Login

आणि देवी प्रसन्न झाली...भाग ५

देव भावाचा भुकेला

"आई देवीसाठीची साडी देवीलाच देतेय. काही कोपणार नाही ती."

"देवी? ही पोरगी? कोण कुठली ती पोरगी? तिला कपडे देऊन देवी कोपणार नाही?" सासूबाई भडकल्या.

आता दुकानातले बरेचसे कस्टमर जमा होऊन सगळं नाटक पाहू लागले.

निशाने मोबाईल काढून सासूबाईंनी सकाळी ठेवलेलं स्टेटस त्यांना दाखवलं.
पहिलं स्टेटस होतं...

जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥

दुसरं स्टेटस होतं,

शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी....

सासूबाईंनी स्टेटस पाहिलं, आणि म्हणाल्या, "हे सगळं लिहिण्यासाठी चांगलं आहे. देवासाठीचं देवालाच वाहिलं गेलं पाहिजे. मला अक्कल शिकवू नकोस."

"आई अहो देवालाच तर वाहतेय. नवरात्रीत मुलींनाच तर देवी म्हणून पूजतो ना. मग ही देवीच आहे ना. मग त्या मंदिरातल्या देवीला देण्यापेक्षा या देवीला देतेय मी. गरज हिला जास्त आहे ना आई. तुमच्या त्या देवीला खूप काही आहे हो. हिच्याकडे काहीच नाही. मेहनत आणि स्वाभिमान सोडून. आणि तुम्ही ही एवढी महागातली साडी देताय, नारळ चढवताय... ते परत मागच्या दाराने विकायला ठेवलं जातं. तुम्ही भक्तीभावाने वाहिलेली वस्तू, पुन्हा विकली जाते. तुमच्या भक्तीभावाचा भाव केला जातो. सगळीच मंदिरं गरजू लोकांना मदत नाही हो करत. म्हणून आपणच ते डायरेक्ट अशा लोकांना दिलं तर काय वाईट आहे. आणि देव तसंही भावाचा भुकेला असतो हो."

निशा बोलत होती. तिथल्या काहींना हे पटत होतं काहींना नाही. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय होता. तिच्यासाठी कोणाला काय पटतंय हे महत्वाचं नव्हतं. तिला जे करायचंय ते महत्वाचं होतं.

तिने पुन्हा संध्याला हाताला धरलं आणि तिला एकेक कपडे दाखवू लागली. पण संध्या मात्र पहायला तयार नव्हती.

"ताई मला नको कपडे. माझ्याकडे पैसे नाहीत. आणि असे कुणाकडून घेतलेलं आईला नाही आवडणार."

"अगं पण मी तुला फुकट नाही देत. तू काम करतेस ना. मग रोज थोडे पैसे बाजूला ठेव. मी नेक्स्ट टाइम येईल ना, तेव्हा मला दे. जेवढे जमतील तेवढे. मग तर झालं?" निशा तिला समजावत म्हणाली. तिलाही माहित होतं, त्याशिवाय संध्या काहीच घेणार नाही.


काकाही तिला सामिल होत, संध्याला समजावू लागले. "हो... रोज माझ्याकडे द्यायचे आणून. मी ते माझ्याकडे ठेवेल. ताई आली की तिला देईल. मग आई रागावणार नाही."

संध्या आनंदाने उड्या मारू लागली. आणि पटपट २ फ्रॉक निवडल्या. निशा अजून घे म्हणत होती, पण तिने नम्रपणे नकार दिला.


क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →