प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: सल्ला भाग -१
निधी आणि मंदिरा दोघी एक दिवस आपल्या घरी नवीन आलेल्या सदस्याशी फोन वर बोलत होत्या.
" काय हे प्रभा, अगं हे असे नाही असे करायचे असते. " निधी आपली छोटी जाऊबाईला म्हणाली.
" नाही प्रभा वहिनी, हे असे करायला हवे. " मंदिरा आपल्या छोट्या वहिनीला म्हणाली.
नवीनच लग्न झाल्यामुळे प्रभाला कोणाचे ऐकावे हे समजत नव्हते. नणंद आणि मोठी जाऊ नेहमी फोन केला की आपल्या सल्ला द्यायला तयार असायच्या.
" आई, अगं मी कितीही काही केले ना, तरी त्या दोघींना आणि सासुबाई नेहमी मला मी चुकीचे कशी आहे, हेच दाखवता. " एकदिवस कंटाळून प्रभाने आपल्या आईला सांगितले.
" अगं, सगळीकडे हे असेच असते. तुला तरी एक जाऊबाई आणि एक नणंद आहे. मला तर तीन-तीन होत्या. माझं तर कधी कधी डोकं अक्षरशः बंद पडायचे का असेच वाटायचे. सुचत नसायचे. त्यात गोंधळ होऊन चुका झाल्या की बोलणी खावी लागायची ते वेगळे." आई आपला अनुभव सांगत होती.
" अगं, पण तुझा काळ वेगळा होता आणि आमचा वेगळा आहे. त्यात कोणाला मी काही सांगू शकत नाही." ती वैतागत म्हणाली.
" तू फक्त हो ला हो कर. नाही बोललीस तर अजून तू ऐकत नाही. कोणी काही सांगितले तर ऐकायचे नसते असेच बोलत राहतील. तसेच सर्व त्यांना सांगत बसू नको. तू स्वतःवर विश्वास ठेव मग होईल सर्व ठीक. स्वतःला त्रास करून त्याबाबत जास्त विचार करुन काहीच होणार नाही बाळा. " ती म्हणाली.
आपल्या मुलीचा कोणतीही गोष्ट करताना तिचा आत्मविश्वास ढासळत चालला आहे, हे प्रभाच्या आईला लक्षात आल्याने तिने आपल्या परीने तिला जास्त विचार करू नको म्हणून सांगितले.
" पुढच्या महिन्यात ताई आणि वहिनी येणार आहेत त्यामुळे काही सामान राहिले असेल तर आणायला बरे ." असे म्हणून प्रभाच्या नवऱ्याने तिला सांगितले.
" बरं. " असे म्हणून ती गप्प झाली.
रात्री खूप उशीर झाला होता. घड्याळात दोनचा टोला वाजून गेला होता तरी तिला झोप लागली नव्हती.
सकाळी सहा वाजता ती घाबरून उठली आणि त्यामुळे तिचा नवराही तिच्या जोरात ओरडण्याने उठला होता.
" काय झालं ? तू जोरात ओरडलीस. वाईट स्वप्न पडले होते का ? " त्याने विचारले.
" अ... हो... ना... ही..." ती गडबडून म्हणाली.
"झोप तू. आज डब्बा नको करुस. थोडावेळ शांतपणे झोप. " तो म्हणाला.
तिने ऑफिसला सुट्टीचा मेल पाठवला होता. दिवसभर झोपून घेतले. जेवण सुद्धा बाहेरून मागवले होते. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप सर्वांपासून आज जणू तिने लांब राहण्याचा प्रयत्न केला होता.
रात्री नवऱ्याने घरच्यांना ग्रुप व्हिडिओ कॉल लावून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली होती. तेवढ्यात रात्री ऑनलाईन जेवणाचे पार्सल मागवले होते ते प्रभाने दरवाजा उघडून घेतले. नंतर ती पिशवी डायनिंग टेबलवर ठेवून ती ताटं घेण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये गेली.
" हे काय भाऊजी, आज बाहेरचे जेवण वाटते. जाऊबाईना कंटाळा आला वाटते. " निधी म्हणाली.
" अरे बाळा, असे बाहेरचे खाणे चांगले नाही. कुठले पण पदार्थ वापरतात आणि कधी कधी तर शिळे अन्न असते तेच गरम करुन देतात. " त्याची मोठी बहीण मंदिरा म्हणाली.
हे सर्व आतून प्रभाने येताना ऐकले होते. तिला वाईटच वाटले. एकदिवस स्वतःसाठी बाहेरुन मागवले तर काय झाले. त्यात तिला आता नवऱ्याकडूनही काही अपेक्षा नव्हती. जेवण झाल्यावर फोन करायला हवा होता आणि घरीच जेवण बनवले असे सांगितले असते तर हा सल्ला ऐकायला मिळाला नसता. तिला सर्वजण दोन लोकांचे जेवण बनवायला कितीसा उशीर लागतो असे म्हणून ऐकवत होते, त्याचा तिला रागही येत होता आणि काही बोलू शकत नाही, म्हणून हतबल झाल्यासारखे वाटत होते.
"अगं ताई, तिची तब्येत बरी नाही ना, म्हणूनच बाहेरून मी मागवले." आपल्या बायकोचा क्षणांत पडलेला चेहरा पाहून प्रभाचा नवरा म्हणाला.
" असे बाहेरचे खाणार तर आजारीच पडणार ना. " निधी मोठ्या जावेचा तोरा मिरवत म्हणाली.
" हो, बरोबर बोलत आहेत मोठ्या वहिनी. साधा खिचडी भात तर बनवूच शकतो की. त्याला कितीसा वेळ लागतो. मी तर सलाईन लावून आली होती तरी घरी येऊन सर्व जेवण बनवले होते." मंदिरा फुशारक्या मारत सांगत होती.
प्रभाचे डोळे भरून आले होते. आपली एक मैत्रीण ही, लग्न करताना नणंद आणि जाऊबाई का नको म्हणत होती, ह्याचे कारण तिच्या समोर वर्चुअली बसलेल्या दोन स्त्रियांमुळे तिला उमजू लागले होते.
पुढे काय होईल ?
क्रमशः
© विद्या कुंभार
कथेचा भाग वाचून झाल्यावर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
