Login

असं उलगडलं रहस्य

संपत्तीच्या मोहापायी झालेल्या खुनाचे रहस्य

लघुकथा लेखन स्पर्धा मे जून 2026

रहस्यकथा :

असं उलगडलं रहस्य

आज बऱ्याच दिवसांनी गुप्तहेर धनंजय समुद्र किनाऱ्यावरील आपल्या आलिशान बंगल्याच्या टेरेसवरून मावळत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. आल्हाददायक वारा अंगावर घेत उजव्या हातात चहाचा कप घेऊन तो गुलाबी, लालसर रंगानी नटलेली पश्चिमा आणि मावळताना विविध आकार घेणारा सूर्य ह्यांचा लपंडाव निरखत होता. इतक्यात त्याच्या नोकराने, सदाने त्याला येऊन वर्दी दिली की त्याला भेटायला एक मध्यमवयीन गृहस्थ आले आहेत. धनंजयने कपातील चहा संपवला आणि तो लगोलग खाली आला.

धनंजय खाली आल्यावर ते गृहस्थ उठून उभे राहिले,

"नमस्कार धनंजयसाहेव, मी माधव रानडे विलेपार्ले पश्चिमेला राहतो."

"काका तुम्ही बसा ना आणि मला साहेब म्हणू नका. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. बोला, आज तुम्ही इथे काय काम काढलात."

"तुम्ही प्रसिद्ध गुप्तहेर आहात म्हणजे माझं तसेच काही काम आहे तुमच्याकडे. मी थेट मुद्द्यालाच हात घालतो."

"हो मला तेच आवडेल कारण माझा वेळ खूप महत्त्वाचा आहे."

"दोन दिवसांपूर्वी माझ्याच बंगल्यात माझ्या विधवा मुलीचा, मालिनीचा रात्री साडेदहा वाजता खून झाला आहे."

"ओह् आय एम सॉरी! पोलिसांना बोलावलं असेलच. त्यांचं काय म्हणणं."

"प्रथमदर्शनी आमच्या घरातील नोकर गणेश ह्याच्यावर संशय गेला आहे कारण माझा मुलगा महेश त्याच वेळी बाहेरून आला त्यावेळी गणेश मालिनीच्या बॉडीजवळ बसला होता आणि त्याच्या हातात सुरा होता. असं असलं तरी माझी आणि माझ्या पत्नीची, इतकचं काय माझ्या आठ वर्षाच्या नातीला सुद्धा गणेशने खून केला नाही याची खात्री वाटते."

"तुमच्या मुलाला मात्र गणेशने खून केला आहे असंच वाटतंय, बरोबर ना! आता मला सांगा तुमच्या घरात कोण कोण असतं? बंगला तुमच्याच मालकीचा आहे ना?"

"हो आमचा पिढीजात बंगला आहे आणि माझ्याच मालकीचा आहे. माझ्या घरात मी, माझी पत्नी मंदा, मुलगा महेश, विधवा मुलगी मालिनी, तिची आठ वर्षांची मुलगी आर्या, अनेक वर्षांपासून आमच्या घरीच राहणारा गणेश आणि स्वयंपाकाच्या मावशी सुधाताई असतात."

"तुम्ही म्हणालात गणेश नोकर आहे पण आता तुम्ही त्याचा तसा उल्लेख केला नाहीत."

"गणेश आमच्या घरातल्यासारखाच आहे. त्याला आणि मावशींना आम्ही नोकर समजत नाही. नेहमी जेवण झाल्यावर मावशी सगळी झाकपाक करतात आणि गणेश आर्यासाठी त्यांच्या खोलीत दूध द्यायला जातो. गणेश वरती जाताना त्याने मालिनीला सुरा खुपसलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं आणि त्याने दुधाचा ग्लास बाजूला ठेवून मालिनीच्या पोटातून सुरा काढला. तेव्हाच महेशने बाहेरून येताना गणेशच्या हातात सुरा पाहिला. खुनामागे गणेशचा हात नाही हे नक्की. पोलिस त्यांचा तपास करत आहेतच पण मला असं वाटतंय की तुम्ही हा शोध घ्यावा आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी."

"तुमच्या बंगल्याला राखणदार असेलच. त्याने त्या सुमारास कोणा परक्या व्यक्तीला येता जाताना पाहिलं का? तुमचा कोणावर संशय आहे का?"

"नाही माझ्या घरातील माणसांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या जावयाचे निधन झाल्यावर मालिनीला तिच्या सासरचे खूप त्रास देऊ लागले म्हणून आम्ही तिला घरी घेऊन आलो. महेश पण त्याच्या ताईला फुलासारखा जपायचा. त्यामुळे संशयास्पद कोणी नाही."

"ठीक आहे उद्या सकाळी अकरा वाजता मी तुमच्या घरी सहज येऊन जाईन. तुम्ही पण माझ्याशी नॉर्मल बोला. मी गुप्तहेर असल्याचं कोणालाही सांगू नका. मी माझ्या पद्धतीने तपास करेन."

माधवराव तिथून घरी आले. समोरच त्यांची नात आर्या खेळत होती. तिला पाहून त्यांना भडभडून आलं. ह्या पोरीचा काय गुन्हा म्हणून परमेश्वराने तिच्या डोक्यावरील बापाचे छत्र काढून घेतले आणि आता आईच्या मायेला सुद्धा पारखे केलं. त्यांना पाहून ती धावतच पुढे आली.

"आजोबा मला चॉकलेट आणलं ना! मला चॉकलेट खूप आवडतं."

आजोबांनी तिला चॉकलेट दिल्यावर ती पुन्हा खेळायला पळाली. माधवराव आणि मंदाताईंच्या डोक्यात आर्याचेच विचार होते. आपण काय आज आहोत आणि उद्या नाही. ह्या चिमुरड्या आर्यांचे पुढे कसे होईल. महेशला पण आपली ताई आपल्याजवळ नाही ह्याचे खूप दुःख होत होते.

दुसऱ्या दिवशी अकरा वाजता धनंजय माधवरावांच्या बंगल्यात आला तेव्हा घरी महेश सोडून इतर सर्व होते. माधवराव त्याला घेऊन त्यांच्या स्टडी मध्ये गेले आणि मंदाला त्यांनी तिथेच चहा पाठवायला सांगितला.

"काका गेल्या काही दिवसात तुमच्या घरात काही विशेष घडलं का? म्हणजे तुमची एखादी कृती ज्यामुळे घरातील एखादी व्यक्ती दुखावली गेली असेल!"

"मुळीच नाही. माझा माझ्या घरातल्यांवर खूप विश्वास आहे. आम्हा सगळ्यांमध्ये एकदम जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझा जावई वारल्यानंतर मालिनीचे सासू सासरे तिला त्रास देऊ लागले तेव्हा महेश खूप चिडला आणि त्याने स्वतःहून तिला आणि आर्याला आमच्या घरी आणलं. मंदा तर मालिनीकडे बघून खूप हळहळ व्यक्त करत असायची."

"महेश आणि मालिनी भावा बहिणीचे प्रेम पण अलौकिक असंच असेल ना!"

"काही विचारू नका. आताच काही दिवसांपूर्वी मी माझी अर्धी मालमत्ता मालिनीच्या नावावर केली तेव्हा महेश लगेचच म्हणाला,

"बाबा बरं झालं तुम्ही ताईच्या नावावर अर्धी संपत्ती केली. मी सुद्धा लग्न झाल्यावर माझं मुल होऊ देणार नाही. आम्ही आर्यालाच आमची मुलगी मानु आणि शेवटपर्यंत तिला अंतर देणार नाही."

"महेश तू आर्याला कधीच अंतर देणार नाहीस ह्याची मला पूर्ण खात्री आहे."

थोड्या वेळाने धनंजयने त्याला त्यांचा बंगला बाहेरून बघायचा आहे असं सुचवलं. त्याप्रमाणे दोघे उठून स्टडीच्या बाहेर आले. इतक्यात महेश बाहेरून आत आला आणि त्याने आर्याला हाक मारून बोलावले आणि खिशातून चॉकलेट काढून तिला दिले. बाबा डोळे मोठे करत म्हणाले,

"अरे महेश तू आर्याला चॉकलेट देण्याच्या विरोधात आहेस आणि आता तू स्वतः तिला चॉकलेट देतोस."

"नेहमी नाही देत बाबा. आजच देतोय."

"नाही आजोबा, मामाने मला त्या दिवशी पण चॉकलेट दिलं होतं."

"कधी गं बाळा?"

"आईला कोणीतरी सुरी मारली त्या दिवशी."

धनंजयने त्याच्या तीक्ष्ण मेंदूत आर्याच्या वाक्याची नोंद केली. बाहेर पडताना धनंजयने आर्याला विचारलं,

"आर्या बाळा मला तुमची झाडं नाही का दाखवणार."

"का नाही दाखवणार. मी येते तुमच्या सोबत."

बाहेर धनंजयने आर्याला बोलते केलं,

"बाळा त्या दिवशी मामाने तुला रात्री खूप उशिरा चॉकलेट दिलं का? आणि ते असंच होतं का?"

"हो अगदी असेच. त्याने मला चॉकलेटचा कागद पण काढून दिला. मी त्याला सांगितलं दे मी
डस्टबीन मध्ये टाकते. पण त्याने तो कागद स्वतःच्या खिशात ठेवला."

"हो का! तू जा आता खेळायला."

बंगल्याच्या बाहेरून फिरताना धनंजयने पाहिलं की बरोबर चौकीदाराच्या मागच्या कोपऱ्यातल्या बाजूला एका ठिकाणी भिंतीवर चढण्यासाठी पाच सहा दगड रचून ठेवले होते. म्हणजे बंगल्यात हया मार्गाने ती व्यक्ती आत शिरली असणार. अशा रीतीने आत येणाऱ्या व्यक्तीला नक्कीच इथली इत्यंभूत माहिती असणार. धनंजयने साऱ्या घटनांचा अभ्यास केला आणि त्याची खात्री पटली की मालिनीचा खुनी दुसरा तिसरा कोणी नसून महेशच आहे. त्यानंतर माधवरावांचा निरोप घेऊन धनंजय घरी आला. रात्री त्याने माधवरावांना फोन करून सांगितले की तो उद्या अकरा वाजता घरी येईल. तुम्ही सगळ्यांना म्हणजे अगदी महेशला पण घरी थांबायला सांगा.

दुसऱ्या दिवशी अकरा वाजता धनंजयने माधवरावांच्या घरी येऊन सगळ्यांना हॉल मध्ये बोलावले. चौकीदार पण आला होता. गणेशला पोलिसांनी लॉकअप मध्ये ठेवल्यामुळे महेश बिनधास्त होता. धनंजयने स्वतःची ओळख करून दिल्यावर महेश थोडा चरकला.

"मिस्टर महेश ज्या दिवशी घरात खून झाला त्या दिवशी तुम्ही किती वाजता घराबाहेर पडलात आणि किती वाजता परत आलात?"

"मी रात्री साडे नऊ वाजता बाहेर पडलो आणि अकरा वाजता परत घरी आलो. तुम्ही चौकीदाराला विचारू शकता."

"हो साहेब दादा बरोबर बोलत आहेत."

"हो ते तुम्ही गेटमधून आलात ते. पण तुम्ही बंगल्याच्या भिंतीवरून चढून आलात आणि लपून छपून बाहेर गेलात ती वेळ कोणती. तेव्हा तुम्ही आर्याला चॉकलेट दिलं आणि त्याचा कागद दुसऱ्या दिवशी तुम्ही बंगल्याच्या भिंतीवरून बाहेर टाकलात."

धनंजयने खिशातून चॉकलेटचा चुरगळलेला कागद काढून दाखवला. महेशचा चेहरा घामाघूम झाला. माधवराव आणि मंदाच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता. धनंजय ठाम स्वरात म्हणाला,

"मिस्टर महेश आता तुमचा गुन्हा कबूल करा आणि तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीचा खून का केलात ते सांगा."

"आई बाबा मला माफ करा. मी संपत्तीच्या मोहापायी माझ्या मालिनी ताईचा खून केला. बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं माझ्या आणि ताईच्या नावावर अर्धी अर्धी संपत्ती केली तेव्हा मला तुमचा आणि ताईचा दोघांचा खूप राग आला तेव्हाच मी ताईला संपवायचं ठरवलं. ताईला संपवल्यावर मी आर्यांचा काटा काढणार होतो. त्या दिवशी मी संधी निर्माण केली. रात्री घरातून बाहेर गेलो आणि लपूनछपून भिंतीवर चढून आत आलो. त्यावेळी ताई तिच्या रूममध्ये जाते ते मला माहित होते. म्हणून मी दबा धरून बसलो. इतक्यात आर्या खाली आली म्हणून मी तिला चॉकलेट उघडून देऊन वरती पाठवलं. आर्या कधीही येऊ शकते म्हणून मी तिच्यासाठी चॉकलेट घेऊन ठेवलं होते. चॉकलेटचा कागद मुद्दाम माझ्या पॅन्टच्या खिशात ठेवला. मला कोणताही पुरावा ठेवायचा नव्हता. मी किचन मधला सुरा त्याच्या हँडलवर रुमाल ठेवून आणला होता. ताई वर जाण्यासाठी आल्याबरोबर मी तिच्या पोटात सुरा खुपसला आणि मुद्दाम सुरा काढला नाही. गणेश मुर्खासारखा सुरा काढायला जाईल आणि त्याच्यावर आळ येईल याची मला खात्री होती. झालेही तसेच."

"तुमच्या बाबांची खात्री होती की गणेश असे कधीच करणार नाही. म्हणून त्यांनी ही केस माझ्याकडे दिली. गुन्हेगार कितीही हुशार जरी असला तरी तो काहीतरी पुरावा सोडतोच. तुम्ही भिंतीवर चढण्यासाठी घेतलेले दगड तसेच ठेवले होते आणि चॉकलेटचा कागद पण सापडू नये म्हणून बंगल्याबाहेर टाकला पण माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही."

"मला ह्याला मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते. धनंजय तुम्ही एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्यापासून वाचवलं आहे."

"चला येतो मी. पुढची कारवाई पोलिस करतीलच."

अशा रीतीने एका चॉकलेटच्या कागदानें खुनाचे रहस्य उलगडले. गुप्तहेर धनंजयाच्या शिरपेचात अजून एक खुनाची केस लीलया सोडवून तुरा रोवला गेला.

©️®️सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →