Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग २५

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा

अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग २५

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले,तो तरुण निकीताशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता.तिने त्याला दूर ढकलून दार लावून घेतले होते.तिथून पुढे...

संध्याकाळी मावशींनी निकीताला आवाज दिला तेव्हा तिला जाग आली. अतीश्रमाने आणि  मानसिक थकव्याने तिची झोप लागली होती. उठल्यावर तिने तोंडावर सपासप पाणी मारले. तोंड पुसत असताना मनीषची आठवण आली. तेव्हा तिला वाटले, मनीष आता काय करत असेल? त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण कसा करणार ?आपला मोबाईल सुद्धा नेमका यावेळी आपल्या सोबत नाही. पण असता तरी या नराधमाने तो काढून घेतला असता. आपल्याजवळ ठेवला नसता असा विचार तिच्या मनात आला. मावशीने पुन्हा दार ठोठावले आणि तिला चहा घ्यायला ये असे सांगितले.

   तिने दार किलकिले करून बाहेर पाहिले. तो नराधम दिसत नव्हता. त्यामुळे ती रूमच्या बाहेर आली. मावशींनी किचनमध्ये डायनिंग टेबलवर तिचा चहा ठेवला. तिथेच खुर्चीवर बसून चहा पिताना ती मावशींकडे निरखून पहात होती.  पन्नाशीच्या असलेल्या मावशी नीटनेटक्या होत्या. अगदी शांत दिसत होत्या. त्यांना कल्पना असेल का हा नराधम असा का वागतो? त्या महाराष्ट्रातीलच दिसतात म्हणून तिने त्यांच्याशी बोलणे सुरू केले. तिने विचारले,
" मावशी तुम्हाला मराठी येते?" यावर त्या म्हणाल्या,
" हो. मी मराठीच आहे."
" मग इकडे कशा काय?" त्यावर त्या म्हणाल्या ,
"साहेबच आम्हा दोघां नवराबायकोंना इथली व्यवस्था पाहण्यासाठी घेऊन आले. या आधी आम्ही मुंबईत राहत होतो."
" तुम्हाला मुलेबाळे नाहीत का? त्यांची आठवण येत नाही का?"
यावर मावशी म्हणाल्या ,
"नाही आम्ही दोघेच आहोत. आम्हाला मुलबाळ नाही."
यावर निकिताने मावशींना विचारले,
" तुमचा मालक असाच आहे का?" यावर मावशीने काहीच उत्तर दिले  नाही.निकीताला समजले,मावशी त्या नराधमाविषयी काहीच सांगणार नाहीत, कारण कितीही केले तरी तो त्यांचा धनी होता. मावशींनी कप बशा उचलल्या आणि त्या विसळायला बेसिनकडे गेल्या. निकिताने बारकाईने घराची पाहणी केली. शेजारच्या रूमचे दार उघडे होते म्हणून ती त्या रूममध्ये डोकावली. मावशी किचन ओट्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. तेवढ्यात तिने त्या रूममध्ये प्रवेश केला आणि तिथे असणाऱ्या वस्तूंकडे ती पाहू लागली.

ती रुम अद्ययावत उंची  सामानाने सजवलेली होती.मजबूत महोगनी लाकडाचा सुंदर पलंग होता.त्याच्या बाजूला कपाट होते.कपाटाला लागून ड्रेसिंग टेबल होते.
  तिला ड्रेसिंग टेबलवर विमानाचे तिकीट दिसले.ते हातात घेऊन तिने वाचले.
"अरे, हे तर आपण ज्या फ्लाईटने आलो त्याच फ्लाईटचे तिकीट आहे. अच्छा! म्हणजे हा फ्लाईट पासून आपल्यावर नजर ठेवून होता तर!" त्या तिकिटावर नाव होते,' राहुल कदम ' . हे नाव तिने लक्षात ठेवले.
  त्यानंतर बाहेरचा कानोसा घेत तिने कपाटाकडे आपला मोर्चा वळवला.कपाटाचे दार उघडायचा तिने प्रयत्न केला पण दार उघडले नाही.त्यानंतर तिला बेडवर पडलेली एक फाईल दिसली.तिने ती उचलली. पहिल्या पानावर एका युवतीचा फोटो चिकटवला होता.त्याखाली तारीख लिहिलेली होती. तिने ते पान उलटले. पुढच्या पानावर दुसऱ्या युवतीचा फोटो होता.त्याखालीही तारीख लिहिलेली होती.तिने सगळी फाईल चाळली.प्रत्येक पानावर वेगवेगळ्या युवतींचे फोटो व तारीख लिहिलेली होती.
फाईलच्या शेवटच्या पानावर तिचा फोटो होता.पण त्याखाली तारीख लिहिलेली नव्हती.ते पाहून तिच्या लक्षात आले,की फोटो खाली कशाची तारीख लिहिलेली आहे? या फोटो खाली तारीख लिहिली जाऊ नये यासाठी आपण प्रतिकार करायला सज्ज असायला हवे असे निकीताला वाटले. आणखी काही मिळतेय का यासाठी निकीता इकडेतिकडे शोधक नजरेने पाहत होती.तिला दरवाजाच्या मागच्या बाजूला भिंतीला टेकून एक पिशवी उभी केलेली दिसली.त्यात काय आहे ते पाहण्यासाठी तिने आपला मोर्चा तिकडे वळवला.

  त्या पिशवीत पिशवी भरुन लाल गुलाबाची फुले होती.त्या नराधमाने रात्रीची जय्यत तयारी केली आहे हे तिच्या लक्षात आले.
बाकी त्या रूममध्ये आक्षेपार्ह असे काहीच तिला दिसले नाही. त्यामुळे पटकन ती तेथून बाहेर पडली आणि पलीकडच्या रूममध्ये शिरली आणि तिने दाराची कडी लावून घेतली. न जाणो तो परत आला तर आपण आयतेच त्याच्या तावडीत सापडू.
आपण खूप खबरदारी घेतली पाहिजे हे तिच्या लक्षात आले.त्या फाईल मध्ये असणाऱ्या तरुणी कोण असतील? आपल्यासारखेच त्याने त्यांचे पण अपहरण केले असेल का? मग आता त्या सगळ्या तरुणी कुठे असतील?जीवंत असतील की याने त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट केले असेल?असे अनेक प्रश्न तिच्या मनात फेर धरु लागले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ही वेळ नाही हे तिने मनाला समजावले.
   आत्ता आपली इथून सुटका कशी होईल? आणि या नराधमाने आपल्यासोबत काही बरेवाईट करु नये यासाठी काय करता येईल त्यावर विचार केला पाहिजे यावर तिने आपले सगळे लक्ष एकवटले.
येणारी मनिषची आठवण तिने प्रयत्नपूर्वक  दूर सारली. कारण या घडीला त्याची आठवण काढत बसण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व होते.
 
  "डर के आगे जीत है |" हे वाक्य तिने आजवरच्या आयुष्यात अनेकदा अनुभवले होते.माणसे प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, आणि यश येत नाही म्हणून कंटाळून प्रयत्न करणे सोडून देतात.ज्या पायरीवर पोहोचून त्यांनी प्रयत्न करणे सोडून दिलेले असते, बऱ्याचदा तीच यशाची पहिली पायरी असते.त्यामुळे जेव्हा खूप त्रास होतोय असे वाटते तेव्हा स्वतःवर संयम ठेवायला हवा हे ती स्वानुभवातून शिकली होती.जेव्हा यशाची पायरी आपण चढतो तेव्हा केलेल्या प्रयत्नाचे चीज होते. थोडे...अजून थोडे... प्रयत्न करायला हवेत हे मनाला समजावता आले की यश पदरात पडतेच!
आत्ता निकीतापुढे यशस्वी होण्यासाठी कुठला टास्क नव्हता, तर तिचे स्वतःचे रक्षण करण्याची जबाबदारी तिच्यावर होती.सर्वप्रथम तिने मनाला समजावले, "मी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे."
हा विश्वास मनात जागणे महत्वाचे असते.तुमचे विचार कसे आहेत यावर तुमचे आयुष्य कसे असणार हे ठरलेले असते.
आता आपण बंदीवान आहोत.आपण काहीच करु शकत नाही अशी मानसिकता जर तयार झाली तर आपण आपल्या सुटकेसाठी काहीच प्रयत्न करु शकणार नाही. "मन चंगा तो कटौती में गंगा | " शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई लढली पाहिजे.त्यासाठी आपण खंबीर राहिले पाहिजे असे निकीता स्वतःच्या मनाला समजावत राहिली.त्यात यश किती येईल ते माहीत नाही.पण अपयश येईल असे समजून आधीच शस्त्रे जमीनीवर टाकायची नाहीत असे तिने मनाला समजावले.  त्या नराधमाची भीती मनातून दूर करुन त्याला त्याचा हेतू साध्य करण्यापासून कसे रोखायचे याचा ती विचार करु लागली. तिला नजरेसमोर सगळा अंधारच दिसत होता, पण तिच्या मनातील विश्वास तिला आधार देत होता की, प्रकाशाचा एक कवडसा सगळा अंधार मिटवायला पुरेसा असतो.क्रमश:
©® सौ.हेमा पाटील



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →