुंब बघून नयनला ते अजून जाणून घ्यायची खूप इच्छा झाली. आधी सुजयने ह्या सगळ्यांबद्दल तिला फक्त माहिती दिली होती. ते इतके घट्ट होते हे कधी सांगितलं नव्हत.
ती सगळ्यांचच निरीक्षण करत होती. साध, निर्मळ मन, जीवाला जीव लावणारी त्यांची मैत्री, त्यांच्यात भांडण झाली असतील अस तिने कधीच सुजयकडून ऐकल नव्हत. हा, एकमेकांना खूप बडबड करत होते. ते ही एकमेकांच्या काळजीपोटी. त्या सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे होते. तरीही ते एक कुटुंब म्हणून थाटात जगत होते.
सुजयच निर्मळ मन, प्रसंगी दाखवलेला राग, त्याचा तो स्पष्टवक्तेपणा आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्या सगळ्या बंधू मंडळीमध्ये भरलेला वेंधळेपणा. ह्या सगळ्यांच कारण आता ती समोर स्वतः बघत होती. ती तिच्या विचारात तिच्या घरच्यांना विसरून गेली होती.
ती तिच्याच विचारात असताना तिला आवाज आला.
“पण हिच्या घरी पण विचारावं लागेल ना?” आराध्या
आता नयनच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिला घरची आठवण आली. तिने रागाच्या भरात तिच्या आई वडिलांना तिच्यासाठी मुलगा बघायची परवानगी दिली होती. इतक्या महिन्यानंतर मुलीने परवानगी दिली म्हणून तिची आई खूप खुश झाली आणि तिच्यासाठी वर संशोधन सुरु केले होते.
आज सकाळी तर तिच्या आईने तिच्या मोबाईलवर दोन मुलांचा बायोडाटा देखील पाठवला होता. तिला हे सगळच आठवलं आणि ती लागलीच तोंड पाडून बसली.
तिचा पडलेला चेहरा बघून तिच्या आजू बाजूला बसलेल्या महिला मंडळ लगेच टेन्शनमध्ये आल्या.
“काय गं?” सोनाली प्रेमाने विचारू लागली. “काही प्रोब्लेम झाला आहे का घरी?”
“आमचा सुजय त्यांना नक्की आवडेल बघ.” जिया मंद स्मित करत बोलली.
“नाहीतर काय?” राधिकाही लगेच सुरु झाली. “लाखात एक आहे माझा भाचा.”
“ते नाही.” नयन आता जरा चाचरत बोलली. “ते मीच जरा माती खाल्ली आहे घरात.”
तश्या सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
“काय केलस?” सायलीची आई प्रेमाने विचारू लागली. “इथे बोल. इथे प्रत्येक प्रोब्लेमवर सोल्युशन मिळत.”
“त.. ते मी रागात होते तर..” नयनने जरा पोज घेतला.
“तर काय बोलली घरी?” आरती तिचा चेहरा वाचत बोलली.
“ते माझे आई वडील कधीचे माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत.” नयन
“बरोबर आहे,” प्राजक्ता “योग्य वयात लग्न झाल की आई वडील मोकळे. पण मग प्रोब्लेम काय आहे? आता घरचे लग्नाच बघत आहेत तर आम्ही घरी येतो आणि लग्नाची मागणी घालतो तुला.”
तस बाकी महिला मंडळीनी प्राजक्ताच्या बोलण्याला सहमती दर्शवली.
“ते मी त्यांना बोलून गेली की दुसरा मुलगा बघा म्हणून.” नयनने आता तिची मान खाली घातली.
“दुसरा मुलगा बघा म्हणजे तू सुजयबद्दल घरात सांगून दिल होतस?” परी
तशी नयनने होकारात मान हलवली.
“आणि त्यांना काहीच हरकत नव्हती?” सायली
आताही तिने होकारात मान हलवली.
“आणि आता जसा तुला सुजयचा राग आला होता,” आराध्या “तसाच तुझ बोलण ऐकून तुझ्या वडिलांना सुजयचा राग आला आहे.”
आताही तिने हळूच होकारात मान हलवली.
“हे भगवान,” राधिकाने पण डोक्याला हात लावला. “आम्हाला वाटल तू सुजयला सुधरवशील. पण तुलाच त्याची हवा लागली आहे. त्यालाही जरा दम निघत नाही.”
आता नयनने तिचे ओठ बाहेर काढले.
“आता रावीसोबत बोलली तर किती मॅच्युअर वागलीस?” सायली “मग तेव्हा काय झाल होत?”
“तेच ना,” नयन “तो खडूस काही ऐकत नव्हता.” नयन आता भावनेच्या भरात बोलून गेली. “आणि त्यात त्याची ती वानरसेना. ती पण मला त्या खडूसला भेटू देत नव्हती. कॉलेजला जाऊन दीला भेटाव तर ते मंद बदक तिथेच घुटमळत असायचं. मग मी तरी किती वाट बघणार ना??”
तिचं बोलण थांबल्यावर तिने पाहिलं तर बाकी सगळ्या महिला मंडळ तिलाच डोळे फाडून बघत होत्या.
“इतकही रोखून बघू नका,” नयन तिचं तोंड वाकड करत बोलली. “जे आहे ते आहे.”
पण नंतर तिने त्यांना पाहिलं तर त्या सगळ्या एकवार मागे बघत होत्या आणि एकवार तिच्याकडे बघत होत्या. आता नयनला जाणवलं की तिच्यामागे कोणीतरी उभ होत. तशी नयन हलकेच पुढे झाली आणि परीच्या पाठी गेली. कारण तिच्या पाठी नक्कीच बंधू मंडळी असतील याची तिला जाणीव झाली होती.
परीच्या पाठी गेल्यावर नयनने मागे वळून पाहिलं तर मालाने रावीला धरून ठेवलं होत. ती बाजूच्या सोफ्यावरची उशी घेऊन तिच्यावर आवरून चालली होती. तर माला तिला अडवत होती.
“आत्या तुझ्या डीस्पेन्सरी सुनेला सांगून ठेव,” रावी चिडून बोलली. “नाहीतर तिचच इंजेक्शन मी तिलाच टोचेल.”
सुनेला हा शब्द ऐकून नयनला जरा लाज चढली. रावी तिला भांडत जरी असली तरी तिने त्यां दोघांच्या नात्याला स्वीकारलेल असल्याची पावती होती ती.
“तुम्हाला काय गरज होती तिला अडवून ठेवायची?” आराध्या
“काय गरज म्हणजे?” रावी “दादूनेच सांगितलं होत. ती दीला रूड बोलली होती तर तिला भेटू देऊ नका.”
“त्यासाठी आधी ऐकायला शिकव लागत.” नयन तोऱ्यात बोलली. “मी कितीतरी वेळा रिक्वेस्ट केली. हात जोडले तरी नाहीच. आधीच ऐकल असत तर ..”
“तर आतापर्यंत सगळ ठरलं असत ना?” विजय बाहेर येत बोलला. त्याच्यापाठी त्याची मित्र मंडळी पण बाहेर आली.
“नसत झाल.” नयन तोंड बारीक करू बोलली आणि तिने जो काही गोंधळ घालून ठेवला होता तो विजयला सांगितला.
“हम्म,” विजय विचार करत बोलला. “आता ज्यांच्यामुळे हा प्रोब्लेम झाला त्यांनाच त्यातून मार्ग काढायला लाव.” विजयने सर्व बंधू मंडळीवर नजर टाकली.
ते ऐकून त्यांचे चेहरे प्रश्नार्थक झाले.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
