मागील भागात.
मग परी तुषारजवळ आली आणि त्याला कॉलेजच्या मागच्या आवारातल्या एका मोकळ्या जागेत घेऊन गेली.
“का लपवलं माझ्यापासून?” परीने थेट मुद्याला हात घातला.
“कारण तुला माहिती आहे.” तुषार “तू टेन्शन घेत बसली असती आणि त्या टेन्शनमध्ये कोणताही निर्णय घेऊन मोकळी झाली असती.”
“मी लहान आहे का काहीही निर्णय घ्यायला?” परी कपाळवर आठ्या आणत बोलली.
“हो,” तुषार “जेव्हा तुझ्या ह्या माणसांचा विषय येतो तेव्हा तू काहीही करू शकतेस, याची मला खात्री आहे.”
“तुम्हाला काय माहित?” परी
“तितक मला माणसांना वाचता येत.” तुषार
आता परी तुषारला बघतच राहिली. मग तिला आठवलं की तिला तर तुषारपासून लांब राहायचं आहे. तेजश्री तर काही तिच्या भावाला परीचा निरोप सांगणार नव्हती. मग तिने स्वतःच तुषारसोबत बोलायचे ठरवले.
“आणि एक.” परी दुसरीकडे बघत बोलली. “अस नका समजू की तुमचे चालू असलेले प्रयत्न मला समजत नाहीत. पण एक गोष्ट सांगते. मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही माझा विषय सोडा.” परी हे सगळ एका दमात बोलून गेली.
“हेच माझ्याकडे बघून बोल.” तुषार तोऱ्यात बोलला.
तस परीने त्याला चिडून पाहिलं.
आता पूढे.
“माझ्या प्रश्नाच उत्तर मला मिळाल.” तुषार मंद स्मित करत बोलला. “राहीला विषय तुझ्या आई वडिलांचाना, ठीक आहे. त्यांना तर तू नकार देऊ शकणार नाहीस ना?”
आता परीने तुषारला चमकून पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात वेगळाच आत्मविश्वास दिसला. ज्याने तिच्या हृदयाचे ठोके लागलीच वाढले गेले.
“बाय फ्रेंड.” तुषारने त्याचा हात पुढे केला. तशी विचारात हरवलेली परी भानावर आली.
तस तिने तिच्या मानेला झटका दिला आणि सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करून जाऊ लागली.
“हाच हात मिळवण्यासाठी तू नंतर धावत माझ्याकडे येशील.” तुषार जाणाऱ्या परीकडे बघत बोलला.
तस परीने मागे वळून तुषारला पाहिलं. “अशी स्वप्न बघायची नसतात.” परीने तिचं तोंड वाकड केल आणि निघून गेली.
इकडे तुषार पण हसतच कॉलेजच्या बाहेर पडला. तिथे तेजश्री कधीची त्याची वाट बघत उभी होती. तिला बघून तुषारला परत सगळ आठवलं आणि तो चिडून तेजश्रीकडे जाऊ लागला.
‘अरे हा तर खूप चिडलेला दिसतोय.” तेजश्री मनातुन घाबरली. पण चेहऱ्यावर तिने तस दाखवू दिल नाही. जसा तो तिच्या जवळ आला आणि तिला काही तो बोलणार त्याआधी तेजश्री बोलू लागली. “मॅमचे शब्द विसरला का?”
“तुला गरज काय होती ते बोलायची?” तुषार
“कारण त्या मला सारख्या सांगत होत्या की तुला सांग त्यांचा विषय सोड.” तेजश्री कपाळावर आठ्या आणत बोलली. “आणि मी ते कधीच करू शकणार नव्हती. हे तुलाही चांगलच माहिती आहे. मग त्या जरा चिडून बोलल्या मग माझ्या तोंडातूनही ते निघून गेल.”
तस तुषारने त्याचे डोळे घट्ट मिटून परत उघडले आणि तो तेजश्रीला घेऊन घरी गेला.
इकडे मनाली तिला मिळालेल्या पत्यावर पोहोचली तर होती. पण तिथे तिला कोणीही दिसत नव्हत. तिला तिच्या खऱ्या आई वडिलांची माहिती घेण्याची इतकी घाई झाली होती की ती ज्या नंबरवरून मेसेज आला होता. त्या नंबरवर सारखा सारखा फोन करत होती. पण तो फोन देखील सारखा बंद लागत होता. तस तशी ती खूपच चिडायला लागली होती. थोडावेळ तर तिला अस वाटल की कोणीतरी तिच्यासोबत मस्करी तर करत नाही ना?
काही वेळ झाला तोच तिच्यापासून थोड लांब अंतरावर एक गाडी येऊन थांबली. मनालीच लक्ष तिकडे गेल. त्या गाडीतून आधी एक माणूस उतरला त्याच्यामागे अजून एक माणूस उतरला. त्या माणसाला मनालीने बरोबर ओळखल होत. कारण त्या दिवशी तिच्या आई वडिलांसोबत बोलणारा तोच माणूस होता.
पहिले तर त्याला बघून मनालीला आनंद झाला. पण त्याचा घाबरलेला चेहरा बघून ती विचारात पडली. मग तिला त्यांच त्या दिवसच बोलण आठवल. त्याच्यानुसार ते तर तिला स्वतःहून खऱ्या आई वडिलांची देणार नव्हते आणि ते स्वतः दुसऱ्या लोकांचा माणूस म्हणून त्यां लोकांत वावरत होते. आता ती लोक कोणती होती? ते तर मनालीला माहिती नव्हत. पण एक गोष्ट तिला समजली होती की तिने आधी पाहिलेला हा माणूस तिच्या विरुद्ध असलेल्या माणसांत राहून त्यांना मदत करत होता. याचा अर्थ आता त्या माणसासोबत असणारा दूसरा माणूस तिच्या विरुद्ध लोकांमधला असू शकणार होता.
पण ती तर आता तिथे येऊन पोहोचली होती. ते पण तीएकटीच आली होती. आता काय करावं? हा प्रश्न तिला पडला. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज येऊन पोहोचला. तो तिने उघडून वाचला तर त्यावर दोन शब्द लिहिले होते.
‘लवकर पळ.’ मनालीला तिच्या प्रश्नाच उत्तर मिळाल. तिने त्या गाडीतून उतरलेल्या माणसाला अजून तरी लांब असलेल पाहिलं आणि तिने इकडे तिकडे नजर टाकली. तिला तिच्याकडे एक रिक्षा येताना दिसली. मनालीने तिच्या चेहऱ्यावर कुठलीही घाबरल्याची भावना दाखवली नाही. तिने तिचा मोबाईल बाहेर काढला. सोबत आलेल्या रिक्षाला हात केला.
“हा बाबा,” मनाली मुद्दाम मोठ्याने बोलली. “आलीच मी. ते कोणीतरी मला मेसेज केला होता.”
मनालीच्या तोंडातून निघालेलं ते वाक्य मनालीच्या जवळ पोहोचलेल्या त्या माणसाला आला आणि तो जागीच थबकला.
जशी रिक्षा जवळ आली तशी मनाली पटकन त्यात बसली आणि रिक्षावाल्याला तिच्या घरचं ठिकाण सांगितल. रिक्षा पुढे गेली आणि मनालीने सुटकेचा श्वास सोडला.
इकडे मनाली हातून गेली म्हणून तो माणूस चरफडत राहीला. त्याच्या मागे उभा असलेला मनालीचा मामा मनातून तर जरा निवांत झाला. पण त्याला एक प्रश्न पडला होता की गौतमने मनालीला ओळखलं कस? कारण मनाली तर अगदीच लहान होती तेव्हापासून तिला तिच्या गावाला कधीच आणल नव्हत. इतकच काय? तिचं नेव देखील बदललं गेल होत. मनालीचे आताचे वडील देखील एक वेळेसच त्यांच्या गावाला आले होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखण हे देखील जवळपास अशक्य होत. मग त्यांनी स्वतःच्या डोक्याला जरा ताण दिला.
‘मी त्यांना फितूर आहे हे तर त्यांना समजल नाही ना?’ हा विचार करून मनालीच्या मामांच्या अंगावर सरकन काटा आला. ‘तस असत तर त्या गौतमने मला पण सोडलं नसत. मग इकडे मलाच पाठवण्याचा उद्देश काय? त्याला माझी वफादारी तर बघायची नव्हती? की ही तिचं मुलगी आहे जिला गावापासून लांब ठेवलं आहे. हे तर त्याला बघायचं नसेल?’ खूप सारे प्रश्न त्याच्या मनात थैमान घालू लागले. पण त्याने त्याच्या चेहऱ्यावर लागलीच राग चढवला. कारण त्याला एक गोष्ट तर समजून आली होती की गौतम त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवून होता.
“इतकी घाई करायची काय गरज होती?” मनालीचा मामा रागात त्या माणसाला बोलला.
“मला काय माहित की तिला लगेच कोणाचा फोन येणार होता ते.” तो माणूस सुद्धा चिडून बोलला.
“अरे तिचा फोन तरी वाजला होता का?” मनालीचा मामा अजून रागात बोलला. “तिने आपल्याला वेड्यात काढलं.”
“अरे हो, फोन तर वाजलाच नाही.” तो माणूस डोक खाजवत बोलला.
“काही कामाची नाही तुम्ही.” मनालीचा मामा ते आलेल्या गाडीत बसले. तसा तो माणूस देखील गाडीत बसला आणि ते दोघेही निघून गेले.
‘आता त्यांच्याशी संपर्क साधायला दुसरा मार्ग शोधावा लागेल.’ मनालीचा मामा मनातच विचार करू लागला. तो त्याच्या विचारात असताना त्याचा फोन वाजला त्याने पाहिलं तर तो फोन गौतमचा होता. साहजिक आहे काम झाल का ते विचारायला तो फोन आला होता.
मनाली हातून निसटली हे समजताच गौतम रागात बडबड करू लागला. पण मनालीच्या त्या मामाने सगळ काही त्याच्या सोबतच्या माणसाच्या अंगावर शिताफीने लोटले. शेवटी मनालीला पकडायच्या उद्देशाने त्या माणसाने खूपच घाई केली होती. त्याच्यामुळेच मनालीला शंका आली आणि नेमकी त्याच वेळेस मनालीला तिच्या वडिलांचा फोन आला. एवढं बोलून मनालीचा मामा शांत बसला. पण गौतमला कुठे शांत बसता येत होत. रागाच्या भरात त्याने मनालीला कस ओळखलं ते मनालीच्या मामला सांगून दिल. तेव्हा ते गौतमला तर समजल नव्हत पण मनालीच्या मामाने ते बरोबर लक्षात ठेवलं. काही वेळाने त्याने त्याच्या सोबतच्या माणसाला पुढे पाठवले आणि स्वतः एका ठिकाणी थांबून घेतलं.
इकडे मनाली तिच्या घरी पोहोचेपर्यंत घामाने भिजलेलीच होती. ती आता काय करायला चालली होती? याची जाणीव तिला आता होत होती. उगाच कोणावरही विश्वास ठेवून ती संकटात पडता पडता वाचली होती. आता ही गोष्ट तर ती घरी सांगू शकणार नव्हती आणि रावीला सांगायचं म्हणजे स्वतःहून वादळाला मिठी मारल्यासारखं होत. तिला इतकी विचारात हरवली होती की ती घरी पोहोचली होती ते देखील तिला समजल नव्हत. जेव्हा रिक्षावाल्याने तिला आवाज दिला तेव्हा ती तिच्या विचारातून बाहेर आली होती.
ती लगबगीने रिक्षातून उतरली आणि घराकडे जाऊ लागली. तिला येताना बघून मनालीची आई पटकन पुढे आली आणि मनालीला दारातून पटकन आत खेचून घेतलं.
मनाली तिच्या आईच्या ह्या वागण्याने गोंधळून गेली. एकवेळ तर आईला काही समजलं तर नाही ही शंका आली.
“कुठे गेली होतीस गं न सांगता?” मनालीची आई मनालीला काळजीने ओरडत विचारू लागली. “नुसता जीवाला घोर लावून ठेवते. सांगून नाही जाता येत का तूला?”
आईच्या अश्या एकामागे एक आलेल्या प्रश्नाने मनालीला अजूनच भरून आल आणि तिने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. हातातून खूप काही निसटून जाणार होत ते आलेल्या एका मेसेजने तिला आवरून घेता आल होत. त्यामुळेच तिने तिच्या आईला भावनेच्या भरात मिठी मारली होती.
“काय झाल मनु?” मनालीची आई लागलीच भावूक झाली आणि मनालीला हळवी होऊन विचारू लागली.
मनालीने फक्त नकारार्थी मान हलवली आणि अजूनच तिच्या आईच्या मिठीत शिरली. तस मनालीच्या आईने तिला तिथल्याच एका सोफ्यावर बसवलं.
“आता खरं खरं सांग काय झाल ते?” मनालीची आई
“हा, एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून.” मनाली जरा चाचरत बोलली.
“बोल ना बाळा.” मनालीची आई तिचा हात आपल्या हातात घेऊन विचारू लागली.
“ते एक मुलगा मला आवडतो.” मनाली विषय बदलायचा म्हणून तिने हा विषय बाहेर काढला होता.
“त्याच नाव आरुष आहे ना?” मनालीची आई पटकन बोलून गेली.
तशी मनाली तिच्या आईला मोठे डोळे करून बघू लागली. “त.. तू... तुला कस..?” मनालीची चांगलीच ततपप झाली.
“आमचे पण खबरी असतात म्हटलं.” मनालीची आई हसतच बोलली.
“रावडे.” मनाली पण तिचे डोळे घट्ट मिटून जोरात ओरडली. “तिच्या पोटात तर काहीच राहत नाही.
मनाली पुढे काही बोलणार तोच मनालीचा फोन वाजला. तिने पाहिलं तर तो फोन आरुषचा होता. आज सकाळपासून तिच त्याच्याशी काहीच बोलण झाल नव्हत. पण आता समोर आई असल्याने मनालीने पटकन तो फोन सायलेंट करून उलटा ठेवला. तिची ती गडबड बघून मनालीची आई हलकेच हसली.
"बोला तुम्ही.” मनालीची आई “मी तुझ्यासाठी चहा टाकते.”
यावर मनालीने तिच्या आईला उगाच हसवून दाखवलं. जशी तिची आई किचनमध्ये गेली तसा तिने पटकन तिचा मोबाईल पहिला. तर तो फोन वाजून कट देखील झाला होता. मग मनालीने आरुषला फोन लावला.
सुजयला डिस्चार्ज देत होते. किमान मनाली तेव्हा तरी येईल अस आरुषला वाटल होत. कारण तिथे आता सगळीच बंधू मंडळी होती. रावीचा देखील मनालीला खूप फोन झाले होते. पण मनालीने ते काही उचलले नव्हते आणि आता तिला फोन केला तर ती नुसतीच तिला भांडत बसेल याची देखील तिला चांगलीच खात्री होती.
“कुठे आहेस?” मनालीने फोन केल्या केल्या आरुषने विचारले.
“अम्म सॉरी,” मनाली बारीक आवाजात बोलली. “ते घरी होते. मी आज आपल्याबद्दल घरात सांगितलं.” आता मनाली टेन्शनमध्ये येत बोलली.
“व्हॉट?” आरुष जरा चमकलाच.
“हो,” मनाली “ते तुमच्या घरी तर माहिती झालाच होत ना. म्हणून मग मी आता माझ्या घरी पण संगून दिल. त्यांना काहीच हरकत नाहीये. उलट आईने मी नाव सांगण्याआधीच तुमच नाव सांगितल.”
“रावीने सांगितलं असणार.” आरुष दीर्घ श्वास घेत बोलला.
“हम्म,” मनाली पण उसासा टाकत बोलली. “तिच्या काही पोटात राहतच नाही.”
“आता सुजयला सोडणार आहेत.” आरुष
“हम्म,” मनाली “मी घरी येते ना. आधीच तिथे तुमची गर्दी झाली असणार. त्यालाच सांभाळता सांभाळता हॉस्पिटलवाल्यांच्या नाकी नऊ आल असणार.”
“आता तिथे सुजयची गर्ल फ्रेंड आहे तिथे आमची गर्दी तरी काय चालणार? तिने आम्हाला पण त्याच्या खोलीपासून लांब ठेवलं आहे.” आरुष तक्रारीच्या सुरात बोलला.
“आणि तुम्ही तिचं ऐकल?” मनालीला जर हसूच आल.
“मग काय?” आरुष त्याच तोंड वाकड करत बोलला. “तिने दीसोबत बोलून तिला तिच्या बाजूने करून घेतलं.”
आता मनाली अजूनच हसू लागली. “मी घरीच येते मॅमच्या.”
“अजूनही मॅम?” आरुष तिची मस्करी करत बोलला.
“मला सवय लागायला वेळ लागेल ना.” मनाली बारीक तोंडाने बोलली.
“ठीक आहे.” आरुष
“रावी कुठे आहे?” मनालीने हळूच विचारलं.
“ही काय बाजूलाच आहे.” आरुषला तिची फिरकी घ्यायची लहर आली. “आपल बोलण ऐकत होती.”
“काय?” मनालीचे डोळेच मोठे झाले. “म... मी मग.. मी ठेवते फोन.”
तसा आरुष खळखळून हसला. “अगं गम्मत केली मी.”
“जावा मला नाही बोलायचं तुमच्याशी.” मनाली लटक्या रागात बोलली आणि सरळ फोन ठेवून दिला.
“घे गं चहा.” मनाली आई चहा घेऊन आली. “लवकर ठेवलास फोन?”
“हा सगळेच माझी मस्करी करा.” मनाली कपाळवर आठ्या पाडत बोलली. सोबतच आईने आणलेला चहा घेतला आणि त्याचे घोट घेऊ लागली.
तिकडे हॉस्पिटलमध्ये सुजयच्या खोलीत बराच गोंधळ चालू होता. साहजिक आहे जिथे ही सगळी बंधू मंडळी जमा होतील तिथे कधीच शांतता नांदू शकत नव्हती. त्यांचा आवाज असा होता की आजूबाजूच्या तीन ते चार खोल्यांपर्यंत त्यांचा तो आवाज जात होता. डॉक्टर देखील त्यांना सांगून वैतागले. पण ती मुल काही सुधारायची नाव घेत नव्हती.
शेवटी नयन तिथे आली आणि सरळ तिला त्रास देतात अस त्यांच्या दीला सांगण्याची धमकी त्यांना दिली. तेव्हा कुठे ते शांत झाले. एवढ्यावरचं नयनच समाधान झाल नाही. म्हणून तिने ह्या सगळ्यांना थेट त्या खोलीच्या बाहेर काढलं.
काही वेळाने परी देखील तिथे जाऊन पोहोचली. कॉलेजमधून ती थेट तिथे आली होती. बाकी सगळी वरिष्ठ मंडळी तर होतीच. त्यात सायलीचे आई वडील देखील होते. बाकी वरिष्ठ मंडळीचे आई वडील आधीच सुजयला भेटून गेले होते.
एवढा मोठा गोतावळा बघून हॉस्पिटलचा सगळा स्टाफ अचंबित झाला होता. खर तर सुजयला फक्त खरचटलं होत. त्यासाठी आता जण आलेले बघून, त्याला समजा जास्त लागल असत तर किती जण आले असते? हा विचार त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे गेला होता. तरीही त्यांच्या ॲकेडमीमधले विद्यार्थी अजून तिथे आले नव्हते.
क्रमशः
कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
