जलदलेखन स्पर्धा मार्च 2026
अहंकाराचा उंबरठा - भाग 1
आज ऑफिसच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टच्या मिटिंगमुळे तन्वीला उशीर झाला. ती रात्री नऊ वाजता घरी आली. घरात शिरताच तिला वातावरणातला तणाव जाणवला. सासूबाई, सारिका, स्वयंपाकघरात होत्या, तर सासरे समाधानराव वर्तमानपत्र वाचत बसले होते. सार्थक हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी करत होता. कुणी काहीच बोललं नाही त्यामुळं तन्वीने स्वतःच ती वादळापूर्वीची शांतता मोडली.
"सॉरी, आज जरा जास्त उशीर झाला," तन्वी म्हणाली.
सार्थकने लॅपटॉपवरून नजर न हटवता उत्तर दिलं, "वेळेचं भान ठेवायला हवं तन्वी. बाबांना सवय नाहीये इतक्या उशिरा जेवायची. बायकोने वेळेवर घरी असावं, इतकी अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का!"
"सार्थक, मी कामात होते. तुला माहीत आहे आज महत्वाच्या प्रोजेक्टची डेडलाईन होती. आणि मी सकाळी जाताना सांगून गेले होते की आज मला उशीर होऊ शकतो. हवं तर आईना विचार."
समाधानराव मध्येच बोलले, "सूनबाई, काम तर आम्हीही केलं आयुष्यभर. पण घराकडे कधी दुर्लक्ष नाही केलं. स्त्रीने घराची लक्ष्मी होऊन राहावं, यातच तिचं सौख्य असतं." काहीक्षण तन्वीला वाटलं, हे 'सौख्य' की 'मर्यादा'?
तन्वी उच्चशिक्षित, महत्त्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचारांची मुलगी. एका मोठ्या ऍड एजेन्सी मध्ये ती 'क्रिएटीव्ह हेड' म्हणून काम करत होती. तिचं लग्न सार्थकाशी झालं. सार्थक सुद्धा एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. दिसायला दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत. पण लग्नानंतर काही दिवसांतच तन्वीला जाणीव झाली की, सुशिक्षित असणं आणि 'सुसंस्कृत' असणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. सुरुवातीला सगळं कसं व्यवस्थित होतं. पण हळूहळू सार्थकमधला 'पुरुष' डोकं वर काढू लागला. त्याला तन्वीचं यश आवडायचं, पण ते त्याच्या यशापेक्षा मोठं नसावं, ही त्याची सुप्त इच्छा होती.
जेव्हा सार्थकने तन्वीच्या प्रमोशनच्या बातमीवर नाक मुरडलं, तेव्हा सारिका बोलली, "अरे सार्थक, तन्वीला प्रमोशन मिळालंय, तिचं कौतुक करायचं सोडून तू तिला तिच्या जबाबदाऱ्या आठवण करून देतोयस?"
"आई, कौतुक आहेच ग, पण आता तिची पोस्ट मोठी झाली की तिला ट्रॅव्हलिंग वाढेल, मिटींग्स वाढतील. मग घराचं काय?" सार्थकाचा अहंकार त्याच्या शब्दातून स्पष्ट झळकत होता. त्याला भीती होती की तन्वीचं पगार आणि हुद्दा त्याच्यापेक्षा वाढला, तर समाजात त्याचं स्थान काय राहील?
जेवण झाल्यावर सारिका तन्वीच्या खोलीत आली. तन्वी डोळ्यात पाणी आणून बसली होती. "तन्वी, रडू नकोस ग," सारिका मायेने म्हणाली. "ह्या घरातला पुरुषी अहंकार जुना आहे. समाधानरावांनी मला कधी घराबाहेर पाऊल टाकू दिलं नाही, कारण त्यांना वाटायचं की मी स्वावलंबी झाले तर त्यांचं महत्त्व कमी होईल. पण तू तसं करू नकोस. तुझं स्वातंत्र्य कोणाच्या परवानगीवर अवलंबून नसावं."
सारिका, तन्वीची सासू, या सगळ्यातून स्वतः गेली होती. तिने समाधानरावांचा अहंकार वर्षानुवर्षे सोसला होता. पण तिला तिच्या सुनेचं आयुष्य स्वतःसारखं होऊ द्यायचं नव्हतं त्यामुळं ती तन्वीला सर्वतोपरी साथ देत होती.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
