Login

अर्धीच पोळी.. अंतिम भाग

व्यथा एका गृहिणीची


अर्धीच पोळी.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की सुमनताई , शोभाताईंकडे चार दिवस रहायला आल्या आहेत. आणि मीराच्या मोजून मापून करण्याने चिडल्या आहेत. बघू मीरा कशी समजूत काढते त्यांची..


" मीरा, ए मीरा.. आज नाश्त्याला काय आहे?" शोभाताई विचारत होत्या.

" कालचा भात उरला होता त्याचा छान दहीभात केला आहे. सोबत काल उरलेल्या पोळ्यांना छान फोडणी दिली आहे.. सायीचे घट्ट दही आहेच." मीरा हसत बोलली.


" अग, मामीला काय शिळं खायला घालणार का?" सुमेधने आश्चर्याने विचारले.

" घरच्याच तर आहेत त्या. आणि त्याच काल सांगत होत्या की त्यांची आई म्हणायची की एका माणसाचे अन्न उरले पाहिजे. आता काल तुमचा अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला त्यामुळे चार माणसांचे जेवण उरले. मग मी काय करू?" मीराने विचारले.

" अग मग मावशींना दे ना.."

" तुला आठवत नसेल तर आठवण करून देते. मागे मावशींनी बजावून सांगितले होते. त्या दहा घरची कामे करतात पण शिळं कोणाकडे खात नाही."

" मग खाली नेऊन दे."

" मी पॅक करते. कोणी गरजू दिसला तर देऊन टाक."

" मग प्राण्यांना दे.." सुमनताई बोलल्या.

" बरं.. मग कोणताही प्राणी रस्त्यावर दिसला तर दे.." मीराचा शांतपणा संपत नव्हता.

" मग फेकून दे ते शिळे. मला शिळं चालत नाही. पोटात दुखतं. मुलं दिवसभर कामाला जाणार मग त्यांच्या दिवसाची सुरुवात शिळ्याने का?" शोभाताई चिडल्या.

" अन्न हे पूर्णब्रह्म.. मी अन्न कचऱ्यात फेकणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही फेका."

" काय बाई हा अगोचरपणा.. हात टेकले हो तुझ्यापुढे.." सुमनताई बोलल्या.

" तुमचे बोलून झाले असेल तर पाच मिनिटे फक्त शांत बसा.. आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. चालेल ना मामी?" मीराने विचारले. दोघींनी नाक मुरडले. मीरा हसली.

"मला एक सांगा मामी, तुमच्या आईच्या काळात गॅस होता का? फोन होते का?"

" कसे शक्य आहे? पन्नास वर्षांपूर्वी एवढे काही नव्हते." मामी झटकून टाकत बोलल्या.

" मग मला सांगा. अचानक एखादा पाहुणा रात्री अपरात्री आला तर जेवण करणे सोपे जायचे का?"

" नाही.."

" मग अशावेळेस एखाद्या माणसाचे जास्तीचे जेवण करून ठेवणे ही त्या काळाची गरज होती ना?" मामींनी मान डोलावली.

" आता अगदीच कोणी आले तर गॅसवर जास्तीत जास्त अर्ध्या तासात पटकन स्वयंपाक होऊ शकतो.. मग तो जास्तीचा स्वयंपाक करायची गरज आहे का?" मामींना मीराचे म्हणणे पटत होते पण मान्य करायचे नव्हते.

" आता दुसरे बघा हं.. आम्ही सगळे पडलो बैठे काम करणारी माणसे. ना कसले शारिरीक श्रम ना यातायात. जास्तीतजास्त बस किंवा ट्रेन पकडणे. माझा नवरा तर जिथे तिथे गाडीने फिरतो. जिथे नाश्ता जिरत नाही तिथे जेवण किती आणि काय खाणार? मग अशावेळेस मोजून स्वयंपाक केला तर माझे चुकले का? आणि थोडं जरी जास्त केले तरी त्या अन्नाचे काय करायचे हा प्रश्न असतो.. आता सध्या रस्त्यावरचे लोक जिथे ताजे अन्न घ्यायला मागत नाहीत तिथे शिळे कोण खाणार? आणि आपण जर गवत खाऊ शकत नसू तर पशुपक्ष्यांना आपले अन्न पचेल असा विचार आपण कसा करू शकतो? ते त्यांच्यासाठी घातक नाही का?" मीरा तिला जे बोलायचे होते ते बोलून थांबली.. सुमनताईंच्या मनात खदखदणारा प्रश्न उफाळून वर आलाच.

" पण म्हणून मग घरातल्यांनी उपाशी रहायचे का? कधी वाटते अर्धी पोळी जास्त खावीशी, घासभरच भात जास्तीचा घ्यावा.. एखाद घोट चहा मिळावा.. हे सगळे मोजून करायचे का?"

" मी कुठे म्हटलं? आधी मी ही व्यवस्थित स्वयंपाक करायचे. पण नंतर लक्षात आले की सासूबाईंचे वय झाले म्हणून त्यांना शिळं चालत नाही, मुले, सुमेध कामाला जातात म्हणून त्यांनी शिळं खायचे नाही. मग उरलेलं अन्न संपवणार कोण? तर मी.. सतत शिळं खाऊन खाऊन मला जेव्हा त्रास होऊ लागला त्यानंतरच मी विचारून करायला सुरुवात केली. मामी आपण पेपरमध्ये वाचतो किंवा अनेकदा बघतोही. हे अन्नधान्य जे आपल्याला सहजतेने मिळते ते तयार होण्यासाठी शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागतात. जास्त लांब जायची गरज नाही. अनेक आदिवासी पाड्यांमध्ये लोक अन्नाशिवाय तडफडून मरतात. मग ते अन्न कचऱ्यात टाकणे माझ्या मनाला पटत नाही. ज्यांना पटते त्यांनी ते करावे."

" अग मग लागलं तर पटकन करून द्यावे. कितीसा वेळ लागतो?" मामी आपला हेका सोडायला तयार नव्हत्या. शोभाताई आणि सुमेध दोघींची जुगलबंदी बघत होते.

" मामी तुम्ही कामाला जायचात? "

" आता मध्येच हे कुठून काढलेस?"

" सांगा ना?"

" नाही ग.. घरसंसार करेपर्यंतच दिवस संपायचा. इच्छा फार होती. पण जमलंच नाही."

" तुम्ही बघितलंत मी कधी जाते?"

" हो.. सकाळी जातेस ते संध्याकाळी येतेस."

" मामी, तिथे शारीरिक नसले तरी मानसिक काम असते. मन थकलेले असते. अशावेळेस अर्ध्याच पोळीसाठी परत गॅस चालू करणे किंवा घासभर भातासाठी कुकर लावणे याचा उत्साह येईल का?" मीराच्या या प्रश्नावर सगळेच गप्प झाले.




अर्धीच पोळी ही माझी कथा काहीजणांना आवडली काहीजणांना नाही पटली. Comments मधून असे दिसले की प्रत्येक घरात एकतरी अशी व्यक्ती असते की तिला तेवढेच म्हणजे घासभर, घोटभर हवे असते. करणार्‍या स्त्रीची होणारी कुचंबणा, कष्ट दिसूनही न दिसल्यासारखी करून ती मागणी पुढे केली जात होती. त्यावर काहींनी अनेक उपाय सुचवले. त्या प्रत्येकाला तिथे उत्तर देणे शक्य नव्हते म्हणून ही कथा पुढे लिहावी लागली. बर्‍याच स्त्रिया ऑफिस, घरकाम सांभाळतात. असे करताना घरातल्यांना किमान एखाद दिवस तरी गरम जेवण द्यायचा प्रयत्न करतात. अशावेळेस अर्धेच दे, चतकोरच दे असे सांगून त्या स्त्रीच्या प्रयत्नांवर आपण पाणी टाकत असतो. हॉटेलमध्ये गेलो तर तिथे पैसे देऊनही कोणी आपले हे लाड करत नाहीत. मग ती गृहलक्ष्मी हे पुरवत असेल तर तिचा आदर केला गेला पाहिजे, हे माझे मत. ते पटले की नाही हे सांगायला विसरू नका. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all