Login

अर्धीच पोळी.. भाग २

व्यथा एका गृहिणीची


अर्धीच पोळी.. भाग २


" मीरा, आज माझ्या दोन आणि वहिनीच्या दोन पोळ्या कर बरं.." शोभाताई सुमनताईंसमोर मीराला सांगू लागल्या.

" अगबाई... वन्स.. हे काय नवीन? तुमच्याकडे काय तोलूनमापून खावे लागते की काय?" आश्चर्याने सुमनताईंनी विचारले.

" काय सांगू वहिनी तुला.." शोभाताई सुस्कारा सोडत म्हणाल्या.

" सांगूनच टाका वन्स.. आणि एवढंच सहन होत नसेल तर चला माहेरी.. म्हशीला आपली शिंगं जड नसतात. चांगली काळजी घेऊ तुमची.." सुमनताई ठसक्यात मीराकडे बघत बोलल्या.

" असं नाही ग वहिनी. आमच्याकडे ना सगळं जेवण जेवढ्यास तेवढे होते. मग आधीच सांगावं लागतं किती जेवणार, काय खाणार ते.." शोभाताई सावरून घेत बोलल्या. मीराला खरी परिस्थिती सांगून जायची फार इच्छा होती पण सगळ्यांचा स्वयंपाक करून तिला ऑफिसला जायचे होते. उत्तर देत बसली असती तर तिथे उशीर झाला असता. दोघींच्या गप्पा रंगात आल्या होत्या.

" अग वहिनी, " मीरा आत आहे बघून शोभाताईंनी त्या दिवशीच्या अर्ध्या पोळीची कथा रंगवून रंगवून सांगितली.
" तुला सांगते, काय मेली बुद्धी झाली आणि ती पोळी मागितली असं झालं ग. ते आई म्हणायची बघ, लेक होईतो लेवून घ्यावे आणि सून येईतो खाऊन घ्यावे. तुझ्याबाबतीत नाही ग.. पण.." शोभाताई आत बघत बोलल्या.

" काय बाई या आजकालच्या सुना ? सासूबाईंना देताना हात आखडता? आणि आपण? माझी आई तर नेहमीच सांगायची. एका माणसाचे अन्न टोपलीत उरले तरच ते नांदते घर.. आणि या मुलींना घरच्यांसाठी होत नाही." सुमनताई नाक मुरडत बोलल्या.

" अग.. मला ना.. चांगलं आठवतंय. एकदा आमचे हे मला परत न्यायला म्हणून आले होते. येई येईतो रात्री उशीर झाला. येताना सोबत म्हणून भावजीही आले होते. दिवसभर प्रवासाने थकलेले ते दोघे जेवायला बसले. भाजी उरली म्हणून यांनी एक घास पोळी मागितली. पोळ्या नेमक्या संपल्या होत्या तर दादाने यांना बोलण्यात गुंतवले. तू पटकन कणिक मळून यांना गरम पोळी करून वाढलीस.. साक्षात अन्नपूर्णाच ग तू.. गेले ग.. ते दिवस गेले." शोभाताई हताश होत बोलल्या.

" पण मी म्हणते, का नाही करत जास्तीचा स्वयंपाक? उरलं तर उरलं दुसर्‍या दिवशी. आपण नव्हतो का खात? पोळी परतून कधी तिचा लाडू करून, भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करून खात होतोच की.. अगदी तेही नाही.. तर मग घरकामाला येणाऱ्या बाईला द्यावे, तिला नसेल द्यायचे तर गाईगुरांना द्यावे, ते ही नसेल तर अगदी फेकून द्यावे.. उपाशी का रहावं म्हणते मी? थांबा मीच बोलते तिच्याशी."

" नको ग वहिनी.. तू आपली चार दिवसांसाठी आली आहेस. रहा आरामात आणि जा सुखाने. नको या सगळ्यात पडूस." शोभाताई बोलल्या.

" आता तुम्हीच नको बोलल्यावर मी काय बापडी बोलणार?" सुमनताई गप्प बसत बोलल्या. मनातून त्यांना मीराचा राग आला होता. कधी नव्हे ते त्या नणंदेच्या घरी रहायला आल्या होत्या. इथे येऊन हे वेगळेच काहीतरी.

" आई, मामी मी निघते. कुकर गॅसवर ठेवला आहे. जेवायच्या अर्धा तास आधी लावा फक्त. पोळी, भाजी कोशिंबीर ओट्यावर झाकून ठेवली आहे.." मीरा जाताना सांगायला आली.

" हो.. आम्ही बघतो ते नंतर. " शोभाताई बोलल्या. पण सुमनताईंनी तिच्याकडे बघायचे सुद्धा कष्ट घेतले नाहीत. मनातल्यामनात काहीतरी ठरवून मीरा घरातून निघाली.

पटवून देऊ शकेल का मीरा, मामींना तिच्या वागण्यामागचे कारण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all