निशा आज ४महिन्यांनी सासरी आली होती. मागच्या वेळेस चुलत नणंदेचं लग्न होतं म्हणून शाळेतून सुट्टी काढून तिला यावं लागलं होतं. मे मध्ये शाळांना सुट्टी असते त्यामुळे चांगली १०-१५ दिवस राहायची. रवि, तिचा नवरा काही दिवस सुट्टी घ्यायचा, तर काही दिवस गावाहून वर्क फ्रॉम होम करायचा. सासूबाईंना, अजिबात पटत नव्हतं. तिने पूर्ण सुट्टी गावालाच घालवावी असं त्यांचं मत होतं. त्यावरून अनेकदा वाद ही घातले होते. दिवाळी साठी देखील, निशाने इथेच थांबावे महिनाभर म्हणून मागच्या दिवाळीत भांडण केलं. पण रविचे जेवणाचे हाल व्हायचे. त्यामुळं एकदा तो स्वतःच आईला त्याबाबतीत बोलला. तो राग सासूबाईंनी मनात ठेवला होता. त्यांच्या मते निशानेच त्याचे कान भरले होते. #avyaktmianamika
निशा तिच्या शाळेत, सगळ्या मुलांची आवडती शिक्षिका होती. गरीब मुलांना पुस्तकं, वह्या घेऊन दे.... कुणाची फी भर... अशा कामात तिला आनंद मिळायचा. पैशामुळे कुणाचं शिक्षण अडायला नको, ही तिची इच्छा होती. त्यामुळं जमेल तशी मदत ती नेहमी करायची. इतर शिक्षक, पालक सगळेच तिला मानायचे.
लग्नाला २च वर्षे झाली होती. अजून मुलांचा विचार त्यांनी केला नव्हता. पण सासूबाईंनी आपल्याच मताने तर्क वितर्क लावले होते. आणि म्हणूनच आज कुलदेवीला जायचा घाट घातला होता. कसलीशी पूजा करण्यासाठी. नातवंड लवकर यावं घरात, यासाठी कुणीतरी सांगितली म्हणून पूजा करायचं ठरवलं होतं.
खरंतर, ४ महिन्यांपूर्वीच ते जाऊन आले होते. चांगली हजार रुपयांची साडी देवीला वाहिली होती. सासूबाईंच्या मते, देवीला साधी साडी चालत नाही. चांगली भारीतली.... काठपदर साडीच हवी. नारळ, खण, गजरा, शृंगाराचे सगळं सामान, मिठाई, फळं..... सगळं कसं सांग्रसंगीत पाहिजे. देवाने आपल्याला भरभरून दिलं, मग आपणही त्याचं देणं लागतो, असं सासूबाईंचंं मत होतं. #avyaktmianamika
निशाला प्रत्येक वेळी देवीला जाताना, होणारा हजारोंचा खर्च नको वाटायचा. तिचं स्पष्ट मत होतं, देव भावाचा भुकेला आहे. त्याच्यासाठी भक्तीभावाने एक फूल नेले तरी तो खुष होईल. हे पैसे, एखाद्या गरीबाच्या मदतीसाठी वापरले तर तो जास्त खुष होईल. आपण त्याचं देणं लागतो, म्हणजे त्याला द्यावं असा अर्थ आपणच आपला काढलाय. त्याचं देणं लागतो, म्हणजे आपल्या हातून काही विवेकी कार्य घडावं... कुणाची मदत व्हावी हा हेतू अपेक्षित आहे. पण सासूला तिचे हे विचार अतिरेकी वाटायचे. उगाच वाद नकोत, म्हणून रविही तिला गप्प राहायला सांगायचा. खरंतर दोघांनी ठरवलं होतं, देवधर्मासाठी वर्षाकाठी काही आणि समाज कार्यासाठी काही पैसे बाजूला ठेवायचे. आपल्या गरजा पूर्ण करून, भविष्याची सोय राखून या सगळ्या गोष्टी करायच्या. पण आईमुळं त्यांचं हे बजेट नेहमी कोलमडायचं. कारण ते गावी आले, की आईचं रोज एक मंदिर, एक देवस्थान असायचं. तिला दुखवायला नको, आणि घरात शांती नांदावी म्हणून रवि बोलतच नसायचा. निशाची मात्र घुसमट व्हायची.
