Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ११

अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या तरुणींची कथा
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ११

©® सौ.हेमा पाटील.
 
  मागील भागात आपण पाहिले,तो सकाळपासून दिसणारा तरुण निकीताला आपल्याजवळ दिसला.भीतीची  व असुरक्षिततेची भावना तिच्या मनात दाटून आली.आता पुढे..

  अचानक अगदी जवळ त्या तरुणाला पाहून ती दचकली.त्याच्यापासून ती पलिकडे सरकली.पण तिच्याकडे पाहून तो हसला.ती आता चा़ंगलीच घाबरली होती.त्या तरुणापासून दूर होण्यासाठी ती धावू लागली.पण तरीही तो तरुण तिच्या शेजारीच तिला दिसत होता. आता तो तिच्या शेजारीच होता.अजून आपली गाडी अगर मनिष का दिसत नाही अशा विचारात ती होती.

तेवढ्यात तिला काही अंतरावर गाडी दिसली.गाडीजवळ मनिष उभा आहे हेही तिला दिसले.ते पाहून तिच्या जीवात जीव आला.तिची भीतीची भावना जरा कमी झाली.पण तेवढ्यात काय झाले ते तिला नीटसे समजले नाही.  कसला तरी उग्र वास तिच्या नाकात शिरला.आपल्या मनगटाला कुणीतरी धरले आहे एवढीच तिला जाणीव झाली...आणि आपण तोंड फिरवून गाडीच्या विरुद्ध दिशेने चालवले जात आहोत हे तिला जाणवले.ती मागे वळून "मनिष मनिष" अशा हाका मारत स्वतःचे मनगट सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत होती.
पण तिला ते शक्य होत नव्हते.

   तिची विचारशक्ती लुळी पडत चालली आहे हे तिला जाणवत होते.मनिष तिला दिसला होता पण मनिषचे तिच्याकडे लक्ष नव्हते. कारण ती गाडीपासून बऱ्याच दूर अंतरावर होती.आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कुणीतरी इथून दुसरीकडे घेऊन निघाले आहे हे तिला जाणवले आणि आपण काहीच करु शकत नाही,आता या परक्या ठिकाणी आपले काय होणार या भीतीने तिची गाळण उडाली.निकराचा प्रयत्न करायचा म्हणून तिने आपले मनगट सोडवून घेण्यासाठी त्या तरुणाच्या हाताला जोराचा हिसडा दिला, पण त्याची मजबूत पकड जराही ढिली झाली नाही.उलट चिडून त्या तरुणाने जोरात तिच्या कानफटीत वाजवली.त्या तरुणाने ओढत तिला एका दुकानाच्या मागच्या दारातून आत नेले एवढेच निकीताला समजले, त्यानंतर तिची शुद्ध हरपली.

निकीता अजून का येत नाही म्हणून मनिष तिला फोन करण्याचा प्रयत्न करत होता पण तिचा मोबाईल गाडीतच आहे हे त्याला माहितच नव्हते.ती फोन का उचलत नाही म्हणून तो चिडला होता.ड्रायव्हरही गाडीत नसल्याने मोबाईल गाडीत आहे हे त्याला समजले नव्हते.एव्हाना चांगलाच अंधार पडल्याने तो तिला शोधण्यासाठी परत त्या गल्लीत आला.पण आता बहुतेक दुकाने बंद होण्याच्या मार्गावर होती किंवा बंद झाली होती.गारठ्याने आपले हातपाय चांगलेच पसरले होते.ते साडीचे दुकान बंद झाले होते.

   ही गेली तरी कुठे असा विचार करत मनिष त्या गल्लीत फिरत होता पण निकीता कुठेच दिसत नव्हती...त्याने उघड्या असलेल्या प्रत्येक दुकानात जाऊन तिथे निकीता नाही याची खात्री करून घेतली. त्याचवेळी तो कंटिन्यू निकीताला फोन लावत होता.जेणेकरुन तिच्या मोबाईलवर रिंग ऐकू आली तर निकीता कुठे आहे ते समजेल.पण त्याला ना निकीता दिसली ना तिच्या मोबाईलची रिंगटोन ऐकू आली.

"या बायका पण ना शाॅपिंगसाठी वेड्या होतात.आता निकीताकडे ढिगाने साड्या पडलेत. एकेका साडीला वर्ष वर्ष हात लावत नाही.तरीही साड्या घ्यायची कोण हौस! त्या नादात सगळ्या जगाकडे यांचे दुर्लक्ष होते. खरेदीत एवढे काय सुख मिळते यांना कुणास ठाऊक?" असा विचार त्याच्या मनात आला. परमुलुखात दोघांची झालेली चुकामूक, त्यात तिन्हीसांज झालेली ! आणि याला कारणीभूत शाॅपिंग आहे असे त्याला वाटले.आता पूर्ण ट्रीप मध्ये एक रुपयाचीही खरेदी करायची नाही असे तिला बजावायचे त्याने मनात ठरवले.
"अरे पण त्यासाठी ती भेटली पाहिजे लवकर." असा विचार त्याच्या मनात आला.ती भेटताच तो चिडून तिच्यावर आगपाखड करणार हे निश्चित होते...पण ती कुठेच दिसत नव्हती.

काही वेळाने निकीता अर्धवट शुद्धीवर आली तेव्हा आपण त्या तरुणाच्या बाहुपाशात आहोत हे तिला जाणवले. ती तेथून दूर होण्याचा निकराने प्रयत्न करु लागली पण ते तिला शक्य झाले नाही.
"कोण आहेस तू? मला असे जबरदस्तीने पकडून का आणले आहेस? माझे काय करणार आहेस तू?"अशी तिच्या प्रश्नांची सरबत्ती ऐकून त्याने हलकेच तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले व तिला शांत बसण्याचा इशारा केला. त्यामुळे अधिकच चवताळून ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करु लागली.यावर त्याने परत एकदा जोरात तिच्या कानफटीत मारली.ती इतकी जोरात होती की , वैफल्यग्रस्तता व भीतीने तिची परत शुद्ध हरपली...

   निकीता कुठेच दिसत नाहीय.सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.सगळी दुकाने बंद झाली आहेत आणि आपण एकटेच त्या गल्लीतील रस्त्यावरुन फिरतोय हे मनिषच्या ध्यानी आले. मनिष आता मात्र चांगलाच घाबरला होता.इथून बाहेर पडायला दुसरा रस्ताच नाही. याचा अर्थ ती बाहेर गेली असती तर निश्चितच आपल्याला ओलांडूनच तिला जावे लागले असते.आणि आपण तर गाडीच्या बाॅनेटला टेकूनच उभे राहिलो होतो.त्यामुळे ती समोरुन अगर पाठमोरी कशीही दिसलीच असती.आणि आपले कितीही लक्ष नसले तरी आपले माणूस आपल्याला ओळखू येतेच...
  याचाच अर्थ ती इथेच कुठेतरी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती संकटात आहे.पटकन हालचाल केली पाहिजे नाहीतर ती आपल्याला परत भेटेल याची शाश्वती नाही...या मनात आलेल्या अभद्र विचाराला त्याने बाजूला टाकले आणि सर्वात अगोदर गाडीच्या ड्रायव्हरला फोन केला व त्याला बाजारपेठेत यायला सांगितले.चारपाच मिनिटांत तो आला.मनिष पूर्ण बाजारपेठेत सभोवताली नजर फिरवत होता, एवढ्यात आलेल्या ड्रायव्हरकडे पहात त्याने विचारले,
"यहां से बाहर जाने के लिये दुसरा रास्ता है क्या?"
यावर," नहीं साब! एकही रास्ता है अंदर और बाहर जाने के लिये. मेमसाब किधर है? मैं कब से आपका इंतजार कर रहा था | मुझे मेरे मालिकने तीनबार फोन किया अबतक क्यूं नहीं पहुंचा पुछ रहा था |मुझे लगा शायद मेमसाब की शाॅपिंग चल रही होगी | हर बार का यहीं अनुभव है | आप गाडी के पास खडे थे मैंने देखा था | तब मैं सामनेवाले होटल में दालचावल खा रहा था |"
पण तो काय बोलतोय याकडे मनिषचे अजिबात लक्ष नव्हते.त्याचे सुरवातीचे महत्वाचे वाक्य त्याने ऐकले होते की इथून बाहेर पडायला दुसरा रस्ता नाही.त्याचे विचारचक्र जोरात सुरू होते.
क्रमश:©® सौ.हेमा पाटील.
  कोण आहे तो तरुण? निकीताशी त्याचा काय संबंध आहे? इथून पुढची कथा तो तरुण, निकीताचा शोध व यामागे असलेले रहस्य याभोवतीच फिरणार आहे.कथा कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →