पण रवीच्या लक्षात आलं होतं एव्हाना, त्यामुळं तो शांत होता.
तोपर्यंत मुलगी पळतच दुकानात गेली, "काका, ती ताई माझं सगळं सामान घ्यायचं म्हणतेय. मी तिला सांगितलं दीड हजार होतील. बरोबर सांगितलं ना मी? आणि मला एक मोठी पिशवी द्या ना. सामान द्यायला."
काकांनी बाहेर निशाकडे पाहिलं. ती फक्त हसली. "हो बरोबर सांगितलेस पैसे. हुशार आहेस. रामा.... ती लार्ज साईझ बॅग दे रे तिला पटकन."
पिशवी घेऊन पुन्हा धावत बाहेर आली आणि एकेक सामान नीट त्यात ठेवू लागली. काका सुद्धा आता बाहेर येऊन उभे राहिले.
"नाव काय गं तुझं?" निशा
"संध्या" तिने सांगितलं.
"काय गं, शाळेत जात नाहीस का?" निशा तिला सामान ठेवायला मदत करता करता म्हणाली.
"जाते ना ताई. आता सुट्टी आहे ना. उन्हाळ्याची. मग आईसोबत काम करते इथं. आईला बरं नाही ना. डॉक्टर कडे पण न्यायचंय. मग पैसे पाहिजे ना. कोण देणार?" पिशवीत सामान भरता भरता ती बोलत होती.
इकडे सासूबाई रविचं डोकं खात होत्या. निशाला सगळं ऐकू होत होतं, पण आज त्यांना उत्तरं देण्यापेक्षा तिचं काम महत्वाचं होतं.
सगळं सामान भरून तिने पिशवी हातात दिली. निशाने पटकन पैसे काढून तिला दिले.
"थँक यू ताई. आता आईला डॉक्टर कडे नेता येईल. खूप उपकार झाले तुमचे. काका, हे बघा किती पैसे आले." डोळ्यातलं पाणी तिच्या गालावर ओघळत होते. काकांनी तिला जवळ घेत डोक्यावरून हात फिरवला.
निशाला अचानक काय झालं माहित नाही. तिने सासूबाईंच्या हातातली साडी घेतली आणि मुलीचा हात धरून पुन्हा दुकानात आली. सासूबाई बघतच राहिल्या. भुताखेताची बाधा झाली की काय, असा प्रश्न त्यांना पडला असावा बहुतेक. काकासुद्धा तिच्या मागे आले.
"काका मला ही साडी रिटर्न करायचीये." निशा म्हणाली.
"काय झालं.... म्हणजे काही डिफेक्ट आहे का?"
"नाही काका साडी मध्ये डिफेक्ट नाही. मला साडी देऊन, या चिमणीसाठी काही कपडे घायचेत. मला तिच्या मापाचे काही कपडे दाखवा. रोज वापरात येतील असे. आणि एक छानसा परीसारखा ड्रेस." ती साडी त्यांच्या हातात देत म्हणाली.
संध्या तर पाहतच राहिली तिच्याकडे. काकांचा आनंद त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. रवि अभिमानाने आपल्या बायकोकडे पाहत होता. आणि सासूबाई मात्र कोपल्या होत्या.
"लाजा सोडल्यात दोघांनी. अगं कोप होईल देवीचा. तिच्यासाठी घेतलेली साडी परत देऊन हया पोरीला कपडे घेतेस. सामान घेतलं ना तिचं सगळं उगाचच. आता हे काय नाटक लावलंय?"
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
