Login

अंत: अस्ति प्रारंभ: | भाग ८

स्त्रीवर झालेला अन्याय आणि त्याचा केलेला प्रतिकार
अंत: अस्ति प्रारंभ:|
भाग ८

©® सौ.हेमा पाटील
मनिष आणि निकीता तयार होऊन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी बाहेर पडले होते हे आपण मागील भागात पाहिले आहे.त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर आपल्या गाडीसह हजर झाला होता.

  "नमस्ते साब ! नमस्ते मेमसाब ! " हे ऐकून दोघांनीही त्याचा नमस्कार स्वीकारला.सामान गाडीत ठेवण्यासाठी तिने ते मनिषच्या हातात दिले.
त्यानंतर अभावितपणे तिची नजर पुन्हा एकदा त्या तरुणाकडे वळली.याचे कारण तिच्या डोक्यात ती सकाळची हाक घुमत होती.त्यामुळे शोधक नजरेने ती त्याचे निरीक्षण करत होती.पण त्या तरुणाचे तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते.

  सकाळी आपल्याला भासच झाला असावा असे तिला आता वाटू लागले. कारण हाॅटेलच्या बाहेर आपापल्या ठरवलेल्या गाडी व ड्रायव्हरची वाट पहात अनेकजण थांबले होते . आपल्याच हाॅटेलमध्ये रहाणारे कुणीतरी जोडपे असेल ज्यातील बाईचे नाव मधु असावे असा निकीताच्या मनात विचार आला.आणि ही हाॅटेलसमोर उसळलेली गर्दी पहाता तो विचार तर्कसंगत आहे असे तिला वाटले.

    पुरुषांनी स्त्रीकडे पहाणे अगदी नैसर्गिक आहे.त्या नियमानेच समोर झाडाखाली उभ्या असणाऱ्या तरुणाची मगाशी आपल्याकडे नजर वळली असावी.आणि प्रत्येक नजरेत वासना असतेच असेही नाही.
असे अनुभव तिलाच काय कुठल्याही बाईला येतातच. त्यामुळे असेल कुणीतरी..असे म्हणत तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.कारण तो तिच्याकडे पहातच नव्हता.तो बहुतेक आपल्यासारखाच पर्यटक असावा व गाडीची वाट पहात असावा असे तिला वाटले. पण हे दुर्लक्ष करणे तिला खूप महागात पडणार होते याची या घडीला तिला जाणीव नव्हती...एवढेच काय सकाळी ओझरती दिसलेली व्यक्ती आणि ही व्यक्ती यांच्यात साम्य आहे का असाही विचार तिच्या मनात आला नाही.एवढी ती मनिषच्या उपस्थितीने आश्वासक झाली होती.तसेही तो तरुण आता पाठमोरा उभा राहून कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होता.त्यामुळेही निकीताला त्याचे वागणे संशयास्पद वाटले नाही.

गाडीचा ड्रायव्हर  पुढ्यात येऊन थांबलाच होता. सामानाच्या दोन सॅक पाहून ड्रायव्हर म्हणाला,
" साब, शाम को हम वापिस यही आने वाले है |  तो फिर आप ये दो दो सॅक क्यूं ले के आये हो? "
हे ऐकल्यावर निकीता मनिषकडे पाहून हसली.
"भैय्या, ये सामान  हरवक्त इनके पास रहता है | मैं साथ हो ना हो, पर ये सामान जरुर होता है |"
यावर मनिषने तिच्याकडे कृतककोपाने एक कटाक्ष टाकला. ती ही हसत त्याच्याकडेच पहात होती.ड्रायव्हरला काही समजले नाही, पण त्याने आपल्या त्या दोन्ही सॅक मागे डिक्कीत नेऊन ठेवल्या. पाण्याच्या बाटल्या गाडीच्या दारात ठेवून ड्रायव्हरने निकीतासाठी दार उघडले.निकीता आत बसली. मनिष ड्रायव्हर सोबत पुढे बसला.थोडा वेळ पुढे बसून ड्रायव्हरसोबत गप्पा मारत त्याची माहिती घ्यावी हा त्याचा उद्देश होता.मनालीत असेतोवर तोच त्यांना फिरवून आणणार होता. कधी कधी हे ड्रायव्हर फार त्रासदायक ठरतात.तसे वाटले तर आजच्या आजच ट्रॅव्हल कंपनीला कळवून दुसऱ्या गाडीची ॲरेजमेंट करता येईल हा विचार त्यामागे होता.हनीमूनला काश्मीरला गेल्यावर मस्तवाल ड्रायव्हरमुळे सगळा विचका झाला होता.तेव्हापासून मनिष पहिल्याच दिवशी ड्रायव्हरची पारख करत असे.

"नमस्ते साब ! मेरा नाम मुन्ना है | आप जबतक मसुरी में है आपको घुमाने के लिये मै और ये मेरी ये  मुमताज हम दोनों आपके खिदमत में रहेंगे |"

"तुम तो दिखाई दिये पर तुम्हारी मुमताज किधर है?"
"साब ये ही तो है मुमताज! मेरी जान| मेरा सब कुछ..."
तो गाडीबद्दल बोलतोय हे मनिषच्या लक्षात आले.त्याने गाडीही अगदी चकाचक ठेवली होती.

मग त्याच्या आणि मुन्नाच्या गप्पा सुरू झाल्या. मुन्ना मनिषला स्वतः बद्दल , मसुरी बद्दल सांगत होता. मनिष खुबीने प्रश्न विचारत त्याच्याकडून माहिती काढून घेत होता. तीही त्यांचे संभाषण ऐकत होती.या नादात ती मनिषला सकाळच्या अनुभवाबद्दल सांगणार होती ते राहूनच गेले. तसेही मनिष पुढे बसला होता. आणि ती ही आता निर्धास्त होती कारण मनिष तिच्या सोबतच होता. त्यामुळे ती  गाडीतून बाहेरच्या दिसणाऱ्या निसर्गसौंदर्याकडे पाहण्यात रमून गेली.त्यांना आज कुठले कुठले पाॅईंट्स पहायचे आहेत ते मुन्ना सांगत होता.त्यातील क्लाऊड एन्ड या पहिल्या पाॅईंटकडे त्यांची गाडी चालली होती.

  क्लाऊडस् एंड हे मसुरीचे शेवटचे टोक आहे जिथे खूप शांतता आणि आल्हाददायक वातावरणाचा आपण आनंद घेऊ शकतो. तेथे जवळपास दोन हजार एकरांचे जंगल असून उंचच उंच ओक व देवदार वृक्ष आहेत.

क्लाऊडस एंड येथे इंग्रजांच्या काळात मेजर स्वेटेनहॅम या ब्रिटीशाने १८३८ मध्ये एक सुंदर वास्तुशास्त्राचा नमुना मानला गेलेला बंगला बांधला होता. आजही तो बंगला मसुरीतील सर्वात जुन्या इमारतीमध्ये मानला जातो. त्याचे आता हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर झाले आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन भेट देतात.

येथून जवळच ज्वालादेवी मंदीर आणि बेनोग वन्य जीव अभयारण्य आहे. ही सगळी माहिती दोघांनी आधीच इंटरनेट वरुन मिळवली होती. आता गाडीत मुन्ना परत ती माहिती देत होता. तो मसुरीतील स्थानिक रहिवासी असल्याने अधिक विस्तृतपणे तो माहिती देत होता.

  क्लाऊडस् एंडकडे जात असताना हॅप्पी व्हॅली मधून हाथीपाँव रोडने थोडेसे ट्रेकिंग करुन गेले की निसर्गाचे मनोहर दृश्य दिसते. जेथे शेवटचे टोक आहे तेथे दिसणारे ढगांचे चित्र इंटरनेटवर पाहून निकीता त्याच्या प्रेमातच पडली होती. कधी एकदा त्या ठिकाणी पोहोचतोय असे तिला झाले होते. पण आधी बेनोग वन्यजीव अभयारण्य पाहून मग क्लाऊडस् एंड कडे जायचे असे मुन्नाने सांगितले, त्यामुळे त्याची मुमताज आता बेनोग अभयारण्याकडे निघाली होती.
  रस्त्याच्या दुतर्फा देवनार व ओक वृक्ष दिसत होते .या अभयारण्याचे वैशिष्ट्य होते की, येथे अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. इतरत्र कुठेही दिसत नाहीत असे वॉटर रेड स्टार, रेड बिल्ड ब्लू ,व्हाईट केप्ड, मॅगपाई हे पक्षी पाहताना आनंद मिळतो. पक्ष्यांचा चाललेला  किलबिलाट ऐकून निकिताला आपण स्वर्गातच आलो आहोत असे वाटले. ती वेड्यासारखे सभोवताली आवाज टिपत होती. आपल्या मोबाईलवर पण तिने हे सुमधुर आवाज टेप करुन घेतले. फोटो तर मनिष कॅमेरात टिपतच होता. सभोवतालचे हिरवेगार उंचच उंच वृक्ष आणि पक्ष्यांचे मनमोहक  दर्शन घेऊन ते दोघे पुढे ‌आले, आणि बर्फाच्छादित चौखंबा आणि बंदरपंच ही शिखरे पाहून दोघेही स्तिमित झाले. ती बर्फाच्छादित शिखरे उन्हामुळे चमकत असल्याने सोनेरी दिसत होती.जणू सोन्याचा डोंगरच . एका बाजूला हिरवेगार जंगल आणि दुसऱ्या बाजूला ही हिमशिखरे पाहून निकिता स्वतः ला हरवून गेली. मनिष फोटो काढतच होता. ती शिखरे फोटोत यावीत म्हणून मनिषने एका तरुण पर्यटकाकडे कॅमेरा दिला व त्या दोघांचे फोटो काढण्याची विनंती केली. त्याने  विविध अँगलमधून दोघांचे पाच सहा फोटो काढले. शेवटी पुन्हा एकदा जंगलाचा फोटो काढून त्यांनी त्या ठिकाणाचा निरोप घेतला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील
कशी वाटली मसुरीची सफर?


 


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →