सार्थकने त्या रात्री खूप विचार केला. त्याला आईचं आयुष्य आठवलं. आईकडे शिक्षण होतं , कला होती, पण बाबांच्या अहंकारामुळे ती फक्त स्वयंपाक घरापुरतीच उरली होती. त्याच्या आईला वाचनाची आवड आहे हे देखील त्याला आज पहिल्यांदा कळत होतं. आईचा देखील काही आवड असेल असं त्याने कधी विचारच केला नव्हता. त्याने ही इथून पुढे आईसाठी गिफ्ट म्हणून पुस्तकं देण्याचा विचार केला. आणि जवळच्या लायब्ररीमध्ये लगेच आईच्या नावाचं ऑनलाईन रेजिस्ट्रेशन पण केल. हळूहळू सार्थकाचा दृष्टिकोन बदलू लागला. त्यालाही कळलं की, पत्नीचं यश हे पतीचं अपयश नसतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी...
"आई, त्यादिवशी रात्री तुमच्यामुळेच मी कॉन्फरेन्सला जाऊ शकले. तुम्ही बाबांसमोर उभ्या राहिलात, हे बघून मला खरोखरच आश्चर्य वाटलं आणि अभिमानही." तन्वी सकाळी सकाळी गॅसवर चहाच पातेलं चढवत म्हणाली.
"अगं तन्वी, मी तुझ्यासाठी नाही, तर माझ्यासाठी उभी राहिले होते. २५ वर्षांपूर्वी मलाही अशीच एक संधी आली होती. शिक्षिका म्हणून एका मोठ्या शाळेत मुख्याध्यापिका होण्याची. पण तुझ्या सासऱ्यांनी एका वाक्यात ती संधी नाकारली— 'आमच्या घरच्या बायका बाहेर नोकऱ्या करत नाहीत.' मी तेव्हा गप्प बसले. तो गप्प बसण्याचा शाप मी आजही भोगतेय." सारिकाच्या डोळ्यातुन जुन्या आठवणीत डोळ्यात टिपूस निघालं.
"आई, तुम्ही तेव्हा गप्प बसलात म्हणून तर आज मला बोलण्याची ताकद मिळाली आहे. पण तुम्हाला वाईट नाही वाटलं? बाबांच्या त्या वागण्याचं?" सारिकाचा हात हातात घेत तन्वीने विचारलं.
"वाटलं ना ग! खूप वाटलं. पुरुषी अहंकार ही अशी गोष्ट आहे ना, जी समोरच्या स्त्रीला 'माणूस' म्हणून बघायला विसरते. त्यांना वाटतं, बायकोला हवं ते घेऊन दिलं, दागिने दिले, चांगलं घर दिलं की तिचं स्वातंत्र्य संपलं. पण स्त्रीला हवं असतं ते स्वतःच्या नावाचं एक आभाळ. काल जेव्हा तू सार्थकला उत्तर देत होतीस, तेव्हा मला माझं हरवलेलं तारुण्य तुझ्यात दिसत होतं." सारिका उत्तरली.
"सार्थक हळूहळू बदलतोय आई. काल तो म्हणाला की त्याला वेळ लागेल, पण तो प्रयत्न करेल." तन्वी म्हणाली.
"त्याला वेळ लागेलच. कारण त्याने बघितलंय की त्याचे बाबा नेहमी वरचढ राहिले. पण तन्वी, एक लक्षात ठेव— घराची शांती राखण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा बळी देऊ नकोस. मी ते केलं आणि आज मला पश्चात्ताप होतो. तू मात्र सार्थकला तुझा 'मालक' नाही, तर 'मित्र' बनव. मैत्रीत अहंकार नसतो, तिथे फक्त सोबत असते." सारिकाने अगदी मोलाचा सल्ला दिला.
"आई, तुम्ही खूप ग्रेट आहात. लोक म्हणतात सासू-सून हे नातं भांडणाचं असतं, पण तुम्ही तर माझ्या पंखातले बळ झालात." तन्वी म्हणाली.
"कारण मला 'सासू' व्हायचंच नव्हतं ग. मला ती 'आई' व्हायचं होतं, जिला स्वतःच्या मुलीला - सुनेला ते सर्व द्यायचंय जे तिला स्वतःला मिळालं नाही. तन्वी, तू फक्त उडत राहा. मागे खेचणारे हात खूप असतील, पण तुझ्या पाठीवर असलेला माझा हात नेहमी तुझा आधार बनेल."
तन्वीने प्रेमाने सारिकाला मिठी मारली.
"कारण मला 'सासू' व्हायचंच नव्हतं ग. मला ती 'आई' व्हायचं होतं, जिला स्वतःच्या मुलीला - सुनेला ते सर्व द्यायचंय जे तिला स्वतःला मिळालं नाही. तन्वी, तू फक्त उडत राहा. मागे खेचणारे हात खूप असतील, पण तुझ्या पाठीवर असलेला माझा हात नेहमी तुझा आधार बनेल."
तन्वीने प्रेमाने सारिकाला मिठी मारली.
स्वयंपाकघरातल्या त्या वाफाळलेल्या चहातील वेलचीच्या सुगंधात पुरुषी अहंकाराच्या खाली दबलेलं सासू सुनेचं नातं दरवळत होतं.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
