अपेक्षाभंग...

अपेक्षाभंग


स्पर्धा
लघुकथा
शीर्षक - अपेक्षाभंग

आज आषाढी पौर्णिमा. सीमाताई सकाळीचं उठल्या. लवकर लवकर कामं आटोपली.आंघोळ करून त्यांना स्वयंपाकाची तयारी करायची होती. आज कुलदेवतेची पूजा, नैवेद्य. तेवढ्यात त्यांना अनघाचा आवाज ऐकू आला. ती नुकतीच उठली होती व उठल्या उठल्या तिचे फोनवर बोलणे सुरू झाले होते. एक महिन्यापूर्वीच त्यांचा मुलगा अमयचे लग्न झाले होते. अनघा सून म्हणून घरात आली होती. परंतु तिला घरातल्या कामाशी काही देणे घेणे नव्हते. सतत ती फोनवर असायची. अमयसाठी डबा करणे, नाश्ता बनवणे सर्व कामे सीमाताईंचीच. सुरुवातीला त्यांना वाटायचे, की नवीन नवीन लग्न झाले आहे. होईल सर्व व्यवस्थित. पण त्यांची आशा व्यर्थ ठरली.

अमय ऑफिसला निघून गेला, की अनघा जेवण करून घ्यायची. सासू-सासरे जेवले की नाही याच्याशी तिचे काही देणे घेणे नव्हते.अमयला मात्र त्यातले काहीच माहित नव्हते. सीमाताईंनीही त्याला कधी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. पण अनघाचे सतत फोनवर राहणे त्यांना आवडायचे नाही. सीमाताईंनी ही गोष्ट शेखररावांना बोलून दाखवली. तसे तर ही गोष्ट अशी शेखररावांच्याही लक्षात आली होती.

"अगं सीमा, कदाचित तू स्वयंपाक घरात असतेस. म्हणून ती स्वयंपाक करत नसेल."
तू एक दिवस आराम कर. बघ करेल ती सर्व. ठीक आहे. म्हणत सीमाताईंनी आज स्वयंपाक घरातून सुट्टी घेतली. सकाळीच उठून त्या गार्डनमध्ये फिरायला गेल्या. गार्डन मधून फिरून आल्यावर घरात येऊन पाहते तर रोजचीच परिस्थिती. नाश्ता, अमयचा डबा सर्वच व्हायचे होते. त्यांनी अमयला अनघाला आवाज द्यायला सांगितले. तर तो आईवरच चिडला.
"अगं आई तू कामं केलीस, स्वयंपाक केलास तर काय झालं?" आणि अनघाला या गोष्टींची आवड नाही तर मी काय करू? सीमाताई दुःखी झाल्या .त्यांनी अमयचा डबा, नाश्ता करून दिला. आता त्यांना कळून चुकले, की आता यात काही सुधारणा होणार नाही. सीमाताईंनी पटापट कामं उरकली. बाकीचा राहिलेला स्वयंपाक करून घेतला.

आता अमयच्या लग्नाला जवळपास दोन वर्षे झाली होती. पण अनघाच्या स्वभावात यत्किंचितही फरक पडला नाही. सीमाताईंना दोन मुलं. एक मुलगा सारंग परदेशात आपल्या कुटुंबासह स्थायिक झालेला. अमय याच शहरातील एका कंपनीत नोकरी करत होता. एक तरी मुलगा जवळ राहावा, तेवढाचं आपल्याला आधार. अशी उभयतांची मनापासून इच्छा होती.

सीमाताई आणि शेखर दोघेही आपापल्या नोकरीच्या सेवानिवृत्त झालेले. आपल्या मुलाचे लग्न झाल्यावर आपण निवांत जीवन जगू शकू, आपले राहिलेले छंद आपल्याला जोपासता येईल. असे सीमाताईंना वाटायचे. पण परिस्थिती वेगळीच होती. त्यांच्या समोरून त्यांचा जीवनपट तरळून गेला.

घरचे, मुलांचे सर्व सांभाळून त्या नोकरी करायच्या. त्यांच्या मनात विचारांनी गर्दी केली. ज्यांना आपण या जगात आणले, ज्यांच्यावर अपार माया केली. तेच आपल्याला समजून घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एका छताखाली जरी आपण राहत असलो तरी मानसिक दृष्ट्या आपण एकटेच असतो. कारण वैचारिक मतभेदामुळे त्यांच्यात व आपल्यात मनं जुळण्यास वाव नसतो आणि हाच दुरावा आपल्यासाठी दुःखाचे कारण बनतो.

आपल्याच विचारांच्या तंद्रीत सीमाताई हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात शेखररावांनी आवाज दिला.
"अगं सीमा कुठे हरवलीस?"
मला वाढ नां. भूक लागली आहे मला.
"हो वाढते."
म्हणत सीमाताईंनी दोन ताटं वाढून घेतली. अनघाचे जेवण आधीच झाले होते.

"काय गं सीमा, शांत शांत आहेस. कसला विचार करते आहे?"

"काही नाही हो."
अगं सीमा, तू आता तुझी तब्येत सांभाळ. आयुष्यभर खूप खस्ता खाल्ल्या तू. आता पूर्ण वेळ कामासाठी एखादी बाई ठेवून घेऊ आपण. म्हणजे तुला त्रास होणार नाही. आता कुणाकडूनही अपेक्षा करू नकोस आणि कुणाला काही बोलूही नकोस. कारण अपेक्षाभंग झाला तर मनाला फार मोठी जखम होते.

आपल्या मुलांना काही बोललो तर घरचं वातावरण खराब होतं. म्हणून तुझ्याच्याने जेवढं होईल तेवढं, तुझ्या तब्येतीला सहन होईल तेवढीच कामं करायची. सीमाताई केवळ ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. निस्तब्ध शांततेत केवळ त्यांचे हुंदके ऐकू येत होते.

सौ. रेखा देशमुख
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →