Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग १०

स्त्रीवर झालेला अन्याय आणि तिने केलेला प्रतिकार
अंत: अस्ति प्रारंभ: |
भाग १०

©® सौ. हेमा पाटील.


आता ते मसुरीतील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळावर पोहोचले होते. क्लाऊडस एंड येथे ढग खाली उतरलेले दिसतात.आपण जगू ढगातच आहोत असा अनुभव येतो.बालपणी मैत्रिणीशी भांडण झाले की आपण एकमेकींना रागाने बोलायचो, जा ढगात! आज आपण त्याचा प्रत्यय घेत आहोत असा विचार तिच्या मनात आला.तिथून दिसणारे मनोहारी दृश्य पाहून निकीता स्तिमित झाली. बाजूला हिरवेगार डोंगर,मध्ये निर्माण झालेली खोल दरी, आणि त्या दरीच्या वर व्यापलेले ढग.निसर्गाची किमया पाहून ती वेडावली. तिथून तिचा पायच निघत नव्हता.मनिषने अक्षरशः तिला ओढून आणले.

तेथून ते लण्डोर येथे गेले.तेथील दगडी इमारती पाहून इंग्रजी राजवटीची आठवण झाली. इंग्रज भारतात असताना उत्तराखंडमध्ये जास्त काळ वास्तव्य करत. त्याच्या खुणा आजही तिथे दिसतात. भारतातील उष्ण कटिबंधातील वातावरण त्यांना सोसत नसे.त्यामुळे येथील थंड हवेच्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांचा मुक्काम असे.

त्यानंतर लाल टिब्बा इथे दोघांनी काॅफी घेतली.उंच उंच बर्फाच्छादित पर्वत शिखराच्या सानिध्यात सभोवताली नजर फिरवत काॅफीचे घोट घेण्यात वेगळीच मजा आली.तेथून झरीपानी फाॅल्स येथे ते दोघे आले.थोडे ट्रेकिंग करत जेव्हा ते फाॅल्सजवळ पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य पाहून वेडावले.दोघांनीही आपापल्या मोबाईल मध्ये फोटो काढण्याचा सपाटाच लावला.फोटोसाठी मोबाईलवर दृष्य पहात असताना अचानक समोर गर्दीत सकाळच्या त्या तरुणाचा चेहरा निकीताला दिसला.तो ही आपल्यासारखाच पर्यटनासाठी आला असावा त्यामुळे दिसणारच असे वाटून तिने दुर्लक्ष केले व ती वेगवेगळ्या ॲंगलने नयनरम्य निसर्गाचे फोटो काढू लागली. कधीतरी तिथून निघावेच लागणार आहे ही जाणीव झाल्यावर ते जरा नाखुशीनेच तेथून निघाले.गाडीकडे आल्यावर भूक लागली आहे याची त्यांना जाणीव झाली.

फानू, आलू के गुठके,भांग की चटनी या मसुरीच्या खास स्पेशल डिश त्यांनी मागवल्या.भांगेची चटणी खाताना भीती वाटत होती की, यामुळे नशा तर चढणार नाही! पण ड्रायव्हर इथलाच रहिवासी असल्याने त्याच्या सांगण्यावरून पदार्थ मागवले होते.नशा वैगेरे काही चढली नाही उलट छान वेगळी चव जिभेवर अगदी अलगदपणे उतरली.जेवून ते पुढील पाॅईंटस् पहाण्यासाठी गाडीत बसले.जेवल्यामुळे दोघांच्याही डोळ्यांवर पेंग आला.

आता आजच्या दिवसातील शेवटच्या पाॅईंटकडे त्यांची गाडी चालली होती.कॅमल्स बॅक रोड पाहून वेळ उरलाच तर शाॅपिंग करायला बाजारात आपणांस सोडेन असे ड्रायव्हरने सांगितले होते.कॅमल्स बॅक रोड जवळ आल्यावर गाडी थांबली तेव्हा दोघेजण झोपेतून जागे झाले.खाली उतरल्यावर  सभोवताली दिसणारे निसर्गसौंदर्य पाहून दोघांच्याही चित्तवृत्ती उल्हसित झाल्या.झोप झाल्याने दोघेही अगदी फ्रेश झाले होते.समोरच चहाच्या स्टाॅलवर चहा घेतला आणि चक्क हातात हात घालून ते दोघे चालू लागले.

  सभोवताली बरीच गर्दी होती पण तिकडे दुर्लक्ष करत ते आपल्यातच दंग होते.त्यामुळे सकाळचा तरुण आपल्या आगेमागेच आहे हे तिच्या लक्षात आले नाही.ओझरता त्याचा चेहरा गर्दीत तिला दिसला पण तिने लक्ष दिले नाही.कधीकधी या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे आपल्या लक्षात येत नाही...जसे या नयनरम्य ठिकाणी तो तरुण एकटाच का आला आहे? त्याच्यासोबत कुणीच कसे नाही? पत्नी नसेल पण मित्र सुद्धा कसे नाहीत? असा प्रश्न वास्तविकपणे निकीताच्या मनात यायला हवा होता.पण मनिष सोबत असल्याने ती निर्धास्त होती त्यामुळे बाकीच्या बाबतीत सावध राहण्याची तिची एक स्त्री म्हणून असलेली सावधता सध्या गरज नसल्याने थोडीशी बाजूला पडली होती.

पाॅईंट पाहून रमतगमत ते गाडीपाशी आले.ड्रायव्हरने गाडीत बसल्यावर विचारले,
" बाजारपेठेत घेऊ का गाडी? अर्धातास तरी अजून चांगलाच उजेड असेल." यावर मनिष ने "जाऊयात" असे सांगितले.

बाजारपेठेच्या तोंडाशीच ड्रायव्हरने गाडी थांबवली.
"तुम्ही शाॅपिंग करायला जा.मी इथेच असेन" असे त्याने सांगितले.रात्रीचे जेवण हाॅटेलमध्ये गेल्यावरच करायचे होते त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला तरी चालेल असा विचार करून दोघे तेथील स्थानिक वस्तू पाहू लागले.मनिषने आपल्या छोट्या भाचीसाठी काही लाकडी  वस्तू,खेळणी घेतली.लाकडी खेळणी हे तेथील वैशिष्ट्य होते.आईसाठी एक तिथल्या पद्धतीची साडी घेतली.तिथेच निकीता स्वतः साठी व आपल्या बहिणीसाठी साडी बघत होती.तेवढ्यात मनिषला आईचा फोन आला.दुकानात नीट ऐकू येईना म्हणून तो तिला सांगून बाहेर आला.ती साड्या बघण्यात गुंग झाली होती.मनिष रेंज येईना म्हणून दुकानापासून जरा दूर एका उंचवट्यावर उभा राहिला व फोनवर बोलत होता.

दरम्यान निकीताला साडी पसंत पडेना म्हणून ती त्या दुकानातून बाहेर पडली.समोरच मनिष फोनवर बोलत असलेला तिने पाहिले. बोलण्याच्या नादात त्याचे लक्ष नव्हते.त्याने आपल्याला पाहिले आहे असा निकीताचा समज झाला.दोन दुकाने सोडून त्याच्या पुढच्या दुकानात बाहेर लावलेल्या साड्या आकर्षक वाटल्या म्हणून ती निर्धास्तपणे त्या दुकानात शिरली.फोनवरचे बोलणे झाले की मनिष तिकडे येईल असा तिने कयास बांधला होता.
  निकीताच्या पुढ्यात एक लाल रंगाची साडी पडली होती.तो दुकानदार तिला म्हणाला," ये यहाॅं की स्पेशालिटी है | हमारे यहाँ दुल्हन के लिये ये  वर्क की हुई लाल साडी खरीदी जाती है | आप पर ये साडी बहुत जचेगी | आप एक खरीद लेना ,साब को बहुत पसंद आयेगी| "
  त्याचे हे शब्द ऐकून तिने ती साडी आपल्या खांद्यावर टाकली आणि कशी दिसते हे पहाण्यासाठी ती आरशासमोर गेली.आरशात पहात असताना खरंच ही साडी आपल्यावर खुलतेय हे तिच्या लक्षात आले.आरशात स्वत:कडे निरखून पहात असताना तिला आवाज आला,
" खरंच खूप छान दिसतेय ही साडी..." ती घाबरली व तिने समोर पाहिले पण कुणीच दिसले नाही, म्हणून तिने इकडेतिकडे पाहिले तेव्हा तोच तिशीच्या वयाचा तरुण तिला पलिकडच्या काऊंटरपाशी दिसला.    तशी दुकानात गर्दी कमी झाली होती. ती जेव्हा दुकानात शिरली तेव्हा चारपाच जण दुकानात होते. पण  आता मात्र तो तरुण एकटाच होता आणि आता  तिला तो संशयास्पद वाटला. ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली. मात्र तो ड्रेस मटेरिअल पहाण्यात गुंग झालेला होता.त्याने किंचितही मान वर केली नाही. ते पाहून आज सकाळपासून आपल्याला हे कसले चित्रविचित्र भास होत आहेत असे तिला वाटले.
  जाऊदेत त्या साड्या नकोतच असा विचार करून ती दुकानाच्या बाहेर आली. तिने इकडेतिकडे पाहिले पण मनिष कुठेच दिसेना.

  एव्हाना चांगलाच अंधार पडला होता.तिने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल काढण्यासाठी पर्स उघडली आणि तिच्या लक्षात आले की मोबाईल गाडीत चार्जिंगला लावला होता तो गाडीतच राहिला.ती दुकानात माघारी गेली व दुकानदाराला रिक्वेस्ट करुन तिने मनिषला फोन लावला. तेव्हा तो दुकानदार एकटाच दुकानात होता व साड्यांच्या घड्या  आवरत दुकान बंद करण्याच्या तयारीला लागला होता .खरंतर निकीता साठीच तो एवढा वेळ थांबला होता.पण तिने साड्या खरेदी केल्या नाहीत त्यामुळे तो निराश झाला होता.
तीन चारदा प्रयत्न करुनही मनिषला फोन लागत नव्हता.त्यामुळे ती बाहेर आली व गाडी जिथे लावली होती तिकडे जाण्यासाठी चालू लागली.‌ चालत असताना रस्त्यावर गर्दी खूप कमी झाली आहे हे तिच्या लक्षात आले म्हणून ती झपाझप पावले टाकत चालू लागली.तेवढ्यात आपल्या अगदी शेजारुन कुणीतरी चालतेय असा तिला भास झाला. म्हणून तिने मागे वळून पाहिले पण कुणीच दिसले नाही.चार पावले चालल्यावर परत तसाच भास झाला म्हणून परत तिने शेजारी मान वळवून पाहिले तर तोच दुकानात  संशयास्पद वाटलेला तरुण तिच्यामागे शेजारी खाली पायांवर बसलेला तिला दिसला.त्याला असे बसलेले पाहून तिच्या लक्षात आले,मगाशी हाच जवळ आला असणार. आपल्या शेजारी कोण उभे आहे हे पाहण्यासाठी आपण आसपास पहातो. खाली पहात नाही.त्याचे असे खाली बसणे पाहून तिला संकटांची चाहूल लागली.क्रमश: ©® सौ.हेमा पाटील.

आता कथेत खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली आहे.कथेची पार्श्वभूमी सांगितली नाही तर कथा आकर्षक होत नाही.त्यामुळे त्या दोघांचे आयुष्य,त्यांची ओळख आणि आता कथा ज्या भागात फिरणार आहे त्या ठिकाणाची माहिती या गोष्टी लेखनात अंतर्भूत कराव्या लागतात याची तुमच्यासारख्या सुजाण वाचकांना जाणीव आहेच.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →