Login

अज्ञानातील सुख

कधी काही गोष्टी माहित नसणे फायद्याच्या ठरतात
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय - अज्ञानातील सुख

अज्ञानातील सुख

" निदान एका स्त्रीने तरी दुसऱ्या स्त्री ला समजून घ्यावं.ते तर दूर...

स्त्री म्हणून तिच्या वाट्याला आलेले दुःख ,तिच्या वेदना, पावलागणिक येणारे अनुभव...

तू समजूनच घेतले नाही गं...
तू आपल्याच कोषात गुरफटलेली.

मेघना! कसं असतं ना... ती बेडकाची गोष्ट माहिती आहे तुला? तो ज्या विहिरीत राहतो त्या विहिरीलाच आपलं जग मानतो.
तशी कूपमंडूक वृत्ती आहे तुझी.
तुझा विचारांचा परीघ तेवढाच .तुझं भावविश्व तेवढंच.

थोडं एक क्षणासाठी तिच्या जागेवर स्वतःला ठेवून बघ... मग कळतील वेदना.
तुझ्या पाठीशी हा कृष्ण उभा आहे. तुला कधी झळा सोसाव्याच लागल्या नाहीत.

मेघना,

ती एकाकी लढतेय..‌.

सॉरी, तिलाही आवडणार नाही,तिला असं दुबळं समजलेलं.ती लढतेय ...सक्षमपणे लढतेय.
तिने अपेक्षापण केली नव्हती कोणत्या मदतीची.

मलाच बघवत नव्हती तिची होरपळ. शेवटी तिचं बाळ ?तोही परका आहे का गं आपल्यासाठी?त्याचं शिक्षण अर्धवट राहू नये त्याला उच्च शिक्षण घेता यावं म्हणून फक्त...मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले एक कार्य एवढ्याच दृष्टिकोनातून बघ ना तू त्याकडे."

"बस्... बस झाला कांगावा.
कधीपासून सुरू आहे हे सगळं?
कळलंय मला."

"हो तेच, तेच सांगतोय मी. कधीपासून सुरू आहे हे सगळं.

तुला माहिती नव्हतं तर काहीच फरक पडला नाही तोपर्यंत ...माहीत झालं म्हणून फरक पडला."

'समोर नेला भारा तर डोळ्याला लागल्या धारा
मागे नेला भारा तर पाठ खाते वारा'
असं म्हणतात ते काही खोटं नाही."
मिलिंद उद्विग्न झाला होता मेघनाचे बोल ऐकून.

"हो,मग? आपल्यालाही मूलबाळं आहेत."

"आजवर काही कमी पडलं का?"

"मी कधीची म्हणते पाटल्या करू पाटल्या करू तर ते नशिबात नाही मेलीच्या. कमी काय पडायचं राहिलं? तेवढं मुलांना शिकवलं सगळ्यांना खाऊपिऊ घातलं की संपली का घरातली कर्तव्य?"

"अगं इतरांनाही मदत करतो गं आपण दयेपोटी.ती तर मोठी वहिनी.एकाच घरात किती आनंदाने एकत्र नांदत होतो.
बिचारीवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली आणि एकाची दोन घरं झालीत.
नाईलाज होता गं. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. म्हणून आई-बाबांनी विचारपूर्वक वेगळं करून दिले तिला तिच्या हिश्श्याचं देवून.
तू येण्यापूर्वी सुद्धा तिने घर सांभाळलं. आई-बाबांचं सगळं केलं. मी शिकायला म्हणून बाहेर पण मला घरची काळजी राहायची नाही.
आज आई-बाबा असते तर त्यांनी मदत केलीच असती ना गं?"

"मी फक्त त्याची फी भरतो.बाकी तर तिच करते सगळं.फक्त फोनवरून बोलणं,कधी जाऊन बघितलं नाही.तरी....
हे असले घाणेरडे आरोप?"

"मला अज्ञानात ठेवून का केलंत हे सगळं?"
"समजल्यानंतर काय महाभारत घडतेय?बघते आहेस ना तू... म्हणून."

"आज तो डॉक्टर झालाय. सकाळीच फोन आला त्याचा म्हणून मी पेढे घेऊन आलोय.
कौतुक करायचं सोडून तू काय अर्थ काढलेस गं?
वहिनी येतेय त्याला घेऊन आपल्या दोघांच्या पाया पडायला.
तेव्हा तरी शांत राहशील.
आपल्या घरातले हे वादविवाद त्याला तरी कळू देऊ नकोस किमान."

मेघनाला स्वतःचाच तिटकारा आला.काय वागलोत आपण?
पटकन् तिने डब्यातून एक पेढा उचलला आणि देवापुढे ठेवायला निघून गेली.

अज्ञानातल्या सुखाची किंमत तिला कळून चुकली होती.

कदाचित तिला आधी हे माहिती झालं असतं तर तिने करू दिले नसते. आज तो आपला पायावर उभा झालेला बघून आणि तेही डॉक्टर... तिला खूप आनंद झाला मनातून. घर पुन्हा सांधल्या गेलं होतं, मिलिंदसारखा सेतू होता म्हणून.
समाप्त
©®शरयू महाजन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →