आपल्यातली गोष्ट भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" पोह्यात लिंबू पिळला नाहीस वाटत ? " मीराबाई रेवाला टोमणे मारण्याच्या तयारीने विचारत होत्या.
" आई अहो, संपले लिंबू आणि मला लक्षातच नाही राहील आणायचं. म्हणून आज करा अड्जस्ट, संध्याकाळी येताना आणते. " रेवाने शांतपणे उत्तर दिलं आणि तिथून निघाली. तोच मीराबाई बडबडल्या, " बरोबर बोलत होती तुझी आई, कामचुकार आहेस तू. आता काय करणार ? पडलीस गळ्यात. " मीराबाई पोहे खात म्हणाल्या.
" कोण माझी आई म्हणाली अशी ? कधी ? " रेवाने मागे फिरत आश्चर्याने विचारलं.
" कोणती आई सासरच्यासमोर मुलीचे खरे गुण सांगेल ? जा तू तुझं काम कर. आणि हो कामचुकारपणा करत काहीतरी चुना लावून जाऊ नकोस. नीट कर. " मीराबाई
रेवा विचार करतच स्वयंपाक घरात आली. तिला कळत नव्हतं की सासूबाई आज असं कां म्हणाल्या ? ही गोष्ट तिच्या मनाला लागली खरी पण सध्या ऑफिसला जायची घाई असल्यामुळे ती पटापट उरकू लागली. टिफिन सोबतच सासू - सासऱ्यांचा स्वयंपाक, स्वयंपाक - नाष्ट्याची भांडी, आणि हे सर्व करता करता कपड्यांची मशीन लावलीच होती. एवढं करून ती घाईने ऑफिसला गेली.
संध्याकाळी उशीर झाला आणि आल्या आल्या ती कामांना भिडली. कूकरची शिट्टी सुरु असताना मीराबाई स्वयंपाक घरात आल्या आणि म्हणाल्या, " दे गं बाई लिंबू, मला आता सरबत पिव्यासा वाटतोय. किती गर्मी आहे. " पदर हलवत त्या म्हणाल्या.
" आई, मला ऑफिसमधून निघायलाच उशीर झाला. त्यामुळे भाजी मार्केटला नाही जाता आलं. उद्या नक्की आणते. आता कोकम सरबत बनवून देऊ का ? " रेवाने नरमाईने विचारलं.
" कामचुकारपणा करायचा आणि नंतर कारण सांगायची. " असं म्हणत त्या तोंड वाकड करून तिथून गेल्या. सकाळपासून कामाच्या गडबडीत विसलेली गोष्ट रेवाला पुन्हा तीव्रतेने जाणवली' कामचुकार '.
असेच दोन दिवस गेले. रविवारी सकाळी मीराबाई स्वयंपाक घरात काम करणाऱ्या रेवाकडे आल्या म्हणाल्या, " माझ्या सोन्याच्या कुड्या दे. "
" माझ्याकडे तुमच्या सोन्याच्या कुड्या कश्या येतील ? त्या तुम्हांलाच माहिती असतील ना ? " रेवाला आता चीड येत होती.
" लहानपणीची चोरीची सवय असले अजून म्हणून म्हणाले, ' घेतले असतील तर दे म्हणून. ' उगाच तमाशे नको. " मीराबाई तिरकसपणे म्हणाल्या.
" हे सर्व कोणी सांगितलं तुम्हांला ? " रेवाचा आवाज खूप मोठा होता आणि ती खूप मोठ्याने सुद्धा बोलली म्हणून सर्वांचं आवाज गेला सासरे आणि नवरा प्रथम आलेच स्वयंपाक घरात आले.
" काय गं काय झालं? एवढ्या जोरात काय ओरडतेयस ? " प्रथम चढ्या आवाजात आणि रागात म्हणाला.
" काय झालं म्हणजे ? तूच बघ, आई सरळ सरळ माझ्यावर चोरीचा आरोप लावतेय. " रेवा रागाने म्हणाली.
" काय चुकीचं बोलले मी ? लहानपणी करायचीस ना तू चोरी ? प्रथम त्या दिवशी बोलला मला आणि बघ रे लगेच अनुभव पण आला. माझ्या कुड्या सापडत नाहीये. आणि वर हिचा तमाशा पण बघा." मीराबाई रागाने म्हणाल्या.
" प्रथम तू ? तू बोललास असं ? का ? " रेवाच्या डोळ्यात रागासोबत पाणी सुद्धा होत.
" अगं मी सहज ते सांगितलं, आपण लहानपणीच्या गप्पा मारत होतो ते. आई आहे माझी. मी तिला सांगूच सांगतो. " प्रथम सहजपणे म्हणाला.
" वाह...! लहानपणी मी मामाकडे जायचे तेव्हा आम्ही भावंड आणि मित्र आंबे चोरायला जायचो ते नक्की तू कोणत्या प्रकारे सांगितलंस ? की आई मला सोन्याच्या कुड्या चोरणारी समजत आहेत ? " रेवाने रागात आपल्या मुठी आवळत विचारलं.
" तोंड वर करून काय विचारतेय ? लहानपणी आंबे चोर होतीस आता मोठ्या चोरी करणारच ना तू ? शेवटी काय सवय जात नसते. " मीराबाई रागाने म्हणाल्या.
" म्हणजे 'कामचुकार ' हे पण प्रथमने च तुम्हांला सांगितलं आहे ? " रेवाने विचारलं.
" हो मग माझा मुलगा माझ्यापासून काही का लपवेल ? " मीराबाई तोऱ्याने म्हणाल्या.
" मीरा, अगं हे बघ, तूच तूझ्या कुड्या केस धुवायचे म्हणून बेडजवळ काढून ठेवले होतेस, ते खाली पडले होते. तुझी रेवाच्या मागे बडबड सुरु झाली म्हणून मी आपल्या रूममध्ये जाऊन चेक केलं आणि मला सापडले सुद्धा. " जितेंद्रराव म्हणजेच रेवाचे सासरे बोलले.
मीराबाईने घाईघाईत कुड्या आपल्या हातात घेतल्या आणि आपल्या रूममध्ये निघूनही गेल्या. रेवा प्रथमला म्हणाली, " काय रे आपल्यातल्या गोष्टी तू तूझ्या आईपर्यंत कां घेऊन गेलास ? आपल्यातल्या गोष्टी आपल्यात नाही ठेवता येत का ? आता त्यांनी माझं जगणं हराम करून ठेवलं आहे. दोन वर्ष झाली ना आपल्या लग्नाला ? सर्व काम मीच करते ना ? या आधी कधी मी चोरी नाही केली ना ? मग आता तू सांगितलं आणि आई मला कामचुकार, चोर सर्व समजतात. तुला कळत नाही का ? " रेवा रागाने म्हणाली.
" रेवा, ती आई आहे माझी. तिला नाही सांगायचं कसं बोलतेयस तू ? तिला सर्व जाणून घेण्याचा अधिकार आहे. " प्रथम आपला हेका धरूनच होता.
रेवाला कळालं की याला बोलून काहीच फायदा नाही म्हणून. तिला प्रथम आणि सासूबाईंच्या वागण्याचा खूप राग आला होता. तिने प्रथम सोबतच सासूबाईंना सुद्धा जाणीव करून द्यायचं की कसं वाटत ? असं ठरवलं.
क्रमश :
