Login

अश्रूंचे ओझे भाग १

अश्रूंचे ओझे भाग १
अश्रूंचे ओझे
भाग १

" आजोबा, तुमचं मन दगडाचं आहे का हो ? तुम्हाला कधीच कशाचं दुःख कसं होत नाही ? का तुम्ही कधी रडताना दिसत नाही ?"

दहा वर्षांच्या आरवने ल्युडोच्या बोर्डवर आपली सोंगटी पुढे सरकवत अगदी निरागसपणे हा प्रश्न विचारला. पण त्या प्रश्नाची धार विनायकरावांच्या काळजाला आरपार चिरून गेली. खिडकीतून येणारा दुपारचा उन्हाचा कवडसा त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे पोक्त भाव अधिकच गंभीर दिसत होते.

विनायकरावांनी हातातील लाकडी फासा मुठीत तसाच घट्ट धरला. त्यांच्या हाताच्या शिरा ताणल्या गेल्या, पण चेहऱ्यावर मात्र त्यांनी एकही रेषा हलू दिली नाही. त्यांनी आरवच्या केसांतून मायेने हात फिरवला आणि मंद हसून म्हणाले,

" अरे वेड्या, पुरुष रडत नसतात. पुरुषांना घराचा खांब व्हावं लागतं. तुला माहितीये ना, घराचा खांब कधी रडत नाही, तो फक्त अख्ख्या घराचं ओझं आपल्या अंगावर पेलून धरतो. तो जर डगमगला, तर घर कोसळतं."

विनायकरावांचे हे वाक्य म्हणजे त्यांच्या गेल्या तीस वर्षांच्या जगण्याचे जणू सार होते. पण लांबून हे ऐकणारा त्यांचा मुलगा समीर मात्र अस्वस्थ झाला. त्याला आपल्या बाबांच्या या खांब होण्याच्या अट्टाहासाची आता भीती वाटू लागली होती.

विनायकराव एका खासगी बँकेतून निवृत्त झाले होते. आयुष्यभर त्यांनी कधीही कोणासमोर डोळ्यांतून पाणी येऊ दिलं नव्हतं. त्यांच्या या खंबीरपणाची खरी परीक्षा दहा वर्षांपूर्वी आली होती. त्यांच्या पत्नीचा, म्हणजे सुलभाताईंचा कर्करोगाने मृत्यू झाला.

संपूर्ण घर कोलमडून पडलं होतं. समीर नुकताच नोकरीला लागला होता, नातेवाईक टाहो फोडून रडत होते, मुलं आईच्या पार्थिवापाशी हुंदके देत होती, पण विनायकराव ?
ते मात्र एखाद्या वटवृक्षासारखे स्थिर उभे होते.

लोकांनी तेव्हा त्यांचं खूप कौतुक केलं होतं.

" बघा, विनायकराव किती धीराचे माणूस आहेत! स्वतःचं दुःख बाजूला सारून मुलाला सावरलं त्यांनी. खंबीर काळीज आहे त्यांचं."

पण त्या खंबीरपणाची किंमत विनायकरावांचे मन मोजत होते, हे कोणालाच माहीत नव्हते. त्या रात्री, जेव्हा घरातली सगळी गर्दी ओसरली होती, तेव्हा विनायकराव एकटेच बाल्कनीत उभे होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर येण्यासाठी आसुसला होता, पण त्यांनी आपले दात ओठ खाऊन तो दाबून धरला.

"मी रडलो, तर मुलं कोलमडतील."

हा विचार त्यांनी स्वतःच्या मनावर एखाद्या दगडावर कोरून ठेवतात तसा मनावर कोरून ठेवला होता.

आज निवृत्तीनंतर विनायकराव खूप शांत झाले होते. समीरला जाणवत होतं की, बाबांच्या या शांततेत एक प्रकारची घुसमट आहे. ते तासनतास बाल्कनीत बसून शून्यात पाहत राहायचे. कधी कधी रात्री विनायकरावांच्या खोलीतून विचित्र आवाज यायचे, जणू कुणीतरी श्वास घेण्यासाठी धडपडतंय. समीर धावत जायचा, तेव्हा बाबा घामेजलेले असायचे.

" काय झालं बाबा ? काही त्रास होतोय का ?" समीर काळजीत विचारायचा.

विनायकराव कपाळावरचा घाम पुसत म्हणायचे,

" काही नाही रे, वय झालंय ना, झोप कमी लागते आणि थोडं दडपण आल्यासारखं वाटतं. तू जा, झोप."

पण समीरला माहित होतं, हे दडपण रक्ताच्या दाबाचं नव्हतं, तर ते मनावर साचलेल्या त्या अदृश्य डोंगराचं होतं. एका रात्री जेवण झाल्यावर समीरने हिंमत करून बाबांजवळ विषय काढला.

" बाबा, आज दहा वर्ष झाली आई जाऊन. तुम्ही एकदाही तिच्याबद्दल मोकळेपणाने बोलला नाहीत. तुम्ही सगळं दुःख आतल्या आत दाबून ठेवलंय. तुम्हाला नाही वाटत का की कधीतरी हे सगळं बाहेर यावं ? मन हलकं करावं ?"

विनायकरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि कठोर आवाजात म्हणाले,

" समीर, रडणं म्हणजे दुर्बळता असते. मी जर रडलो असतो, तर तू आज इथवर पोहोचला नसतास. बापाचं काम रडणं नसतं, तर सावरणं असतं. माझं मन दगडाचं नाहीये, मी ठीक आहे."

समीर गप्प बसला, पण त्याला दिसत होतं की बाबांच्या चेहऱ्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत चाललाय. विनायकराव आता जेवणही कमी करत होते. डॉक्टरांनी तपासलं, हार्ट नॉर्मल होतं, पण विनायकरावांना सतत वाटायचं की त्यांच्या छातीवर कोणीतरी एक प्रचंड वजन ठेवलं आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा.

त्या रात्री विनायकरावांना पुन्हा दडपण आलं. ते बाल्कनीत आले. बाहेर पाऊस पडण्याची चिन्हे होती, आभाळ गच्च भरून आलं होतं.

विनायकरावांना तसंच वाटत होतं,जसं ते गच्च भरलेलं आभाळ. त्यांना वाटत होतं की जर आता पाऊस पडला नाही, तर हे आभाळ कोसळेल. त्यांच्या मनाचंही तसंच झालं होतं. साचलेल्या दुःखाचा पाऊस पडला नव्हता, म्हणून ते मन वजनाखाली दबलं गेलं होतं.

विनायकराव स्वतःशीच पुटपुटले,

" अश्रू ही सगळ्यात वजनदार गोष्ट का आहे समीर ? " त्यांना तो प्रश्न विचारणाऱ्या नातवाचा, आरवचा चेहरा आठवला.

एक दिवस समीरने आतल्या खोलीत आईची एक जुनी डायरी काढली. ती डायरी वाचताना समीरचे डोळे पाणावले. त्याला समजलं की बाबांना वाचवण्यासाठी आता काय करायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरने ठरवलं की तो बाबांना त्यांच्या या खंबीरपणाच्या कैदेतून मुक्त करणार.

समीर बाबांच्या खोलीत गेला. विनायकराव खिडकीबाहेर पाहत होते. समीरने आईचे काही जुने फोटो अल्बम त्यांच्या समोर ठेवले आणि म्हणाला,

" बाबा, आज खंबीर होण्याची गरज नाहीये. आज फक्त आईचा नवरा आणि माझा बाप म्हणून या फोटोंकडे बघा. आज आरवचे आजोबा म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून स्वतःला अनुभवा."

विनायकरावांनी थरथरत्या हाताने तो अल्बम हातात घेतला. पहिल्याच पानावर सुलभाचा हसरा चेहरा होता. विनायकरावांचे डोळे त्या फोटोवर स्थिरावले आणि त्यांच्या आयुष्यात कधीही न दिसलेलं काहीतरी घडण्याची सुरुवात झाली...