Login

अंत अस्ति प्रारंभ: | भाग ९

स्त्रीवर झालेला अन्याय आणि तिने दिलेला लढा

अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ९
©® सौ.हेमा पाटील

नमस्कार, मंडळी, चुकून आठनंतर दहावा भाग पोस्ट केला गेला त्यासाठी क्षमस्व. हा भाग आधी वाचावा मग दहावा भाग..ही विनंती.

   मागील भागात आपण पाहिले,आता मनिष आणि निकीता निसर्गाच्या सानिध्यात अगदी ताजेतवाने झाले आहेत.मसुरीचे वर्णन ऐकल्यावर आपल्यालाही वाटू लागले ना,एकदा मसुरीला नक्की जाऊया..मला तर वाटले बुवा !

   आता निकिताला वेध लागले होते क्लाऊडस एंड येथे जाण्याचे! हाथी पाॅंव येथून थोडेसे ट्रेकिंग केले की अतिशय मनोहर असे निसर्गाचे दृश्य दिसते. त्यामुळे हॅप्पी व्हॅली मधून जाताना हाथी पाॅंव रोड येथे मुन्ना ने दोघांना खाली उतरून थोडेसे ट्रेकिंग करा असे सुचवले. दोघांनाही तेच हवे होते. त्यामुळे खाली उतरून मनीषने आपली सॅक आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरा सोबत घेतला.सॅक पाठीवर अडकवण्यापूर्वी त्यात एक पाण्याची बाटली टाकायला तो विसरला नाही .त्याला ट्रेकिंगची खूप आवड होती.

मनिष त्याच्या मित्रांसमवेत कॉलेजला असल्यापासूनच विविध गड, किल्ले येथे ट्रेकिंगला जात असे. निकिताला सुद्धा निसर्गात रमायला खूप आवडत असे. त्यामुळे ती सुद्धा खूप आनंदी झाली होती. सभोवतालचे निसर्गाचे नयनरम्य दृश्य तिच्या आनंदात आणखी भर घालत होते. पक्षांचा चिवचिवाट ऐकून ती आपली सकाळची भीती कधीच विसरून गेली होती . पण ही आपली चूक आहे, आपण याबाबत मनीषला काहीही सांगितले नाही हे तिला अजून समजायचे होते...
   दोघेजण ट्रेकिंग करत असताना त्यांच्या अवतीभवती खूप माणसे होती. अधून मधून एखाद्या पॉईंट वर थांबून मनीष फोटो काढत होता. त्या निसर्गरम्य ठिकाणी दोघेजण एकमेकांचा हात धरून चालले होते. दोघांच्या चित्तवृत्ती  उल्हासित झाल्या होत्या. दोघे चालत थोडे पुढे गेल्यावर त्यांना इंग्रजांच्या काळात मेजर स्वेटेनहॅम याने बांधलेला बंगला जो आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर झाला होता तो दिसला. त्याला भेट देण्यासाठी दोघेजण आत गेले.

  खरोखरच दगडी बांधकामात केलेला तो वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना होता . इतके जुने बांधकाम असूनही आजही भक्कम असलेली ती वास्तू पाहून दोघे अचंबीत झाले. आत मध्ये फोटो काढण्यास परवानगी नव्हती त्यामुळे बाहेरून विविध अँगलने मनीषने फोटो काढले. ते फोटो काढत असताना निकिता आणि त्याचा मिळून एक फोटो गार्डला काढायला लावला. गार्डने विविध अँगल मधून दोघांचे फोटो काढले . गार्डला रोजचीच सवय होती, कारण येणारे पर्यटक आठवण जपून ठेवण्यासाठी फोटो काढतात त्यावेळी गार्डलाच रिक्वेस्ट करत असतात.
मनसोक्तपणे फोटो काढून झाल्यावर थोडा वेळ तेथेच निरीक्षण करून दोघांनी तेथे कॉफी घेतली. कॉफी जरा एक्स्पेन्सिव्ह  होती, पण आपण त्या ठिकाणी जाऊन कॉफी घेतली ही आठवण कायम स्मरणात राहणार होती. इतरांना सांगताना
"अरे, त्या क्लाऊड्स एंड येथे हॉटेल हेरिटेज मध्ये आम्ही कॉफी घेतली" असे सांगताना गर्व वाटेल अशी ती कृती होती . आणि या जगात दिखावा यावरच भर दिला जातो. त्यामुळे तर सभोवतालचा निसर्ग पाहून अनुभवण्यापेक्षा फोटो काढण्यातच सगळे गुंग झालेले दिसतात. आम्ही इथे गेलो होतो, आम्ही हे पाहिले, आम्ही इथे भेट दिली, हे जगाला दाखवून देण्यातच सध्या लोकांना आनंद मिळतो.
 
  नेत्रसुख घ्यावे, आपण निसर्गात रममाण व्हावे यापेक्षा कधी एकदा फोटो काढतो आणि ते सोशल मीडियावर टाकतो असे लोकांना झालेले असते. अर्थातच आपण कुठे गेलो असेल तर तेथील फोटो टाकण्यास काहीच हरकत नाही. पण ज्यावेळी आपण तेथे असतो तो वेळ फक्त फोटो काढण्यात न घालवता त्या निसर्गाशी रममाण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातील आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेथील पक्षांचा चिवचिवाट , तेथे असणारी निरव शांतता, निसर्ग आपल्याला आपल्या आतच डोकावण्याचा देत असलेला संदेश, आणि त्यातून आपला कमी होत जाणारा अहंकार या गोष्टी जाणवल्या पाहिजेत ,जाणून घेतल्या पाहिजेत . तरच निसर्गाशी जवळीक साधता येते आणि आपण कोण आहोत आपण कसे जगले पाहिजे याचे भान येते.
   यासोबतच आपल्या आयुष्यातून हरवत चाललेली शांतता आपल्याला इथे अनुभवता येते. आपण पूर्णपणे चार्ज होतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्याच्या लढाईत लढण्यासाठी अधिक जोमाने तयार होतो.जसे शरीराला जिवंत रहाण्यासाठी जेवण आवश्यक असते,तसेच आत्म्याला कोsहम कडून सोsहम कडे वाटचाल करण्यासाठी आपल्या आत डोकावायचे असते. त्यासाठी निसर्ग आपल्याला बिनशर्त मदत करण्यासाठी तत्पर असतो. पण हे समजून घेण्याची पात्रता आता कुणाच्या अंगी उरलेली नाही.

   उथळ पाण्याला खळखळाट फार असेच दृश्य सध्या सगळीकडे दिसते. डीपमध्ये जावे असे कोणालाच वाटत नाही. गरजेपुरते आणि आवश्यक असेल तेवढेच ज्ञान ,माहिती घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण या पलीकडे जाऊन आपण जे काही अनुभवतो त्यातून आपल्याला जो असीम आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. या  वरवरच्या गोष्टींमुळेच आपण आपल्यातले माणूसपण विसरत चाललो आहोत. आपली अवस्था बिकट होत चालली आहे. पण त्याचे कुणालाही काहीही देणेघेणे नसल्यासारखे सगळे वागत आहेत. कानावर पडणाऱ्या बातम्या ऐकल्या की तेवढ्यापुरते हळहळणे आणि थोडा वेळ गेला की ते विसरून आपल्याच जगात रममाण होणे हे माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे दर्शन आहे.

रस्त्याने जाताना एखादा अपघात झालेला पाहिला तर तिथे एक दोन क्षण गाडी स्लो करून बघून विव्हळत असलेल्या माणसासाठी चुकचुकत तिथून गाडी पुढे काढली जाते. कुणालाही थांबण्यासाठी वेळ नसतो. वेळेवर मदत मिळाली तर कदाचित एखादा जीव वाचू शकतो ही संवेदनाही कुणाच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, इतका माणूस आपल्याच स्वार्थासाठी किंवा आपल्या दैनंदिन जीवनाची लढाई लढण्यात बिझी झाला आहे.  यातूनच त्याच्यामध्ये ही संवेदनशुन्यता  निर्माण झाली आहे .

  जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो तेव्हा निसर्गाची भव्यता लक्षात येऊन आपल्यातील हे दोष कमी होऊ शकतात. पण त्यासाठी निसर्गाशी तादात्म्य साधले गेले पाहिजे. नाहीतर तुमच्या निसर्गाच्या जवळ जाण्यात काहीच अर्थ नाही. ते फक्त फोटोसेशन असते .
   मनीष नेहमीच ट्रेकिंगला जात असल्याने त्याला निसर्गाच्या सानिध्यात रमण्यातील आनंद माहीत होता. त्याच्या सानिध्यात राहिल्याने निकिता ही त्याच्यासारखीच निसर्गाच्या  ध्वनीत आपला सुर मिसळून एकरूप होण्याची किमया साधू शकत होती. त्यामुळेच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दोघेही निसर्गाच्या सानिध्यात रममाण होत असत आणि समृद्ध व ताजेतवाने होत असत. आपले सगळे ताणतणाव,चिंता ते सोडून देत असत आणि निसर्गाकडून सकारात्मक शक्ती घेऊन परत आपल्या जगात परतत असत. आत्ताही ते दोघे असेच निसर्गाशी तादात्म्य पावले होते.चालताचालता एका ठिकाणी दोघेही थबकले.
क्रमश:©® सौ.हेमा पाटील.
काय मग रमलात ना तुम्ही पण निसर्गाच्या सानिध्यात? पण आपल्याला अजून खूप मोठी मजल मारायची आहे.ही तर सुरवात आहे.निकीता आणि मनिषच्या आयुष्यात खूप काही घडणार आहे.सकाळी त्याची फक्त नांदी झाली आहे...आणि विशेष म्हणजे येणाऱ्या संकटापासून दोघेही अनभिज्ञ आहेत.वाचत रहा ही कथा मालिका..




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →