Login

अवनी एक प्रवास भाग ८९

परीला देखील ते जाणवलं पण तिने तस दाखवू दिल नव्हत. जरी ती काही बोलली असती तरी त्याने त्याच्या मनासारखंच केल असत. त्यापेक्षा तिने त्याला तिच्या पाठी पाठी येऊ दिल होत. त्याला आरश्यातून बघताना परीच्या गालावर हलकीशी लाज चढली होती.
मागील भागात.

“सॉरी.” मालाने त्याला घट्ट मिठी मारली. प्रसादने देखील तिला तसाच त्याच्या मिठीत कवटाळून घेतलं.

इकडे परी त्या खोलीत आली. तस तिने पाहिलं तर महिला मंडळ एका बाजूला बसलं होत तर सुजय, राज, आदेश, जय, आरुष एका बाजूला बसले होते.

नयनला पडलेला घेराव बघून त्यांना सगळ काही समजून गेल आहे याची कल्पना परीला आली. मग ती देखील त्यांच्यात जाऊन बसली.

इकडे हा सगळा गोंधळ चालू असताना तिकडे मनाली मात्र एका फोनची आतुरतेने वाट बघत होती. रावीने जस तिला घरी सोडलं होत तसा तिच्या मोबाईलवर एक फोन आला होता. पहिले तर अनोळखी नंबर बघून तिने काही तो उचलला नाही. पण तो सारखाच वाजत असल्याने तिने शेवटी तो उचललाच.

“तुला जर तुझ्या खऱ्या आई वडिलांची माहिती हवी असेल तर मी जो पत्ता पाठवेल त्या पत्त्यावर येऊन भेट. थोड्यावेळाने मी पत्ता सांगायला तुला परत फोन करेल आणि हो ही गोष्ट कोणाला सांगितलीस तर तू तुझ्या खऱ्या आई वडिलांना कायमच गमावशील.”

एवढं बोलून तो फोन कट झाला होता. समोरच्या माणसाने मनालीला बोलायला संधी देखील दिली नव्हती. मनाली तिच्या मोबाईलला बघतच राहीली.

आता पूढे.

फोनवरच बोलण ऐकून मनाली अस्वस्थ झाली. तिला तिच्या खऱ्या आई वडिलांची माहिती तर पाहिजे होती. तिला त्यांना जाब विचारायचा होता. तेच जर न भेटता गमावले गेले तर तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नव्हती. त्यामुळे आता काय करावं? हा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने त्या पत्त्यावर जायची तयारी केली आणि त्या फोनची वाट बघत बसली.

सुजय हॉस्पीटलममध्ये असल्याने तिने सध्या आरुषला काही फोन केला नव्हता. शेवटी तो त्याचा भाऊ होता आणि तो पहिले सुजयकडेच लक्ष देणार होता. याची तिला जाणीव होती. त्या पत्त्यावर भेटून ती लगेच हॉस्पिटलला परत जाणार होती. अस काहीस ठरवून ती फोनची वाट बघत बसली.

काही वेळाने तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यात तिला जिथे बोलावलं गेल होत त्या जागेचा पत्ता होता. तो पत्ता मिळताच मनाली पटकन उठली आणि घराबाहेर पडली. तिची आई नेहमीप्रमाणे शेजारच्यांकडे गेली होती आणि तिचे वडील त्यांच्या मित्रांकडे गेले होते.

मनाली घाई घाईतच एका रिक्षात बसली आणि निघून गेली. तिला अस रिक्षात बसताना तिच्या आईने पाहिलं. तिने मनालीला आवाज देखील तिला होता. पण मनालीला तो काही ऐकू गेला नाही.

मग मनालीच्या आईने मनालीला फोन लावायला घेतला. त्यावर देखील मनालीने लगेच येते अस सांगितल आणि फोन ठेवून दिला. मनालीच्या या उत्तराने तिचं काही समाधान होत नव्हत. तिच्या मनात शंकेची एक पाल चुकचुकायला लागली. तरीही तिची काही वेळ वाट बघू अस ठरवून तिची आई तिच्या कामाला लागली.

हॉस्पिटलमध्ये परी बाकी महिलांसोबत गप्पा मारत असताना तिला तेजश्रीचा फोन आला. तिने पहिले तर सुजयच्या तब्येतीची चौकशी केली आणि नंतर परीला कॉलेजला यायला कधी जमेल ते विचारू लागली. कॉलेजच फंक्शन अगदीच जवळ येऊन पोहोचलं होत. त्यामुळे तेजश्रीने नाईलाजाने फोन फोन केला होता.

परीची परिस्थिती बघून सायली आणि राधिकाने तिला कॉलेजला जायला परवानगी दिली. परी उठली आणि सुजयला एकदा भेटून ती कॉलेजकडे निघून गेली.

परी कॉलेजकडे चाललीच होती की तिला रस्त्यात एका ठिकाणी घोळका दिसला. त्यात तिला तुषार दिसला होता. ज्याने दोघा तिघांची गचांडी धरली होती.

“ह्यांना तर फक्त भांडता येत वाटत.” परीने मनातच सुस्कारा सोडला. तो शांत व्हायचं नावच घेत नसलेलं बघून शेवटी परीच तिकडे गेली.

तिने पाहिलं तर त्याचा बाजूला एक छोटी मुलगी होती जिच्या नाकातून हलकसं रक्त येत होत. मग परी जरा विचार करू लागली आणि तिने बाजूला एका उभ्या असलेल्या माणसाला काय घडलं ते विचारलं.

तर झाल अस की तिथल्या एका सिग्नलवर तुषार पोहोचला होता. डाव्या बाजूला बरीच दुकान होती. तुषारची बाईक देखील अगदीच डाव्या बाजूला होती. तुषारला थांबून काही वेळ झाला नसेल तोच तिथल्याच एका दुकानातून एक लहान मुलगी तिच्या उडणाऱ्या फुग्याच्या मागे रस्त्यावर आली. तिचा तो फुगा तुषारच्या पुढे असणाऱ्या एका बाईकवाल्याच्या चाकाच्या खाली आला. त्या चिमुकलीने त्या बाईकवाल्याकडे तिचा तो फुगा मागितला. तो फुगा मागताना तिने त्याला हात लावला होता.

साधारण कपडे घातलेल्या एका मुलीने हात लावला म्हणून त्या बाईकवाल्याला राग आला आणि त्याने त्या मुलीला जरा जोरात बाजूला ढकलून दिले. तशी ती मुलगी बाजूला पडली आणि तिच्या नाकाला लागून थोडस रक्त तिच्या नाकातून बाहेर आल.

हे सगळ बघून तुषारच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो त्याच्या बाईकवरून पटकन उतरला. आधी त्या मुलीला उचलले. तोपर्यंत लाल असलेला सिग्नल हिरवा झाला होता. तो माणूस त्याची बाईक पुढे नेणार तोच तुषारने त्याची बाईक घट्ट धरून ठेवली. तोपर्यंत त्या मुलीचे आई वडील दुकानातून बाहेर आले आणि त्यांच्या मुलीला बघू लागले. ती मूलगी खूपच रडत होती.

बाईक पुढे का जात नाहीये म्हणू त्या माणसाने मागे पाहिलं तर त्याला तुषार दिसला जो त्याची बाईक पकडून उभा होता. तुषार देखील साध्या कपड्यात असल्याने त्या माणसाने तुषारला देखील भांडायला सुरवात केली. तस तुषारने सरळ त्याच्या बाईकची चावी काढली आणि त्या मुलीची त्याला माफी मागायला लावली. तो माणूस देखील रागारागात त्याच्या बाईकवरून उतरला आणि त्या मुलीची आणि तुषारची लायकी काढू लागला.

मग काय? तुषारने त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा हात फिरवला आणि एक दीर्घ श्वास घेत त्या माणसाच्या एकच मुस्कटात मारली. तुषारचा तो वेट लिफ्टिंग आणि व्यायाम करून मजबूत झालेला हात त्या माणसाला दिवसा तारे दाखवून गेला. आता तर त्या माणसाच्या नाकातून देखील हलकसं रक्त आल.

“आता बरोबर हिशोब झाला.” तुषार तिरकस हसत बोलला.

दोन ते मिनिटांनी तो माणूस जाणीवेत आला. त्याला अजूनच राग आला आणि त्याने त्याच्या पुढे गेलेल्या मित्रांना फोन करून बोलावून आणलं. आजूबाजूची माणस देखील त्या माणसाला त्याची चुकी असल्याचे समजावून सांगत होते. पण त्या माणसाचा सो कॉल्ड अहंकार दुखावला गेला होता. जशी त्याची मित्र मंडळी आली तसा त्याला अजूनच जोर आला आणि तो जोरजोरात भांडत त्याच्या मित्रांना त्याची चूक नसल्याचे सांगू लागला. पण आजूबाजूची माणस काहीतरी वेगळच सांगत असल्याचे त्याच्या मित्रांना जाणवले. तरीही त्यांनी त्याच्या मित्राची बाजू लावून धरली. त्यामुळे आता गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या.

आता गोष्टी हातापायी वर येताना बघून जमा झालेल्या काही माणसांनी तिथून जरा लांब जाण पसंत केल. पण तुषार काही मागे हटायला बघत नव्हता. त्याची ती शरीरयष्टी बघून ती माणस अजून तरी त्याला हात लावत नव्हती. कानाखाली खाल्लेला तो तर तुषार पासून जरा लांब राहूनच त्याच्याशी भांडत होता. तिथे किती वेळ गेला तुषारला काही समजल नाही. आता ती माणस काही ऐकतच नव्हती आणि सतत अंगावर धावून येत होती. पण त्याला हात लावत नव्हती. तुषार याला वैतागला आणि सरळ दोघांची गचांडी धरून बाजूला ढकलून दिल. तसे ते बाजूला जावून धडपडले.

ते बघून ज्याने आधी कानाखाली खाल्ली तो त्याच्या तिसऱ्या मित्रासोबत तुषारवर धावून आला. तर तुषारने त्यांच्या गचांडीला देखील पकडून ठेवलं आणि तेच परीने पाहिलं.

आता तुषार काही त्याचं ऐकणार नाही हे परीला समजून गेल होत. ती तशीच पुढे गेली. आता त्याची काळजी तिला पुढे घेऊन गेली की त्या माणसांची काळजी हे मात्र परीला समजलच नव्हत.

परीला अचानक पुढे आलेलं बघून तुषार जागीच थबकला आणि त्याची पकड सैल झाली. आता पकड सैल झाली तर त्या माणसांनी लांब जाव ना. तर नाही त्यांना तिथे एका मुलीला आलेलं बघून अजूनच जोश आला आणि तुषारला पकडायला पुढे सरसावले.

ते बघून परीने त्यांना अडवून पाहिलं. तर त्या माणसांना त्याचाही राग आला. त्यांनी परीला धक्का मारायचा प्रयत्न केला. तेवढ्यातच परी बोलली.

“ती लहान मुलगी अनोळखी होती तरी त्यांनी तुमच्या कानाखाली मारली,” परी कडक आवाजात बोलली. “मी तर त्यांची मैत्रीण आहे.”

बस, ह्या एका वाक्याने ती माणस लागलीच मागे झाली. जो अनोळखी मुलीसाठी इतकं करू शकतो. तर त्याच्या मैत्रिणीसाठी काहीही करायला मागे पुढे बघणार नाही. इतकी जाणीव तर त्या माणसांना झालीच होती.

“आता गप्प त्या मुलीला सॉरी बोलायचं,” परी “नाहीतर मी माझ्या पोलीस मामांना बोलवून घेईल की मला त्रास दिला म्हणून.”

तशी ती माणस शांत झाली आणि एकमेकांकडे बघू लागली. आता त्याचं लक्ष आजूबाजूला भडकलेल्या माणसांवर गेल. त्यांनी लागलीच त्या लहान मुलीची माफी मागितली आणि तिथून पटकन निघून गेले.

तुषार मात्र मनातून खूप खूप खुश झाला होता. एकतर परीने त्याला त्याची मैत्रीण सांगितली होती आणि तिच्या डोळ्यातली त्याच्या बाबातीची काळजी तुषारला सहज दिसून आली होती.

मग परी त्या मुलीकडे गेली. तिने आधीच तिच्या पर्समधून फर्स्ट एड किट तिच्या आई वडिलांना दिल होत. त्यातल्या डेटोलने त्या मुलीला आलेलं रक्त पुसून घेतलं होत. त्यावर एक क्रीम सुद्धा लावली होती.

आता तर सगळ झाल होत म्हणून आजूबाजूची गर्दी पांगली गेली. परी आणि तुषारने त्या मुलीचा निरोप घेतला आणि दोघे एकमेकांजवळ आले. आता तुषार परीला जरा मंद स्मित करून बघत होता. पण परी, परी मात्र त्याच्यावर चांगलीच चिडली.

“तुम्हाला फक्त भांडता येत का ओ?” परी भावनेच्या भरात बोलू लागली. “उगाच तुम्हाला काही झाल असत म्हणजे?”

“अच्छा तर माझी काळजी होती म्हणून तू आलीस होय.” तुषार तिची फिरकी घेत बोलला.

तसे परीने तिचे डोळे फिरवले. “तुमच काहीच होऊ शकत नाही.” आणि ती तिथून जाऊ लागली. जाता जाता तिने तुषारवर नजर टाकली, अगदी तशीच जशी हॉस्पिटलमध्ये असताना टाकली होती.

परीने वरून कितीही चिडलेली असल्याच दाखवलं असल तरी ती आतून जरा घाबरली होती. एका अनोळखी लहान मुलीची असलेली काळजी बघून ती भरवली पण होती. तितकचं त्याच्या काळजीने तिला त्याची काळजी देखील वाटून आली होती.

तुषारला तर जग जिंकल्यासारख वाटू लागल. मग तो ही त्याच्या बाईकवर बसला आणि आता तो परीच्या मागे मागेच जाऊ लागला. सुजयवर झालेला हल्ला बघून परीला एकटीच सोडणार नाही अस त्याला वाटल होत. पण आता तिला एकटीच बघून तो तिच्या मागे मागे जाऊ लागला. असही त्याची जिम तर त्याने ठेवलेली माणस सांभाळत होती आणि मालाचा आता सराव नव्हताच. मग त्याला सध्या दुसर कुठलही काम नसल्याने तो आरामात परीच्या मागे मागे जाऊ लागला होता.

परीला देखील ते जाणवलं पण तिने तस दाखवू दिल नव्हत. जरी ती काही बोलली असती तरी त्याने त्याच्या मनासारखंच केल असत. त्यापेक्षा तिने त्याला तिच्या पाठी पाठी येऊ दिल होत. त्याला आरश्यातून बघताना परीच्या गालावर हलकीशी लाज चढली होती.

जशी परी कॉलेजमध्ये पोहोचली तसा तुषार त्याच्या घराकडे निघून गेला. परी त्याच्याच विचारात कॉलेजच्या स्टाफ रूमकडे गेली. ती रूम आज तर खूपच रिकामी होती. एक दोन तिचे सहकारी होते. ते पण लगेच त्यांच्या दुसऱ्या कामाला जाणार होते.

परीने त्यांना बघून मंद स्मित केल आणि तिची बॅग तिच्या जागेवर ठेवून डान्सची प्रॅक्टिस चालणाऱ्या ठिकाणी ती जायला निघाली. ती स्टाफ रूममधून बाहेर पडलीच होती की तिला कोणीतरी भेटायला आल्याच तिथल्या प्यूनने तिला सांगितलं.

आता ह्या वेळेला कोण तिला भेटायला आल असेल? हा विचार करून ती प्यूनने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचली. ती इकडे तिकडे बघतच होती की एका महिलेने तिला आवाज दिला.

“अवनी ना?” ..

परीला आवाज आला. तस तिने मागे वळून पाहिलं तर वयाने थोड्या मोठ्या एका महिलेने तिला आवाज दिला होता.

“हो,” परी मंद स्मित करून बोलली. “आपण? सॉरी पण मी नाही ओळखल तुम्हाला.”

“मी तेजूची आई.” तेजश्रीची आई

“अच्छा हो का?” परी आदराने बोलली. “बोल ना काय म्हणता? पण तेजश्री काही बोलली नाही मला की तुम्ही येणार आहेत ते.”

“अम्म हो का,” तेजश्रीची आई जरा चाचरत बोलली. “विसरली असेल ती. जरा वेंधळी आहे.”

यावर परीला जरा हसू आल. “बोला मग, आज कशी आठवण आली आमची?”

“जरा दुसऱ्या ठिकाणी जाऊन बोलूयात?” तेजश्रीची आई इकडे तिकडे बघत बोलली.

तशी परी पण इकडे तिकडे बघू लागली. “अम्म काही प्रोब्लेम झाला आहे का तेजश्रीचा? तुम्ही इथे पण बोलू शकता.”

“इथे नको,” तेजश्रीची आई “जरा एकांतात बोलायचं होत.”

तस परी तिच्या घड्याळात बघू लागली.

“जास्त वेळ नाही घेणार मी.” तेजश्रीची आई

“ठीक आहे,” परी एका बाजूला जात बोलली. “इकडे या मग.”

दोघी जणी त्या कॉलेजच्या आवारातल्या एका कोपऱ्यात पोहोचल्या.

“बोला आता.” परी

“ते तुषारचा विषय आहे.” तेजश्रीची आई

तसी परी दचकलीच. समोर उभी असणारी ती तुषारची देखील आई आहे. हे तिच्या ध्यानातच आल नव्हत. ती तेजश्रीच्या आईकडे चमकून बघायला लागली.

“सॉरी मी अशी थेट बोलत आहे,” तेजश्रीची आई जर भावूक झाली. “पण खूप महत्वाच होत म्हणून.”

“ब.. बोला ना मग.” परी पण आता अस्वस्थ झाली. आता त्या नेमक काय बोलणार होत्या याच परीला टेन्शन आल होत.

“आता काय बोलू,” तेजश्रीची आई “इतके दिवस माझा मुलगा तुला भेटत आहे. तर त्याच मन तर तुला समजल असेलच ना.”

“कश्याबद्दल बोलता आहात तुम्ही?” परी न समजल्यासारख बोलू लागली. “आणि मी टीचर आहे. देव नाही जे मला कोणाच मन समजून जाईल.”

“मी सरळ मुद्यावर येत आहे.” तेजश्रीची आई “माझ्या मुलाचा तुझ्यात जीव गुंतला आहे.”

“त्याला मी काय करू शकते?” परी मनातून खूप अस्वस्थ व्हायला लागली. “मी तर त्याला काही बोलली पण नाही. इतका ही आमच्यात काही बोलण झाल नाहीये.”

“तुझ्याकडून नसेल झाल पण तो तर गुंतला आहे ना.” तेजश्रीची आई

“मग तुम्ही त्याला सांगा,” परी आता जरा चिडून बोलली. “यात माझी काय चूक की तुम्हा मला काही बोलायला आलात.”

“तुझी चुकी अस नाही गं,” तेजश्रीची आई “तो आमच काहीच ऐकत नाहीये. किमान तो तुझ तरी ऐकेल.”

“सॉरी,” परी “पण जो मुलगा घरच्यांचं ऐकत नाही तो माझ का ऐकेल? आणि का म्हणून ऐकेल?”

“अस नको बोलूस,” तेजश्रीची आई अजूनच भावनिक झाल्या. “त्याने आमच्या समाजाच्या विरोधात जाऊन लग्न केल तर तेजूच आयुष्य..” तेजश्रीची आई बोलता बोलता थांबली.

“तुम्हाला जेव्हा तुमच्या राहत्या घरातून बाहेर काढलं गेल होत तेव्हा तुमचा कोणता समाज तुमच्या मदतीला आला होता?” परी कोरडेपणाने बोलली.

तशी तेजश्रीची आई परीला चमकून बघू लागली.

“मी पण फक्त माझ्या कुटुंबासाठी जगत आहे,” परी कडक आवाजात बोलली. “त्यात बाकी कोणत्याच गोष्टीला स्थान नाहीये. अगदी माझ्या मनाला सुद्धा.”

“मी माझ्या मुलाबद्दल बोलत आहे,” तेजश्रीची आई “हवं तर तुझ्यापुढे पदर पसरते.” तेजश्रीच्या आईने त्यांचा पदर तिच्यापुढे केला. “एकदा त्याच्याशी बोलून घे.”

“प्लीज अस नका करू.” परीला खूपच ऑकवर्ड वाटू लागल. “तुम्ही तुमच्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त ओळखता. त्यामुळे यात मी तुमची काही मदत करू शकेल अस वाटत नाही आणि हा, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जात नाही. हे देखील तितकंच खर आहे.”

“पण एकदा बोलून घेतलं असतस ना.” तेजश्रीची आई

“पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला अजून त्या बाजूने कधीच काही विचारल नाही आणि तस मला जाणवूनही दिल नाही,” परी त्यांना समजावून बघू लागली. “त्यामुळे मी त्यांच्याशी अस थेट या विषयावर बोलण त्यांच्या मनात शंका निर्माण करेल आणि माझ्यामुळे त्यांनी तुमच्यावर शंका घेतलेली मला आवडणार नाही. कारण त्यांनी याबद्दल काही मला विचारलं तर मी खोट बोलू शकणार नाही.”

“पण त्याने विचारलच तर.” तेजश्रीच्या आईने त्यांच्या मनातली शंका विचारली.

“बोलली ना मी,” परी “मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीये.”

तस तेजश्रीच्या आईला जरा समाधान वाटलं. त्यांनी तसाच तिचा निरोप घेतला. तिने तेजश्रीच्या आईला समजावलं तर होत पण तिचं मन आतून खूप अस्वस्थ झाल होत. आपण अनाथ आहोत हे समजल्यावर तुषारच्या घरचे आपल्याला सहज स्वीकारणार नाही हे तिला आधीच माहिती होत. तेच आता तिला तेजश्रीच्या आईच्या बोलण्यावरून सहज समजून गेल आणि तिला तुषारपासून लांब होण्याचा निर्णय घेतल्याचे समाधान वाटू लागले.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →