Login

आणि देवी प्रसन्न झाली...भाग ३

देव भावाचा भुकेला


"पण काका, अहो लहान आहे ती. बालकामगार ठेवणं गुन्हा आहे ना." निशा नेहमीच्या सवयीने बिनधास्त बोलून गेली.

"हो गं पोरी. आम्ही नाहीच म्हणत होतो. पण तिच्या आईला भिती वाटतेय, तिच्या जागी दुसरं कुणाला ठेवलं तर तिचं काम जाण्याची. मग घर कसं चालवणार? मुलीचं शिक्षण कसं करणार? आणि बरोबरही आहे तिचं. तिच्या जागी कुणाला ठेवलं तर परत तिला काढणं बरोबर दिसणार नाही. म्हणून मग ही येते. मी बोललोही, तुझं काम तुला देऊ तू परत आल्यावर, आणि तोपर्यंत तुला अर्धा पगारही देतो. पण गरीब असली तरी स्वाभिमानी माणसं आहेत. बिनकामाचा पगार तिला नकोय. म्हणाली अर्धा पगार देणारच आहात तर हिला येउद्या. थोडंफार काम करेल ती. पोरगीपण हुशार आहे. तिच्या आई सारखंच चोख काम करते. ती पूर्ण पगार घेणार नाही म्हणून मग मी असं रोज ५-१० रुपये देतो बक्षीस म्हणून. पोरगी खुष, आईचा स्वाभिमानही दुखावला जात नाही." काकांनी त्यांची बाजू सांगितली.

निशाला खरंतर पटतही होतं आणि नाहीही. दोघेही आपापल्या जागी बरोबर होते. आईची भिती तिच्या जागी योग्य होती..... काकांचा समजूतदारपणा कायद्याला धरून नसला तरी माणुसकीला धरून होता. निशाच्या डोळ्यांत आता पाणी उभं राहिलं. ती पटकन बाहेर गेली. आणि तिच्याजवळचं सामान पाहू लागली. सासूबाईंनी तोपर्यंत १२०० ची भारीतली साडी काढली, देवीला नेसवायला. ब्लॉउज पीस वेगळा घेतला.... चोळीचा खण... तो ही महागातला. रविने नेहमीप्रमाणे पैसे देण्याचं काम केले.
बाहेर निघणार तेवढ्यात त्यांना फीडबॅक देण्यासाठी सांगितलं. सासूबाईंनी एक बटण दाबले. आणि बाहेर पडल्या. तेवढ्यात त्या मुलीने आवाज दिला. निशाला तिथे पाहून सासूबाई तिला म्हणाल्या, "अगं तिकडे मंदिराजवळ घेऊ ते सगळं."

"आई, अहो तिकडे काय इकडे काय, घेऊ की इथेच." म्हणत त्यांच्या उत्तराची वाट न पाहता, तिने सामानाचे भाव विचारले. मुलीने पटापट सगळ्या वस्तूंचे दर सांगितले. "सगळ्या सामानाचे किती पैसे होतील?" निशाने विचारलं तसं ती मुलगी आ वासून पाहत राहली. #avyaktmianamika

"अगं सांग ना, किती होतील सगळ्या सामानाचे?" निशाने परत विचारलं.

"तुम्ही सगळं सामान घेणार?" तिने अविश्वासाने विचारलं.
सासूबाई सगळं ऐकून तिथे आल्या. "अगं काय वेडबीड लागलंय का? ओटीपुरतं सामान घे आणि चल."

आता रविसुद्धा निशाकडे पाहत होता.
"आई, प्लीज, तुम्ही तुम्हाला हवंय ते घेतलंत ना. आता मला हवं ते घेऊद्या."

पुन्हा मुलीकडे पाहत तिला, किंमत विचारली. तशी ती मुलगी मनातल्या मनात गणित मांडू लागली. "दीड हजार होतील ताई."

"ठीक आहे. सगळे सामान दे मला."

सासूबाई रविकडे पाहून म्हणाल्या, "अरे काय वेड लागलंय का तुझ्या बायकोला? आवर जरा तिला."

क्रमश :

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →