Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ३७

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ३७
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले,राहुलने ईस्माईलला चार ताकदवान माणसे दार तोडण्यासाठी पाठवायला सांगितले होते.राहुल आत आहे की बाहेर हे त्याने मुद्दाम सांगितले नव्हते.आता पुढे..

"अभी भेज देना |" असे राहुलने इस्माईलला सांगितले.
"हां  हां ! अभी भेज देता हूं | भेजने से पहले फोन करता हूं |" हे ऐकल्यावर राहुलला बरे वाटले. आता इस्माईल कडून माणसे आली की दार उघडले जाईल. दार उघडले की आधी निकिताला तिथून बाहेर काढून दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवले पाहिजे. कुठे न्यायचे कसे न्यायचे याचे प्लॅनिंग त्याच्या डोक्यात सुरू झाले. तसेच इस्माईलची माणसे येतील त्यावेळी आपण समोर असता कामा नये. नाहीतर आपण बाहेर आहोत आणि मग आत कोण आहे असा संशय त्यांना येईल.मधल्या वेळात निकीता तर पळून जाणार नाही ना? असा विचार त्याच्या मनात आला.दरवाजाजवळचा माणसांचा वावर तिच्या लक्षात आल्यावर ती सुरक्षेसाठी आतल्या रुममध्ये जाऊन दार लावून घेईल.बहुतेक बाहेर येणार नाही असे त्याला वाटले.रिस्क नक्कीच होती,पण रिस्क घेणे आवश्यक होते.

   थोड्या वेळातच इस्माईलचा फोन आला.
" माझी माणसे येथून निघाली आहेत. पाच ते दहा मिनिटात ते पोहोचतील."  हे ऐकल्यावर राहुलला बरे वाटले. त्याने आपली गाडी तेथून बाहेर काढली. आणि मेन रोडपाशी एक आडबाजूला पार्क केली. आणि तो गाडीतच बसून राहिला. आता त्याला मेन रोड वरून आत वळणारी गाडी आणि माणसे दिसू शकत होती. पण तो मात्र कुणाला दिसू शकला नसता. कुणीतरी वाकडी वाट करून तिकडे आले तरच तो गाडीत बसला आहे हे लक्षात आले असते.

   दहा मिनिटातच त्याला दोन टु व्हीलर वरून चार माणसे आत वळलेली दिसली. हीच माणसे इस्माईलने पाठवलेली  असावीत याचा त्याला अंदाज आला. मागोमाग ईस्माईलची गाडीही आलेली त्याला दिसली.आता ती दार कसे उघडतात याची उत्सुकता त्याला लागली होती. परंतु तो तिथे जाऊ शकत नव्हता. जेव्हा इस्माईलचा फोन येईल किंवा ती माणसे परत जाताना दिसतील तेव्हाच आपण तिकडे जाऊ शकतो. तेवढ्या वेळात निकिताने काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवली, असे त्याला वाटत होते.

  त्या माणसांसोबत इस्माईल सुद्धा आला होता. तो जर आला नसता तर आपण तिथे जाऊ शकलो असतो असे त्याला वाटले. पण आपल्या हातात फार कमी वेळ आहे त्यामुळे आता या गोष्टींचा विचार सोडून देऊन पुढे काय होते ते पाहिले पाहिजे असे म्हणून तो शांत बसला. पंधरा मिनिटांतच इस्माईलचा त्याला फोन आला .
"आपने जो बोला था वो कर दिया है | आपका दरवाजा आपने खोलने को बोला था लेकिन अंदर से इतनी मजबुतीसे बंद कर दिया था कि तोडने के बजाय कोई और चारा नही था | आपका दरवाजा टूटकर निकला है | आप बाहर क्यूं नही आ रहे हो | हम दरवाजे के पास ही खडे है|"
हे ऐकून तो म्हणाला,
" आपने मेरा काम कर दिया | बहोत शुक्रिया |  अब आप जा सकते हो | मै आपसें मिलने रात को आ जाऊंगा |" हे ऐकल्यावर इस्माईलला जरा वेगळे वाटले. आपला मोबदला आपल्याला नक्की मिळणार याची त्याला खात्री होती.त्यामुळे राहुल बाहेर का आला नाही अशा फालतु गोष्टींचा विचार करायला त्याला वेळ नव्हता. त्याच्या मागेही कामांची भली मोठी लिस्ट असल्याने लवकर सुटका झाली असे वाटून तो त्या माणसांना घेऊन माघारी फिरला.

    तो माघारी गेलेला बघताच राहुलने घराकडे गाडी दामटली. तो घरी पोहोचला तर दरवाज्याचे चार तुकडे होऊन दरवाजा तिथेच पडला होता. तिथूनच तो बाजूने आत शिरला. आत शिरल्यावर त्याला जानकी मावशी आत दिसली, पण निकिता मात्र दिसली नाही. त्याने सगळे घर शोधले पण निकिता कुठेही नव्हती. एवढ्या कमी वेळात ही कुठे गेली असावी असे त्याला वाटले. मोजून दहा मिनिटे पण मध्ये गेली नसतील. हातपाय बांधलेल्या जानकी मावशीला त्याने सोडवले. त्यांच्या तोंडावर बांधलेली पट्टी सोडून त्याने विचारले,
"निकिता कुठे आहे ?"यावर जानकी मावशीने दाराकडे हात करून ती बाहेर गेली असे खूण करून सांगितले.
" ती कधी बाहेर पडली ?" असे राहुलने विचारले. यावर जानकी मावशीने सांगितले,
" ती माणसे गेली की त्यांच्या पाठोपाठ लगेचच निकिता बाहेर पडली." हे ऐकल्यावर राहुल स्तिमित झाला. निकिता आपल्याला खूपच भारी पडणार असे दिसते.आता इथे थांबण्यात अर्थ नाही.ताबडतोब इथून बाहेर पडले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. त्याने आत जाऊन कपाटातील समोर दिसेल त्यातील आवश्यक सामान एका बॅगेत भरले.जानकी मावशीला आपल्यासोबत बाहेर पडायला सांगितले.  जानकी मावशीला तिचे दोन-तीन दिवसांचे कपडे पटकन भरायला सांगितले आणि दोघेजण घराबाहेर पडले.

  घराची अवस्था दयनीय अशी झाली होती. दोन बेडरूमपैकी निकिताला ज्या बेडरूम मध्ये ठेवले होते त्या बेडरूमचाही दरवाजा पूर्ण उघडा होता. त्याच्या कड्या आधीच तोडलेल्या होत्या. मुख्य दरवाज्याचे चार तुकडे होऊन तो दरवाजा तुटून पडला होता .अशा अवस्थेत घराला सोडून तेथून जीव वाचवून निघून जाणे राहुल साठी महत्त्वाचे होते. त्यामुळे त्याने बाकीचा विचार न करता जानकी मावशीला सोबत घेऊन ती जागा सोडली.

जानकी मावशीला असे वाटले की,
"आपल्या मालकांना आपली किती काळजी आहे !आपल्याला सोबत घेऊन ते निघाले आहेत." पण जानकीला सोबत घेऊन जाण्यामागे राहुलचा वेगळाच उद्देश होता . त्याला आपल्या विरुद्ध कमीत कमी पुरावा मागे ठेवायचा होता. जानकी मावशीला जर त्याने तेथेच सोडले असते तर पोलिसांनी तिला बोलते केले असते .आणि त्यामुळे  त्याच्या हातात फार कमी वेळ राहिला असता. आधीच सखाराम पोलिसांच्या तावडीत सापडलेला असावा अशी दाट शंका त्याला आली होती. त्यात या मावशींची भर पडायला नको म्हणून तो आपल्या सोबत त्यांना घेऊन निघाला होता.

  निकिता ने मावशींना शिरा खाण्यासाठी मोकळीक दिली होती परंतु नंतर जेव्हा राहुलने दरवाजावर थापा मारायला सुरुवात केली तेव्हा झालेल्या मारामारीनंतर तिने मावशींना परत आत नेऊन बांधून ठेवले. आणि त्यांच्या तोंडावर सुद्धा रुमाल बांधला. थोड्यावेळाने आवाज यायचा बंद झाला तेव्हा तिला असे वाटले, हा परत गेलेला असावा. परंतु अर्ध्या तासातच दारावर जोरजोरात धडका बसू लागल्या. हे पाहून कोणीतरी दार तोडण्याचा प्रयत्न करत आहे हे तिला समजले. आता काय करायचे असा प्रश्न तिच्यापुढे पडला.
क्रमश:©® सौ.हेमा पाटील.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →