Login

अजून किती वर्ष!

एका सासूची व्यथा


अजून किती वर्ष!

आज नंदिनेने दुपारी अचानकच तनुजाकडे जायचे ठरवलं. सगळी कामे उरकल्यावर तिने तनुजाच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या केल्या आणि भरपूर गप्पा मारण्याच्या उद्देशाने ती जरा लवकरच तनुजाकडे पोहोचली. बेल वाजल्यावर तनुजाने नंदिनीचे हसून स्वागत केलं पण नंदिनीला जाणवलं की ह्या हास्याला एक दुखरी किनार आहे.

"ये बैस. उन्हातून आलीस मस्त थंडगार कोकम सरबत देते मग निवांत बोलू आपण."

तनुजा आत जाताना नंदिनीच्या लक्षात आलं तिच्या चालण्या बोलण्यात नेहमीचा उत्साह नव्हता. एरव्ही नंदिनी घरी आल्यावर तिला काय करू आणि काय नको असं होतं. नंदिनी तीला अशी उदास बघू शकत नव्हती. नक्की काय झालं असेल. हिच्या घरचे तर सगळेच खूप चांगले आहेत. हिचे बिनसले तरी काय! इतक्यात तनुजा आतमधून कोकम सरबत घेऊन आली.

"काय गं नंदू आज अचानक कशी आलीस. फोन पण नाही केलास. तुझ्या आवडीच्या जेवणाचा बेत केला असता ना. आलीस तर आलीस आणि घरून जेवून आलीस."

"अगं हल्ली सगळे एकमेकांना सरप्राइज देण्यात आनंद मानतात ना. म्हटलं आपण पण तुला सरप्राइज देऊया. मस्त छान गप्पा मारूया. तू दुपारी झोपत नाहीस ते मला माहित आहे. ह्या बघ तुझ्या आवडीच्या सुरळीच्या वड्या आणल्या आहेत."

"तू न अगदी मनकवडी आहेस. बरं कसं झालंय सरबत? संध्याकाळी मस्त खमंग थालिपीठ करते."

"ते राहू दे. तुझ्या हातचे नेहमीच खाते. बरं मला सांग तुला काही होतंय का! तुझ्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह आणि स्मितहास्य दिसत नाही."

"नाही गं असं काहीच नाही."

"तनु आपली मैत्री किती वर्षांपासूनची आहे. माझ्या जिवलग मैत्रिणीचा चेहरा मी वाचूच शकते. त्या दिवशी फोनवर बोलताना पण मला हे जाणवलं. हे बघ जे काही असेल अगदी मोकळेपणाने बोल. माझ्याशी बोलल्यावर तुला खूप हलकं वाटेल आणि म्हणूनच मी घरी कोणी नसतानाची ही दुपारची वेळ निवडली."

"नंदू आता काय आणि किती सांगायचं! 'रोज मरे त्याला कोण रडे' असं झालंय माझं. वाटलं होतं आता तरी चांगले आराम करण्याचे दिवस येतील. पण कसचं काय. एकेकाचे नशीबच असतं असं त्याला काय करायचं!"

"अगं बाई असं कोड्यात बोलू नकोस. जे काही असेल ते जरा स्पष्टपणे बोल."

"काही नाही गं. सुजयच्या लग्नाला आता एक वर्ष होत आलंय तरी माझे 'रांधा वाढा उष्टी काढा' काही संपत नाही बघ. ह्याच्या लग्नाच्या आधी घरातली सगळी कामं मीच करत होते आणि आताही मीच करते. माझी सून सायली घरात काहीच काम करत नाही. संध्याकाळी तिला यायला खूप उशीर होतो पण सकाळी तरी तिने काम करायला नको का. एकदोन वेळा मी तिला सांगायचा प्रयत्न केला तर म्हणाली आई मी कधीच काही काम केलं नाही. उगाच वादविवाद नकोत म्हणून मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतेय."

"तनु हे बघ तुझ्या मनूला लग्नाआधी तू सर्व हातात देत होतीस. तिला तू सांगायचीस ना की लग्नानंतर तुला करायचंच आहे. तिला पण काही येत नव्हतं ना. ती पण हळू हळू तिच्या सासूबाईंच्या हाताखाली शिकलीच ना. तसं तू पण सायलीला प्रेमाने बोलून शिकव."

"नंदू शिकवायला ती आली पाहिजे ना किचन मध्ये. आणि मनुचं म्हणशील तर ती सांगत होती की तिच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत. त्या तिला काही करूच देत नाहीत. त्या तशा तरुण आहेत गं पण मला नाही झेपत सर्व एकटीने करणं. आता सून आली आहे तर तिने नको का करायला. अजून किती वर्ष मीच करायचं!"

"आता तुला सून आली आहे म्हणून तू तिच्याकडून अपेक्षा करतेस. मला फक्त मुलगी आहे त्यामुळे ती लग्न होऊन गेल्या नंतर मीच सर्व करतेय. मी कोणाकडून अपेक्षा ठेवू शकत नाही. वयाचं म्हणशील तर आपण दोघी एकाच वयाच्या आहोत. कसं असतं ना आपण कोणाकडून तरी अपेक्षा करतो आणि ती पूर्ण झाली नाही तर अपेक्षभंगाचे दुःख आपण सहन करू शकत नाही. मग एक तर घरात भांडणं होतात किंवा आपण आतल्या आत कुढत बसतो आणि याचा आपल्या तब्येतीवर परिणाम होतो."

"एक तर ही सकाळी आरामात उठते. सगळं आरामात चाललेलं असतं बाईसाहेबांचे. आपली पण नवीन लग्न झाली होती पण तेव्हाही आपण लवकर उठून साऱ्या कामांचा ताबा घेत होतो. तेव्हा नोकरी करणाऱ्या बायका पण घरातील सर्व उरकून ऑफिसला जायच्या."

"हे बघ तनु तू इथेच गल्लत करतेस. आपल्या वेळची आणि ह्यांची तुलना होऊच शकत नाही. त्यावेळी प्रवास करणे आताच्या मानाने सुलभ होते. हो साधने कमी होती पण आतासारखी तुफान गर्दी नसायची. कामाच्या वेळा मर्यादित असायच्या. आता घरातील व्यक्ती बाहेर पडली की ती किती वाजता परत येईल ते सांगू शकत नाही. हे बघ तू सायलीला एखाद्या सुट्टीच्या दिवशी एखादा सोपा पदार्थ मुद्दाम तिला प्रेमाने बोलावून करायला सांग. तिला धीर दे आणि सांग कसंही झालं तरी आम्ही गोड मानून घेऊ. पाहिजे असेल तेव्हा तिला मदत कर. बघ ती पण हौसेने करेल. ती येतच नाही म्हणून तिच्याबद्दल मनात राग ठेवून सगळी कामं करत बसली तर तुलाच त्रास होईल."

"सुरुवातीला एकदा सुट्टीच्या दिवशी आली आणि म्हणाली आई मी पिझ्झा करू का? मी सरळ नाही म्हटलं अगं तो पिझ्झा कोण खाणार?"

"तू तिला नाही म्हटलंस म्हणून कदाचित ती पुन्हा आली नसणार. आपली लेक समजून तिला तिच्या परीने काय करते ते करू द्यावं. प्रेम दिलं की प्रेम मिळतं, काही अपवाद वगळता. काही सासवा खाष्ट असतात तर काही सुना. तिथे मात्र दोघींमधून विस्तव जात नाही."

"आता आधी जे झालं ते जाऊ दे. मी काय करू म्हणजे माझ्या मनाला शांती लाभेल."

"उत्तर तुझ्याकडेच आहे तनु. आपण नेहमी आपल्यापेक्षा जे जास्त दुःखी आहेत त्यांच्याकडे बघून म्हणायचं मी खूप सुखी आहे. काही सुनांना लग्न झाल्याबरोबर वेगळं राहायचं असतं. तुझ्याकडे तसं तर नाही. सायली मनमिळावू आहे. ती घरातील सर्वांशी प्रेमाने वागते. ह्या मुली आपलं सारं काही सोडून दुसऱ्या घरी येतात. त्यांना आपण मायेने जवळ केलं की त्या आपल्याच होतात. अर्थात काही जणींना कितीही माया लावली तरी काही फरक पडत नाही, हा भाग वेगळा."

"नंदू तू आलीस आणि मला समजावलं. माझ्या मनातलं मळभ दूर झालं. तू म्हणालीस तसं ज्यांना फक्त मुलीच असतात त्या त्यांना जमेल तोपर्यंत घरातील कामं करतच असतात. ' अजून किती वर्ष ' हे त्यांच्या मनात येत नाही. समोरच्याला समजून घेणं खूप महत्वाचे असते. आता सायलिने काही केले नाही तरी मी तिच्याकडून काही अपेक्षा ठेवणार नाही. आता ती माझी मनूच आहे. चल मस्त चहा करते आणि त्या बरोबर खमंग थालिपीठ."

"तनु चल मी पण तुझ्या मदतीला येते."

©️®️सीमा गंगाधरे




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →