Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग २१

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग २१

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, अजून निकीताचा शोध लागलेला नाही.तन्मय मसुरीला येणार आहे.आता पुढे...

  मनिष बेडवर आडवा झाला. त्याला आपल्या बालपणीची आठवण झाली. तन्मय आणि तो लंगोटीयार होते.बालपणापासून असलेल्या दोघांच्या मैत्रीत आजवर खंड पडला नव्हता.दोघेही एकाच वर्गात होते. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दोघे शाळेत जात.मोठे झाल्यावर एका गाडीवरुन काॅलेजला जात.दोघांचा मित्र समूह वाढला, पण त्याचा यांच्या मैत्रीवर कधीच परिणाम झाला नाही.यांची मैत्री अभंग,अतूट राहिली.
तन्मयने एमपीएससीची परीक्षा दिली आणि  तो डीवायएसपी म्हणून रुजू झाला. त्याला सुट्ट्या फार कमी असत पण तो अधून मधून फोनवरून संपर्क साधत असे. दोघे दोन दिशांना असले तरीही दोघांमध्ये अजूनही संवाद घडत असे. जेव्हा तन्मय गावी येत असे तेव्हा आवर्जून मनीषला भेटायला येत असे. या दोघांची मैत्री अजूनही टिकून होती. त्यामुळेच तो निकिताच्या काळजीपोटी मसुरीला यायला निघाला होता. त्याने पोलीस स्टेशनला फोन करून मनीषच्या केस मध्ये बारकाईने लक्ष द्यावे अशी सूचना केली होती. तो आता प्रमोशनवर जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून नांदेड येथे कार्यरत होता.

तो येणार आहे हे ऐकून मनीषची काळजी थोडीशी कमी झाली होती .बालपणी एक गोळी अर्धी अर्धी करून दोघांनी खाल्ली होती. खरे मित्र संकटात धावून येतात हा त्याला अनुभव होता.त्यामुळेच तर आपले सगळे व्याप बाजूला सारून तन्मय इकडे यायला निघाला होता ना?
गेल्या वर्षी जेव्हा तन्मयच्या बाबांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा तन्मयने त्याला फोनवर सांगितले होते. तन्मयच्या आधी तेथे मनीष पोहोचला होता आणि त्याने तेथील सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली होती. दोन दिवस सुट्टी काढून तन्मय च्या जोडीला मनीष तेथेच थांबला होता. हॉस्पिटल मधून बाबांना जेव्हा डिस्चार्ज मिळाला तेव्हा मनीष परत आला होता.या आणि अशा अनेक स्मृतींमध्ये मनिष गढून गेला.तात्पुरती तरी निकीताची काळजी सोडून तो वेगळा विचार करा होता.

संध्याकाळी आपण एअरपोर्टवर पोहोचलो आहोत असा तन्मयचा मेसेज आला.
" गाडी पाठवू का?" असा फोन मनीषने केला, पण तन्मय म्हणाला,
" नको. मला पोलिसांनी गाडी पाठवली आहे. मी दहा मिनिटात पोहोचतोय."
हे ऐकल्यावर मनीष रूम मधून खाली हॉटेलच्या स्वागत कक्षात आला. दहा मिनिटातच तन्मय तेथे पोहोचला. तन्मयला पाहून मनीषने धावत जाऊन त्याला मिठी मारली. डोळे पाण्याने भरले होते. तन्मयने त्याला थोपटले.  तो मनीषला म्हणाला,
" चल आपण तुझ्या रूमवर जाऊयात." दोघेजण वर आले. मनीषने वरच चहा मागवला.
" तुला काही खायचे आहे का?" असे त्याने तन्मयला विचारले. पण तन्मयने "नाही" असे सांगितले. चहा आला. चहा घेता घेता दोघांचे बोलणे सुरू झाले.

" नेमके काय घडले मला परत एकदा सुसंगतपणे सांग." असे तन्मयने सांगितले. कालपासून जे काही घडले ते सगळे मनीषने त्याला सांगितले. त्यावर काढलेले फोटो बघू म्हणून त्याने मनिषच्या मोबाईल वरील फोटो बारकाईने पाहिले. त्याने रूमची पाहणी केली आणि तो उठून बाल्कनीत गेला. त्याच्या पाठोपाठ मनीषही बाल्कनीत गेला. तेथे गेल्यावर अचानक मनीषला आठवले, सकाळी निकिता केस वाळवत बाल्कनीत उभी होती. तेथून घाबरून ओरडतच आपल्याकडे आली होती. आणि तिने आपल्याला हलवून हलवून उठवले होते. ही गोष्ट त्याने तन्मयला सांगितली.

  तन्मयने बाल्कनीतून इकडे तिकडे लक्ष दिले तेव्हा त्याच्या लक्षात आले हॉटेलच्या गेटवरून येणारा रस्ता आणि मधला कॉरिडॉर इथून स्पष्ट दिसतोय. इथे काही वावगे निकिताला दिसले असेल का ? किंवा कुणीतरी  तिच्यावर लक्ष ठेवत आहे असा संशय तिला आला असेल का? असा विचार तन्मय च्या मनात आला. त्यावेळी त्याने
"याबाबत तुला आणखी काही आठवते का?" असा प्रश्न मनीषला विचारला. त्यावर त्याने सांगितले,
"निकिता खूप धाडसी होती ,पण त्यादिवशी मला एकट्याने तू खाली जायचे नाहीस, आपण दोघेही रूम मधून सोबतच बाहेर पडू असे तिने सांगितले होते. मी जेव्हा आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा तिला मधुराणी म्हणून हाक मारली पण त्यावेळी ती खूप दचकली. तिने मला सांगितले इथून पुढे कधीही मला मधु म्हणून हाक मारायची नाही."
यावर तन्मयने विचारले,
" या नावाशी तिचा काही संबंध आला आहे का? याआधी  कधी हे नाव तू तिच्याकडून ऐकले होतेस का?" यावर मनीष नकारार्थी मान हलवत नाही म्हणाला.
"मीही तिला अचानकच त्यादिवशी मधुराणी म्हणालो होतो.यू नो, मी बाथरुममधून बाहेर आलो तर ही समोर बेडवर बसली होती.इतकी मोहक दिसत होती की तिला बाहुपाशात घेण्याचा मोह मला आवरला नाही.आणि तेव्हा उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून तो शब्द बाहेर पडला."
"ठीक आहे." असे म्हणून तन्मय म्हणाला,
" चल आपल्याला वेळ घालवता येणार नाही. आपण खाली जाऊन ऑफिस स्टाफशी बोलूया."

दोघेजण खाली आले खाली आल्यावर तन्मयने हॉटेलच्या मॅनेजरला आपले कार्ड दाखवले. त्याने तन्मयता हात जोडून नमस्कार केला.
"आपली कस्टमर निकिता बेपत्ता झाली आहे" हे सांगितले.
" त्यामुळे तुमच्या स्टाफची मला चौकशी करायची आहे. काल सकाळी तुमच्या स्टाफ पैकी कोण कोण कामावर होते? त्यांची माहिती मला द्या. त्यापैकी कोणी उपस्थित असतील तर त्यांना इथे बोलवा." असे त्याने सांगितले.
" तसेच मला तुमच्याशी सुद्धा बोलायचे आहे" असे सांगितले. मॅनेजरने आपले रजिस्टर काढले.  काल सकाळी कोण कोण ड्युटीवर होते? सफाई कामगार, वेटर, काउंटरवर कोण होते, तसेच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट जवळ कोण होते? गेटवर कोण होते? ही सगळी नावे एका कागदावर लिहून काढली. त्यासमोर त्यांचे मोबाईल नंबर लिहिले. त्यापैकी तीन जण आत्ता कामावर उपस्थित होते. त्यांना फोन करून काउंटरवर बोलावले .त्यात गेटवरील सुरक्षारक्षक होता. तन्मयने त्याच्यापासून चौकशीला सुरुवात केली. निकीताचा फोटो दाखवून त्याने विचारले,
" यांना तू पाहिले होतेस का?" सुरक्षारक्षकाने मनीषकडे पाहिले आणि तो म्हणाला,
" हो. हे दोघेजण हॉटेलमध्ये येताना मीच यांचे सामान गाडीतून बाहेर काढले होते."
" त्यानंतर तू या मॅडमना कधी पाहिले होतेस?" त्यावर तो म्हणाला,
"सकाळी.  काल सकाळी सहाच्या दरम्यान या मॅडम बहुतेक बाहेरून मॉर्निंग वॉक वरून आल्या. तेव्हा मी ड्युटीवर नुकताच हजर झालो होतो." क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →