Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ३५

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कहाणी
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग ३५

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, इन्स्पेक्टर सोहनी यांना हाॅटेलवर जाऊन रिकाम्या हाताने परतावे लागले होते.सोहनी परतले आणि सखाराम ने आपल्या मालकाचा पत्ता दिला म्हणून तन्मयही हाॅटेल ग्रीन लाईमवर पोहोचला होता.आता पुढे...

   इन्स्पेक्टर सोहनी यांना पोलीस प्रमुखांचा फोन आला. केस बाबत काय प्रगती झाली हे त्यांनी विचारले. त्यावर,
" सखारामला पकडले आहे आणि राहुलचा फोटो सापडला आहे.राहुल मुंबई, महाराष्ट्र येथील आहे. तो काही दिवस मसुरीला व काही दिवस मुंबईत असतो एवढी माहिती मिळाली आहे. खबरे मुंबईत पोहोचले आहेत. अजून माहिती मिळाली की कळवतो.परंतु राहुलला मात्र अजून पकडण्यात यश आले नाही" हे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलीस प्रमुखांनी इन्स्पेक्टर सोहनी यांना सांगितले,
" मसुरी मधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सस्पेक्टेड दोन्ही इसमांचा फोटो पाठवून द्या. त्या दोघांबद्दल कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये याआधी जर कुठली तक्रार झालेली असेल तर त्याची मदत होईल."  इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितले,
" मी ते आधीच केले आहे. या दोघांचेही आधीचे कुठलेही पोलीस रेकॉर्ड नाही."  हे ऐकल्यावर पोलीस प्रमुख म्हणाले,
" सात महाराष्ट्रातील मुलींचे मसुरीत अपहरण झालेले आहे ही गोष्ट आपल्यासाठी लांच्छनास्पद आहे.आणि अजूनही आपल्या हाती कुठलाही ठोस पुरावा नाही. तेव्हा शर्थीचे प्रयत्न करा आणि आरोपीला पकडा." हे ऐकून इन्स्पेक्टर सोहनी म्हणाले,
" हो साहेब!" आणि त्यांनी फोन ठेवला.

"आपण प्रयत्न करतच आहोत. पण वरिष्ठांना काय सांगायचे ? ते बोलतील ते ऐकून घ्यावेच लागते. आणि याची सवय करून घ्यावीच लागते "असे मनाशी म्हणत ते समोरच्या फाईल मध्ये डोके खुपसून बसले. कॉन्स्टेबलला त्यांनी आपल्यासाठी चहा मागवायला सांगितला.चहा पिला की जरा तरतरी येईल असे त्यांना वाटले.

भरधाव वेगात गाडी चालवत राहुल निघाला होता. आज पहिल्यांदाच त्याला थोडी भीती वाटली होती. आजवर आपण अतिशय सावधतेने वागत होतो पण तरीही आज आपल्याला हॉटेल मधून पळ काढावा लागला. याचा अर्थ सखाराम नक्कीच पोलिसांच्या तावडीत सापडला असावा. त्याने तोंड उघडले तर मात्र आपले काही खरे नाही. निकिता तिकडे आपल्या घरी आहे. सखारामने जर घराचा पत्ता सांगितला तर निकिता आयतीच पोलिसांच्या हाती सापडेल. त्यामुळे निकिताला आधी तेथून हलवणे गरजेचे आहे असे त्याला वाटले. पण आता कुठलेही पाऊल उचलताना अतिशय सावधानता बाळगली पाहिजे हे त्याने मनाशी पक्के केले.

  वाटेत एक बऱ्यापैकी हॉटेल बघून तेथे तो जेवणासाठी गेला.सकाळपासून पोटात काहीच नव्हते. भूक लागली होती.जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येईपर्यंत तो इकडेतिकडे शोधक नजरेने पाहत होता. परंतु आपला कोणी पाठलाग करत आहे असे मात्र त्याला वाटले नाही. कुणी संशयास्पद व्यक्ती त्याला आढळली नाही.तरीही आपण काळजी घेतली पाहिजे हे  त्याने स्वतःला बजावले. त्याने व्यवस्थित पोटभर जेवण केले . तृप्त होऊन तो हाॅटेलच्या बाहेर पडला.

  आता आपण घराकडे चक्कर मारूयात असे त्याला वाटले. तिकडे काय परिस्थिती आहे हे डोळ्याखालून घातले म्हणजे पुढे काय केले पाहिजे हे ठरवता येईल असे त्याला वाटले. त्याने आपली गाडी घराकडे वळवली. रस्त्याने जात असतानाही त्यांचे मागे पुढे सगळीकडे बारीक लक्ष होते.आपला कुणी पाठलाग करत आहे का हे तो तपासून पहात होता.
  सखारामने जर तोंड उघडले नाही तर कदाचित सखारामला पोलीस सोडून देतील. तू काहीच केले नाही यावर आमचा विश्वास बसला आहे असे म्हणतील. पण त्यानंतर तो कुठे जातोय याचा पाठलाग करत ते घरापर्यंत पोहोचतील असे त्याला वाटले होते. पोलिसांची ही ट्रीक त्याला माहीत होती, पण सखारामला माहीत नव्हती. त्यामुळे तो सुटका झाली की सरळ घराकडेच येणार हे ठरलेलेच आहे असा त्याने विचार केला.
त्यामुळे घराजवळ गेल्यावर त्याने दूर अंतरावरच गाडी उभी केली होती. आणि तो तिथूनच घराकडे पहात होता.  आपल्या घराजवळ त्याला कुठलीही हालचाल दिसली नाही .अगर कुणी संशयास्पद रीतीने फिरत असताना त्याला दिसले नाही. त्यामुळे अजून तरी आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटले. परंतु त्याचा सगळा अचूक बायोडाटा तन्मयकडे पोहोचलेला आहे यापासून तो अनभिज्ञ होता. त्याने गाडीत असणारी घराची चावी घेतली आणि तो घराकडे चालू लागला.

घराजवळ येताना त्याने पाहिले घराला कुलूप अजूनही तसेच आहे. याचा अर्थ सखाराम इकडे फिरकलेला नाही. अजूनही सखाराम आलेला नाही म्हणजेच तो नक्कीच अडचणीत आहे हे त्याला समजले. त्याने कुलूप उघडले आणि जानकी मावशीला आवाज दिला. जानकी मावशी नुकतीच तुपातला शिरा खाऊन तरतरीत होऊन बसली होती. तिने आतून "ओ" दिली.
" दरवाजा आतून उघड", असे त्याने सांगितले.
" माझ्याकडे चावी नाही ",असे जानकी मावशी म्हणाली. निकिताचा नुकताच डोळा लागला होता. या आवाजाने ती जागी झाली.  तिने कानोसा घेतला तर जानकी मावशी कोणाशी तरी बोलत आहे हे तिच्या लक्षात आले.  ती पटकन उठून बाहेर आली, तेव्हा तिला कळले की बाहेर राहुल आहे. आणि जानकी मावशी राहुलशी बोलत आहे.

चावी निकिताकडे होती. मावशीने निकिताच्या हातातील चावी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वीही झाली. चावी घेऊन दार उघडण्यासाठी ती पळाली. तिच्या मागोमाग निकिता सुद्धा धावली. मावशीने तोपर्यंत कुलपात चावी घातली होती. फक्त चावी  फिरवायचा अवकाश होता. तेवढ्यात निकिताने मावशीच्या हातावर झडप घातली, आणि मावशीला बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. मावशी अजिबात बाजूला सरकत नव्हती.निकीताने मावशीचे दोन्ही हात पकडले. मावशी मागे वळली.तिच्या मनात निकीताबद्दल राग होताच. तिने कुलुपात घातलेली चावी तशीच ठेवून निकीताच्या केसांना धरुन ओढले. निकीताचे डोके धरुन शेजारच्या भिंतीवर आपटले. बेसावध असल्याने निकीताचे डोके भिंतीवर जोरात आपटले. निकीता सावरेपर्यंत मावशीने पुन्हा एकदा तिचे डोके भिंतीवर आपटले.

  आता मात्र निकीता ने मावशीचे दोन्ही हात धरले. तरीही ते हात सोडवून घेत मावशीने निकीताच्या चेहऱ्यावर नखांनी ओरबाडले. निकीताने मावशींच्या हाताला धरले व ती त्यांना ओढत आतल्या रुमकडे नेण्याचा प्रयत्न करु लागली.पण तुपाला निकीता नेच बनवून दिलेला  शिरा खाऊन बारा हत्तींचे बळ मावशीच्या अंगात संचारले होते.त्या जागेवरुन मावशी तसूभरही हलली नाही . निकीताने मावशीला हाताला धरुन ओढण्याचा खूप प्रयत्न केला,पण जमिनीला चिटकल्यासारखी मावशी तिथेच उभी होती.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
निकीताला आता स्वसंरक्षणासाठी मारामारीवर उतरावे लागले होते.उभ्या आयुष्यात जे केले नाही तेही प्रसंगी करावे लागते.आता पुढे काय होते ते पाहूया.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →