निशाने उरलेल्या पैशात एक साधी साडीही घेतली. सासूबाईंच्या समाधानासाठी.... त्यांच्या मनातल्या देवीसाठी.
काकांनी पिशव्या हातात दिल्या. तिने नेहमीच्या सवयीने परत आपलं सामान चेक केलं तर त्यात एक फ्रॉक एक्सट्रा होता. "काका, अहो तुम्ही चुकून एक जास्तीचा फ्रॉक दिलाय. दुसऱ्या कस्टमर चे कपडे आले बहुतेक नजरचुकीने."
"नाही चुकून नाही. हे माझ्याकडून संध्यासाठी. संध्या, आवडलं का बघ....आणि हो, हे माझ्याकडून बक्षीस आहे हा." काकांनी संध्याला जवळ घेत सांगितलं.
निशाच्या डोळ्यात आता पाणी होतं. संध्या तिच्याजवळ आली आणि म्हणाली, "ताई, मी तुमच्या पाया पडू?"
"माझ्या? का?" डोळ्यातलं पाणी थोपवत निशाने विचारलं.
"आई म्हणते, देव आपल्या हक्काचं आपल्याला नक्की देतो. कोणत्याही रूपात येऊन. तो सगळीकडे आहे. सगळ्या रुपात. आपणच कधी कधी ओळखायला चुकतो. माझ्यासाठी तुमीच देव आहात. मग तुमच्या पाया पडणारच ना." म्हणत संध्याने तिला वाकून नमस्कारही केला. नंतर रविच्या आणि सासूबाईंच्याही पाया पडली.
तिच्या बोलण्याने आता सासूबाईंच्या डोळ्यातही पाणी आलं. "एवढीशी पोर..... अन एवढी समज? मला मेलीला आजपर्यंत नाही कळालं, ते हिला एवढ्या लहान वयात कळालं. खरंय गं बाई, देव देव्हाऱ्यात नाही...." सासूबाई तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या.
आपले डोळे पुसत निशाजवळ जात तिचे डोळे पुसले. दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. तिथे उभं असणाऱ्या प्रत्येकाचं डोळ्यांत आता अश्रू होते. एक चिमुरडी त्यांना आयुष्याचं सार सांगत होती. #avyaktmianamika
काकांनी, डोळे पुसत त्यांना फीडबॅक द्यायला सांगितला.
निशाने, संध्याला सांगितलं.
निशाने, संध्याला सांगितलं.
संध्याने, पटकन पुढे येऊन टाळ्या वाजवणारं हसरं इमोजी दाबलं. तसं, डिस्प्ले वर टाळ्या वाजवत, हसणारा ईमोजी उड्या मारत आला. त्याला असं पाहताना, संध्या सुद्धा टाळ्या वाजवत आनंदाने उड्या मारत होती.
ती पुन्हा ते बटण दाबणार तेवढ्यात, निशा तिला थांबवत म्हणाली, "अगं एकदाच करायचं."
"पण ताई, आपण तर ४ कपडे घेतले ना. मग ४ वेळा करायचं ना.... हो ना काका?"
काकांनी हो मध्ये मान हलवली, तसं तिने पुन्हा ते इमोजी दाबलं. पुन्हा ईमोजी सोबत टाळ्या पिटत उड्या मारू लागली.
आतापर्यंत काकांनी कितीतरी वेळा, त्या इमोजींना उड्या मारताना..... हसताना पाहिलं होतं. पण आजचं हास्य दैवी वाटत होतं.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, आज निशाला इमोजींचा खरा अर्थ सांगत होता... इमोजींचा असा अर्थ आजपर्यंत कुणीच सांगू शकलं नव्हतं. ती हसता हसता रडत होती की रडता रडता हसत होती तिलाच कळत नव्हतं. रविने तिची अवस्था ओळखून तिला जवळ घेतलं.
तेवढ्यात सासूबाई पुढे आल्या. नुकतीच घेतलेली साडी, संध्याच्या हातात देत म्हणाल्या, "ही आईला दे. त्यांना सांग आजीने दिलीये. आशिर्वाद म्हणून. नाही म्हणायचं नाही."
निशा आता निशब्द झाली. तिने जाऊन पटकन त्यांना नमस्कार केला. काकांच्याही पाया पडली. आणि काका मात्र, या कुटुंबाला हात जोडून म्हणाले, "आज देव मला स्वतःहून भेटायला आला....."
निशा आता निशब्द झाली. तिने जाऊन पटकन त्यांना नमस्कार केला. काकांच्याही पाया पडली. आणि काका मात्र, या कुटुंबाला हात जोडून म्हणाले, "आज देव मला स्वतःहून भेटायला आला....."
तेवढ्यात संध्याने पुन्हा ते इमोजी दाबलं. तसं मशीन पुन्हा हसू लागली. पण आत्ताचं हसणं मात्र वेगळंच होतं.
प्रत्येकाला त्याचा त्याचा देव भेटला होता.... न मागताच सारं काही भेटल्याचा आनंद काही वेगळाच होता. आणि सासूबाईंची देवी दूर गाभाऱ्यात, आज वेगळंच तेज चेहऱ्यावर घेऊन मंद हसत होती.....जणू तिची भक्ती तिच्या भक्तांनी खऱ्या अर्थाने जाणली होती.... माणुसकीची पालवी आज नव्यानेच फुलली होती.....
समाप्त
