Login

अहंकाराचा उंबरठा - भाग 2

अहंकाराचा उंबरठा

अहंकाराचा उंबरठा - भाग 2


काही दिवसांनी तन्वीला एका इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी तीन दिवसांसाठी बँगलोरला जावं लागणार होतं. ही तिच्या करिअरमधली खूप मोठी संधी होती. ​रात्री जेव्हा तिने ही गोष्ट सार्थकला सांगितली, तेव्हा सार्थकाचा पारा चढला.
"नाही जाणार तू! मी परवानगी देत नाही."

​"परवानगी? सार्थक, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतेय," तन्वी ठामपणे म्हणाली.

​"हे बघ तन्वी, माझ्या घरात माझ्या शब्दाच्या बाहेर कुणी जात नाही. तुला करिअर करायचं स्वातंत्र्य दिलंय ना? मग मर्यादेत राहा," सार्थक ओरडला.

​तिथेच समाधानराव आले. "सार्थक बरोबर म्हणतोय. सुनांनी असं एकटं बाहेर जाणं आमच्या खानदानात बसत नाही."

​तन्वीला आज कळलं की, तिला दिलेलं 'स्वातंत्र्य' हे केवळ एक आभास होता. ते स्वातंत्र्य तोपर्यंतच होतं, जोपर्यंत ते सार्थकाच्या अहंकाराला धक्का लावत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी आपली बॅग भरू लागली. सार्थकने तिचा हात पकडला.
"मी म्हटलं ना, तू जाणार नाहीस!"

​सारिका तिथे आली आणि तिने सार्थकाचा हात झटकला. "सार्थक, बस झालं! गेली २५ वर्ष मी ह्या घरात या अहंकाराची गुलाम म्हणून राहिले. पण माझी सून तशी राहणार नाही. तन्वी, तू जा. मी बघते काय होतंय ते."

​समाधानराव कडाडले, "सारिका, तुला कळतंय का तू काय बोलतेयस? घराची शिस्त मोडतेय ही मुलगी."
​सारिका शांतपणे म्हणाली, "शिस्त नाही, अहो, तुम्ही तुमचा अहंकार जोपासताय. तन्वी शिकलेली आहे, ती काही चुकीचं करत नाहीये. तिचा प्रगतीचा मार्ग रोखण्याचा अधिकार तुम्हाला किंवा सार्थकला कुणी दिला?"

​तन्वीने सार्थककडे पाहिलं. तो अतिशय रागात होता.
​"सार्थक,तुला माझी प्रगती म्हणजे तुझ्या अहंकारावर झालेला वार वाटतोय. पण मी आज जातेय, कारण मला स्वतःची ओळख हरवायची नाहीये." तन्वी निश्चयाने म्हणाली.

तन्वी कॉन्फरन्सला गेली. त्या तीन दिवसांत घरात खूप वाद झाले. समाधानरावांनी सारिकाशी बोलणं बंद केलं. सार्थक अस्वस्थ होता. त्याला घर खायला उठत होतं. त्याला जाणीव झाली की, ज्या घराची ती 'लक्ष्मी' आहे, तिच्याशिवाय घराला घरपण नाही.


तन्वी आपली बॅग रिकामी करत होती आणि सार्थक बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता.
​"तर... अखेर तू केलंस जे तुला करायचं होतं. घरच्यांच्या शब्दापेक्षा तुला तुझं ते 'करिअर' जास्त महत्त्वाचं वाटलं." सार्थक खोचकपणे म्हणाला.

"सार्थक, मी जे केलं ते माझ्या कामाचा भाग होतं. यात कोणाचा अपमान करण्याचा किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही." तन्वी कपड्यांच्या घड्या करत म्हणाली.

"हे पुस्तकी बोलणं सोडून दे तन्वी. प्रॅक्टिकली विचार कर. या घरात बाबांचा एक शब्द चालतो. आईने कधी त्यांच्या शब्दाबाहेर पाऊल टाकलं नाही. मग तुलाच इतकी खाज का आहे बाहेर पडण्याची?" सार्थक रागात म्हणाला.

"कारण आई स्वतःच मन मारून जगत आली सार्थक. त्यांनी त्यांच्या इच्छा, त्यांचं शिक्षण, त्यांचं स्वातंत्र्य तुझ्या बाबांच्या अहंकाराच्या पायाशी वाहून दिलं. तुला काय वाटतं, आई आनंदी आहे? नाही. त्या फक्त 'समाधानी' असण्याचं नाटक करतात. मला ते नाटक जमत नाही. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव हवी आहे." तितक्याच ठेक्यात तन्वीने उत्तर दिल.

"अस्तित्व म्हणजे काय? पैसे कमवणं? प्रसिद्धी मिळवणं? घर आणि नवरा यांच्याकडे दुर्लक्ष करून जे स्वातंत्र्य मिळतं, ते स्वातंत्र्य नसतं, तो स्वैराचार असतो." सार्थक अजूनही माघार घ्यायला तयार नव्हता.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →