मैत्रेयी बिग मार्ट मधून बाहेर पडली आणि हातातील बॅग्ज कॅरी करत ती तिच्या ओला ऑटोची वाट पाहत उभी होती इतक्यात तिची नजर समोर स्कुटीवर उभ्या असलेल्या स्त्रीकडे वळली, ती स्त्री देखील तिच्याकडेच पाहत असल्याचे मैत्रीयीला लक्षात आले. तिने लक्षपूर्वक तमा स्त्रीकडे पाहिले तसे आपसूकच एक ओळखीचे हसू पसरले. ती स्त्री देखील मैत्रेयीच्या दिशेने येऊ लागली.
"हाय मैत्रेयी ओळखलं का?"
"अगं का नाही ओळखणार क्षमा? किती वर्षांनी भेटतोय आपण! कशी आहेस तु?"
"मी मजेत आहे एकदम. खरच गं कॉलेजनंतर अगदी आत्ता भेटतोय आपण."
"हो मग काय करणार? तु कॉलेजनंतर जी गायब झाली ते थेट आत्ताच! कुठे होतीस? तुझ्या लग्नाचे ही मला आपल्या केतकी कडून समजले. काय गं एवढी आपली खास मैत्री पण लग्नाला ही बोलावले नाहीस. " क्षमाने एकावर एक प्रश्नांची सरबत्ती केली मैत्रेयीवर.
"अगं बाबांची अचानक ट्रान्सफर झाली मग आम्ही नागपूरला होतो दोन वर्षे, तिथून इथे पुन्हा मुंबईत आलो पण बाबांना अटॅक आला त्यामुळे माझे लग्न अगदी घाईघाईत ठरले आणि झाले सुद्धा अगदी कोणालाच कळवले नाही, केतकी सुध्दा मध्ये अशीच भेटली तेव्हा तिला समजले."
"अच्छा! आता घरी सगळे ठीक आहे ना? बाबा काय म्हणतात? "
"हो गं क्षमा घरी सगळे व्यवस्थित आहेत आता. माझे सोड तु काय म्हणतेय? तु कधी लग्न केले? "
" अगं झाली पाच वर्ष लग्न होऊन. खर सांगू तुझी खूप आठवण आली होती मला लग्नात, पण तुला कॉन्टॅक्ट तरी कसा करणार होते मी? " क्षमाच्या बोलण्यात राग जाणवत होता.
" हो ग पण आता भेटतोय तर किती छान वाटतयं. कधी विचार ही केला नव्हता आपली पुन्हा भेट होईल ती ही अशी! "
"खरय गं मैत्रेयी! आज बघ ना किती सहजच आपली भेट झाली. पण आता टच मध्ये राहूया गं. तुला माहितेय मी सारखी आठवण काढत असते. अगं माझ्या नवर्याला तर तु इतकी ओळखीची आहे कायं सांगू? "क्षमाचे बोलणे ऐकून मैत्रेयी गोंधळली.
" अगं आम्ही तर ओळखत नाही एकमेकांना. मला त्यांच नाव देखील माहित नाही मग ते कसे ओळखतात मला? " मैत्रेयीच्या बोलण्यातील कुतूहल क्षमाने हेरले.
" अगं मी माझ्या नवर्या जवळ सारखे आपल्या विषयी बोलत राहते कॉलेजची आठवण निघाली की त्यामुळे तो तुला अगदी ओळखतो नावाने. मी त्याला तुझ्या पेंटिग्ज बद्दल तर इतके बोलले काही विचारू नको.
ए मैत्रेयी, तु तुझं पेंटिंग सुरू ठेवलंयस ना? कॉलेजमध्ये तुझी चित्रं बघायला गर्दी व्हायची!" क्षमाने विचारलं.
" नाही गं. खर सांगायच तर लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या, मुलं आणि संसारात वेळच नाही मिळाला. माझ चाललंय आपलं रुटीन," मैत्रेयी थोड्या संथ आवाजात म्हणाली.
क्षमाने मैत्रेयीकडे वरून खाली न्याहाळलं. मैत्रेयीच्या अंगावर एक साधा लेगिन टॉप होता, चेहऱ्यावर थकवा आणि हातात घरगुती सामानाने भरलेल्या जड पिशव्या. तिला आठवली ती कॉलेजमध्ये जीन्स टॉप वर जॅकेट घालणारी, चेहर्यावर कायम हसू घेऊन आणि हातात ब्रश घेऊन वावरणारी अल्लड मैत्रेयी तर दुसरीकडे मैत्रेयी देखील इतक्या वेळानंतर क्षमाकडे पाहत होती. क्षमा एकदम फ्रेश दिसत होती. फॉर्मल शर्ट-पॅन्ट, गळ्यात ऑफिसचं आयडी कार्ड आणि डोळ्यांत एक वेगळाच आत्मविश्वास.
"अगं वेळ नाही मिळाला हे काय कारण आहे का? तु कधीतरी ब्रश घेऊन सुरू करायच पेंटिंग."
"आता तर ब्रश पकडायची सवयही सुटली असेल बहुधा." मैत्रेयीच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती.
क्षमा क्षणभर शांत झाली आणि म्हणाली, "मैत्रेयी, मी आता एका मोठ्या ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये क्रिएटिव्ह हेड आहे. आज तुझ्याकडे बघून मला ती जुनी 'मैत्रेयी' शोधूनही सापडत नाहीये. तू कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी आई आणि कोणाची तरी सून होण्याच्या नादात 'मैत्रेयी'ला कुठेतरी विसरलीस असं नाही वाटत?"
क्षमाचे हे शब्द मैत्रेयीच्या जिव्हारी लागले. इतक्यात तिची ओला ऑटो आली, दोघींनी नंबर शेअर केले आणि निरोप घेतला पण रिक्षात बसल्यावर मैत्रेयीच्या डोळ्यांसमोर फक्त स्वतःचं 'पुसट' होत चाललेलं अस्तित्व दिसत होतं.
घरी आल्यावर नेहमीप्रमाणे कामाचा डोंगर वाट पाहत होता.
"अगं मैत्रेयी, चहा ठेव आणि बघ माझं निळं शर्ट इस्त्री केलंय का?" हॉलमधून तिच्या नवऱ्याचा, अविनाशचा आवाज आला.
"आई, माझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे ना," मुलाने ओरडून सांगितलं.
"अगं मैत्रेयी, चहा ठेव आणि बघ माझं निळं शर्ट इस्त्री केलंय का?" हॉलमधून तिच्या नवऱ्याचा, अविनाशचा आवाज आला.
"आई, माझा प्रोजेक्ट पूर्ण करून दे ना," मुलाने ओरडून सांगितलं.
मैत्रेयी किचनमध्ये गेली, पण तिचे हात आज यंत्रासारखे चालत नव्हते. तिला क्षमाचे शब्द आठवत होते "तू कोणाच्या तरी जबाबदाऱ्या निभावताना स्वतःला विसरलीस!"
तिने आरशात पाहिलं. लग्नानंतर तिने स्वतःसाठी एक नेलपेंटही विकत घेतलं नव्हतं. सणवाराला सगळ्यांचे कपडे यायचे, पण "मला काय हवंय?" हे तिला कोणी विचारलंच नव्हतं आणि तिनेही कधी सांगितलं नव्हतं.
तिने चहाचा कप अविनाशसमोर ठेवला आणि शांतपणे म्हणाली, "अविनाश, उद्यापासून मी दुपारी दोन तास घराच्या कामासाठी उपलब्ध नसेन."
अविनाशने आश्चर्याने पाहिलं, "म्हणजे? काय करणार आहेस दोन तास?"
"मी पुन्हा माझे पेंटिंग क्लासेस सुरू करणार आहे आणि वरच्या खोलीत माझा स्टुडिओ बनवणार आहे," मैत्रेयी ठामपणे म्हणाली.
"अगं पण घराचं काय? मुलाचं अभ्यास, माझं खाणं-पिणं..." अविनाश थोडा चिडून म्हणाला.
मॅत्रेयीने शांत पण खंबीर आवाजात उत्तर दिलं, "अविनाश, मी या घरची सून आणि पत्नी आहेच, पण त्याआधी मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. इतकी वर्ष मी तुमची स्वप्नं जगले, आता मला माझं अस्तित्व शोधायचंय. कामाचं नियोजन आपण वाटून घेऊ शकतो. जर तुम्हाला तुमचं काम महत्त्वाचं वाटतं, तर माझी कला माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे."
अविनाश पहिल्यांदाच मैत्रेयीच्या डोळ्यांतील तो ठामपणा पाहून गप्प झाला. मैत्रेयीला जाणवलं की, जोपर्यंत ती स्वतःसाठी उभी राहणार नाही, तोपर्यंत जग तिला केवळ एक 'गरज' म्हणून बघेल, 'व्यक्ती' म्हणून नाही.
त्या रात्री मैत्रेयीने कित्येक वर्षांनी आपला जुना कलर बॉक्स काढला. रंगांचा तो सुगंध तिला सांगत होता की, ती आता केवळ कोणाची 'सावली' नाही, तर स्वतःचं एक 'आकाश' बनणार आहे.
समाप्त
©®ऋतुजा कुलकर्णी ✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा