Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग २०

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कहाणी
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग २०

©® सौ.हेमा पाटील.


गेल्या भागात आपण पाहिले, मुन्ना व मनिष पोलिस स्टेशनमध्ये गेले होते.तेथील सगळे आटोपून जेव्हा मनिष  बाहेर पडला तेव्हा खरंतर थकला होता.शरीराला ताजेतवाने ठेवण्याचे काम मन करते.मन प्रसन्न असेल तर कितीही श्रम केले तरी शरीर थकत नाही.पण तेच उलटे झाले की औदासिन्य येते.काहीच करावेसे वाटत नाही.
मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण | असे समर्थांनी सांगितले आहे. मन निराशेकडे झुकू देऊ नये.नेहमी सकारात्मक रहावे अशी मनिषच्या आईची शिकवण होती. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनता. कारण ते विचार  तुमच्या अंतर्मनावर रुजलेले असतात.मी हे करु शकेन का? असा डळमळीत होणारा विचार जर अंतर्मनावर रुजला तर तुम्ही त्या विचाराने प्रभावित होता.आणि हळूहळू तुम्ही नकारात्मकतेकडे झुकू लागता. मनिषची आई नेहमी म्हणायची ते त्याला आठवले,
"वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.म्हणून मनात कधीच अभद्र विचारांना थारा देऊ नये.मन चंचल असते,पण प्रयत्नपूर्वक मनाला सकारात्मक विचार करण्याची सवय लावावी. यशस्वी होण्यासाठी आधी मनावर ते बिंबवले की यश मिळतेच...अर्थात प्रयत्न आवश्यक असतातच ! तुम्ही जसे विचार करता तशीच तुमची वृत्ती बनत जाते.यासाठी आपले पूर्वज सांगत आलेत,वास्तू तथास्तु म्हणते."
"असं कसं गं? एखाद्याने जर मनात लाख ठरवले की मी राजा आहे.म्हणून तो राजा होणार आहे का?"असे तो एकदा आईला म्हणाला होता.
"असे नाही रे...तुला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तुझ्या मनावर ती गोष्ट बिंबवायची.असे केल्याने ती जेव्हा अ़ंतर्मनावर बिंबते तेव्हा अंतर्मन यावर काम करायला सुरुवात करते.आपल्या जागृत मनापेक्षा अंतर्मनाची शक्ती जास्त असते हे तुला माहीतच आहे.तुझ्या M.B. A. मार्केटिंग मध्ये तू हे शिकला आहेसच."

मनिषला हे आठवले आणि तेवढ्यात आईचाच मोबाईल वर फोन आला.
"शंभर वर्ष आयुष्य आहे हिला", असे म्हणत त्याने फोन उचलला.
आई विचारत होती,
"कसे आहात रे? सगळे व्यवस्थित आहे ना?"
क्षणभर तो विचलित झाला.आईला सगळे सांगून टाकावे असे त्याला वाटले.तिच्याशी बोललो की आपले मन हलके होईल असे वाटले.पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आले,आपण चूक करत आहोत.आपण जर आईला सांगितले तर ती काळजी करत बसेल.तिला झोप लागायची नाही.त्यापेक्षा आपणच स्वतः वर कंट्रोल ठेवायला हवा.आवाजात नेहमीचा गोडवा आणत त्याने प्रयत्नपूर्वक सहजतेने उत्तर दिले,
"हो गं ! ठीक आहोत.तू कशी आहेस?"
मी ठीक आहे रे . निकीताचा फोन का लागत नाहीय? काल संध्याकाळी तुझ्याशी बोलले म्हणून आत्ता तिला फोन लावत होते,पण लागलाच नाही."
हे ऐकल्यावर मनिषला अगदी भडभडून आले. आता आईला सगळे सांगावे असे त्याला प्रकर्षाने वाटले. तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला,
"अगं, काल तिचा मोबाईल हरवलाय."
"कसा हरवला? निकीता कुठे आहे? दे तिला फोन."
"आता काय फोनवर तिला रागावणार आहेस का?"
"रागावतेय कशाला? मला तिच्याशी बोलायचेय."
आता काय करायचे असा मनिषपुढे प्रश्न पडला.तेवढ्यात त्याला सुचले.
"अगं ती बाथरुममध्ये आहे." त्याने थाप मारली.
"अरे बारा वाजलेत. अजून तुम्ही हाॅटेलमध्येच आहात? मग फिरणार कधी? धन्य आहात."
"अगं काल सकाळी तर बोललीस ना तिच्याशी. तुझ्या लाडक्या सुनेला जरा मोकळी सोड की.किती बांधून ठेवणार आहेस?" काहीतरी बोलून वेळ मारुन नेण्यासाठी तो म्हणाला.

"तर तर... तुम्ही आजकालची पोरे आमच्या बंधनात रहाणार आहात? तोंड बघा.निकीताला फोन करायला सांग मला."
"ऐ आई ,आधीच आम्हांला उशीर झाला आहे. आता रात्रीच तुला फोन करेन. आणि तुझ्या सुनेची अगदी व्यवस्थितपणे मी काळजी घेतोय.तेव्हा आता फोन ठेव." असे म्हणत त्याने फोन ठेवला.

तो असे म्हणाला खरं , पण निकीता कशी असेल असा विचार त्याच्या मनात आला आणि तो अस्वस्थ झाला.
आपण इथे आलो कशासाठी आणि हे काय होऊन बसले असे मनिषला वाटले.
  
या सगळ्या प्रकारात दुपारचे बारा वाजून गेले होते. त्याने मुन्नाला सांगितले,
" चल आपण जरा मसूरी मध्ये फिरून येऊ. कुठे निकिता दिसते का पाहू ."यावर मुन्नाने मान हलवली.

दोघेजण गाडीत बसले आणि त्यांची गाडी निकीताच्या शोधार्थ निघाली. मसुरी शहरात ते दोघे फिरत होते, परंतु निकिता त्यांना कुठेच दिसली नाही.अर्थातच कशी दिसणार होती? तिचे अपहरण झाले आहे हे एव्हाना मनिषच्या ध्यानी आले होते.

एक हॉटेल पाहून मुन्नाने गाडी थांबवली. तो म्हणाला,
" साब, हम दोनो यहां पे खाना खाये तो कैसा रहेगा?" यावर काही न बोलता मनीष खाली उतरला. दोघेजण तिथे जेवायला गेले.जेवताना निकीताच्या आठवणीने मनिषच्या घशात घास अडकला. पण जेवण ही शरीरासाठी आवश्यक बाब आहे त्यामुळे जेवले पाहिजे असे मनाला बजावत त्याने चार घास खाल्ले.

जेवण झाल्यावर दोघेजण बाहेर आले मनीष इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.  त्याने मोबाईल हातात घेतला तर तन्मयचा फोन आला होता. तन्मयने त्याला विचारले ,
"काय झाले? काही प्रगती?" यावर मनीषने "नाही" म्हणून सांगितले. तन्मय म्हणाला,
" मी आता निघतोय. संध्याकाळी मी पोहोचेन. तुझ्या हॉटेलचा पत्ता मला मेसेज करून ठेव." हे ऐकल्यावर मनीषला जरा धीर आला. त्याने तन्मयला आपला हॉटेलचा रूमनंबर, पत्ता आणि लोकेशन पाठवले. त्याने मुन्नाला गाडी हॉटेलवर घ्यायला सांगितले आणि तो रूमकडे परतला.

मुन्नाला त्याने सांगितले,
" तू ही घरी जाऊन विश्रांती घे. मला जर गरज लागली तर मी संध्याकाळी तुला फोन करेन." यावर मुन्ना म्हणाला,
"  साब, जब भी चाहो आधी रात को भी मुझे बुला सकते हो |  मै और मुमताज तुम्हारी खिदमत मे हाजीर होंगे |"
"ठीक आहे". असे म्हणत मनिष त्याला म्हणाला,
" जा आता घरी. तू ही विश्रांती घे. कालपासून माझ्यासोबत तुझी पण फरफट झाली. मग संध्याकाळी बघू काय करायचे ते."

मुन्ना तेथून घरी परतला. मनीष रूमवर आला आणि कपडे बदलून आंघोळीला गेला. आंघोळ केल्यावर त्याला थोडेसे बरे वाटले, पण निकिताची आठवण त्याला सतत छळत होती. निकिता कशी असेल याची काळजी त्याला लागून राहिली होती. त्यामुळे त्याला कशातच वारस्य वाटत नव्हते.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
आता तन्मय तिकडे यायला निघाला आहे.पाहूया पुढच्या भागात काय होते ते..



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →