Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ७00

अन्यायाविरुद्ध स्त्रियांनी दिलेला लढा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ७

©® सौ.हेमा पाटील.

  मागील भागात आपण पाहिले,निकीताला माॅर्निंग वाॅकला गेल्यावर मधु अशी हाक ऐकू येते.असेल कुणीतरी म्हणून ती दुर्लक्ष करते.परंतु हाॅटेलमध्ये रुमच्या गॅलरीत ती उभी असतानाही पुन्हा मधु ही हाक ऐकू येते.त्यामुळे निकीता प्रचंड घाबरते.आता पुढे पाहू...

  निकीता प्रचंड घाबरली होती.बेडवर झोपलेल्या मनिषला ती जोरजोरात हलवून उठवत होती.तिच्या घाबरण्यामागे मधु ही हाक होती.

  मनिष झोपेतून जागा झाला आहे याचेही भान निकीताला नव्हते.ती अजूनही त्याला हाका मारत हलवत होती.ते पाहून मनिषला समजले की,काहीतरी घडले आहे त्यामुळे निकीता इतकी अस्वस्थ झाली आहे.तो पटकन उठून बसला व तिच्या दोन्ही दंडांना धरुन तिला हलवत म्हणाला,
"अगं,काय झाले आहे?का इतकी ओरडतेयस"?
त्याच्या हलवण्यामुळे ती जराशी भानावर आली. वेगाने मनिषकडे झेपावत त्याच्या कुशीत शिरुन अगदी आत आत शिरण्याचा प्रयत्न करु लागली.मनिषने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.तीही काहीच न बोलता शांतपणे त्याच्या मिठीत विसावली.आत्ता तिला काही विचारण्यात अर्थ नाही असे मनिषला वाटले.म्हणून तो तिच्याकडे मिश्कीलपणे पहात म्हणाला,
"ए वेडाबाई,आपण खरंच हनीमूनला आलोय असा ग्रह करुन घेतला आहेस का? आज बेडवरुन खाली उतरायचे नाही का?तसे म्हणत असशील तर माझी तयारी आहे."
हे ऐकून ती अभावितपणे हसली.

तिला हसलेली पाहून मनिष म्हणाला," माझे वेडे कोकरु ते.."
हे ऐकून ती पुन्हा त्याला अधिकच बिलगली.पण त्याचवेळी तिला मधु ही हाक दुसऱ्यांदा ऐकलेले आठवले. आपला कुणीतरी पाठलाग करतेय का अशी शंका तिच्या मनात आली. आपण हाॅटेलकडे परतताना मागे वळूनही पाहिले नाही.कदाचित मागे वळून पाहिले असते तर आपल्या मागावर कुणी आहे का ते समजले असते असे तिला वाटून गेले. आता मनिषला सोडून अजिबात कुठेही एकटीने जायचे नाही असे तिने मनाशी पक्के ठरवले.

आजकाल मुलींना, बायकांना पळवून नेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.त्यात आपण इथे परमुलुखात..ना कुणी ओळखीचे ना पाळखीचे..असे काही संकट आले तर कुणाकडे मदत मागायची? त्यापेक्षा एकटीने अजिबात कुठेही जायचे नाही असा विचार ती करत होती.

   मनिष तिच्या विचारमग्न चेहऱ्याकडे पाहून ती का घाबरली असावी याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होता. आपण गाढ झोपेत असताना ती बाहेर गेली होती हेच मनिषला माहीत नव्हते.तसेच ती आंघोळ करुन फ्रेश झालेली दिसतेय याचा अर्थ ती झोपेत नाही.नाहीतर तिला काही भितीदायक स्वप्न पडले असावे असे म्हणता आले असते. पण तिला आत्ता काही विचारले तर ती अजून घाबरेल असे वाटले म्हणून मनिषने तिला काहीच विचारले नाही. तीही फक्त त्याच्या मिठीत त्याला बिलगून बसली होती.

तिच्या डोक्यावरुन हात फिरवत मनिष म्हणाला,
" चल,मला आवरु दे.आपल्याला ब्रेकफास्ट उरकून नऊ वाजता पाॅईंटस् पहायला जायचेय."
हे ऐकल्यावर ती बाजूला झाली.तो फ्रेश होऊन आवरण्यासाठी बाथरुममध्ये शिरला.ती मात्र अंगाभोवती ब्लॅंकेट  गुंडाळून घेऊन बेडवरच बसून होती...बसल्या बसल्या तिला जरा गुंगी आली.

अचानक तिच्या कानापाशी
"ऐ मधुराणी.."असे शब्द ऐकू आले आणि ती एकदम दचकली.तेवढ्यात तिच्याभोवती बाहुपाशांचा विळखा पडला.ती अचानक झालेल्या या प्रसंगाने इतकी घाबरली की,मनिषला हाक मारण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या कंठातून शब्द फुटेना.तिची अशी अवस्था झालेली पाहून मनिष घाबरला.तोच तिच्या हनुवटीला धरुन तिचा चेहरा वर उचलत मनिष म्हणाला ,
"काय झाले माझ्या मधुराणीला?" ती खूप घाबरलीय हे समजल्याने त्याने शेजारच्या टेबलावर असलेल्या जारमधून ग्लासमध्ये पाणी ओतले व ग्लास तिच्यापुढे धरला.दोन घोट पाणी पिल्यानंतर तिचा श्वास जरा मंदावला.ते पाहून मनिष ने तिच्या  डोक्यावरुन हळूवारपणे हात फिरवत विचारले,
"Are you alright?"
ती म्हणाली,
"मला आधी सांग तू मला मधु अशी हाक का मारलीस?" यावर मनिष म्हणाला,
"मग काय..आहेसच तू मधुराणी! तुझ्या या अधरांमधील मध म्हणजे अमृत आहे."
तो पुढे अजून काही बोलण्याच्या आधीच निकीताने त्याला थांबवले व ती म्हणाली,
" मला मधु म्हणून कधीच हाक मारायची नाही." तिचा घाबरलेला चेहरा व थरथरणारे शरीर पाहून ती फारच घाबरली आहे हे त्याला समजले.पण याविषयी अधिक काही आत्ताच विचारायला नको म्हणून मनिष म्हणाला,
"ओके राणी सरकार!कधीच म्हणणार नाही.बरं चल आता..आवरुन घे.आपल्याला आधीच उशीर झाला आहे."

निकीता बेडवरून खाली उतरली.पण तिने मनिषला सांगितले की,
"दोघांनीही बरोबरच खाली जायचे.मी तयारी करेपर्यंत इथेच रुममध्ये थांबायचं."
"जैसा आपका हुक्म आंका."
हे नाटकी स्वरात मनिष म्हणाला,पण तिची कळी काही खुलली नाही.

तिने बेबी पिंक कलरचा शरारा घातला.केस मोकळेच सोडले होते.हातात फक्त रिस्टवाॅच घातले होते अन् उजव्या हातात नाजुकसे ब्रेसलेट. ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली होती बस...पण एवढ्या माफक मेकअपमध्ये ती सुंदर दिसत होती.मनिषला तिला जवळ घेण्याचा मोह आवरला नाही.त्याने तिला मिठीत घेतले आणि तो म्हणाला,
" आज राहुदेत का पाॅईंटस् पहायला जायचे? ब्रेकफास्ट उरकून परत इथेच येऊया."
त्याला दूर सारत निकीता म्हणाली,
" झाली तुझी सुरवात..चल शूज घाल."
"अगं ऐक ना! आपण एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी इकडे आलोय ना! तूच सारखी ओरडत असतेस ना मला वेळ देत नाही म्हणून? मग आता इथेच थांबू या म्हणतोय तर..."
यावर लज्जित चेहऱ्याने तिने मनिषकडे डोळे वटारुन पाहिले.
"आता खाली येणार आहेस की मी एकटीच जाऊ?" हे तिचे लटक्या रागाने डोळे वटारुन पाहत बोलणेही मनिषला खूप आवडले.
तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात चेहऱ्यावर नाखुशीचे भाव आणत तो तिच्यासोबत रुमबाहेर पडला.

हाॅटेलमध्ये काॅम्पिमेंटरी ब्रेकफास्ट होता.प्लेट घेऊन ती काय काय पदार्थ आहेत हे पहात फिरत असताना काही तेथील पदार्थ व काही सगळीकडे मिळणारे लोकप्रिय पदार्थ तिला दिसले. इडली, वडा, ढोकळा प्रवास करताना योग्य नाही म्हणून त्यांनी आलुपराठा आणि सोबत चटणी व साॅस असा ब्रेकफास्ट व काॅफीच घेणे पसंत केले .खरंतर मनिषाला ढोकळा खूप आवडतो, पण आज त्याने मनावर संयम ठेवला.
 
  खाणे उरकल्यावर ते बाहेर काॅरिडाॅरमध्ये आले.आता दिवसभराचा प्रोग्राम फिक्स होता.गाडीच्या ड्रायव्हरला मनिष फोन करत असताना तिने सभोवार नजर फिरवली.एका झाडाजवळ उभा असलेला तरुण आपल्याकडेच पहात आहे हे तिच्या लक्षात आले, त्यामुळे अभावितपणे तिची नजर पुन्हा एकदा त्याच्याकडे वळली.तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर आला. त्यामुळे साहजिकच तिचे तिकडे दुर्लक्ष झाले.ती ड्रायव्हर कसा आहे हे न्याहाळू लागली. कारण पुढचे काही दिवस तोच दिवसभर या दोघांसोबत असणार होता...
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →