Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ४८

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ४८
©® सौ.हेमा पाटील.

   कालच्या भागात आपण पाहिले, रात्री उशिरा एका खबऱ्याने बातमी आणली की राहुल जी गाडी घेऊन जात होता त्या गाडीवर एक टुव्हिलर आदळली आहे.गाडीचे पुढचे बाॅनेट चेपले आहे.पुढची नेमप्लेट निखळली आहे.आता पुढे...
   तन्मयने एव्हाना फरसाणचा फडशा पाडला होता.पाणी पिण्यासाठी तो थोडावेळ थांबला.खाताना ही तो अधूनमधून थोडे थोडे थांबत होता.एवढाही विलंब मनिष व निकीताला नकोसा वाटत होता.एकदाचे फरसाण संपले म्हणून मनिषाला हायसे वाटले.
तन्मय पुढे म्हणाला,
"नेमप्लेट निखळल्यामुळे आता त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे झाले होते.ज्याठिकाणी हे घडले होते त्याच्या आसपास असणाऱ्या मेकॅनिककडे राहुल दुरुस्ती करवून घेण्यासाठी नक्की जाणार. तो तिथे किती वेळ होता आणि तिथून कुठे गेला हे समजले असते.त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी हा शोध घेणे सुरु केले होते.

राहुल हुशार होता.त्याने जवळपास दुरुस्ती करणे टाळले. तेथून पुढे आल्यावर चंबाकडे जाण्याच्या रस्त्यावर त्याने एका मेकॅनिककडे गाडीची नेमप्लेट बसवून घेतली होती याचा शोध लागला.राहुल जरी स्वतःला फार शहाणा समजत असला तरी पोलीसही कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे राहुलला अजून समजायचे होते.आजवर केलेल्या अपहरणांचा शोध लागला नव्हता, त्यामुळे तो स्वतःला फार स्मार्ट समजत होता.
  त्याने फक्त नेमप्लेट बसवली होती.गाडीची दुरुस्ती करवून घेतली नव्हती.आणखी एक गोष्ट  समजली की रात्री ती  दोघे मेकॅनिकच्या रुममध्येच राहीले होते.मेकॅनिकला दोघांचा फोटो दाखवला असता त्याने दोघांनाही ओळखले होते.
मग तो चंबाच्या दिशेने गेला आहे हे कन्फर्म झाले.तपासाची दिशा ठरली. तेथील खबऱ्यांना सुचना दिल्या गेल्या.दोघांचे फोटो पाठवले गेले.काल रात्री उशिरापर्यंत हे सगळे काम सुरू होते.

आज सकाळी लवकर तो जानकीमावशीसह चंबामध्ये असल्याचा मेसेज आला आणि मी ताबडतोब निघालो.
रस्त्याने कुठेही त्याला कुणी अडवले नसल्याने तो गाफील होता.आपण आता मसुरी पासून इतके दूर आलो आहोत की आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू शकणार नाहीत असे वाटून तो खुशीत गाजरे खात होता.पण पोलिस सुतावरुन स्वर्ग गाठतात हे कुठे त्याला माहीत होते?"

"खरंच हे सगळे इंटरेस्टिंग आहे यार..तू जेव्हा पोलिस डि वाय एस पी म्हणून  रुजू झालास तेव्हा मला वाटले होते चांगली नोकरी सोडून हा इकडे कशासाठी वळला असेल? पण आज लक्षात येतेय. तू जे करतोयस ती ही देशसेवाच आहे.सलाम तुला यार..." असे मनिष म्हणाला.
यावर तन्मय नुसताच हसला.
"पुढे सांगू की थांबू?" असे तो म्हणाला.
"अरे आता मध्ये अजिबात बोलणार नाही.तू बोलत रहा." असे मनिष म्हणाला.

  "मी सकाळी निघालो.वाटेत मला खबऱ्याचे फोन येत होते.तो राहुलवर बारकाईने लक्ष ठेवून होता.तेथील पोलिस स्टेशनमध्ये मी फोन करून आधीच कल्पना दिली होती. अचानक पोलिस फोर्सची मदत लागू शकते याची कल्पना दिली होती.

  राहुल मला ओळखणे शक्यच नव्हते.त्यामुळे मी थेट त्याच्यासमोर जायचे ठरवले. त्याप्रमाणे मी तो रहात असलेल्या डिलक्स इन हाॅटेलमध्ये पोहोचलो.काऊंटरवर जाऊन माझी ओळख सांगितली.राहुल व जानकीचा फोटो दाखवून ही दोघे तुमच्या हाॅटेलमध्ये आहेत का? हे विचारले.
मॅनेजरचे होकार दिला.आम्ही आल्याची कुणकुण त्यांना लागता कामा नये असे मी त्याला सांगितले.पोलिसस्टेशनला फोन करुन पोलिस फोर्सला हाॅटेलभोवती वेढा द्यायला सांगितले.सगळी जय्यत तयारी झाली आणि मी राहुलच्या तुमचे दार ठोठावले.

जानकी मावशीने दार उघडले.राहुल बेडवर मोबाईल हातात घेऊन सर्फींग करत होता.मावशीने विचारले,
"कोण पाहिजे?"
"तुम्हीच !"असे म्हणत तन्मय आत शिरला.अनोळखी व्यक्तीला आत शिरल्याचे पाहून राहुल गडबडला.
" कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला ?"असे त्याने विचारले.
"तूच हवा आहेस." असे तन्मय म्हणाला.
हे ऐकून त्याला समजले की, मी पोलिस असणार.तो बेडवरुन उठला व माझ्यासमोर येऊन उभा राहिला.
माझ्या डोळ्यात डोळे घालून तो मला अजमावण्याचा प्रयत्न करत होता.मी शांतपणे तो काय करतोय ते पहात होतो.
मावशी काय करतेय याकडे मी एक नजर टाकली.तोच क्षण बरोबर पकडून त्याने मला जोरात धक्का दिला व तो बाहेर पळून गेला. तो जरी बाहेर पळाला तरी आता तो जास्त दूर जाऊ शकणार नाही हे मला माहीत होते.त्यामुळे मी शांतपणे उठलो व हाॅटेलच्या बाहेर आलो.माझ्या अपेक्षेप्रमाणे बाहेरच्या पोलिसांनी त्याला पकडले होते.
माझ्याकडे पाहून तो गुरगुरला,
"कोण आहेस तू? मला का पकडले आहे? याचा परिणाम चांगला होणार नाही."
  "हो? काय करशील? मला पण किडनॅप करशील?"
  हे ऐकल्यावर त्याने चमकून माझ्याकडे पाहिले.
"पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला व जानकी मावशीला  मसुरीला आत्ताच घेऊन आलो."
"फारच सहजपणे पकडलेस की तू त्याला.मला वाटले होते इंटरेस्टिंग असेल. तू त्याचा शोध घेशील, तो पळून जाईल.मग तू त्याचा पाठलाग करशील.त्याची गाडी पुढे,तुझी गाडी मागे.मग तो तुला हुलकावणी देऊन पसार होईल.त्यानंतर खूप शोधाशोध केल्यावर तो तुला सापडेल."
"हा काय सिनेमा आहे का? अर्थात खूपदा असेही घडते.पण या केसमध्ये आधीच सगळी माहिती घेऊन त्याच्याभोवती पाश आवळून मग त्याची मान पकडली आहे.तो सापडल्याने त्याचा शोध घेण्यापेक्षा बाकीच्या पुराव्यांच्या मागे लागलो होतो.आता त्याला पकडले आहे.तो पोलिसांच्या ताब्यात आहे.त्याच्याकडून इन्स्पेक्टर सोहनी गुन्ह्याची कबुली करवून घेतील.

  आता माझा या केसमधील रोल संपला आहे.मावशी, सखाराम आणि राहुल तिघेही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.मी ठरल्याप्रमाणे उद्या सकाळी मुंबईला जाणार आहे.तुमची मदत तर इन्स्पेक्टर साहेबांना लागेलच.कदाचित तुमचे प्लेनचे बुकींग बदलावे लागण्याची शक्यता आहे."
"आम्ही थांबू रे...पण त्याच्यावर गुन्हा शाबित होईल का? माझी साक्ष कोर्टात कितपत खरी समजली जाईल?"निकीता म्हणाली.
यावर तन्मय म्हणाला,
"सात मुलींचे त्याने अपहरण केले आहे. त्या सातजणींनी कोर्टात येऊन त्याच्याविरुद्ध साक्ष दिली तर?"
  "मग काय तो सुटत नसतो.पण त्या सात मुलींना कुठे शोधायचे? पोलिसांनी इतका प्रयत्न करुनही त्या सापडल्या नाहीत,आता कुठून सापडणार? म्हणजे इतके गुन्हे करुनही गुन्हेगार निर्दोष सुटणार."

  "Have some patience baby ! तो आता सापडला आहे ना? कोर्टात केस उभी रहायला अजून एक दिड महिना तरी जाईल.त्यानंतर किमान दोन वर्षे केस चालेल. मग त्याचा निकाल लागेल. हे मात्र नक्की की कोर्टात केस उभी रहाण्यापूर्वी त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा करुन दाखल केले तर केस स्ट्राॅंग होईल आणि त्याच्या मानेभोवतीचा फास आवळला जाईल."
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
तुम्हाला काय वाटते? राहुलला शिक्षा होईल की तो निर्दोष सुटेल?



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →