Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग १३

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांची कहाणी
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग १३
   ©® सौ.हेमा पाटील.
  
   निकीता साडी घेण्यासाठी दुकानात थांबली असताना अचानक बेपत्ता झाली. याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केली.पोलिस प्रमुखांच्या ॲसिस्टंटनी पोलीस फोर्स येत आहे असे सांगितले.आता पुढे...

  पोलिस येणार आहेत म्हणून त्यांची वाट पहात बसणे मनिषला शक्य नव्हते.निकीताच्या काळजीने त्याचा जीव तीळ तीळ तुटत होता.
शोधक नजरेने मनिषने बाजारपेठेकडे पाहिले.दुकानांच्या मागील बाजूस खोल दरी होती. त्या दरीच्या बाजूला एका रांगेत दुकाने होती. समोरुन येण्याजाण्यासाठी फक्त चालता येईल एवढाच रस्ता होता.तेथील पहाडात रहाणाऱ्या लोकांना येणाऱ्या पर्यटकांकडून अर्थार्जन होत असे.शेती व पर्यटन हा तेथील मुख्य व्यवसाय आहे.ज्यांची शेती आहे ते शेती करतात.जे गरीब आहेत ते फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहने सादर करणे,घोडा,खेचर यांची सोय करणे ही कामे करतात.पर्यटक तेथील गढवाली शाली व साड्यांना पसंती देतात त्यामुळे त्याची दुकाने प्रमुख प्रेक्षणीय स्थळांच्या जवळपास दिसून येतात. अशीच दुकाने या ठिकाणी होती.

  मनिषने  बारकाईने त्या जागेकडे पाहिल्यावर काही गोष्टी त्याच्या लक्षात आल्या.त्यामुळे ड्रायव्हरला त्याने गाडीकडे पिटाळले.  मागे डिक्कीत एक निळी सॅक आहे ती आणायला सांगितले. काॅलेजला असताना एन.सी.सी.च्या कॅंपला बाहेरगावी जाताना  त्याला लागलेली सवय आजही टिकून होती. ही तीच सॅक होती जी सकाळी गाडीत ठेवताना चर्चा झाली होती.

सॅकमध्ये एक तीन सेलची पाॅवलफुल उजेड पडणारी बॅटरी व एक कपाळाला बेल्टने लावता येईल अशी जंगलात वापरण्यायोग्य बॅटरी, एक जाड दोरी, चाकू ,फर्स्ट एडचे बाॅक्स आणि कपड्यांचा एक जोड, साॅक्स असे सामान होते.निकीता दरवेळी वैतागायची,
"आपण काय जंगलात ट्रेकिंग साठी जातोय का? कशाला हे ओझे वागवायचे?आणि आता सगळीकडे सगळे मिळते.अगदीच गरज लागली तर तिथे घेता येईल..."

यावर तो फक्त हसायचा आणि म्हणायचा,
" अगं मीच ओझे घेतोय ना! वेळ कधी सांगून येत नाही. " यावर ती म्हणायची,
"आपण दोघे सोबत असल्यावर समोर वाघ आला तरी आपल्याकडे एक कटाक्ष टाकून मनाशी म्हणेल की यांच्या वाटेला जाण्यात अर्थ नाही आणि निघून जाईल." यावर तो फक्त हसायचा.परंतु तिचे ऐकून त्याने ते सामान सोबत घेणे कधीच टाळले नाही.

आत्ता याक्षणी त्याला निकीताचे बोल आठवले आणि ती आत्ता कुठल्या संकटाचा सामना करत असेल असा विचार त्याच्या मनात आला.

  ड्रायव्हरने आणलेली सॅक त्याने उघडली.त्यातील चाकू त्याने कमरेच्या बेल्टमध्ये अडकवला.बॅटरी ड्रायव्हरच्या हातात दिली व दुसरी बॅटरी आपल्या डोक्याला अडकवली.दोरी काढून कमरेला बांधली.ड्रायव्हरला सांगितले की,
"मेमसाब लापता है | वो यहीं कहीं होगी | हमें उसे ढुंढना है | लेकीन थोडीसी भी लापरवाही हुई तो हम और मेमसाब दोनों की जान खतरे में पड सकती है | अगर आपकी इच्छा ना हो तो आप गाडी में जाकर बैठ सकते हो |"

यावर मुन्ना म्हणाला,
"साब, मेमसाब मुझे भैय्या कहकर पुकारती है | इस रिश्तेसें वो मेरी बहन हो गयी..और अपनी बहन की जान खतरे में हो और मैं गाडी में जाकर बैठ गया तो खुदा मुझे इसकी वजह पुछेगा तब मैं क्या जबाब दूॅं ? और एक बात सून लो मैं मराठी बोल तो नही सकता मगर मुझे मराठी अच्छेसे समज मे आती है | आप मुझसे मराठी मे बात कर सकते हो | मै आपको हिंदी मे जवाब दूंगा |" हे ऐकून मनीषने मान डोलावली .तसेच मुन्नाने गाडीकडे जाण्यास नकार दिल्याने मनीषचा माणुसकी वरचा विश्वास अजूनच दृढ झाला.मग त्याने मुन्नाला सांगितले की,
"आपण प्रत्येक दुकानांची दारे चेक करायची.एकाचवेळी दुकानाला एकच दार आहे की मागील बाजूस पण दार आहे का? आणि ते बंद आहे की उघडे? आणि आतून काही बारीकसा आवाज येतोय का याचा कानोसा घ्यायचा.पण कटाक्षाने बॅटरीचा उजेड पाडणे टाळायचे व पावलांचाही आवाज होणार नाही याची दक्षता घ्यायची.नाहीतर शत्रू सावध होईल.जेव्हा अशी काही हालचाल जाणवेल तेव्हा मला सांग.तू काहीही निर्णय घेऊ नकोस.कारण अतिशय शांत डोक्याने आपल्याला मेमसाबचा शोध घ्यावा लागणार आहे.आपली थोडीशी चुकी तिच्या जीवावर बेतू शकते."

यावर मुन्ना ने मान डोलावली.तो म्हणाला ,
" अगर आप मुझसें बहोत दूर होंगे तो  मैं आपको मिस्डकाॅल दूॅंगा | आप भी वैसे ही करना | मैं मोबाईल व्हायब्रेटपर रखता हूं,आपभी फोन व्हायब्रेटपर रखो |" हे ऐकून मनिषने आपला फोन व्हायब्रेट टोनवर ठेवला.

  बाजारपेठेत  दुकानांची लाईन होती.दोघांनी एकेका दुकानाचा शोध घ्यायला सुरुवात केली.चार दुकानांची मागची व पुढची दारे बंद होती व कानोसा घेतला तर आतून कसलाही आवाज येत नव्हता.पाचव्या दुकानाजवळ मनिष पोहोचला तेव्हा दुकानाचे समोरील शटर बंद होते.तो मागील बाजूस आला तर मागील दार ओढून घेतले आहे, परंतु बंद केलेले नाही हे त्याच्या लक्षात आले.आतून काही आवाज येतोय का याचा त्याने कानोसा घेतला आणि आत काहीतरी आवाज झाला.त्यामुळे तो सावध झाला व त्याने मुन्नाला मिस्ड कॉल केला.मुन्ना दोनच मिनिटात तिथे पोहोचला.परत आतून काही आवाज आला नाही, पण मनिषने खुणेने उघड्या दाराकडे मुन्नाचे लक्ष वेधले.

   दोघेही पाय न वाजवता दारापाशी पोहोचले.जराशा किलकिल्या असलेल्या दारातून मनिषने आत डोकावून पाहिले.आत अंधारच होता तरीही कसली चाहूल लागतेय का हे मनिष पहात होता.दोन तीन मिनिटे दोघेही तसेच स्तब्ध ऊभे राहून आतील हालचालींचा अंदाज घेत होते.पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही.ते दोघे आता काय करावे अशा विचारात असतानाच मुन्नाला आत काहीतरी चमकताना दिसले म्हणून त्याने निरखून पहाण्याचा प्रयत्न केला तर..
"ये तो बिल्ली है साब..." असे उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर पडले. बाहेरची हालचाल जाणवून आतील मांजर म्याॅंव म्याॅंव करत या दोघांच्या पायांच्या मधून बाहेर पळून गेले.दोघांचाही  रोखलेला श्वास दोघांनीही एकदमच सोडला व दोघेही खाली जमिनीवर फतकल मारुन बसले.
मनिष निराश झाला.इथे निकीता भेटेल असे त्याला वाटले होते.आता निकीता कुठे असेल? कशी असेल याची चिंता त्याला वाटू लागली.कितीही तीव्र इच्छा असली तरी आत्ता या घडीला आपण तिच्यासाठी काहीच करु शकत नाही. ही आपली असहाय्यता त्याने खाली जमिनीवर मुठी आपटून व्यक्त केली.मुन्नाने त्याच्या खांद्यावर थोपटले व नजरेनेच सांत्वन केले.क्रमश:  ©® सौ.हेमा पाटील.
निराश झालेल्या मनिषची आणि निकीताची भेट होते का? कुठे असते निकीता? कुणी केलेले असते तिचे अपहरण? कशासाठी? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वाचत रहा ही कथा.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →