Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ५०

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ५०

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, राहुल पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.जानकीमावशीने आपला जबाब द्यायला सुरुवात केली आहे.आता पुढे...

" मॅडम, मी व माझे मालक मुंबईत रहात होतो. मी धुण्याभांड्याची, स्वयंपाकाची कामे करायची.माझा नवरा हाॅटेलमध्ये वेटरचे काम करायचा. माझ्या मालकाला या साहेबांनी विचारले,
मसुरीला माझे घर आहे.तिथे कायमस्वरूपी नोकर हवा आहे. घरातच रहायचे.तिथे माझा एक दुकान गाळा आहे.तो चालवायचा.मी काही दिवस तिथे रहातो अन् काही दिवस मुंबईत. त्यामुळे मला एक जोडपे हवे आहे. नोकर बाकीची कामे करेल आणि त्याची बायको घरातील स्वच्छता,जेवण बनवणे ही कामे करेल.

आम्ही धारावी झोपडपट्टीत रहात होतो. एकदम बंगल्यात राहायला जाण्याची संधी चालून आली होती.त्याची भुरळ पडली.मालक कधीतरीच मसुरीला येईल.मग काय बंगल्याचे आपणच मालक! असा विचार माझ्या मनात आला.कमी पगार मिळाला तरी चालेल,पण ही नोकरी स्वीकारायची अशी मी नवऱ्याला ताकीदच दिली होती.
नवऱ्यालाही ही नोकरी बरी वाटली. त्यामुळे त्याने होकार दिला.मग मालकांनी आम्हांला दोघांना ट्रेनची तिकीटे काढून दिली . आम्ही मसुरी येथे पोहोचलो तेव्हा मालक मसुरी येथेच होते. त्यांनी घराकडे यायच्या खाणाखुणा सांगितल्या.
घरी आलो तेव्हा इथे अनिता होती.आधी तर आम्हांला वाटले, ही साहेबांची बायको आहे. साहेबांनी तिला कोंडून ठेवले होते. त्यांना गरज लागेल तेव्हा ते त्या रुममध्ये जात. इतर वेळी त्या दाराला बाहेरुन कडी लावत असे.

हे पाहून मला आश्चर्य वाटले होते.मी आमच्या मालकांना म्हणाले,
"हे मालक असे का आहेत? स्वतःच्या बायकोला असे कोंडून का ठेवतात?"
यावर माझ्या मालकांनी सांगितले,
"तुला माहीत आहे का नाही मला माहीत नाही. पण आपल्याला काय करायचे आहे? ते आणि त्यांचे भविष्य! "
हे ऐकून मी शांत बसले होते. मालकांच्या विचित्र स्वभावाचा मला अंदाज आला होता.पण नोकरी सोडावीशी वाटत नव्हती कारण एकाच ठिकाणी काम करायचे होते. कामही मोजकेच होते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे बंगल्यात रहाण्याचे स्वप्न पूर्ण होत होते.

मालक महिन्यातून पंधरा दिवस इथे आणि पंधरा दिवस मुंबईत असा त्यांचा मुक्काम असायचा."
"ही अनिता कोण होती मग?" लेडी काॅन्स्टेबलने मुद्दामच प्रश्न विचारला.
"अनिता ही राहुलने पकडून आणलेली बाई होती."
"पकडून? बायका काय रस्त्यावर पडलेल्या असतात का? उचलली आणि घातली खिशात !"
"मॅडम, आमच्या मालकांसाठी तरी ते तसेच होते.कारण साधारण दर दोन महिन्यांनी ते नवीन बाई घेऊन यायचे."
"मग तुम्हांला खटकायचे नाही हे? तुम्ही याबद्दल कधी बोलला नाहीत का त्याला?"
"बोलले होते मॅडम. मी त्यांना म्हणाले होते, हे असे वागणे चांगले नाही.त्या मुलींचा तळतळाट लागेल तुम्हांला. भरल्या संसारातून तुम्ही मुलींना उचलून आणताय."
यावर मालक म्हणाले होते,
"मावशी, तुमचे काम तुम्ही करा.माझ्या गोष्टींत नाक खुपसायचे नाही. मला जो काही तळतळाट लागायचा असेल ते मी पाहून घेईन.पुन्हा जर असे काही बोललात तर नोकरीवरुन काढून टाकीन."

"अच्छा! नोकरी सुटेल म्हणून तुम्ही याबाबतीत मूग गिळून गप्प बसलात तर !"
  "हो मॅडम, आता पन्नाशीत जास्त दगदग करणे झेपत नाही.चार घरं ढुंढाळायची. तिथल्या मालकीणींचे नखरे झेलायचे. त्यांचे स्वभाव मांजरीसारखे.वरुन तर गुबगुबीत छान दिसायच्या.पण कधी नखं बाहेर काढून बोचकारतील याचा नेम नाही. आयुष्यभर याचा अनुभव घेतला.चांगल्या मालकीणी पण मिळाल्या,त्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच! त्यामुळे मी शांत बसले.
  मॅडम, मी मुंबईत आयुष्य काढलेय. श्रीमंत कुटुंबात धुणीभांडी स्वयंपाकाची कामे करत असल्याने व्यवस्थित रहायला शिकले.भाषा सुधारली. एक मालकीण एकटीच रहायची.ती खूप ग्रंथ वाचायची.तिला बोलायला कुणीच नसायचे. ती माझी वाटच पहात असायची. मी तिथे तासभर असायचे, तेवढ्यात ती कालच्या दिवसभरात घडलेले सगळे काही सांगायची. ग्रंथात काय वाचले तेही सांगायची. त्यामुळे मालक जे काही चुकीचे करतो ते त्याला भोगावे लागेल. कर्माचे फळ त्याला नक्की मिळेल. आपण आपले काम करायचे असा माझा दृष्टिकोन तयार झाला होता.असा विचार करुन आम्ही तिथले काम सोडले नाही.पण या बाबासाठी पोलिसस्टेशनची पायरी चढावी लागेल असं मात्र वाटलं नव्हतं."
लेखनिक पोलिस लिहायचे थांबला.तसे मॅडमनी सांगितले,
" हे ही लिहून घ्या. नोकरी सुटण्याच्या भीतीने हे जोडपे तिथे घडणाऱ्या गोष्टी पाहून ही तिकडे दुर्लक्ष करत होते."
"बरं मॅडम. लिहितो.मला वाटले हे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आहे तर हे कशाला लिहू?"
"वैयक्तिक आयुष्य हे फार थोड्या वेळासाठी असते.आपण सर्वांसोबत जगत असताना एकमेकांच्यावर अवलंबून असतो.जसे मी सांगितले म्हणून तुम्ही लिहून घेताय कारण तुम्ही रायटर आहात.तुम्ही जर चुकीचे लिहिले तर त्याचा परिणाम या केसवर होईल.मला इन्स्पेक्टर साहेब रागावतील.मग मी तुम्हाला...अन् इन्स्पेक्टर साहेबांना वरचे साहेब...अशी साखळी असते.माणूसही असाच घडत जातो ना? तुमचे विचार तुम्हांला घडवतात."
."बरं." असे म्हणत त्यांनी मान डोलावली व लिहायला सुरुवात केली.
"बोला मावशी पुढे" असे मॅडम म्हणाल्या.
"पंधरा वीस दिवसांनी मालक अनिताला घेऊन मुंबईला गेले. पंधरा दिवस बंगल्यात आमचेच राज्य होते.आम्ही त्या आनंदात डुंबत होतो.पंधरा दिवस कसे गेले ते कळले नाही.मालक परत आले तेव्हा यांची जाणीव झाली. परत येताना मालक एकटेच आले होते.अनिता सोबत नव्हती.
त्यानंतर आठ दिवसांनी मालक रश्मीला घेऊन आले."
"ही रश्मी कोण?"
"नवीन मुलगी मॅडम. तिला ते गाडीतून घेऊन आले तेव्हा ती बेशुद्ध होती.रात्री उशिरा ते तिला घरी घेऊन आले.गाडीतून आणताना त्यांनी तिला उचलूनच आणले होते.तिला नेऊन त्यांनी एका बेडरुममध्ये ठेवले.मला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले.ती जर रात्री शुद्धीवर आली तर मला उठव असे सांगून मालक झोपायला त्यांच्या बेडरुममध्ये गेले. आमची झोपायची खोली आता आमची राहिली नव्हती.गेले पंधरा दिवस ती रुम आम्ही आमची बेडरुम म्हणून वापरत होतो.

  रश्मी काही सकाळपर्यंत शुद्धीवर आली नाही.मी किचनमध्येच चटई टाकून झोपले होते.सकाळी माझी नेहमीची कामे सुरू झाली.तेव्हा "दार उघडा दार उघडा" असा आवाज आणि दारावर थापा पडू लागल्या. मी मालकांना उठवायला निघाले होते तेवढ्यात तो आवाज ऐकून तेच स्वतः उठून आले. मला चहा ठेवायला सांगून त्यांनी त्या बेडरुम चे दार उघडले.दार उघडल्यावर रश्मी वेगाने बाहेर धावत आली.
मालकांनी तिचा हात धरला.ती हात सोडवून घेण्यासाठी धडपडू लागली.पण मालकांच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही.मालकांनी तिला उचलून घेतले व ते त्या बेडरुममध्ये तिला घेऊन गेले.आत गेल्यावर त्यांनी दाराला आतून कडी लावली."
"पुढे काय झाले?"
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
नमस्कार वाचक मंडळी ,
आज पन्नास भाग पूर्ण केले याचा आनंद आहे. कथा मात्र इथे पूर्ण होणार नाही.ती चालूच रहाणार आहे. सर्व वाचकांचे ही खूप धन्यवाद!








0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →