Login

अर्धीच पोळी..

व्यथा एका गृहिणीची
अर्धीच पोळी..

" आज मला जास्त भूक नाहीये.. माझ्यासाठी एकच पोळी कर ग.." रविवारी सकाळी सासूबाईंनी मीराला सांगितले..
" हो.." असे बोलून मीरा कामाला लागली.. हि त्यांच्या घरची पद्धत होती. सकाळ संध्याकाळ वेगळा स्वयंपाक.. सकाळी साग्रसंगीत स्वयंपाक. मग संध्याकाळी इडली, डोसा, थालीपीठ असे काहीतरी.. सगळ्यांनाच वेगळे खायचे असायचे.. त्यामुळे मीरा सकाळी मोजकाच स्वयंपाक करायची.. ज्यांना कमीजास्त हवे आहे ते सकाळीच तसे सांगायचे.. मीराने बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि गरम पोळ्या करायला घेतल्या.. मुले, नवरा , सासूबाई जेवायला बसले होते. रोजचे ,मला नको त्यांना आधी वाढ असे सासूबाईंचे करून झाले.. 
"मीरा वाढ ग अर्धी पोळी अजून.." पोळी खात असलेल्या सासूबाईंचा आवाज आला.. ओटा आवरत असलेल्या मीराचा हात थबकला.. ती काही बोलत नाही हे पाहून भात खात असलेल्या नवर्‍याने, सुमेधने आवाज दिला..
" मीरा, अग आई काय म्हणाली? तिला पोळी वाढ ना.." 
" अरे भिजवलेली कणीक संपली.." मीरा अपराधी स्वरात म्हणाली..
" पण तुझेही जेवण व्हायचे आहे ना?"
" अरे, माझा आज उपवास आहे.. संध्याकाळी साबुदाणेवडे करणार आहे.. सकाळी सासूबाई एकच पोळी खाणार म्हणाल्या म्हणून मोजून पोळ्यांची कणिक भिजवली.."
" अग पण एखादी जास्त करायची ना.." 
" करायला हरकत नसते, पण कोणी खाल्ले नाही कि शिळे खायचा कंटाळा येतो म्हणून.. सोड.. मी पटकन पीठ भिजवते.."
" नको भिजवूस.. आज मेली ती भाजी चांगली झाली म्हणून अर्धी पोळी खाविशी वाटली तर लगेच हे नाटक.. खाण्याची इच्छाच मरून जाते.. सोड भात वाढ मला तो.." सासूबाईंनी आणि सुमेधने ज्या जळजळित नजरेने पाहिले कि मीराची फराळाचे करायची वासनाच राहिली नाही.. संध्याकाळी साबुदाणे वडे सगळ्यांनी खायला सुरुवात केली.. छान झाले आहेत असे म्हणत मुले मिटक्या मारत खात होते..
" अजून देऊ का?" मीराने विचारले..
" अर्धाच वडा दे.." सासूबाई.
" अर्धा?" वडे तळत असलेल्या मीराला टेन्शन आले..
" सुमेध मी तुझ्या पानात वाढते.. तू दे अर्धा करून.. आत माझे वडे जळतील.." ती जबाबदारी सुमेधच्या गळ्यात मारून मीरा आत पळाली.. तो वडा चमच्याने अर्धा करताना सुमेधच्या हातावर वाफ आली..
" तू एवढा गरम वडा का दिलास?" त्याची चिडचिड सुरू झाली..
" हो ना.. बिचाऱ्याचा हात भाजला.. स्वतः दोन तुकडे करून दिले असतेस तर?" 
" माझा हात भाजला नसता?" मीरा सुमेधला ऐकू येईल अशा स्वरात म्हणाली.. रात्री झोपताना सुमेधने विचारलेच..
" तू आईशी असे का वागतेस?"
" मी? मी काय वागले?" मीराने आश्चर्याने विचारले..
" आई, तुला अर्धे मागते, तू का देत नाहीस?" सुमेध थोडा रागातच होता..
" आज अर्धा वडा देताना तुझे काय झाले? मी नसताना काही प्रश्न नसतो आणि मी घरी असताना जेव्हा तुम्हाला गरम काही खायला देण्याचा प्रयत्न करते तिथे माझे चुकते का?" मीराने विचारले.. "म्हणजे बघ मगाशी वडे लहानच होते.. पण तरिही त्यांना हट्टाने अर्धाच हवा होता.. त्या दिवशीसुद्धा डोसा हवा होता.. पण तो अर्धाच.. थालिपीठ केले कि ते हि अर्धेच.. आता मी स्वयंपाक करायचा कि हे अर्धे करत बसायचे? आणि हि गरम वस्तू अर्धी कशी करायची हे पण सांग.. " मीरा पण वैतागली होती. "बरे ते उरलेले अर्धे तुम्ही कोणी खायला पण मागत नाही.. मग आहेच मी संपवायला.."
" अग मग लहान करून द्यायचे ना.." सुमेधने आईची बाजू मांडायचा प्रयत्न केला..
" त्या दिवशी दोन फुलके करून ठेवले होते.. त्यांनी त्यातलाही दिडच खाल्ला.. आणि उरलेला अर्धा माझ्या नावाने ठेवून दिला.. मी काही राक्षस नाही ना.. कि प्रत्येकाचे उरलेले संपवायचे.. आता मोजकेच देते म्हणून मुलांचे डबे संपलेले असतात.. नाटके मोठ्यांचीच आहेत.."
मीराच्या या समस्यांवर उपाय सुमेधकडे नव्हता. बघू मीरा यातून कसा मार्ग काढते ते.

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all