Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ३८

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ३८
:©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, राहुलने ईस्माईलच्या माणसांकरवी  दरवाजा तोडण्यास सांगितले होते.तिथून पुढे जे घडले ते राहुलच्या अपेक्षेपेक्षा वेगळेच होते.
दरवाजाला असलेल्या आय होल मधून निकीताने बघितले तर तिला वेगळीच चार-पाच माणसे दरवाजाला धडका देत असताना दिसली. आलटून पालटून ती चौघेजण दरवाज्याला धडका देत होती. एक इसम तिथे उभा राहून त्यांना मार्गदर्शन करत होता. तिथे तिला राहुल दिसला नाही. याचा अर्थ त्यावेळी तिथे राहुल नसावा. परंतु ही माणसे त्यानेच पाठवलेली असणार हे तिला समजले.

तिने खबरदारीचा उपाय म्हणून किचन मधील एक जाड सुरी जी तिने आज शोधून ठेवली होती ती स्वसंरक्षणासाठी आपल्या जवळ घेतली. आणि राहुलच्या रूममध्ये जिथे जानकी मावशीला बांधून ठेवले होते तिथे आत जाऊन तिने दरवाजा लावून घेतला.त्या एकाच दरवाजाला आता आतून कड्या शिल्लक राहिल्या होत्या.आता पुढे काय होईल ते पाहत बसणे एवढेच तिच्या नशिबी होते.

   जवळपास दहा मिनिटांचा वेळ गेला आणि दरवाजा तुटल्याचा आवाज तिला आला. परंतु तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर सामसूम झाली. दरवाजाजवळ कोणीही नाही असे तिला वाटले म्हणून तिने बेडरूमचा दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिले तर दरवाजा तुटून वेडा वाकडा पडला होता. आणि तिथे कुणीही नव्हते. हे बघताच तिने ती सुरी एका टाॅवेलात गुंडाळून आपल्या सोबत घेतली. आणि ती तेथून त्या दरवाज्याच्या पडलेल्या तुकड्यांमधून वाट काढत त्या घराच्या बाहेर पडली. आता आपण या समोर दिसणाऱ्या रस्त्याने जर चालत गेलो तर नक्कीच आपल्याला राहुल आडवा येणार. कारण तो आता घरीच येत असणार असा निकीताने अंदाज बांधला.दरवाजा तोडून कुणी आत आले नाही . दरवाजा तुटला की मोडणारी माणसे बाहेरच्या बाहेरच परतली.याचाच अर्थ राहुलनेच ते काम या माणसांना सांगितले असणार...
हातात वेळ फार कमी होता. त्यामुळे तिने त्याच्या घराच्या मागच्या कंपाउंडच्या भिंतीवरून पलीकडे उडी मारली.आणि त्या बाजूने ती रस्ता दिसेल त्या दिशेने चालू लागली. ती चालत थोडी पुढे गेली आणि तिला एक दुकान दिसले. त्या दुकानात जाऊन तिने रिक्वेस्ट केली की,
" मला एक फोन करायचा आहे." त्या दुकानदाराने आपला मोबाईल चालू करून तिच्यापुढे धरला. तिने मनीषला फोन लावला. अननोन नंबर बघून मनीषने आधी उचलला नाही. पुन्हा रिंग झाली तेव्हा मनीषने फोन उचलला. मनीषचा आवाज ऐकून निकिता म्हणाली ,
" हॅलो, मी बोलते निकिता!" निकिताचा आवाज ऐकून मनीषच्या कानांवर विश्वास बसेना.
"निकिता कुठे आहेस तू?" यावर निकिताने सांगितले ,
"या मोबाईल वरून मी माझे लोकेशन पाठवते. ताबडतोब मला तिथे घ्यायला ये." हे ऐकताच मनीष म्हणाला,
" ठीक आहे. लगेच पाठव. मी निघतोच."
निकिताने मोबाईल वरून लोकेशन पाठवले. तेवढ्या वेळात मनीषने तन्मयला फोन केला. तन्मय सखारामला बोलते करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. मनीषने सांगितलेले ऐकले की तन्मय तेथून ताबडतोब बाहेर निघाला. सोबत चार असिस्टंट घेतले आणि मनीषला सांगितले,
" निकिताने पाठवलेले लोकेशन मला पाठव." मनीषने त्याला लोकेशन पाठवले. मुन्नाला सोबत घेऊन मनीष सुद्धा त्या लोकेशनकडे निघाला. तन्मयही पोलीस स्टेशन मधून निघाला. निकिता त्या दुकानात थांबली होती. एवढ्यात त्या मोबाईलवर मनीषचा फोन आला. त्या दुकानदाराने फोन उचलला. त्याला मनीष म्हणाला,
" अभी थोडी देर पहले इस मोबाईल से मुझे कॉल आया था|" हे  ऐकल्यावर त्या दुकानदाराने निकिताकडे फोन दिला. मनीष म्हणाला,
" आम्ही तू सांगितलेल्या लोकेशन जवळ पोहोचलो आहोत. तू कुठे आहेस? बाहेर ये." हे ऐकल्यावर निकिता दुकानातून बाहेर आली. ती बाहेर पडली तेव्हा तिला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मुन्नाची मुमताज दिसली. त्या गाडीजवळ उभा राहून मनीष इकडे तिकडे पहात होता. ते पाहून ती धावतच रस्ता क्रॉस करून तिकडे गेली. तिला पाहताच गाडीत बसलेला मुन्नाही बाहेर आला.
"साब, ये देखो मेमसाब आ गई |"असे तो म्हणाला. म्हणून मनीषने वळून बघितले, तर निकिता धावतच येत होती. मग तोही धावतच तिच्याकडे झेपावला. निकिताने जवळ येऊन मनीषला मिठी मारली. मनीषनेही तिला जवळ घेतले .दोघांची झालेली गळाभेट इतक्या दिवसांचा दुरावा दर्शवत होती. निकिताच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. मनीषचेही डोळे वाहत होते. निकिता आपल्यासमोर उभी आहे याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मध्ये काही दिवस त्याने जो ताण सहन केला होता तो त्याच्या डोळ्यांवाटे बाहेर पडत होता.

मुन्ना या दोघांची गळाभेट अनिमिष नेत्रांनी पहात होता.तेवढ्यात तेथे तन्मय पोलिस व्हॅन मधून पोहोचला.तोही खाली उतरणे विसरुन या दोघांकडेच पहात राहिला. थोड्यावेळाने निकीता भानावर आली.आपण भर रस्त्यात उभे आहोत हे लक्षात आल्याने ती मनिषच्या मिठीतून बाजूला झाली.त्याचवेळी मुन्ना पुढे आला आणि म्हणाला,
"आप आ गयी मेमसाब! कैसी है आप? ठीक तो है ना?"
हे ऐकून तिने होकारार्थी मान हलवली.तेवढ्यात तिला रस्त्याच्या पलिकडे उभा असलेला तन्मय दिसला.त्याला पाहून तिला फार आश्चर्य वाटले.हा इथे कसा असे तिला वाटले.तन्मय रस्ता क्रॉस करून अलिकडे आला आणि तिला म्हणाला,
"आमच्या तोंडचे पाणी पळवले होतेस तू! काळजी करुन करुन तुझा नवरा बघ किती सुकलाय.  पण तू तर झाशीची राणी निघालीस.स्वत:च स्वतः ची सुटका करून घेतलीस.छान छान! अशीच कायम रहा.महिलांनी असेच असले पाहिजे."
"पण तू इथे कसा?" हा प्रश्न निकीताने विचारला.
"सगळे इथेच उभे राहून बोलायचे आहे का? चला रुमवर जाऊया.तिथे थोडावेळ विश्रांती घेऊया.मग सगळ्यांचे सगळे ऐकून घेऊ."असे मनिष म्हणाला.
यावर तन्मय म्हणाला,
"नाही.आधी निकीताला घेऊन आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेले पाहिजे.निकीता सापडली आहे हे कळवले पाहिजे.ती आपली ड्युटी आहे.तसेच आरोपीला पकडण्यासाठी निकीताचा जबाब उपयोगी ठरेल."
हे ऐकल्यावर निकीताने मनिषकडे पाहिले.मनिष काही बोलण्याआधी तन्मयच तिला म्हणाला,
याबाबत सगळे काही तुला मी नंतर सांगेन.आता आपण आधी पोलिस स्टेशनमध्ये गेले पाहिजे. मुन्ना, चल गाडी वळव."
हे ऐकून मुन्नाने गाडी वळवली.मनिष व निकीता गाडीत बसले.पुढे तन्मय आलेली पोलिस जीप होती.मागे मुन्नाची गाडी होती.तन्मयने इन्स्पेक्टर सोहनी यांना फोन करून निकीता सापडली आहे हे सांगितले.आत्ता निकीता  पोलिस स्टेशनमध्ये निघाली आहे.तुम्हीही तिथे या. लवकरात लवकर तिला मोकळे करा." असे त्याने सांगितले.
गाडीत बसलेल्या निकीताला तन्मयने विचारले,
"तू इथे कुठे होतीस? त्या ठिकाणाच्या जवळपासच्या खाणाखुणा सांगू शकशील का?"
या मागच्या रस्त्याने गेले की नववा बंगला.बंगल्याची मागची बाजू. पुढच्या बाजूने गेलास तर बंगल्याचे मुख्य दार तोडलेले दिसेल.तीच मुख्य खूण आहे."
"म्हणजे निकीता तू बंगल्याचे दार तोडून पळालीस? एवढी ताकदवान आहेस?" असे तन्मय म्हणाला.
"ते जर मला शक्य असते तर चार दिवस मी वाट पाहिली असती का?"
असे निकीता म्हणाली.
"काय घडले ते इथेच सांगू का? थांबतोयस का तू?" असे निकीताने विचारले.
"नको.त्यापेक्षा राहुल हाती लागणे जास्त महत्वाचे आहे.तुझ्याकडून परत सगळे ऐकेनच मी.आता मी जातो.तुम्हीही पोलीस स्टेशनमध्ये जा." असे म्हणत तन्मय पोलिस जीपमध्ये बसला.
क्रमश:©® सौ.हेमा पाटील.

  हुशss  झाली एकदाची निकीताची सुटका ! आता तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस राहुल पर्यंत पोहोचतात का? की आजच तन्मयच्या हाती तो लागतोय पाहूया.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →